Will theaters be flooded again? | पिक्चर अभी बाकी है..

पिक्चर अभी बाकी है..

ठळक मुद्देकोरोनाचं भय आहेच. त्यामुळे आता थिएटर्स उघडली आणि काटेकोर नियमांनुसारच चालवली गेली, तर प्रेक्षकांचा प्रारंभिक उत्साहाचा प्रतिसाद नंतर ओसरणीला लागण्याची शक्यता अधिक आहे.

- मुकेश माचकर

जवळपास सात महिन्यांच्या खंडानंतर देशभरातली सिनेमागृहं पुन्हा एकवार प्रेक्षकांच्या सेवेत रुजू करण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. अनेक राज्यांमध्ये मल्टिप्लेक्सेस सुरूही झाली आहेत.ङ्घ देशभरातली एकपडदा आणि बहुपडदा चित्रपटगृहं मिळून सुमारे 8750 थिएटर्स सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांची तिकडे रीघ लागेल की कोरोनासंसर्गाच्या भयाने प्रेक्षक अजूनही थिएटरांकडे फिरकणार नाहीत, हे इतक्या प्रारंभिक टप्प्यावर छातीठोकपणे सांगणं कठीण आहे; पण देशात 58 शहरांमध्ये झालेल्या सर्वेक्षणातून थिएटरमालकांना दिलासा देणारे आकडे पुढे आले आहेत. अनेक पर्याय उपलब्ध असताना बर्‍याच प्रेक्षकांना थिएटरांमध्ये जाण्याची ओढ आहे, ही आश्चर्याची गोष्ट आहे.
कोरोनाकाळात टीव्हीने प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जबाबदारी उचलली होती. सर्व मालिकांचं चित्रीकरण बंद असल्याने त्या आघाडीवर फार काही नवं घडत नव्हतं; पण जुने लोकप्रिय कार्यक्रम पुढे आणले गेले. सिनेमे होतेच. शिवाय कशालाही ब्रेकिंग न्यूज म्हणणार्‍या आणि कोणत्याही फुटकळ घडामोडींना, माणसांना महत्त्व देणार्‍या वृत्तवाहिन्यांनी स्वतंत्रपणे मनोरंजनाचा वसा उचलला होता.
ओटीटी म्हणजे ओव्हर दि टॉप प्लॅटफॉर्म्सची या काळात चांदी झाली. अँमेझॉन, नेटफ्लिक्स, हॉटस्टार यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे सदस्य वाढले. त्यांवरच्या वेबमालिका आणि ओरिजिनल सिनेमांना उत्तम प्रतिसाद मिळाला. 
लोकांना थिएटरांचा विसर पडणार की काय, अशी भीती निर्माण झाली. पण, प्रत्यक्षात तसं झालेलं नाही. ऑरमॅक्स मीडिया प्रा.लि. या कंपनीने हिंदी, तामीळ, तेलुगू या प्रमुख भाषांमधल्या प्रेक्षकांच्या मनाचा कल जाणून घेण्याचा प्रय} केला तेव्हा तब्बल 82 टक्के प्रेक्षकांनी ‘कधी एकदाची थिएटर्स सुरू होतायत,’ अशी भावना व्यक्त केली. आपण पुढचे सहा महिने सिनेमागृहाची पायरीही चढून कोरोनाचा धोका पत्करणार नाही, अशी भावना व्यक्त करणार्‍यांचं प्रमाण फक्त सहा टक्के होतं.


घराच्या सुरक्षित चौकटीत, मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप अशा हव्या त्या स्क्रीनवर सिनेमा पाहण्याची सोय उपलब्ध असताना लोकांना थिएटरमध्ये जाण्याची ओढ का लागली असावी?
थिएटरमध्ये मोठय़ा पडद्यावर सिनेमा पाहणं हा एक वेगळा अनुभव आहे. सिनेमाची निर्मितीच मुळात मोठा पडदा डोळ्यांसमोर ठेवून केलेली असते. ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमा पाहिल्याचा आनंदही वेगळाच असतो आणि सुसज्ज थिएटरांमध्ये अनुभवायला मिळणारे ध्वनी परिणाम घरात टीव्हीवर किंवा इतर पडद्यांवर अनुभवता येत नाहीत. 
मोबाइल-स्क्रीनवर सिनेमा पाहणं ही तर शुद्ध तडजोडच आहे. त्यात सिनेमा फारच ‘छोटा’ बनून जातो. सर्वार्थाने पण या सगळ्या ‘सिनेमागुणां’साठी मोठय़ा पडद्यावर सिनेमा पाहणं मिस करत असलेल्या प्रेक्षकांचं प्रमाण किती असेल? इतका सिनेमाचा सखोल विचार करणारे प्रेक्षक किती असतील? ही संख्या फार असण्याची शक्यता नाही. मग 82 टक्के लोकांना (हा आकडा मुंबईत 93 टक्के आहे हे लक्षणीय आहे.) मल्टिप्लेक्सेस किंवा थिएटरांमध्ये जायचंय ते कशाला?
कारण सिनेमा पाहणं हे एक निमित्त आहे, त्यानिमित्ताने खरेदी, बाहेर खाणंपिणं-मौजमजा अशा अनेक गोष्टी एकत्रितपणे जोडून केल्या जातात. बहुतेक मोठय़ा शहरांमध्ये नोकरदार आईवडील आणि शाळकरी मुलं यांच्यासाठी बाँडिंग आणि आउटिंगसाठी वीकेण्डचाच पर्याय असतो. या दिवशी आईनेही घरातल्या स्वयंपाकाला सुटी द्यावी, सगळ्यांनी संध्याकाळी जवळच्या मॉलमध्ये जावं, काही आवश्यक आणि बर्‍याचशा अनावश्यक-चंगळवादी खरेद्या कराव्या, एखादा सिनेमा पाहावा, तिथे महागडे पॉपकॉर्न खावे, मग बाहेर पडून त्याच कॉम्प्लेक्समधल्या एखाद्या उपाहारगृहात जेवणाचा आस्वाद घ्यावा आणि वर आइस्क्रीम चेपून घरी जावं, असा या कुटुंबांचा नित्यक्रम असतो.
कॉलेज वयातल्या मित्रमैत्रिणींसाठी सिनेमाला जाणं ही पिकनिक असते (सिनेमा आवडला नाही तर त्यांचा ग्रुप मिळून ज्या कमेंटी करतो, ती इतरांसाठी डोकेदुखी असते), प्रेमी युगुलांना सिनेमागृहाचा अंधार शहरांमध्ये अत्यंत दुर्मीळ असा हक्काचा एकांत मिळवून देतात, तोही गारेगार एसीमध्ये. त्यासाठी त्यांना पडेल चित्रपट फार उपयोगी पडतात.
लोक थिएटर मिस करतायत, सिनेमे मिस करतायत का, हा प्रश्नच आहे. त्यामुळेच थिएटर उघडल्यानंतर काय होणार याचे दोन अंदाज बांधता येणं शक्य आहे.
एकतर मल्टिप्लेक्समध्ये सहकुटुंब सिनेमा पाहणं ही हजार ते दोन हजार रुपयांना चाट देणारी गोष्ट आहे. कोरोनापूर्व काळात एक मध्यम उत्पन्नाचा गट होता, त्याला हे परवडणारं होतं. आज यातल्या बर्‍याच जणांच्या नोकर्‍या गेल्या आहेत, ज्यांच्या आहेत त्यांचे पगार निम्म्याने कापण्यात आलेले आहेत, त्याची खर्च करण्याची क्षमता कमी झालेली आहे. त्याच्या प्राधान्यक्रमात थिएटर बसेल का?
दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंब असो, मित्र असोत की प्रेमी युगुलङ्घसगळ्यांना एक खुर्चीचं अंतर सोडून बसावं लागणार आहे एकमेकांपासून,ङ्घम्हणजे थिएटरमध्ये बसून फक्त सिनेमाच पाहावा लागेल. ते कितीजणांना जमेल, भावेल, रुचेल?
या जोडीला कोरोनाचं भय आहेचङ्घत्यामुळे आता थिएटर्स उघडली आणि काटेकोर नियमांनुसारच चालवली गेली, तर प्रेक्षकांचा प्रारंभिक उत्साहाचा प्रतिसाद नंतर ओसरणीला लागण्याची शक्यता अधिक आहे.
- मुकेश माचकर
mamanji@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Web Title: Will theaters be flooded again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.