विलक्षण चिकाटीचे वामनराव

By Admin | Updated: October 11, 2014 19:12 IST2014-10-11T19:12:18+5:302014-10-11T19:12:18+5:30

वयाची पन्नाशी गाठू लागली, की शरीर बोलायला लागते. अनेक प्रकारच्या व्याधींचा विळखा त्याभोवती पडू लागतो. अशा परिस्थितीत केवळ वैद्यकीय उपचारांनी सारे काही होत नाही. अभिजात योगसाधना करून आत्मविश्‍वासाने व्याधींना मात देणार्‍या श्रद्धाळू आणि जिद्दी अशा वामनरावांची ही कथा.

Wonderful perseverance of Vamanrao | विलक्षण चिकाटीचे वामनराव

विलक्षण चिकाटीचे वामनराव

- डॉ. संप्रसाद विनोद

 
पुतण्या आणि पत्नीचा आधार घेत सुमारे पन्नास वर्षांचे, स्थूल शरीराचे वामनराव माझ्या चिकित्सा कक्षात (कन्सल्टिंग रूममध्ये) आले. ‘सगळं शरीर आखडलंय. एकट्याने कुठे जाता येत नाही. खुर्चीवर बसून पूजा करावी लागते. सारखी धाप लागते. एक्झिमामुळे रात्री नीट झोप लागत नाही. पोटाचा हर्निया असल्याने हालचालींवर बंधन आलंय. जगणं फार त्रासदायक आणि परावलंबी झालंय. तुम्हीच आता मला यातून बाहेर काढा,’ अगदी कळवळून त्यांनी मला सांगितलं. अस्थिरोगतज्ज्ञांनी निदान केलं होतं अ५ं२ू४’ं१ ठीू१२्र२- ऋीे४१ठीू‘. म्हणजे, मांडीच्या हाडाच्या विशिष्ट भागाकडे रक्तपुरवठा नीट न झाल्यामुळे हाड मृत आणि ठिसूळ होणं. एवढे सगळे रोग झालेल्या व्यक्तीवर योगोपचार करणं हे मोठं आव्हानच होतं. त्यांना निराश किंवा नाउमेद होऊ न देता योगाच्या र्मयादांची जाणीव करून देणं, योगोपचार हे दीर्घकालीन, जिकिरीचे असतील, हे समजावून सांगणं आणखी कठीण होतं; पण हे काम मी प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत आवर्जून करतो. कारण, प्रमाणाबाहेर अपेक्षा ठेवून रुग्ण आला आणि त्याला अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळाले नाहीत तर तो योगविद्येलाच नावं ठेवू लागतो, जे मला खरंच आवडत नाही. 
योगोपचारांचे परिणाम मिळायला वेळ लागत असल्याने होमिओपॅथीचे उपचार पूर्वीप्रमाणे चालू ठेवावेत, असं सांगून वामनरावांवरील योगोपचारांना सुरुवात केली. अस्थिरोगामुळे जमिनीवर बसता येत नव्हतं. सगळ्या हालचालींवर र्मयादा आल्या होत्या. दर वेळी कोणाला तरी बरोबर घेऊन सगळीकडे जाणं व्यवहार्य नव्हतं. बांधकामाच्या व्यवसायामुळे रोज कामाच्या ठिकाणी तर जावंच लागणार होतं. पुतण्या, मुलं, पत्नी मदतीला होती; पण त्यांनाही फार त्रास देऊ नये, अशी वामनरावांची भावना होती. शेवटी आलटून-पालटून दोन्ही मुलं, पत्नी आणि पुतण्याने त्यांना शांती मंदिरात घेऊन यायचं ठरलं. 
प्रथम गादीवर बसून, नंतर पलंगाजवळ उभं राहून जमतील तशा साध्या, सोप्या हालचाली करायला ते शिकले. सुरुवातीला हेही त्यांना जड गेलं; पण चिकाटीने प्रयत्न करीत गेल्याने काही दिवसांनी ते जमायला लागलं. जोडीला सखोल शिथिलीकरण सुरू होतंच, त्यामुळे हळूहळू त्यांचं शरीर मोकळं झालं, हलकं झालं. योगाभ्यासातला उत्साह वाढला. योगाविषयी  ‘आवड’ निर्माण झाली, त्यामुळे योगासाठी २-३ तासांची ‘सवड’ काढणं, त्यांना सहज शक्य होऊ लागलं. परिणामही छान मिळायला लागले. गोडी आणखी वाढली. दम्याचा त्रासही कमी व्हायला लागला. ध्यानामुळे मन दिवसभर शांत राहू लागलं. महिन्या-दोन महिन्यांत आसनांशी संबंधित हालचाली सुलभ होऊ लागल्या. काठीचा आधार घेत हळूहळू चालणं जमायला लागलं. कोणाला बरोबर न घेता रिक्षाने शांती मंदिरात येणं जमू लागलं. थोड्या वेळासाठी जमिनीवर बसणं शक्य होऊ लागलं. इतरांवर अवलंबून राहणं जसजसं कमी झालं तसतसा आत्मविश्‍वास परत येऊ लागला. नंतर तो इतका वाढला, की त्यांना दुचाकीवरून योगासाठी यावंसं वाटायला लागलं. हे खूपच चांगलं लक्षण होतं. मी गमतीने त्यांना म्हणालो, ‘मुलांना जसं तुम्ही दुचाकी जपून, बेताबेताने चालवायला सांगता तशीच तुम्हीही चालवा म्हणजे झालं! ’
एकदा तर गंमतच झाली. दुचाकीवरून त्यांच्यासोबत आलेला त्यांचा २0 वर्षांचा मुलगा घाबरत घाबरत येऊन मला म्हणाला, ‘सर, बाबांचा आत्मविश्‍वास जरा कमी करता येईल का? ते आता माझ्यापेक्षा जास्त ‘बुंगाट’ गाडी चालवतात. मला त्यांच्या मागे बसायला भीती वाटते.’ ही गोष्ट मी वामनरावांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी लगेच ती अमलात आणली. मग, त्यांच्या मुलाला गमतीने म्हणालो, ‘अरे, एकदा वाढलेला आत्मविश्‍वास असा कमी करता येत नाही; पण बाबांना तुझ्या मागे बसल्यावर कशी भीती वाटते, हे आता तुझ्या लक्षात आलं असेल.’ त्यानंतर, त्यांचा मुलगाही दुचाकी हळू चालवू लागल्याचं वामनरावांनी मला सांगितलं. त्यांची एक मोठी काळजी दूर झाली, त्यामुळे येणारा ताणही खूप कमी झाला. 
पोटाचा हर्निया सोडता वामनरावांच्या इतर व्याधींमध्ये आत्यंतिक मानसिक ताणाचा वाटा फार मोठा होता. ‘अभिजात योगसाधने’च्या नियमित अभ्यासामुळे त्यांचा ताण खूपच कमी झाला. इतर कारणांमुळे येणारे ताणही कमी झाले. साहजिकच, सगळ्या व्याधींची तीव्रता कमी झाली. दमा सुरुवातीलाच कमी झाला होता. सांध्यांमधलं आखडलेपण आणि एक्झिमाही लक्षणीय प्रमाणात कमी झाला. एक्झिमाने काळी पडलेली कातडी पूर्ववत व्हायला मात्र काही महिने लागले. हे सगळे परिणाम त्यांना आणि मलाही अचंबित करणारे होते. शल्यविशारदांचा सल्ला घेऊनच वामनरावांनी योगाभ्यासाला सुरुवात केली असल्याने हर्नियात फारसा फरक पडणार नाही याची त्यांना कल्पना होती. मात्र, शांतपणे आणि सहजपणे योगसाधना केल्यामुळे हर्निया वाढला नाही, त्यापासून होणारा त्रासही कमी झाला. पोटाच्या स्नायूंची बळकटी वाढल्यामुळे हे शक्य झालं. नंतर, वामनरावांना योगाच्या परिणामकारकतेविषयी इतकी खात्री पटली, की मोठय़ा उत्साहाने ते याबाबत सर्वांना सतत सांगू लागले. मग, पुढचे कित्येक महिने इतर सगळे विषय बाजूला पडले. एका प्राचीन मंदिराचे पिढीजात विश्‍वस्त असलेले वामनराव खूप भाविक स्वभावाचे आहेत. सलग तासभर जमिनीवर बसू शकल्यानंतर ते एकदा मोठय़ा आनंदाने म्हणाले, ‘ सर, मला आता रोज पाटावर बसून मनसोक्त पूजा करता येईल. विश्‍वस्त म्हणून सगळ्या जबाबदार्‍याही पार पाडता येतील.’ हे सांगताना अंतरीचा कळवळा असणार्‍या  या भक्ताचा चेहरा आनंदाने उजळून निघाला! 
(लेखक हे महर्षी न्यायरत्न विनोद यांचा विशुद्ध अध्यात्माचा आणि अभिजात योगसाधनेचा वारसा चालविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगगुरू आणि योगोपचारतज्ज्ञ आहेत.)

Web Title: Wonderful perseverance of Vamanrao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.