जलसंधारण महामंडळास १० हजार कोटी देणार
By Admin | Updated: December 16, 2015 03:06 IST2015-12-16T03:06:49+5:302015-12-16T03:06:49+5:30
कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाईल आणि या महामंडळास २५ वर्षांची मुदतवाढ देण्यात येईल, ...

जलसंधारण महामंडळास १० हजार कोटी देणार
२५ वर्षांची मुदतवाढही मिळणार
नागपूर : कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाईल आणि या महामंडळास २५ वर्षांची मुदतवाढ देण्यात येईल, असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विधानसभेत जाहीर केले.
कोरडवाहू शेतीच्या शाश्वत विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांची योजना जाहीर केली आहे. त्या अंतर्गत महामंडळाची वाटचाल सुरू राहील. महामंडळाची उपयुक्तता लक्षात घेऊन त्याला २५ वर्षांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याबाबत तसेच महामंडळाला दहा हजार कोटी रुपये देण्यासंदर्भात येत्या तीन महिन्यात अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे राज्यमंत्री म्हणाले.
सदानंद चव्हाण, राजन साळवी, वैभव नाईक, डॉ. अनिल बोंडे, शशिकांत शिंदे, गणपतराव देशमुख, राजेश टोपे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना शिवतारे यांनी सांगितले की, महामंडळाने यापूर्वी सुरू केलेले आणि ७५ टक्क्यांहून अधिक काम झालेले प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील. सुमारे १२०० कोटी रुपयांची कामे सध्या सुरू आहेत. तथापि १९०० कोटी रुपयांची दोन हजाराहून अधिक कामे रद्द करण्यात आली आहेत. दोन मुख्य अभियंत्यांनी कामांची चौकशी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, असे राज्यमंत्री म्हणाले.(प्रतिनिधी)