युगंधर योगाचार्य

By Admin | Updated: August 23, 2014 14:30 IST2014-08-23T14:30:54+5:302014-08-23T14:30:54+5:30

प्राचीन भारतीय विद्येची साधना करणे वेडेपणाचे समजले जात होते, त्या काळात अत्यंत परिश्रमाने, चिकाटीने योगविद्या आत्मसात करून एका व्यक्तीने त्यावर आपले नाव कोरले. योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार असे त्यांचे नाव. देशातच नव्हे, तर परदेशांतही योगासनांचा प्रसार करून ‘योगविद्येचे भीष्मपितामह’ अशा पदवीला पोहोचलेल्या गुरुजींचे अखेरच्या आजारातील वागणे, बोलणे एखाद्या योग्याला साजेसेच होते. त्याचा अनुभव घेतलेल्या त्यांच्या शिष्याचे मनोगत.

Yugandhar Yogacharya | युगंधर योगाचार्य

युगंधर योगाचार्य

 डॉ. मनोज नाईक

 
मरणास प्रत्येक मानव घाबरतो व त्या तीव्र भीतीपोटी त्याला खूप मानसिक त्रास होतो. याला योगशास्त्रात क्लेश म्हणतात. पंचक्लेशांमध्ये अभिनिवेश हा सर्वांत महान क्लेश आहे. अभिनिवेश म्हणजे मृत्यूला सामोरे जाण्यास घाबरणे. क्लेश कमी करून नाहीसे करणे, हे योगशास्त्राचे ध्येय होय. अभिनिवेशावर मात करणे हे योगसाधनेमुळे योग्याला साध्य होते. आजच्या युगात हे योगी म्हणजे जगप्रसिद्ध योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार. जीवनातील ८0 वर्षे गुरुजींनी जगभर योगप्रचार व प्रसार केला. त्यांची अंतकालातील वागणूकही पुढील अनेक शतके मानवतेला शिक्षण देणारी आहे. या धीरोदात्त वागणुकीचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला मिळाले. त्यांचा एक शिष्य व डॉक्टर म्हणूनही हा अनुभव अविस्मरणीय आहे.
बालवयात गुरुजींना खूप व्याधी झाल्या. त्यांनी योगसाधनेने (आसन व प्राणायामाने) त्यावर मात केली व उत्तम स्वास्थ्य उपभोगले. आजार, दमणूक, थकणे, नकारात्मक दृष्टिकोन त्यांना कधीच माहीत नव्हता. अथक परिश्रम, मेहनत व भ्रमण करून अनेक राष्ट्रांमध्ये त्यांनी हा अवघड विषय सामान्य लोकांपर्यंत पोहोचवला. योग शिक्षण व योग प्रसाराचा त्यांचा यज्ञ अखंड सुरू होता. त्यांना हृदयविकाराचे दोन झटके येऊन गेले. पहिला वयाच्या ७८व्या वर्षी. छाती दुखल्यावर घाम आल्यामुळे. मला गीताताईंनी रात्री घरी बोलावले. तपासण्यांमध्ये हृदयविकार दिसत होता. त्यांना आयसीयूमध्ये उपचारांसाठी दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यांनी स्पष्टपणे नकार दिला व मला सांगितले, ‘‘मी अँडमिट होणार नाही. औषधे घरीच द्या.’’
त्यांनी कोणत्याही तपासण्या केल्या नाहीत. औषधांबरोबरच हृदयाला पोषक अशी आसन साधना सुरूच ठेवली. हळूहळू तब्येत चांगली झाली व केवळ ४ आठवड्यांत पूर्ववत प्रॅक्टिस सुरू झाली. हार्टअँटॅक माहिती असून, जाणीवपूर्वक अँडमिट न होऊन, साध्या गोळ्या व योगोपचारावर घरी बरे होण्याचे असे उदाहरण  कुठेच नाही. 
दोन वर्षांनी म्हणजे ८0 वय असताना दुसरा अँटॅक आला. त्याही वेळी रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. मात्र त्यांनी नकार दिला. म्हणाले, ‘‘मनोज, मी अँडमिट होणार नाही. मला अँटॅक आला आहे, हे मला माहिती आहे. मी घरीच देवाजवळ आहे, काळजी करू नको. मी बरा होईन.’’ सल्ला नाकारल्यावर डॉक्टर असला, तरी रागच येतो. मी रागाने औषधे लिहून दिली.
पुन्हा तोच चमत्कार झाला. रोज घरी औषधांबरोबर आसन व प्राणायाम साधना दुसर्‍या दिवसापासून चालूच राहिली. हळूहळू रिकव्हर होऊन बरेही झाले. मला एकदा जवळ बोलावून त्यांनी विचारले, ‘‘काय रे, मृत्यूच्या तोंडातून बाहेर आलो की नाही?’’
बरे झाल्यावर पुन्हा त्यांची अथक साधना सुरूच राहिली. याला योगिक भाषेत ‘तप व तीव्र साधना’ असे संबोधतात. रुग्णांकडून आसने अचूकपणे करून घेणे ही एक अवघड कला आहे. परिश्रमाने गुरुजींनी ती साध्य केली होती. त्यांच्या कमजोर होत चाललेल्या हृदयावर याचा ताण यायचा; मात्र तरीही गुरुजी हे सर्व करत. देश-परदेशांत त्यांचा प्रवासही खूप होत असे.
 या कठोर परिश्रमाचे कारण योग प्रसार व प्रचार हे  त्यांनी आपले आद्य कर्तव्य मानले होते. 
पण, हा ताण  पुढची १५-१६ वर्षे त्यांच्या हृदयाला कमजोर करत गेला. अधूनमधून खोकला, पायावर सूज व दम लागणे. गोळ्या दिल्यावर आराम पडायचा.  पद्मविभूषण समारंभाचा ऐन उन्हाळ्यातला दिल्लीचा  प्रवास त्यांना सहन नाही झाला. त्यानंतर जून, मेमध्ये महिनाभर बेल्लूर प्रवास, तिथले शिकवणे याने चांगलाच सेट बॅक बसला. गुरुजींची प्रकृती ढासळली. शेवटी मी अनावर होऊन विनवणी केली, ‘‘गुरुजी, अँडमिट होता का?’’ उत्तर तेच, ‘‘नाही.’’ मी आतील आक्रोश आवरून कारण विचारल्यावर त्यांनी अविस्मरणीय उत्तर दिले.
‘‘हे पाहा मनोज, माझे वय ९६ झाले आहे. मी राजासारखा जगलो आहे. आता माझी वेळ येत चाललेली आहे. मी कोणालाही कधीही दुखावलेले नाही. माझी कोणाशीही शत्रुता नाही. देवाने मला ज्या कामासाठी पृथ्वीवर आणलेले आहे (आसन, प्राणायाम विद्येचा प्रचार, प्रसार व त्यांची पुनस्र्थापना करणे), ते कार्य पूर्णपणे साध्य झालेले आहे. माझी विद्या अंत:करणापासून मी सगळ्यांना शिकवलेली आहे व वाटलेली आहे. माझ्याकडे मी काहीच राखून ठेवलेले नाही. मी पूर्णपणे संतुष्ट आहे व मरणाच्या दारात माझ्या मनात आता काहीही नाही. गीतेत काय सांगितले आहे, आत्म्यामध्ये शरीर हे वस्त्र आहे. वस्त्र जीर्ण झाल्यावर आत्मा हे शरीर बदलतो. ती वेळ आली आहे.’’ 
मृत्यूच्या दारावर असलेल्या योग्याच्या मुखातून हे शब्द ऐकल्यावर योगिक विचार म्हणजे काय, ते समजले. जशी वाचा, तसेच वागणे पाहिजे. हे योग साधनेने आणि योग्यालाच येऊ शकते.
 मी माझ्या कार्डिओलॉजिस्ट मित्र डॉ. धोपेश्‍वरकर, डॉ. तुषार दिघे यांना बोलावले. त्यांनी तपासण्या केल्या. त्यात हृदयाची क्षमता खूप कमी झाल्याचे दिसले. ‘युरीन’चे प्रमाण खूप कमी झाले होते. त्यामुळे किडनीवर ताण येत होता. इंजेक्शन घेतल्यावर योगाची प्रॅक्टिस, मग परत इंजेक्शन, असे सुरू झाले. हात मोकळे ठेवले, तरच साधना शक्य झाली असती, म्हणून इंजेक्शन देऊन सुई लगेच काढून घ्यायचे ठरले. इंजेक्शनच्या वेळासुद्धा आसन साधनेत बाधा येऊ नये म्हणून अलीकडे किंवा पलीकडे ढकलायचो. असे साधारण १७ ते १८ दिवस चालू राहिले.
रोज शिरेतून तपासायला रक्त काढणेही चालू होते. एकदाही तक्रार नाही, कण्हणे नाही. हे आश्‍चर्यच होते. परिचारिका इतक्या प्रभावित झाल्या, त्यातली एक तर गुरुजींना ‘सुपरमॅन’ म्हणायची. त्यांची नात अभिजाता व मुली सुनीता व सुचिता यांनी दिवसरात्र एक करून त्यांची काळजी घेतली. राया ढवळे, उदय भोसले यांनी या काळात गुरुजींसाठी खूप परिश्रम घेतले. गुरुजी आजारी आहेत, म्हणून काही तरी कारण काढून ते घरी रेंगाळत बसायचे. जास्त बसल्यावर गुरुजी म्हणायचे, ‘‘जा रे बाबा, इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन प्रॅक्टिस करा. आज काय सुट्टी घ्यायचे ठरवले आहे का?’’ 
‘कसे वाटते?’ विचारल्यावर त्यांची कधी तक्रार म्हणून नसायची. एकदा मी विचारले, ‘‘दम कसा आहे?’’ तेव्हा म्हणाले, ‘‘थांब.’’ लगेच अधोमुख स्वस्तिकासन केले व म्हणाले, ‘‘काल हे आसन करता येत नव्हते. आज जमत आहे, म्हणजे सुधारणा आहे.’’ इंजेक्शन, औषधे थोडाच असर दाखवत होते; पण त्यांचे स्वत:चे प्रयत्न चालू असायचे. २-४ दिवस तर रात्रभर त्यांची आसने चालू होती. दुसर्‍या दिवशी म्हणाले, ‘मला आसनातच बरे वाटते. रात्रभर आसने केली. सध्या रात्र माझा दिवस आहे व दिवस माझी रात्र आहे.’’ ‘या निशा सर्व भूतानां तस्याम् जागृति संयमि, तस्यम् जागृति भूतानामए सा निशा पश्यतो मुने:’ या गीतेतील योग्याच्या वर्णनाप्रमाणेच त्यांचे हे वागणे, बोलणे होते.
डॉ. धोपेश्‍वर यांना त्यांच्या त्या अवस्थेतही गुडघ्याच्या तक्रारींवर त्यांनी उपाय व आसने सांगितली. रोज भेटल्यावर ते म्हणायचे, ‘‘काय रे, माझी रिकव्हरी हा चमत्कार आहे का नाही, हे तुमच्या शास्त्राला समजणार नाही.’’ गुरुजी हे खरंच न समजणारा चमत्कार, गूढ व वैद्यकीयशास्त्राच्या आकलनापलीकडचे आहेत.
११ ऑगस्टला ४-५ वेळा घरी त्यांना चक्कर येऊन ते बेशुद्ध झाले. ४५ सेकंदांत शुद्ध आल्यावर सुचिताने विचारले, ‘‘काय झाले?’’ ते म्हणाले, ‘‘काही नाही गं, प्राण व प्रज्ञा यांच्यात थोडं डिसकनेक्शन झाले.’’ घरच्यांनी पुन्हा रुग्णालयात दाखल होण्याची विनंती केल्यावर ते म्हणाले, ‘‘हे पाहा, आतापर्यंत प्राण आणि प्रज्ञा (विवेक व बुद्धी) स्थिर होती. त्यामुळे मी नाही म्हणालो. पण, आता मला निर्णय घेण्याची क्षमता उरलेली नाही. पुढच्या उपचारांचा निर्णय मी तुमच्यावर सोपवतो. मी आंतरिक स्थितीत स्थिर झालो आहे. बाह्य शरीराला काय करायचे, हे तुम्ही ठरवा.’’ योग म्हणजे जीवात्मा-परमात्मा याचे जोडणे. जीवात्मा परमात्म्यात स्थिर होतो, यालाच म्हणतात का? 
शेवटी प्रयाग हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलमध्ये लगेच उपचार सुरू झाले. ९६ वर्षांतली त्यांची ही पहिली व शेवटची अँडमिशन, हे डॉक्टर मनाला जाणवत होते; पण विद्यार्थी मन त्याकडे पूर्णपणे कसे दुर्लक्ष करीत होते. प्रयाग सरांचा, दुसर्‍या स्पेशालिस्ट सरांचा राउंड व्हायचा. रात्री मला जायला उशीर व्हायचा, तरीही ते वाट बघत असायचे. बरोबर रात्री नातवंडं असायचे. ते म्हणायचे, ‘‘गुरुजी, झोपा आता.’’ तेव्हा ते उत्तर द्यायचे, ‘‘नाही, मनोज येणार आहे.’’ मी येऊन गेल्यावरच त्या त्रासात भेटल्यावर झोपायचे. झोपणे कुठले, आसनावस्थेत स्थिरावण्याचे त्यांचे प्रयत्न असायचे. पाठीला तकीया, उशीचा आधार घेणं. हातातल्या विविध मुद्रा करणे सतत चालू असायचे.
या माणसाला आयुष्यभर विश्रांती माहितीच नाही. ही पहिली विश्रांती. आराम व हालचाल बंद झाल्याने अंग दुखत होतं. एकदा रात्री दम लागला असताना त्यांनी त्यांचा नातू व माझ्या मदतीने स्वत:ला पालथे  करून घेतले. हे वैद्यकीय आश्‍चर्य आहे. कारण, वैद्यकीयशास्त्रात कृत्रिम श्‍वसनात पालथे ठेवण्याचे फायदे हे गेल्या ४-५ वर्षांत समजले आहे. हृदयाचे ठोके अनियमित सुरू  होते. 
 
बीपी कमी होते, पण औषधांच्या आधारावर टिकले होते. फुफ्फुसावर सूज आल्याने ‘श्‍वसनाला त्रास होत होता.  तो कमी करण्यासाठी एक उपकरण लावल्यावर ते म्हणाले, ‘‘नको. मला त्यांचा फायदा नाही, चेहर्‍यावर विलक्षण शांतीचा भाव. दु:खातपण आश्‍चर्यकारक वाटणारी ही अंतकाळची वागणूक.
त्या अवस्थेतही  सतत हाताच्या तीव्र मुद्रा जागेपणी, गुंगीत व झोपेत सतत सुरू असायच्या. बद्ध अंगुली, त्या स्थितीत हात छातीवर (हृदय चक्रावर) व कपाळावर आज्ञा चक्रार ठेवणे जपासारखे चालू होते.
पंकज यांचा फोन आला, की गुरुजींचा श्‍वास थांबला आहे. हृदय एकदा  एकदा सुरू झाले; पण आता काही प्रतिसाद नाही. त्या क्षणी जीवात्मा आपल्या दृष्टीने परमात्म्यात विलीन झाला. त्यांच्या दृष्टीने ते परमात्यात अधीच विलीन झाले होते. लगेच ५ मिनिटांत हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. प्राण गेला होता, पण विश्‍वासच बसत नव्हता. गुरुजींना रोज शवासनात बघायची सवय झाली होती. असे भासत होते, की गुरुजी शवासनात आहेत. डॉक्टरी भान पहिल्यांदा जागे झाले व समजूत काढू लागले, की हे कायमचे शवासन आहे.
मृत्यू रोज बघून मृत्यू झाल्यावर डॉक्टरांना खरं तर वाईट वाटत नाही. तरी पहिल्यांदा खंत वाटली, एक योगी गेला. गेला नाही मूर्खा, जगात आपली विद्या सढळ हातांनी वाटून, जगभरातील विद्यार्थ्यांना आसन व प्राणायाम विद्या देऊन अमर झाला आहे.
खरंच गुरुजी, तुम्ही आसनदेवता आहात. जीवन तर शिकवलेच; पण मृत्यूमधूनही  शिक्षण दिले. मृत्यूनंतर तुमचा हा वारसा चालवायचा आम्ही प्रयत्न करू.  दोन्ही पायांवर डोके ठेवून या योगीराजाला वंदन केले व साश्रू नयनांनी घरी परतलो.
( लेखक गुरूजींचे डॉक्टर असून त्यांच्या शिष्यपरिवारातील आहेत.)

Web Title: Yugandhar Yogacharya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.