१०० वा दीक्षांत समारंभ आठवड्यावर
By Admin | Updated: September 19, 2014 00:58 IST2014-09-19T00:58:14+5:302014-09-19T00:58:14+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शंभरावा दीक्षांत समारंभ अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला आहे. २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या सोहळ्यासाठी प्रशासनाकडून युद्धस्तरावर तयारी सुरू आहे.

१०० वा दीक्षांत समारंभ आठवड्यावर
नागपूर विद्यापीठ : प्रशासनाची युद्धस्तरावर तयारी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शंभरावा दीक्षांत समारंभ अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला आहे. २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या सोहळ्यासाठी प्रशासनाकडून युद्धस्तरावर तयारी सुरू आहे. या समारंभाबाबत निरनिराळ्या विभागांतील अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू असून तयारीत कुठेही कमतरता राहू नये याची विशेष काळजी घेण्यात येत आहे.
मागील वर्षीपासून वादात सापडलेला हा समारंभ भव्यपणे आयोजित करण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडणार आहे. विद्यापीठाच्या रावबहादूर डी. लक्ष्मीनारायण परिसरातील क्रीडांगणावर होणाऱ्या या ऐतिहासिक दीक्षांत समारंभास सुमारे तीन हजार निमंत्रित उपस्थित राहतील. विद्यापीठासमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे मान्यवरांना निमंत्रण पाठविणे. यासंदर्भात प्रशासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदारी विभागून दिली आहे. याशिवाय बक्षीस वितरण, सुरक्षा व्यवस्था, बैठक व्यवस्था इत्यादीसंदर्भात संपूर्ण ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार करण्यात आली आहे. विशेषत: बैठक व्यवस्थेदरम्यान कुठलाही गोंधळ होऊ नये, अशा सूचना प्रशासनाकडून आल्या आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी यासंबंधात विस्तृत आराखडाच तयार केला आहे.(प्रतिनिधी)
विजय भटकर यांना डी.लिट. उपाधीने गौरविणार
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शंभराव्या दीक्षांत समारंभाची प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यात प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ व परम महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांना डी.लिट. ही उपाधी देऊन गौरविण्यात येणार आहे. यासंदर्भात डॉ. भटकर यांना पत्र पाठविण्यात आले असून त्यांनी याला संमती दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांना त्यांनी दूरध्वनीवरून आपली संमती कळविली आहे.