शंभरीसाठी डावावर नोकरी
By Admin | Updated: January 13, 2017 02:01 IST2017-01-13T02:01:12+5:302017-01-13T02:01:12+5:30
शंभराच्या नोटेसाठी एका पोलिसाने आपली नोकरी डावावर लावली. त्याने दुचाकीचालकाकडून शंभर रुपयाची लाच स्वीकारली

शंभरीसाठी डावावर नोकरी
नागपूर : शंभराच्या नोटेसाठी एका पोलिसाने आपली नोकरी डावावर लावली. त्याने दुचाकीचालकाकडून शंभर रुपयाची लाच स्वीकारली अन् लाच देणाऱ्याच्या साथीदाराने मोबाईल कॅमेऱ्यात त्याला कैद केले. नंतर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्हिडिओची गंभीर दखल घेतली असून, दोषी पोलीस कर्मचारी धनराज ठोंबरे याला निलंबित करण्यात आले आहे.
काही पोलीस कर्मचारी रस्त्यावर उभे राहून वाहनचालकांना चिरीमिरीसाठी त्रस्त करतात. सकाळपासून पोलिसांची ही वसुली मोहीम सुरू होते. रोजचे दोन तीन हजार सहज खिशात पडत असल्याने एकमेकाचे पाहून अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी हा गोरखधंदा वेगवेगळ्या भागात सुरू केला आहे. बुधवारी दुपारी अशाच पद्धतीने हनुमाननगर बास्केट बॉल ग्राऊंडजवळ एका पोलिसाची वसुली मोहीम सुरू होती. एका दुचाकीचालकाला त्याने थांबवले अन् परवाना (स्मार्ट कार्ड) हातात घेतल्यानंतर हेल्मेट तसेच अन्य कागदपत्रांची विचारणा करू लागला. वाहनचालकाने सहजपणे पैशाचे पाकिट काढले. त्यातील शंभराची नोट पोलीस शिपायाच्या हातात ठेवली. त्यानंतर पोलिसाने स्मार्ट कार्ड त्याला परत केले.
पोलीस मागे वळला अन् दुचाकीचालकही तेथून निघाला. मात्र, हा संपूर्ण घटनाक्रम एका मोबाईलधारकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ बुधवारी सायंकाळपासून व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तो व्हिडिओ बघून संबंधित पोलीस कर्मचारी, घटनास्थळ आदीची चौकशी सुरू केली. या संदर्भात गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आम्ही या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे सांगितले. पोलिसांच्या हातात नोट कोंबणारा तरुण कोण ते स्पष्ट झालेले नाही. मात्र, आम्ही या प्रकरणाची चौकशी करीत असल्याचे सांगितले होते. शेवटी रात्री त्याला निलंबित करण्यात आली आले. (प्रतिनिधी)
ठरवून केला गेम !
दुचाकीचालकाने काहीही उजर न करता पोलिसाच्या हातात शंभराची नोट ठेवली. त्याचे शुटींग करताना पोलीस स्पष्टपणे त्यात दिसावा, याचीही नोट देणाऱ्या आणि शुटींग करणाऱ्याने काळजी घेतल्याचे जाणवते. वारंवार हा पोलीस कर्मचारी त्या दुचाकीचालकाकडून वसुली करीत असावा आणि त्यामुळेच कंटाळलेल्या दुचाकीचालकाने साथीदाराच्या (शुटींग करणाऱ्याच्या) मदतीने त्याचा गेम केला असावा, अशी चर्चा या व्हिडिओच्या निमित्ताने सुरू झाली आहे.