पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसध्ये १० लाखाचा गांजा जप्त
By Admin | Updated: May 7, 2015 02:11 IST2015-05-07T02:11:59+5:302015-05-07T02:11:59+5:30
पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसने सुरतला १०० किलो १०९ ग्रॅम गांजा नेत असलेल्या तीन आरोपींना नागपूर शहर

पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसध्ये १० लाखाचा गांजा जप्त
नागपूर : पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसने सुरतला १०० किलो १०९ ग्रॅम गांजा नेत असलेल्या तीन आरोपींना नागपूर शहर गुन्हे शाखेच्या आणि लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हेशाखेतर्फे रंगेहाथ अटक करून त्यांच्याकडून १० लाख ९ हजार १०० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
रेल्वेगाडी क्रमांक १२८४३ पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमधून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती नागपूर शहर गुन्हे शाखा आणि लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहर गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडित सोनवणे, लोहमार्ग पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार, अनुप अढाऊ, प्रवीण राठोड, अशोक हनवते, रवींद्र सावजी, बाबुसिंग ठाकूर, संतोष चौबे, नरेंद्र चौधरी, मुश्ताक शेख, हवालदार गणेश लढे, गजानन ठाकूर, शैलेश ठवरे, बच्चू तिवारी, प्रकाश सिडाम, नितीन रांगणे, सतीश पाटील, किशोर महंत, प्रफुल्ल बोंद्रे, सय्यद वाहिद, दत्ता घुगल यांनी सापळा रचला. पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस दुपारी २.५० वाजता प्लॅटफार्म क्रमांक ३ वर येताच या गाडीतील आरोपींना त्यांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले. सुकेश वेणुधर महाराणा (२०) रा. राजस जि. खुर्दा (ओडिशा), प्रशांत कुमार बाउरी बंधूमहापात्रा (२२) रा. कदवा, जि. पुरी (ओडिशा) आणि प्रमोद महेंद्र बागरसिंग (२२) रा. घोगोपुर जि. खुर्दा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडुन १०० किलो १०९ ग्रॅम वजनाचा आणि १० लाख ९ हजार १०० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)