दहशतवादाचा जागतिक भस्मासुर
By Admin | Updated: December 20, 2014 16:25 IST2014-12-20T16:25:10+5:302014-12-20T16:25:10+5:30
तालिबान्यांनी पाकिस्तानातील शाळेत १३२ लहान मुलांची व शिक्षकांची केलेली निर्घृण हत्या ही मानवतेला काळीमा फासणारी घटना, तसेच सिडनीतील दहशतवादी हल्ला असाच थरकाप उडवणारा. अवघ्या जगाला वेठीस धरू पाहणार्या जागतिक दहशतवादाच्या भस्मासुरापासून वाचायचे कसे, हा खरा यक्षप्रश्न आहे.

दहशतवादाचा जागतिक भस्मासुर
सुधीर देवरे
ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात १५ डिसेंबरला लिंडट या उपहारगृहात एका इराणी व्यक्तीने केलेला हल्ला व अनेक जणांना (दोन भारतीयांसकट) ओलीस ठेवलेली धक्कादायक घटना तर लगेच दुसर्या दिवशी सकाळी पेशावरजवळ पाक लष्कराने चालवलेल्या शाळेत तालिबान्यांनी केलेली १३२ लहान मुलांची व काही शिक्षकांची निघृण हत्या. शब्दांत व्यक्त करता येणार नाही अशीही अत्यंत भयानक व घृणास्पद घटना मानवतेवरचा भीषण हल्ला आहे. दहशतवादाचे हे क्रूर स्वरुप पाहून सारे जग हळहळले. भारतातही सर्वत्र दु:खाची व उद्वेगाची छाया पसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानच्या या अतीव दु:खाच्या प्रसंगी भारत पाकिस्तानच्या जनतेबरोबर आहे, अशी भावना व्यक्त करून भारताचीसह वेदना व सहानुभूती कळवली. आपल्या संसदेने तसेच देशातल्या सर्व शाळांतून दोन मिनिटे स्तब्धता पाळून पेशावरच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली वाहिली.
मलाला युसुफजाई या पाकिस्तानी युवतीला नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर तीन-चार दिवसांत अशी घटना घडावी यासारखा अजून कोणता दैवदुर्विलास असावा! मलालानेही तालिबानच्या धर्मवेड्या रिवाजांविरुद्ध विरोध केला होता व तालिबान्यांनी गोळ्या मारून तिला मारायचा प्रयत्न केला होता. आयसिस या अत्यंत कडव्या इस्लामी गटाने इराकमध्ये नुकतीच १५0 महिलांची त्यांनी जिहादींशी विवाह करायला नकार दिल्याबद्दल हत्या केली अशी बातमी प्रकाशित झाली आहे. आयसिसने गेल्या काही महिन्यात पाश्चात्य वार्ताहरांची क्रूरपणे हत्या करून दहशतवाद कोणत्या भीषण थराला गेला आहे हे जगाला दाखवून दिले आहे.
२६/११च्या मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्यांची आपल्या सर्वांना झालेली जखम अजून ताजी आहे. गेल्या दोन-तीन दशकांत भारताने अनेक लहान-मोठे दहशतवादी हल्ले झेलले आहेत, सोसले आहेत. १९९३ मधला मुंबईवरचा अतिरेकी हल्ला, १९९९ ला कंदाहारला आपल्या विमानांचे अपहरण करून तालिबान्यांनी केलेला अत्याचार, २00१ मध्ये आपल्या संसदेवरील हल्ला याशिवाय जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांची सतत होणारी घुसखोरी व हल्ले. अशा दहशतवादी कृत्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मिळणारी पाकिस्तानची मदत व पाठिंबा हा आपल्या शेजारी देशाच्या धोरणाचा स्थायीभावच झाल्याचे दिसून येत आहे.
दहशतवाद ही अलीकडच्या काळात एक भयाण व गंभीर प्रवृत्ती बनली आहे व ती मोठय़ा चिंतेची बाब आहे. धार्मिक, तात्विक किंवा राजकीय मतभेद सोडवण्यासाठी वा आपल्या मताचा दुसर्या देशावर दबाव आणण्याच्या हेतूने हिंसेचा मार्ग अवलंबायचा हे तसे पूर्णपणे नवीन नाही. पण दहशतवाद हे राजकीय शस्त्र किंवा परराष्ट्रीय धोरणाचा एक प्रमुख भाग म्हणून वापरले जाणे हे आजकालच्या २0-२५ वर्षांतले. ९/११ म्हणजे न्यूयॉर्कवरच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर इमारतीवरचा दहशतवादी हल्ला हा या नवीन प्रणालीचा एक उच्चबिंदू. नंतरच्या काळात तर दहशतवाद्यांचा अत्याचार देशोदेशी पसरतच गेला. पेशावरमधल्या अमानुष घटनेनंतर पाकिस्तानातल्या राज्यकर्त्यांना व राजकीय पक्षांना दहशतवादाच्या गंभीर स्वरुपाची जाणीव झाल्यासारखे वाटते. पंतप्रधान नवाज शरीफ यांनी ‘चांगले’ तालिबान व ‘वाईट’ तालिबान यात काही फरक नसून ते सगळे पाशवी आहेत व पाकिस्तानातून दहशतवाद पूर्णपणे नष्ट करू असे घोषित केले आहे. काही महिन्यांपूर्वीच पाकिस्तान सरकार पाकिस्तानी तालिबानबरोबर शांतिवार्ता करत होते. शरीफ यांनी असेही म्हटले आहे, की दक्षिण आशियाचा सगळा प्रदेश-अफगाणिस्तान व भारतसकट दहशतवादापासून मुक्त करायला हवा. हे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवाज शरीफ यांच्याशी टेलिफोनवर केलेल्या संभाषणानंतर काढले मोदींनी भारत व पाकिस्तान यांनी एकत्रितपणे दहशतवादाचा पूर्णपणे बिमोड करायला पाहिजे अशी भावना व्यक्त केली होती.
पाकिस्तानला दहशतवादाचा सामना निर्विवादपणे करायचा असेल तर खूप प्रयत्न करावे लागतील व स्वत:ची दुहेरी व दुटप्पी भूमिका बदलावी लागेल. गेल्या २५ वर्षांपासून पाकिस्तान दहशतवादाचे मूलस्थान व केंद्र बनला आहे. ओसामा बिन लादेनला पाकिस्ताननेच आश्रय दिला होता. अनेक विश्वव्यापी दहशतवादी संघटनांची मुख्यालये पाकिस्तानात आहेत. उदा. लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-महम्मद, जमात-उल-दावा इत्यादी. त्या संघटनांचे पाकिस्तानात मोठमोठे कॅम्प्स असून त्यात दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते. हाफिज सईदसारखा दहशतवाद्यांचा नेता नुसताच राजरोसपणे देशभर फिरत नाही तर त्याला भारताविरुद्ध निदर्शने करायला, सभा घ्यायला अधिकृतरित्या उत्तेजन दिले जात आहे. हाफिज सईद मुंबईवरच्या २६/११च्या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार होता. हाफिज सईदच्या जमाद उल दावा या संघटनेला अमेरिकेने २00८ पासून काळ्या यादीत ठेवले आहे व हाफिज सईदवरही दहा दशलक्ष डॉलर्सची रक्कम इनाम म्हणून जाहीर केली आहे.
तालिबानच्या स्थापनेतही पाकिस्तानचाच मोठा भाग होता. अफगाणिस्तानमध्ये रशियन सैन्याविरुद्ध लढण्यासाठी मुजाहिद्दीन व तालिबानसारखे कट्टर धर्मपंथी सुसज्ज करून अफगाणिस्तानमध्ये ९/११ आधी तालिबानला सत्तेवर आणण्यांतही त्यांना यश आले होते. गेल्या दहा-बारा वर्षांत अमेरिका व नाटो सैन्याची अफगाणिस्तानमध्ये तालिबानविरुद्ध लढाई चालली असताना अफगाण तालिबान व पाकिस्तान तालिबान अशा दोन्ही गटांबरोबर पाकिस्तानचे लष्कर व गुप्तचर संस्था आयसिस कार्यरत होते. किंबहुना अफगाणिस्तानमधून आलेल्या मुल्ला ओमर या तालिबान नेत्याला किंवा हक्कानी नेटवर्क या संघटनेला पाकिस्तानात आश्रय दिला आहे.
भारतातून पाकिस्तानात पळालेल्या दाऊद इब्राहिम या दहशतवादी गँगस्टरला दिला आहे तसाच. याबरोबरच तालिबान व दहशतवादी संघटनांच्या विरोधी संघर्षात आपण अमेरिकेचे व नाटो सैन्याचे जवळचे सहकारी आहोत हा पाकिस्तानचा प्रथमपासूनचा दावा आहे. तेहरिक-ए-तालिबान या पाकिस्तानी तालिबान संघटनेने पेशावरच्या नीच कृत्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सुरुवातीला काही वर्षे या संघटनेबरोबर पाकिस्तानी लष्कर व आयसिस यांचे चांगले संबंध होते. टीटीपीचा उपयोग आपल्याला एक स्ट्रॅटेजी अँसेट म्हणून करता येईल असे पाकिस्तानमधल्या सत्ताधार्यांना वाटत असावे. पण २00८ पासून टीटीपी व पाकिस्तान लष्कर यांचा सरहद्दीच्या भागात संघर्ष सुरू झाला व आता दोघांत लढाई चालू आहे. पाकिस्तानी तालिबानचा पेशावरच्या शाळेतल्या कोवळ्या मुलांवरचा हल्ला हे पाकिस्तानी लष्कराने चालवलेल्या तालिबानविरोधी मोहिमेला एक क्रूर सूडमय उत्तर असावे असे पाकिस्तानात बोलले जात आहे.
पाकिस्तानमधले अस्थिर व अशांत वातावरण निवळेल का अशी शंका जगभर व्यक्त केली जात आहे. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्य परत गेल्यावर (२0१४ पासून) तेथे कशी परिस्थिती होईल, याबाबतीत प्रश्नचिन्हच आहे. प्रचंड खर्च केल्यावर व फार मोठय़ा प्रमाणात गेली १२-१३ वर्षे प्राणहानी झाल्यावरही अमेरिकेला अफगाणिस्तानमध्ये शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करण्यात फारसे यश आलेले नाही असे दिसते. भारताने या काळात अफगाण लोकांच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीच्या दिशेने मोठय़ा प्रमाणात मदत केलेली आहे. झारांज-डेलाराम हा जवळजवळ ३00 किमीचा रस्ता, सल्मा हे धरण, पार्लमेंटची इमारत, शाळा, विद्युतीकरण इत्यादी अनेक मूलभूत क्षेत्रात भारताने त्या देशात योगदान दिले आहे.
पाकिस्तान-अफगाणिस्तान या भागांतले अस्थिर वातावरण दूर करण्यासाठी पाकिस्तानला स्वत:च्या धोरणात किंबहुना आपल्या राज्यकर्त्यांच्या मनोविचारातच मूलभूत बदल करावे लागतील. ‘चांगले’ व ‘वाईट’ तालिबान यात फरक न करण्याबरोबरच ‘चांगले’ व ‘खराब’ दहशतवादी हा त्यांनी सतत आचरणात आणलेला फरकही दूर करणे त्यांना क्रमप्राप्त आहे. एका बाजूने आपण सर्व तालिबानच्या विरुद्ध आहे असे म्हणायचे तर दुसर्या बाजूने २६/११ ची ट्रायल व तपासणी रेंगाळत ठेवायची, हाफिज सईदसारख्या दहशतवाद्याविरुद्ध पुरेसा पुरावाच नाही असा दावा करून त्याला भारतविरोधी कारवाया करायला मदत व उत्तेजन द्यायचे, पेशावरच्या कृत्याला भारत जबाबदार आहे, अशा हाफिज सईद व माजी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांच्या कांगावाखोर व उद्दाम वक्तव्यांविरुद्ध कोणतीच कारवाई न करणे अशा एक व अनेक बाबतीत पाकिस्तान यापुढे आवश्यक व समंजस निर्णय घेणार नसेल तर त्यांच्याच देशातल्या दहशतवादाला ते तोंड देऊ शकतील असे वाटत नाही. तसे झाले तर दहशतवादाचा हा भस्मासूर अधिकाधिक प्रबळ होईल. पाकिस्तानच्या स्वत:च्या हिताच्या दृष्टिकोनातूनही हे हानीकारक ठरेल व भारतासारख्या शेजारी राष्ट्रावरही तिथल्या अस्थिरतेचे व हिंसेच्या वातावरणाचे पडसाद पडतील. दहशतवाद, धार्मिक मूलभूतवाद व असहिष्णुता हे सर्वच राष्ट्रांचे शत्रू आहेत. भारताला पाकिस्तानच्या सद्य परिस्थितीत अधिकच दक्ष व सज्ज रहावे लागेल यात शंका नाही.
(लेखक परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव
व सिम्बायोसिस इंटरनॅशनल
युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक आहेत.)