१० दिवस पाणी संकट
By Admin | Updated: November 19, 2014 00:49 IST2014-11-19T00:49:14+5:302014-11-19T00:49:14+5:30
गोरेवाडा तलावाच्या पाणी पातळीत विक्रमी घट होऊन ती ३१२.५० मीटरपर्यत खाली आली आहे. १८ नोव्हेंबरला तलावातील पाणी पातळीचा हा नीचांक नोंदविण्यात आला आहे.

१० दिवस पाणी संकट
गोरेवाडा तलाव : पातळी ३१२.५० मीटरवर
नागपूर : गोरेवाडा तलावाच्या पाणी पातळीत विक्रमी घट होऊन ती ३१२.५० मीटरपर्यत खाली आली आहे. १८ नोव्हेंबरला तलावातील पाणी पातळीचा हा नीचांक नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या पश्चिम, दक्षिण-पश्चिम, दक्षिण आणि मध्य भागातील नागरिकांना पुढील दहा दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. अकस्मात उद्भवलेल्या पाणी टंचाईमुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे.
शहराच्या ६५ टक्के भागाला गोरेवाडा तलावातून पाणी पुरवठा केला जातो. परंतु तलावाला पुरवठा करणाऱ्या नवेगाव- खैरी प्रकल्पाचा उजवा कालवा फुटला आहे. या महिन्यात दोनदा हा कालवा फुटला. कालव्याला वारंवार मोठमोठे भगदाड पडत असल्याने गोरेवाडा तलावाच्या पाणी पातळीत विक्रमी घट झाली आहे. यामुळे शहराला होणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. सद्यस्थितीत तलावतील पाणी पातळी ३१२.५० मीटरपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे शहराच्या बहुसंख्य भागाला मर्यादित पाणी पुरवठा होणार आहे.
गोरेवाडा तलावाची पातळी साधारणपणे ३१३ मीटर असली आणि तलावाला कालव्यावदारे ४३० ते ४४० एमएलडी पाणी पुरवठा झाला तरी शहराला पुरेसा पाणी पुरवठा करता येतो.
परंतु पेंच -नवेगाव खैरी धरणाच्या ७ कि.मी.अंतरावर बाभूळखेडा गावाजवळ उजवा कालवा फु टल्याने पाटबंधारे विभागाने कालव्यातील पाणी प्रवाह १३ नोव्हेंबरपासून बंद केला आहे. नवेगाव खैरी धरणावरून आरबीसीमध्ये पाणी वळविण्यासाठी धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे कालव्याचा प्रवाह थांबल्याने गोरेवाडा तलावातील पाणी पातळी पूर्णपणे कमी झाली आहे.
१४ नोव्हेंबरला गोरेवाडा तलावाची पाणी पातळी ३१३.१४ मीटर होती. १५ नोव्हेंबरला ती ३१२.८८ मीटर, १६ तारखेला ३१२.४० तर १७ व १८ नोव्हेंबरला ती ३१२.५० मीटरपर्यंत खाली गेली आहे. ३१ आॅक्टोबरला पेंच नवेगाव खैरी प्रकल्पाच्या १९ कि.मी. अंतरावर राईट बॅक कॅनल पाटणसावंगीजवळ एका ठिकाणी फुटला होता. त्यामुळे पाटबंधारे विभागाला ३१ आॅक्टोबरच्या संध्याकाळपासून पाण्याचा प्रवाह बंद करावा लागला होता. परिणामी शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. सद्यस्थितीत गोरेवाडा तलावातील पाणी पातळी ३१२.५० मीटर आहे. १९ नोव्हेंबरला ती ३१२.६० मीटर होण्याची शक्यता आहे. तरीही पुढील १० दिवस शहराच्या पश्चिम, दक्षिण-पश्चिम, दक्षिण आणि मध्य भागाचा पाणी पुरवठा बाधित राहणार आहे.
दुरुस्तीनंतर पाटबंधारे विभाग महादुला येथून दररोज पूर्णक्षमतेने ४५० एमएलडी पाणी उचलून गोरेवाडा तलावाच्या पातळीत वाढ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यानंतरही तलावाच्या पातळीत जेमतेम ४ ते ५ से.मी. पाण्याची वाढ होत आहे. टंचाईमुळे गैरसोय होत असली तरी लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ओसीडब्ल्यूने केले आहे. (प्रतिनिधी)