१०० कोटींचा व्यवहार ठप्प
By Admin | Updated: December 6, 2014 02:31 IST2014-12-06T02:31:02+5:302014-12-06T02:31:02+5:30
पगारवाढीसह विविध मागण्यांना घेऊन शुक्रवारी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय संप पुकारला होता. सुमारे १०० कोटी रुपयांचा व्यवहार प्रभावित झाला.

१०० कोटींचा व्यवहार ठप्प
नागपूर : पगारवाढीसह विविध मागण्यांना घेऊन शुक्रवारी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय संप पुकारला होता. सुमारे १०० कोटी रुपयांचा व्यवहार प्रभावित झाला. युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनच्या (यूएफबीयू)आवाहनावर पश्चिम झोनमधील बँकेने हा संप केला होता.
वेतनवाढीच्या प्रश्नावर गेल्या महिन्यात देशव्यापी संप केल्यानंतरही तोडगा न निघाल्याने बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी मंगळवारपासून विभागीय संप पुकारला. या संपाच्या जाहीर वेळापत्रकानुसार शुक्रवारी महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि दीव-दमण येथील बँक कर्मचारी यांनी एक दिवसाचा संप केला. आज संपादरम्यान किंग्जवेस्थित स्टेट बँकआॅफ इंडिया कार्यालयाच्या समोरून रॅली निघाली. यावेळी पुरुषांसोबतच महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. हातात झेंडे, बॅनर, पोस्टर आदी घेऊन आंदोलनकर्ते सिव्हिल लाईन्स येथील अलाहाबाद बँक परिसरात पोहोचले. येथे रॅलीचे रूपांतर सभेत झाले.
बँक कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पाशर््वभूमीवर इंडियन बँक्स असोसिएशनच्या (आयबीए) निवेदनानुसार बँक कर्मचाऱ्यांची २५ टक्क्यांची पगारवाढीची मागणी मान्य करता येणार नसल्याचे नमूद केले आहे. पगारवाढ ही मूळ पगार आणि कार्यक्षमतेवर आधारित अशा दोन गटांत विभागून देण्याचा प्रस्ताव आयबीएने ठेवला होता, मात्र संघटनांनी हा प्रस्ताव अमान्य केला. बँकांचा नक्त नफा कमी झाला असून, कर्मचारीवर्ग व त्यांचा महागाई भत्ताही वाढलेला आहे. त्यामुळे बँकांना कर्मचाऱ्यांना अपेक्षित असलेली पगारवाढ देता येणार नाही, असे आयबीएने जाहीर केले आहे. यावर या जाहीर सभेत उपस्थित विविध युनियनच्या मान्यवरांनी आपले विचार मांडले. यूएफबीयूचे विदर्भ समन्वयक बी.के. तलवारे यांनी सांगितले की, मागण्या मान्य न झाल्यास येत्या काही दिवसांत अनिश्चितकालीन संप पुकारण्यात येईल.
यावेळी यूएफबीयूशी जुडलेले एआयबीओसी, एआयबीईए, एनसीबीई, एआयबीओसी, बीईएफआय, आयएनबीईएफ, आयएनबीओसी, एनडीबीडब्ल्यू व एनडीबीडी संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी होते. (प्रतिनिधी)