खेळण्यांची दुनिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 06:00 AM2020-07-19T06:00:00+5:302020-07-19T06:00:07+5:30

लहानपणी आपण खेळलेली खेळणी. आयुष्यभर ती लक्षात राहतात. भातुकली आणि बाहुल्यांचा खेळ खेळत तर  अनेक पिढय़ा मोठय़ा झाल्या.  अगदी इसवीसनपूर्व काळापासूनची  खेळणी उपलब्ध आहेत.  ती केवळ खेळणी नाहीत, तो एक इतिहास आहे, आजच्या मनोरंजन संस्कृतीची ती उगमस्थानं आहेत.

World of toys! | खेळण्यांची दुनिया!

खेळण्यांची दुनिया!

googlenewsNext
ठळक मुद्देखेळणं फक्त मनोरंजनाचे साधन नसून आपल्या समाजाचे आणि संस्कृतीचे प्रतिबिंब आहे.

- हृषीकेश खेडकर

मनातल्या आठणीतला एक असा कप्पा जो कधीही उघडला की चेहर्‍यावर एक स्मितहास्य उलगडतं आणि बालपणीचा काळ सुखाचा, याची पुन्हा एकदा जाणीव होते. काय काय दडलेलं असतं मनाच्या या कप्प्यात? अशी कुठली गोष्ट आहे जी सहज आपल्याला बालपणात घेऊन जाते? 
- खेळणी ! 
भूतलावरची एक अशी अद्भुत गोष्ट, जिच्या मदतीने आपण मनातले अद्भुत जग तयार करायला लागलो. प्रत्येकाचं जग वेगळं; पण खेळणी त्या जगाचा एक अविभाज्य घटक.
भूक भागवण्यासाठी भटकंती करणारा माणूस शेती करून स्थिर झाला आणि वस्ती करून राहू लागला. रोजच्या अन्नाचा आणि निवार्‍याचा मोठा प्रश्न सुटला आणि दैनंदिन जीवनात बराच फावला वेळ मिळू लागला. मिळालेल्या या वेळात जशी कला विकसित होत होती, तशी मनोरंजनाची साधनेदेखील बनवली जाऊ लागली. माती वापरून भांडी बनवण्याचे कौशल्य तर मनुष्याला अवगत होतेच; आता याच गोष्टीचा आधार घेत मनुष्य खेळणी बनवू लागला. पुरातत्ववेत्ते जेव्हा या गोष्टीचा मागोवा घेऊ लागले, तेव्हा काही चित्तवेधक गोष्टी समोर आल्या.
बहुतांशी खेळणी ही दैनंदिन जीवनात आढळणार्‍या गोष्टींचे, किंवा पाळीव प्राण्यांचे स्केल मॉडेल म्हणजेच प्रमाणित प्रतिकृती होत्या, यांचा उपयोग लहान मुलांना खेळता खेळता सभोवतालच्या जगाची ओळख करून देण्यासाठी केला जात होता. इ.स.पूर्व 3500 मध्ये इजिप्शियन संस्कृतीत सापडलेली चार गाईंची मातीत बनवलेली प्रतिकृती असो किंवा इ.स.पूर्व 1800 मध्ये सिंधू संस्कृतीतील हरयाणा येथे सापडलेली दगडात कोरलेली बैलाची प्रतिकृती; ही दोन्हीही उदाहरणे केवळ प्राचीन खेळणी नसून आजच्या मनोरंजन संस्कृतीची उगमस्थानं आहेत.
मोहेंजो-दारो येथे इ.स.पूर्व 2300 काळातील कांस्य धातूमधून घडवलेल्या डान्सिंग डॉलपासून ते अगदी आजच्या बार्बी डॉलपर्यंत अनेक खेळणी आपण बनवली, बघितली आणि खेळली; पण हे खेळणं फक्त मनोरंजनाचे साधन नसून आपल्या समाजाचे आणि संस्कृतीचे प्रतिबिंब नाही का? 
भारतात तर प्रत्येक राज्यात खेळणी आणि बाहुल्या बनवण्याची एक विशिष्ट पद्धत आणि शैली आहे. आसाममध्ये दलदलीत वाढणार्‍या झाडांच्या अर्कापासून खेळणी बनवली जातात, तर पश्चिम बंगालमध्ये टेराकोटा खेळणी प्रसिद्ध आहेत. वाराणसी, लखनौ, मथुरा आणि वृंदावन येथील लाकडात बनवलेली खेळणी त्यांच्या आकर्षक रंगसंगतीसाठी प्रसिद्ध आहेत, तर राजस्थान हे न भाजता चिकणमातीपासून बनवलेल्या बाहुल्यांसाठी. 
आपल्याला परिचित असलेलं खेळणं म्हणजे भातुकली. चारशे ते पाचशे वर्षांपासून चालत आलेला हा खेळण्यांचा संच आजही लहान मुलांसाठी घर व्यवस्थापनाची परंपरा आणि पद्धती यांचे मनोरंजनातून स्वयंशिक्षणाचे उत्तम साधन आहे.
साधारण घरातल्या शंभर लहानमोठय़ा वस्तूंचा प्रतिकृतीतला, खेळण्यांमधून बनवलेला संसार म्हणजे भातुकली. ठकी म्हणजेच महाराष्ट्रात आढळणारी बाहुली, ही या भातुकलीतल्या संसाराची राणी. जात, धर्म, पंथ यापासून मुक्त असलेली ठकी घरातला एखादा जुना रुमाल साडीसारखा नेसून मिरवायची. 
गरीब-र्शीमंत असा भेदभाव माहिती नसलेल्या या ठकीबरोबर कित्येक पिढय़ा खेळल्या आहेत. आपल्या मनातली सगळी गुपिते त्यांनी ठकीसमोर सांगितली असतील. खेळणं म्हणून डिझाइन केली गेलेली ही भातुकली खेळून एक पिढी खर्‍या संसाराला लागते; आणि दुसरी पिढी परत तेच खेळणं घेऊन स्वप्नातला संसार थाटू लागते हे सगळं किती मजेशीर आहे.
आजही गावाकडच्या मुलांच्या झोळीत गोट्या, विटी-दांडू, सोंगट्या, बैलगाडी अशी खेळणी सापडतील तर मुलींच्या झोळीत चिंचोके, सागरगोटे, बिट्टय़ा आणि भातुकलीसारखी खेळणी बघायला मिळतील. शेकडो वर्ष लहान-थोरांवर अधिराज्य गाजवणारी राजस्थानी कठपुतली ही अशीच एक पारंपरिक बाहुली.
‘कठ’ म्हणजे लाकूड आणि ‘पुतली’ म्हणजे बाहुली, अशी लाकूड, कापड आणि धातूच्या तारांपासून बनवलेली ही बाहुली ऐतिहासिक कथा, दंतकथा आणि पुराणकथा सांगण्यासाठी आजही वापरली जाते. राजाराणी, अनारकली, जोगी, गारुडी, जादूगार अशा वेगवेगळ्या रूपातून ही बाहुली नैतिकता आणि साहसाच्या गोष्टी सांगत आली आहे. ही खेळणी कोणी आणि कधी डिझाइन केली हे माहिती नाही; पण यांच्या निर्मितीचा जो आपल्यावर प्रभाव पडला तो वादातीत आहे. 
काळानुरूप शहराकडच्या मुला-मुलींचे खेळ बदलले. विटी-दांडूची जागा बॅट-बॉलने घेतली तर ठकीची जागा बार्बीने. एकोणवीसशे साठच्या दशकात रूथ हॅण्डलर नावाच्या एका अमेरिकन गृहिणीला असे लक्षात आले की, आपल्या मुलीला खेळण्यासाठी खूप कमी पर्याय उपलब्ध आहेत. खेळत असताना तिची मुलगी केवळ एक आई किंवा आया बनू शकते, तर तिच्या मुलाकडे जी खेळणी आहेत ती खेळताना तो फायर फाइटर, अंतराळवीर, डॉक्टर इत्यादी बनू शकतो.


या विचारातून प्रेरणा घेत रूथने अशी बाहुली बनवली ज्यातून मुलीला खेळताना जे वाटेल ते बनण्याचा पर्याय मिळाला आणि अशा पद्धतीने 1959 साली बार्बीचा जन्म झाला. सुडौल बांध्याची बार्बी अमेरिकन बाहुली न राहता संपूर्ण जगाची फॅशन डॉल बनली.
बार्बीच्या लिपस्टिकपासून ते कपड्यांपर्यंत आणि केशभूषेपासून ते बुटांपर्यंत प्रत्येक गोष्ट बदलता येऊ लागली. या बाहुलीने तिच्याबरोबर खेळणार्‍या प्रत्येक मुलीला खुणावणारे व्यक्तिमत्त्व बनवण्याची आणि तसा साज चढवण्याची संधी दिली. 
स्वीमसूटपासून ते नऊवारी साडीपर्यंत म्हणाल त्या पेहरावात आज बार्बी बघायला आणि खेळायला मिळते. खेळत असताना बार्बीचा केलेला साज आणि बनवलेलं तिचं जग, हे खेळणार्‍या मुलीच्या मनाचे प्रतिबिंब आहे हे कळायला थोडादेखील वेळ लागत नाही. एका विशिष्ट परंपरेचं प्रतीक असलेलं खेळणं जेव्हा भौगोलिक सीमा ओलांडून दुसर्‍या परंपरेत मिसळू पहातं तेव्हा डिझाइनच्या दृष्टिकोनातून खेळण्यात झालेला बदल बरंच काही सांगून जातो. खेळणं कधीच निर्जीव नव्हतं; त्यात ओतलेला जीव खेळणार्‍याचा खेळ सांगून जातो. तुम्हाला आठवतो का तुमच्या लहानपणीचा असा एखादा खेळ?

hrishikhedkar@gmail.com
(लेखक वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)

Web Title: World of toys!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.