विजय नागपुरे लोकमत न्यूज नेटवर्ककळमेश्वर : राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना ग्रामीण भागात जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाकडून प्रभावीपणे राबविण्यात येत असतात. मात्र, काही वर्षापासून या विभागातील अभियंत्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. यामुळे तालुक्यात होणाऱ्या विकासकामांची गुणवत्ता तपासणे कठीण झाले असून, योजना राबवायच्या कशा, असा यक्ष प्रश्न लघु पाटबंधारे उपविभागाला पडला आहे.
ग्रामीण भागात लघु पाटबंधारे योजना घेण्यासाठी संबंधित गावच्या ग्रामसभेने ठराव करून मागणी नोंदवणे आवश्यक आहे. तसेच, योजना पूर्ण झाल्यानंतर ती ताब्यात घेऊन तिची देखभाल करणे आवश्यक आहे. सध्या जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाकडून जलयुक्त शिवार, बंधारे दुरुस्ती करणे, गाळमुक्त धरण आणि राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत विविध कामे हाती घेण्यात आली आहे. मात्र, ही कामे करताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कळमेश्वर तालुक्यात होणाऱ्या विकासकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाच शाखा अभियंत्यांची पदे निर्माण करण्यात आली आहे. परंतु, ही पाचही पदे रिक्त आहेत. तसेच कार्यालयीन कामकाजाकरिता वरिष्ठ सहायक पद मंजूर असून रिक्त आहे. सोबतच कनिष्ठ सहायकाच्या दोन मंजूर पदांपैकी एक पद रिक्त आहे. परिचराचे तीन पदे मंजूर असून, यापैकी एक पद रिक्त आहे. शाखा अभियंत्यांचे पाचही पदे रिक्त असल्याने स्थापत्य अभियांत्रिकी सहायक प्रतीक गजभिये व कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांवर कामाचा भार आला आहे.
वाहनचालक पद रिक्तजिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभाग कळमेश्वरमधील अभियंत्यांना सुरू असलेल्या विकासकामांच्या ठिकाणी भेट देण्याकरिता चारचाकी वाहन व एका वाहनचालकाची नियुक्ती करण्यात आली आहे, परंतु मागील अनेक वर्षापासून वाहनचालकाचे पद रिक्त असल्याने त्या वाहनाचा उपयोग शून्य आहे.चालकाचे पद जर भरले गेले नाही, तर लाखो रुपयांचे चारचाकी वाहन जागेवरच भंगारावस्थेत जाण्याची चिन्हे आहेत.
जि. प. लघु पाटबंधारे विभागाची कामेजिल्हा वार्षिक योजना, जिल्हा खनिज विकास निधी, जलयुक्त शिवार योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना, अमृत सरोवर योजनेअंतर्गत विभागामार्फत नवीन बंधारे बांधकाम, जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती, तलाव दुरुस्ती, तलाव खोलीकरण, नाला खोलीकरण व रुंदीकरणाची कामे केली जातात.
जलसंधारण अधिकारी पदाचा कार्यभार 'प्रभारी'वरजि. प. लघु पाटबंधारे उपविभाग कळमेश्वरमार्फत चालत असणाऱ्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय जलसंधारण अधिकारी हे पद निर्माण करण्यात आले आहे. परंतु, उपलब्ध माहितीनुसार या पदाचा कारभार इतर विभागांतील प्रभारी अधिकाऱ्यांनीच चालविला असल्याचे माहितीवरून स्पष्ट होते. कार्यालयातील माहिती फलकावरून लक्षात येते की, २०२० पासून ते २०२५ पर्यंत उपविभागीय जलसंधारण अधिकारी पदाचा कार्यभार प्रभारी अधिकाऱ्यांवरच अवलंबून आहे. १ ऑगस्ट २०२० पासून आतापर्यंत आठ प्रभारी अधिकारी झाले असून, सध्या उपविभागीय अभियंता योगेश इंगळे यांच्याकडे ३१ आक्टोंबर २०२३ पासून प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.