In the word of paparazzi.. | पॅप

पॅप

ठळक मुद्देसेलिब्रिटींच्या मागावर असलेल्या ‘पापाराझ्झीं’च्या आयुष्यात उतरताना..

- योगेश गायकवाड

स्वत:च्या हाताने स्वत:चं करिअर घडविण्याची इच्छा असणार्‍या प्रत्येकाचं प्रेरणास्थान असणार्‍या सनी लिओनी यांच्या सोबत काम करण्याची संधी मधल्या काळात मला मिळाली. मुंबईतल्या फिल्मीस्तान स्टुडिओमध्ये शूटिंगच्या निमित्ताने चक्क दहा दिवस त्यांचा जवळून सहवास लाभला. त्या खास वयात कल्पनाविश्वात साथ देणारी ‘ड्रीम गर्ल’ प्रत्यक्षात भेटल्याचा केवढा तो आनंद ... आणि असा हा आनंद सोशल मीडियावर शेअर न करण्याइतक्या संत पदाला मी अजून तरी पोहोचलेलो नसल्याने, सनी लिओनी सोबतचा फोटो अखेर मी सोशल मीडियावर पोस्ट केलाच.
माझ्या हाताला घट्ट धरून झाडाच्या एका ओंडक्यावर तोल सांभाळत उभी असलेली सनी.. असा आमचा फोटो प्रामाणिकपणे भास मारण्याच्या उद्देशाने मी सोशल मीडियावर टाकला होता. मित्नांमधून आलेला धूर, लाइक्सची संख्या मोजण्यात माझा वेळ मजेत गेला. त्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडला. आणि दोन दिवस मनाला गारवा देऊन भिंतीवरून ओघळूनपण गेला. 
- पण एक अनोळखी थेंब मात्न चिकाटीने टिकून राहून मला त्नास देत राहिला. ‘शार्प शूटर’ नावाने अकाउण्ट असलेला तो माझ्याशी प्रयत्नपूर्वक ओळख वाढवू लागला. ‘‘आपण खूप चांगले दिग्दर्शक आहात, आपल्याला प्रत्यक्ष भेटून इंटरव्ह्यू करण्याची इच्छा आहे.’’ अशा आशयाचे मेसेज पाठवू लागला. हा शार्प शूटर कोण कुठला माहीत नाही, बरं सनी लिओनीबरोबरचा एक फोटो बघून याला मी ‘चांगला’ दिग्दर्शक असल्याचा साक्षात्कार झालेला. त्यामुळे त्याला फारसं गांभीर्याने न घेता मी दुर्लक्ष करत राहिलो; पण तो भलताच चिवट निघाला. 
अखेर कंटाळून मी त्याला घराजवळच्या कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलावलं, तर   ‘तिथे नको आपण तुमच्या शूटिंगच्या सेटवरच भेटू’, असा आग्रह त्याने धरला. मी म्हटलं, ‘तिथे कामाची गडबड असते आपल्याला शांतपणे बोलता येणार नाही!’
त्यावर त्याची काहीच हरकत नव्हती. म्हणाला, मी दिवसभरपण वाट बघत थांबायला तयार आहे. आणि तिथे सनी मॅडमपण असतीलच ना !
 तेव्हा कुठे माझ्या भेजात प्रकाश पडला की, माझ्या इंटरव्ह्यूचं निमित्त करून सनी लिओनीला गाठायचा त्याचा डाव होता. मग अर्थातच मी त्याला ब्लॉक केला. पण कसा कोणास ठाऊक त्याने माझा मोबाइल नंबर शोधून काढला आणि पुन: फोन मेसेज करू लागला. एकदा वेळ काढून मग मी त्याच्या खानदानाचा उद्धार करून झापला.
पण त्याने जराही न डगमगता शांतपणे मला ऑफर दिली, ‘‘तुमच्या शूटिंगच्या सेटवर येऊन मला एक दिवस सनी लिओनीबरोबर राहून तिचे फोटो काढायची संधी द्या, त्या बदल्यात एका मोठय़ा पोर्टलवर मी तुमचा इंटरव्ह्यू छापून आणेन.’’ 
अधिक खोदून चौकशी केल्यावर त्याने आपली ओळख सांगितली की, तो ‘शार्प शूटर’ म्हणजे बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या मागे मागे धावणारा एक ‘पापाराझी’ आहे.
‘पापाराझी’ हा शब्द मला ऐकून माहीत होता. हल्ली भारतातही बोकाळलेला ट्रेण्ड माझ्या अनुभवाचा होता. विमानतळावर जाणारे-येणारे, जिममध्ये व्यायामाला जाणारे, अगदी एखाद्या पॉश रेस्टॉरण्टमध्ये डिनर-डेटला जाणार्‍या स्टार्सचे फोटो हल्ली बदाबदा आपल्या मोबाइलवर कोसळत असतात, ती सगळ्या या पापाराझींचीच करतूत !
- पण हे लोक असतात कोण, काम कसं करतात, कुणासाठी करतात, त्याचे पैसे त्यांना कोण देतं, सेलिब्रिटींच्या आयुष्यातल्या बातम्या, त्यांचा ठावठिकाणा हे लोक कसा शोधून काढतात? खासगी आयुष्यात बेशरमपणे नाक खुपसणार्‍या या लोकांचे आणि सेलिब्रिटींचे संबंध प्रत्यक्षात कशा प्रकारचे असतात?- असे सगळे बरेच प्रश्न होते. मी त्या प्रश्नांचाच माग काढायचा ठरवला.
मुंबईतील बांद्रा, जुहू भागातील जिम्स, कॅफे, क्लब्ज अशा ठिकाणी पापाराझी बरोबर सापळा रचून बसून राहिलो. आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका सनकी पापाराझीसोबत प्रियांका चोप्रा आणि आलिया भटची वाट बघत रात्नभर बसून राहिलो. अमिताभ-रेखाच्या काळातल्या एका रिटायर्ड पापाराझीलापण भेटलो. काहींनी मोकळेपणाने माहिती दिली तर एकाने ही माहिती देण्याचेपण पैसे घेतले. पण या सगळ्यांना भेटून त्यांच्याबरोबर सेलिब्रिटींच्या मागे फिरून पापाराझींच्या जागांबद्दल अत्यंत इंटरेस्टिंग माहिती हाती लागली. 
पापाराझींच्या नजरेतून बिनामेकपचे सेलिब्रिटी बघताना कधी उत्सुकता ताणली गेली, कधी धक्कादायक माहितीने डोकं गरगरलं तर कधी समाज म्हणून आपल्या नैतिकतेबद्दल गंभीर प्रश्नही पडले. अगदी थेट प्रिन्सेस डायनापासून तैमुर पतौडीपर्यंत सगळ्यांच्या मागे फ्लॅश उडवत फिरणार्‍या या पापाराझी लोकांबद्दलचे माझे हे भन्नाट अनुभव लोकमतच्या ‘दीपोत्सव’ या लोकप्रिय दिवाळी अंकात सविस्तर लिहिलेले आहेत.
 पापाराझी सेलिब्रिटींच्या आयुष्यात डोकावतात, चला, आपण या निमित्ताने त्यांच्या आयुष्यात डोकावून बघूया.
yogmh15@gmail.com
(लेखक चित्रपट दिग्दर्शक आहेत.)

यावर्षीच्या ‘दीपोत्सव’चं दार उघडताना.. 

अंकाविषयी अधिक माहिती -
deepotsav.lokmat.com
1. ऑनलाइन खरेदी : deepotsav.lokmat.com
2. व्हॉट्सअँप मेसेज पाठवून प्रत मिळवा : 955-255-0080
3. ई-मेल : sales.deepotsav@lokmat.com
4. स्थानिक वृत्तपत्र विक्रेत्याकडे मागणी नोंदवा

Web Title: In the word of paparazzi..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.