गंगा पुनरुज्जीवित होईल?

By Admin | Updated: July 5, 2014 14:46 IST2014-07-05T14:46:07+5:302014-07-05T14:46:07+5:30

गंगा नदी म्हणजे भारतीयांचे श्रद्धास्थान. पण, आता ही गंगा किती तरी प्रकारांनी मैली झालेली आहे. असंख्य प्रदूषणकारी घटक यांमुळे गंगा आज जरार्जजर होण्याच्या पंथाला लागलेली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगेच्या परिवर्तनाची आस बाळगलेली आहे. या गंगेचे पावित्र्य भारतीयांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल?

Will Ganga revive? | गंगा पुनरुज्जीवित होईल?

गंगा पुनरुज्जीवित होईल?

- राजेंद्र केरकर

गंगा ही भारतीय जनमानसाची पिढय़ान्पिढय़ापासून लाभलेली असीम श्रद्धा आहे. भगवान शिवशंभोच्या जटेतून गंगा आली, त्याचप्रमाणे भगीरथाच्या तपोसाधनेद्वारे स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आली, अशा बर्‍याच लोकपरंपरा भारतीय लोकमानसात असल्याने या लोकमातेला इथल्या धमर्जीवनात परमेश्‍वररूपिणी, मोक्षदायिनी असे स्थान पूर्वापर लाभलेले आहे. त्यामुळे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या भारतीय उपखंडात ‘हर हर गंगे’ हा मंत्रघोष उच्चरवाने होत असलेला आढळतो. दर वर्षी लाखो भारतीय गंगेत स्नान करणे हे आपल्या जीवनाचे ध्येय मानतात. एखाद्या व्यक्तीला गंगेत स्नान करताना मृत्यू आला, तर ते मोक्षदायक मानले जात असल्याने बरेच जण गंगेत आत्महत्या करणे ही पसंत करतात. मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार उत्तर प्रदेशातील 
वाराणसीच्या पवित्र घाटांत करणे ही लोकपरंपरा निर्माण झाल्याने आज हा परिसर अर्धवट 
जळलेल्या, कुजलेल्या मृतदेहांनी, मृतदेहांच्या जळलेल्या राख, हाडे आदींनी ओंगळवाणा झालेला पाहायला मिळतो. प्रक्रिया न केलेले सांडपाणी, औद्योगिक आस्थापनातील केरकचरा, प्रदूषित पाणी आणि अन्य शेकडो प्रदूषणकारी घटक गंगेशी तिच्या वेगवेगळ्या उपनद्यांतून आणि स्रोतांतून एकरूप होत असल्याने ही नदी आणि तिच्यातले पाणी प्रदूषित झालेले आहे. 
हिमालयातील गंगोत्रीच्या हिमनगातून सुमारे ४000 मीटर समुद्रसपाटीपासून उंचीवरून गंगा उगम पावते. २५00 कि.मी.चा प्रवास करून शेवटी ही नदी बंगालच्या उपसागराशी एकरूप होते. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्‍चिम बंगाल अशा पाच राज्यांतून गंगा वाहते. परंतु, ठिकठिकाणी सांडपाणी, केरकचरा, शेताभातांतून येणारा केरकचरा आणि रासायनिक खते, जंतुनाशकांच्या अंशांमुळे नदीची परिस्थिती चिंताजनक झालेली आहे. दर वर्षी वाराणसीतील घाटांत जवळ जवळ ३३ हजार जळालेले मृतदेह आणि ८00 टन मृतदेहाची राख गंगेत विसर्जित केली जाते. वाराणसी घाटात पुजार्‍यांमार्फत होणार्‍या आरतीच्या प्रसंगी असंख्य पर्यटकांची तोबा गर्दी उसळत असल्याने, त्यांच्याकडून ही नदी मोठय़ा प्रमाणात प्रदूषित होत असते. ३२00 मृतदेह, ३00 टन अर्धवट जळालेले मृतदेहाचे मांस आणि ६000च्या आसपास मृतांची कलेवरे गंगा दर वर्षी आपल्यात सामावून घेते. कानपूर येथे ४0२ चर्माेद्योग आस्थापने असून, यातील १00च्या आसपास कारखान्यांत चामड्यांवर प्रक्रिया करण्यासाठी अत्यंत विषारी गणल्या गेलेल्या क्रोम या रासायनिक द्रवाचा वापर केला जातो. बर्‍याचदा प्रक्रिया न करता हे सारे नदीत सोडले जाते. क्रोमियमवर आधारित चामड्यांवर प्रक्रिया करण्याचे तंत्रज्ञान उपयोगात आणणार्‍या चर्माेद्योगांना प्रतिबंध करण्यात यावा, असा आदेश २0११मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने हल्लीच प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार, पाच राज्यांतील ७६४पेक्षा जादा औद्योगिक आस्थापने मोठय़ा प्रमाणात गंगेला प्रदूषित करण्यास कारणीभूत ठरल्याचे सिद्ध झालेली आहेत. बनारस हिंदू विद्यापीठाच्या गंगा प्रयोगशाळा आणि नदी परिसंस्था पर्यावरण व्यवस्थापन आणि प्रशिक्षण के ंद्राने केलेल्या अभ्यासानुसार, गंगेवरच्या मोठय़ा आणि छोट्या धरणांच्या साखळीने नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला विस्कळीत करून टाकलेले असून, तिच्या पात्रात जहरी प्रदूषणकारी घटकांमुळे नदीच्या पाण्याचा दर्जा कमी झालेला आहे. कारखान्यांतील मोठय़ा प्रमाणात केरकचरा योग्य रीतीने विल्हेवाट न लावता तो सरळ गंगेत टाकल्याकारणाने नदीचे पात्र अशा कचर्‍याने अक्षरश: भरून गेलेले आहे. २0११च्या उत्तराखंड पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अभ्यासानुसार, हरिद्वार येथील गंगेच्या पाण्यात कॉलिफोर्म बॅक्टेरियासारखे घातक विषाणू आढळलेले आहेत. यामुळे खरे तर हरिद्वारपुढील गंगेचे पाणी पिण्यासाठी, आंघोळीसाठी आणि अन्य वापरासाठी घातक ठरलेले आहे. 
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राज कपूर यांनी तीन दशकांपूर्वी गंगेच्या दयनीय स्थितीची कल्पना देण्यासाठी ‘राम तेरी गंगा मैली’सारख्या चित्रपटाची निर्मिती केली; परंतु गंगेला प्रदूषणमुक्त करण्याचे प्रयत्न मात्र अर्धवट आणि नियोजनशून्य ठरले. राजीव गांधी पंतप्रधान असताना १९८५मध्ये केंद्र सरकारने गंगा कृती आराखड्याद्वारे पहिल्या टप्प्यातील नदीच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी ४५२ कोटींची तरतूद केली. पाच वर्षांत नदीला प्रदूषणमुक्त करण्याचे प्रयत्न मात्र सफल ठरले नाहीत. त्यानंतर १९९३मध्ये पाच राज्यांतील ५९ शहरांतून जाणार्‍या गंगेला स्वच्छ करण्यासाठी राबवलेले अभियान अपयशी ठरले. गेल्या २८ वर्षांत सरकारी आकडेवारीनुसार, ११00 कोटी रुपये गंगेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी खर्ची घातले; परंतु त्यामुळे गंगेच्या परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी २00७मध्ये गंगा जगातील पाच सर्वाधिक प्रदूषित नद्यांच्या यादीत समावेश करण्यात आली. २0१0मध्ये कें द्र सरकारने २0२0पर्यंत गंगा स्वच्छता अभियान हाती घेण्याचे ठरवले आणि त्यासाठी १५,000 कोटी रुपये खर्च करण्याचे ठरवले. नदीला वाचविण्यासाठी केंद्र सरकारने जागतिक बँकेशी करार केला. असे असतानाही गंगेच्या स्थितीत विशेष असे परिवर्तन काही झाले नाही. 
देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळणार्‍या नरेंद्र मोदी यांना वाराणसीतल्या मतदारांनी भरघोस मते देऊन गंगेच्या परिवर्तनाची आस बाळगलेली आहे. पंतप्रधान मोदी यांनी प्रत्यक्ष वाराणसी घाटावर गंगा आरतीत सहभागी होऊन गंगेच्या पुनरुज्जीवनाला आणि स्वच्छतेला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही दिलेली आहे. साध्वी उमा भारतींकडे कें द्रीय जलसंसाधन मंत्रालयाची जबाबदारी दिलेली आहे. गंगा ही भारतीय लोकमानसाच्या श्रद्धेचे अत्युच्च संचित आहे. गंगास्नान ही भारतीय मनाला तजेला देणारी, पावित्र्याचे संदेश देणारी बाब असून, त्यासाठी ‘जन्मा येऊन करावे गंगा स्नान’ अशी स्वाभाविक इच्छा भारतातील गरिबापासून श्रीमंतांपर्यंत, लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत असते. गंगेच्या स्पर्शानेच जीवनातील पापांचे क्षालन होऊन आत्म्याला मोक्ष लाभतो, अशी लोकश्रद्धा आहे. गंगा ही भारतीय नद्यांतल्या साखळीतील श्रद्धेचा परमोच्च बिंदू आहे. त्यामुळे उमा भारतींनी आपण गंगेला निर्मल करून तिला पावित्र्यपूर्ण अशा पूर्वपदावर आणणार असल्याचा आशावाद फोल ठरणार नाही, यासाठी प्रामाणिकपणे आणि नियोजनबद्ध ‘गंगा निर्मल अभियान’ राबवणे गरजेचे आहे. 
हिमालयाची कन्या, भगवान शंकराची पत्नी, देवतेचे रूप अशा स्वरूपात भारतीय जनमानसाने गंगेला पाहिले आणि पुजलेले आहे; परंतु आज आम्ही आमच्या असंख्य घातक कृत्यांनी गंगेची दशादशा केलेली आहे. जलसिंचनाचे प्रकल्प, जलविद्युत निर्मिती योजना, २.९ कोटी लिटर प्रक्रिया न केलेले सांडपाणी दर दिवशी तिच्यात विसर्जित करण्याची प्रवृत्ती, अपरिमितपणे होणारा रेतीचा उपसा, नदीतल्या दगडगोट्यांचा बांधकामासाठी होणारा वाढता वापर, धाíमक सण-उत्सवाच्या प्रसंगी नदीत टाकला जाणारा प्रचंड केरकचरा, सांडपाणी, मलमूत्र विसर्जन आणि शेकडो औद्योगिक आस्थापनांतून बेफिकीरपणे सोडले जाणारे असंख्य प्रदूषणकारी घटक यांमुळे गंगा आज जरार्जजर होण्याच्या पंथाला लागलेली आहे. वेदकाळापासून पाण्यात केरकचरा, घाण टाकणे निषिद्ध मानलेले असताना आपण आपल्या खर्‍याखुर्‍या लोकमातांना कचरा कुंड, गटाराचे स्वरूप प्रदान करत आहोत. पाणी हे जीवन, ही आपल्या पूर्वजांची धारणा आपण नष्ट करत आहोत. डॉल्फिन आणि असंख्य जलचरांसाठी नैसर्गिक अधिवास असलेली गंगा संकटग्रस्त आहे. गंगेला तिचे गतवैभव खरोखर पुन्हा लाभेल का? भारतीयांना तिचे पूर्वीचे पावित्र्य पुन्हा अनुभवायला मिळेल का? याची उत्तरे आगामी काळ देईल.
 (लेखक पर्यावरणप्रेमी आणि कार्यकर्ते आहेत.)

Web Title: Will Ganga revive?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.