१००वा दीक्षांत समारंभ उद्या
By Admin | Updated: September 25, 2014 01:31 IST2014-09-25T01:31:00+5:302014-09-25T01:31:00+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा बहुप्रतीक्षित शंभरावा दीक्षांत समारंभ शुक्रवार २६ सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. अमरावती मार्गावरील विद्यापीठाच्या रावबहादूर डी. लक्ष्मीनारायण

१००वा दीक्षांत समारंभ उद्या
नागपूर विद्यापीठ : माजी राष्ट्रपती कलाम राहणार उपस्थित
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा बहुप्रतीक्षित शंभरावा दीक्षांत समारंभ शुक्रवार २६ सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. अमरावती मार्गावरील विद्यापीठाच्या रावबहादूर डी. लक्ष्मीनारायण क्रीडांगणावर माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रमुख उपस्थितीत दीक्षांत समारंभ पार पडणार असल्याची माहिती प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी एसएफएस महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियंका बेरत्रमला सर्वाधिक १७ पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
दीक्षांत समारंभाला मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. अभय बंग, राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे शंभराव्या दीक्षांत समारंभात सुप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांना मानद डी. लिट. प्रदान केली जाणार आहे.
४३७ पदकांचे वाटप
दीक्षांत समारंभात २०१२ च्या उन्हाळी व हिवाळी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ६९ हजार ९४१ विद्यार्थ्यांना स्नातक व स्नातकोत्तर पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत. तसेच विविध परीक्षांमधील १८४ प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना २९२ सुवर्ण पदके, ४३ रौप्य पदके, १०२ पारितोषिके अशी एकूण ४३७ पदके आणि पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.(प्रतिनिधी)
प्रियंका बेरत्रमला सर्वाधिक पदक
एसएफएस महाविद्यालयाच्या प्रियंका बेरत्रम हिचा सर्वाधिक १७ पदके व पारितोषिकांनी सन्मान करण्यात येणार आहे. ती बी.एस्सी. अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी होती. त्याखालोखाल दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा आशुतोष मधुकर आपटे व जी.एच. रायसोनी कॉलेज आॅफ लॉ येथील खुशबू दिलीप छाजेड यांनी एलएलबी (पाच वर्षीय अभ्यासक्रम) परीक्षेत प्रत्येकी १५ पदके प्राप्त केली आहेत. ब्रह्मपुरी येथील डॉ. आंबेडकर कला-वाणिज्य महाविद्यालयाच्या नरेश माणिकराव मोरे एमए (इतिहास) या विषयात सर्वाधिक गुणांसह ११ पदकांचा मानकरी ठरला आहे.