पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारातून १० हजार झाडांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:07 IST2021-04-05T04:07:56+5:302021-04-05T04:07:56+5:30

नागपूर : आपल्या प्रियजनाचा अंत्यसंस्कार हा नातलगांसाठी दु:खाचा व भावनिकतेचा क्षण असताे. यावेळी हिशेब महत्त्वाचा नसताे. मात्र पर्यावरणाचा हिशेब ...

10,000 trees saved from eco-friendly cremation | पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारातून १० हजार झाडांना जीवदान

पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारातून १० हजार झाडांना जीवदान

नागपूर : आपल्या प्रियजनाचा अंत्यसंस्कार हा नातलगांसाठी दु:खाचा व भावनिकतेचा क्षण असताे. यावेळी हिशेब महत्त्वाचा नसताे. मात्र पर्यावरणाचा हिशेब आता प्रत्येकाला ठेवणे गरजेचे झाले आहे. या हिशेबाची नागपूरकरांना बऱ्यापैकी जाणीव झाली असून जन सहकार्याने पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराची चळवळ यशस्वी ठरत आहे. २०२०-२१ या सरलेल्या आर्थिक वर्षाचा हिशेब केल्यास शहरातील घाटांवर हाेणाऱ्या पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारामुळे १० हजार झाडांना जीवदान देणे शक्य झाले आहे.

शेतातील कचऱ्यापासून माेक्षकाष्ठ निर्माण करून पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचे प्रणेते ठरलेले विजय लिमये यांच्या प्रयत्नांना महापालिकेच्या सहकार्याने चांगले यश मिळायला लागले आहे. लिमये यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील विविध दहनघाटांवर ५००० पेक्षा जास्त मृतदेहांचे संपूर्ण पर्यावरणपूरक पद्धतीने अंत्यसंस्कार करून लाकडाचा उपयाेग कमी केला आणि गरजेनुसार दहा हजार झाडांची कत्तल राेखणे शक्य झाले. बीज लावण्यापासून झाडाची पूर्ण वाढ हाेइपर्यंत किमान २००० रुपये खर्च गृहीत धरल्यास या झाडांना वाचवून आपण एक काेटी रुपयांची बचतही केली आहे. विजय लिमये यांनी शेतातील काडीकचऱ्याचा उपयाेग करून मृतदेह ज्वलनासाठी माेक्षकाष्ठाची निर्मिती केली. त्यांनी सांगितले, गेल्या आर्थिक वर्षात ५००० मृतदेहांचा अग्निसंस्कार करण्यासाठी शहरातील विविध स्मशानघाटावर १२५० टन माेक्षकाष्ठ उपलब्ध करण्यात आले. शेतकऱ्यांचा कचरा विकत घेऊन त्यांनाही आर्थिक लाभ देणे शक्य झाले आहे. एवढेच नाही तर एवढ्या माेठ्या प्रमाणात माेक्षकाष्ठाची निर्मिती करून ग्रामीण भागातील ५० अकुशल कामगारांच्या हाताला किमान वर्षभर काम मिळवून देण्यात यश आले आहे.

हे सर्व घडत असताना, हवेचे प्रदूषण हा मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही. शहरातील सहा स्मशान घाटावर पर्यावरणपूरक अंत्यविधीची सुविधा उपलब्ध केल्यामुळे येथील हवेचे प्रदूषण ५० टक्क्यांपेक्षा कमी करण्यात यशस्वी झाल्याचा दावा लिमये यांनी केला आहे. त्यामुळे वृक्षसंवर्धनासह प्रदूषण कमी करून पर्यावरण संरक्षणाची साखळी पूर्ण झाली आहे.

पर्यावरणपूरक अंत्यविधी हा उपक्रम नागपुरात पाच वर्षांपूर्वी सुरू केला. पर्यावरणप्रेमी नागपूरकरांनी या उपक्रमास सुरवातीपासूनच मनापासून सहकार्य केले आहे. त्यामुळे इतक्या वर्षात जवळपास लाखो झाडांना जीवदान देण्यात यशस्वी झालो आहोत. यासाठी नागपूरकरांचे कौतुकच आहे. इतर शहरातील लोकांनी नागपूर शहराचा आदर्श घेऊन झाडे आणि पर्यावरण वाचवण्यासाठी योगदान द्यावे.

- विजय लिमये, पर्यावरण मित्र

Web Title: 10,000 trees saved from eco-friendly cremation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.