‘तान्हाजी’ आणि आगे-मागे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 06:01 AM2020-02-23T06:01:00+5:302020-02-23T06:05:01+5:30

नुकत्याच आलेल्या ‘तान्हाजी’ या चित्रपटानं  41 दिवसांत 347 कोटींचा गल्ला जमवला.  भारतीय चित्रपटाचा हा जागतिक विक्रम. त्याआधी हिंदीत ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’,  मराठीतही ‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’, ‘हिरकणी’.  असे सिनेमे पाठोपाठ आले, अजून अनेक येताहेत. ऐतिहासिक चित्रपटांची अशी लाट येण्याची कारणं काय?  प्रदर्शनाच्या तोंडावरच वादविवाद का उफाळून येतात?  आर्थिक लाभापलीकडे या सिनेमांचे फायदे-तोटे काय?  मुख्य म्हणजे ऐतिहासिक सिनेमे बनवताना   सनेमॅटिक लिबर्टीच्या र्मयादा काय असाव्यात, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात.

Why there is a wave of Historical Films? | ‘तान्हाजी’ आणि आगे-मागे..

‘तान्हाजी’ आणि आगे-मागे..

Next
ठळक मुद्देइतिहासपटांची लाट : हा ‘अभिमान’ की ‘वाट’?

- अमोल उदगीरकर

  ज्याप्रमाणे कुठल्याही नाण्याला दोन बाजू असतात, त्याप्रमाणे सध्या बॉलिवूडमध्ये, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आणि देशातल्या इतर प्रादेशिक चित्रपटांमध्ये ऐतिहासिक चित्रपटांची जी लाट आली आहे तिलापण दोन बाजू आहेत. एक चांगली बाजू आणि एक वाईट बाजू. 
अजय देवगण अभिनित आणि ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी - द अनसंग हिरो’ सिनेमा देशभरात दणकून चालला. सिनेमा बॉक्स ऑफिसवरचे अनेक विक्रम मोडून काढत असतानाच सिनेमावर मूळ इतिहासाचं विद्रूपीकरण केल्याचा आरोप लावण्यात येऊ लागला. सिनेमातले अनेक प्रसंग ऐतिहासिक तथ्यांना धरून नाहीत असा ओरडा होऊ लागला. इतिहासाचं विद्रूपीकरण केल्याचे आरोप आणि त्यातून काही समूहांच्या भावना दुखावल्या गेल्याचे प्रकार यापूर्वी संजय लीला भन्साळीच्या ‘पद्मावत’ आणि ‘बाजीराव मस्तानी’च्या वेळेसपण झाला होताच. आशुतोष गोवारीकरच्या ‘पानिपत’वरपण हे आरोप लागलेच आहेत. त्यातून ऐतिहासिक घटनांवर आधारित सिनेमा आणि वादविवाद हे समीकरणच जणू तयार झालं आहे. 
या वादांच्या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होतात. सध्या ऐतिहासिक चित्रपट एका मागून एक अशा पद्धतीने तयार होत आहेत आणि प्रदर्शित होत आहेत, त्याची कारणं काय आहेत? या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तोंडावरच वादविवाद उफाळून कसे येतात? आर्थिक लाभांच्या पलीकडे जाऊन या सिनेमांचे लाभ-तोटे काय आहेत? आणि मुख्य म्हणजे ऐतिहासिक सिनेमे बनवताना लेखक-दिग्दर्शक जी सिनेमॅटिक लिबर्टी घेतात त्याच्या र्मयादा काय असाव्यात? 
ऐतिहासिक सिनेमे आणि टीव्हीवरच्या मालिका हा काही भारतीय प्रेक्षकांसाठी नवीन प्रकार नाही. ‘मुघल-ए-आझम’, ‘गांधी’, ‘1947 अर्थ’, ‘जोधा अकबर’ आणि असे अनेक सिनेमे यापूर्वी येऊन गेलेले आहेत. मराठी प्रेक्षकांची एक पिढी भालजी पेंढारकरांचे शिवकालीन विषयांवरचे सिनेमे बघत मोठी झाली आहे. जुलमी सत्तांपासून मराठी मुलखाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या शिवाजी महाराजांबद्दल मराठी माणूस जातिधर्माच्या भिंती तोडून हळवा आहे. आतापण मराठीत ‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’, ‘हिरकणी’ असे ऐतिहासिक सिनेमे पाठोपाठ आले. शिवरायांचे सरदार आणि पावनखिंडीमध्ये धारातीर्थी पडलेल्या बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर मराठीमध्ये एकाचवेळेस दोन सिनेमे तयार होत आहेत. मध्यंतरी येऊन गेलेला अक्षय कुमारचा  ‘केसरी’ हा सिनेमापण एका ऐतिहासिक घटनेवर प्रकाश टाकतो. या ऐतिहासिक विषयांवर आधारित सिनेमाचं एक टेम्पलेट आहे. टाळ्याखाऊ संवाद, नायकाचं आणि पात्रांचं उदात्तीकरण, काळ्याकुट्ट रंगात रंगवलेले खलनायक, प्रभावी युद्धदृश्यांची भरमार, व्हीएफएक्सचा बजेटच्या र्मयादेनुसार केलेला सढळ वापर आणि तथ्यांच्या ऐवजी लेखक -दिग्दर्शकांनी (अर्थातच काही सन्माननीय अपवाद वगळता) इतिहासाचं आपापल्या परीनं केलेलं इंटरप्रिटेशन हे या ऐतिहासिक सिनेमांच्या टेम्पलेटचे भाग आहेत. 
देशात कुठल्या प्रकारचा सिनेमा बनत आहे, याची पाळंमुळं देशाच्या तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीमध्ये सापडतात. उदाहरण द्यायचं झालं तर अमिताभ बच्चनचा ‘अँग्री यंग मॅन’ इमेज लोकप्रिय करणारा सिनेमा हा सत्तरच्या दशकातल्या सामाजिक अस्वस्थतेचं प्रॉडक्ट होता. स्वातंत्र्यानंतर देशाच्या हवेत जो एक रोमॅण्टिसिझम होता तो  सत्तरच्या दशकात पूर्णपणे विरून गेला होता. भ्रष्टाचार, लाल फीतशाही, सरकारी यंत्रणांची प्रचंड अकार्यक्षमता, यामुळे देशातल्या परिस्थितीला कावलेला प्रेक्षक बच्चनच्या ‘अँग्री यंग मॅन’मध्ये स्वत:ला बघत होता. त्यामुळे त्या दशकातल्या सिनेमाला एक आकार मिळाला. सध्याच्या ऐतिहासिक सिनेमांच्या आलेल्या लाटेचं विश्लेषणपण सध्याच्या सामाजिक, राजकीय परिप्रेक्ष्यात करता येतं. 
मोदींच्या राष्ट्रीय राजकारणात झालेल्या उदयानंतर देशात  हिंदू राष्ट्रवादाची लाट उसळली आहे. हे चांगलं का वाईट, बरोबर का चूक याचा ऊहापोह करण्यासाठी वेगळा लेख लिहावा लागेल. या उजव्या राष्ट्रवादाचा रोख जसा पाकिस्तानकडे आहे तसंच देशातल्या काही समूहांकडेपण आहे. हे चांगलं आहे की वाईट यावर वेगवेगळी मतं असू शकतात. पण वातावरणातला हा बदल एकदमच जाणवण्यासारखा आहे. यामुळे प्रचंड ध्रुवीकरण झालं आहे. 
या राष्ट्रवादाच्या प्रभावाखाली असणार्‍या बहुसंख्य जनतेला आपल्या इतिहासाबद्दल अभिमान आहे. त्यांना तो इतिहास आता मोठय़ा पडद्यावर बघायचा आहे. या इतिहासात नायक कोण आहे आणि खलनायक कोण आहे, याबाबत त्यांच्या मनात स्पष्टता आहे. आपल्याकडे येणार्‍या बहुतेक इतिहासपटांमध्ये जनभावनेचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं.  ‘तान्हाजी - द अनसंग हिरो’मध्ये उदेभान या मोगलांच्या राजपूत सरदाराचे विशिष्ट पद्धतीने केलेलं खलनायकीकरण हे या समजाना दिलेलं पुष्टीकरण देतं. आपण कुठले सिनेमे बघावेत यातपण लोकांची सामाजिक, राजकीय मतं महत्त्वाची ठरू लागली आहेत. ‘छपाक’ आणि  ‘तान्हाजी - द अनसंग हिरो’ या एकाच दिवशी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या वेळेस हे ध्रुवीकरण प्रकर्षानं जाणवलं. 
‘छपाक’ची मुख्य अभिनेत्री आणि निर्माता दीपिका पदुकोण हिने जेएनयू विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि ‘छपाक’वर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली. जो ‘छपाक’ बघेल तो डाव्या विचारसरणीचा आणि ‘तान्हाजी’ बघेल तो देशभक्त असं एक वेगळंच नॅरेटिव्ह तयार झालं. हे फक्त एक उदाहरण झालं. धार्मिक-राजकीय ध्रुवीकरणाच्या काळात हे वारंवार होणार. थोडक्यात लोकांच्या अस्मिता टोकदार होण्याच्या काळात इतिहासपट येत राहणार हे नक्की.
आपले लेखक, दिग्दर्शक अशा सिनेमांमध्ये घेत असलेली सिनेमॅटिक लिबर्टी हा चिंतेचा विषय आहे. यात महत्त्वाचा मुद्दा हा की सिनेमॅटिक लिबर्टी घेणं हे स्वाभाविकच आहे. कारण शेवटी ही लोकं सिनेमा बनवत आहेत, डॉक्युमेंट्री नाही. प्रेक्षकांचं रंजन करणं हा या सिनेमाचा मुख्य उद्देश आहे. पण ती सिनेमॅटिक लिबर्टी किती प्रमाणात घेतली जावी याला काही र्मयादा असाव्यात. आपला समाज पुरु षप्रधान आहे आणि सिनेमा नायकप्रधान. आपल्या इतिहासात होऊन गेलेली मोठी लोकं ही जमिनीशी नाळ टिकवलेली साधी माणसं होती. पण आपल्या सिनेमात पराक्रमी, पण आपल्यासारख्याच हाडामांसाचे असणार्‍या इतिहासपुरुषांचं  नायकीकरण होतं. या इतिहासपुरुषांना तद्दन मसाला फिल्म्सच्या किंवा दाक्षिणात्य देमारपटातल्या नायकांच्या साच्यात बळजबरीनं घुसवण्याचा प्रयत्न आपले बहुतेक इतिहासपट करायला जातात आणि सिनेमाची वास्तवाशी फारकत व्हायला सुरु वात होते. 
हे इतिहासपुरु ष आपल्या सिनेमात अचाट ताकदीचे, अर्तक्य कृत्य करणारे दाखवतात आणि खरा घोळ इथं सुरू होतो. इतिहासाचं सिनेमाकरण करण्याच्या नादात काही समूह काळ्याकुट्ट रंगात रंगवणे, राजघराण्यातल्या घरंदाज स्रियांना सिनेमाच्या पडद्यावर का होईना नाचवणे असे प्रकारपण घडायला लागतात.
सिनेमात दाखवला जाणारा इतिहास खरा का खोटा, हे कसं ताडून बघायचं हाही एक मोठा प्रश्न आहे. कारण आपण एक समाज म्हणून इतिहासाचं दस्तऐवजीकरण करण्यात प्रचंड आळशी आहोत. काही बेभरवशाच्या बखरी आणि त्याहून वाईट म्हणजे ऐतिहासिक कादंबर्‍या हा ऐवज आपण इतिहास समजून घ्यायला वापरतो. ज्या काही थोड्याफार इतिहासाचं दस्तऐवजीकरण झालं आहे, त्याचीपण अनेक जातीय-धार्मिक-प्रादेशिक व्हर्जन्स आहेत. इतिहासाच्या दस्तऐवजीकरणातल्या या बजबजपुरीचा फायदा सिनेमात इतिहासाचं विद्रूपीकरण करणार्‍या लोकांना होतो. कारण खरा इतिहास नेमका काय आहे याबद्दल एक समाज म्हणून आपल्यातच एकमत नाहीये. सिनेमातला इतिहास कुठल्या निकषांवर तोलायचा याबद्दल प्रचंड सांशकता आहे. ही अस्ताव्यस्त साशंकता हेच आपल्या अनेक दुखण्याचं मूळ आहे. 
पण या सिनेमांना एक र्शेय द्यायला हवं. आपल्या इतिहासातले अनेक अप्रकाशित दुर्लक्षित नायक यानिमित्ताने जनतेपर्यंत पोहोचू लागले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रापुरतेच माहीत असलेले तानाजी मालुसरे आता पूर्ण देशभरात माहीत झाले. दिल्ली टाचेखाली ठेवणारे बाजीराव पेशवे आणि पानिपतावर अब्दालीला भिडणारी लढवय्यी मराठी जमात देशभरात माहीत झाली. एका मोठय़ा समूहाला स्वराज्य बनवण्याची प्रेरणा देणारे शिवाजी महाराज नेमके कोण आहेत, याबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. इतिहासाचं विद्रूपीकरण केल्याचं अपर्शेय या सिनेमाला द्यायचं असेल तर आपले इतिहासपुरु ष देशभरात पोहोचवण्याचं र्शेयपण याच सिनेमाला द्यावं लागेल. ही आपल्या सिनेमाची मोठी उपलब्धी आहेच. लेखाच्या पहिल्याच वाक्यात म्हटल्याप्रमाणे, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. इतिहासपटांच्या नाण्याची उजळ बाजू आहेच आणि याचं र्शेय त्यांना द्यायलाच हवं.

amoludgirkar@gmail.com
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)

ऐतिहासिकपटांची लाट नाही..
ऐतिहासिक सिनेमाच करायचा असं काही माझ्या डोक्यात नाही आणि अशी काही लाट वगैरे येतेय याही मताचा मी नाही. मुळात ऐतिहासिक विषय लोकांना आधीपासून माहीत असतो. गोष्ट तर त्यांनी लहानपणापासून ऐकलेली असते मात्र एखादी गोष्ट एक दिग्दर्शक म्हणून मी माझ्या नजरेतून कशी मांडेन यासाठी मी माझा पुढचा सिनेमा ‘पावनखिंड’ करतोय. अजून दोन ऐतिहासिकपट पण मी करणार आहे. मुळात तुम्हाला जर एखादा विषय भावत असेल तर तो सिनेमा कोणताही असो, आपण एक दिग्दर्शक म्हणून करायलाच हवा या मताचा मी आहे. 
- अभिजीत देशपांडे (लेखक, दिग्दर्शक)

इतिहासातलं नाट्य शोधण्याचा प्रयत्न
मुळात ऐतिहासिक सिनेमा कोणी एकजण करेल अशी काही सक्ती नाही किंवा मक्तेदारीही नाही. मात्र लेखक-दिग्दर्शकाने त्या ऐतिहासिक विषयांच्या मंदिराच्या वीटांना कुठेही धक्का न बसू देता कळस चढवला पाहिजे. मी मुळात ऐतिहासिकच सिनेमा का करतो त्यापेक्षा ते विषय मी समजून उमजून, 2 ते 3 वर्ष त्याचा सखोल अभ्यास करून प्रेक्षकांसमोर मांडतो, म्हणून ते प्रेक्षकांना भावतात असं मी म्हणेन. वादासाठी, भरपूर पैसे मिळवण्यासाठी कोणताही फिल्ममेकर मुळातच सिनेमा बनवत नसतो. आपला सिनेमा जास्तीत जास्त लोकांनी पाहावा असं त्याचं मत असतं. मुळात आपल्या इतिहासातच इतकं नाट्य लपलं आहे की आपोआप भरपूर विषय आपल्याला मिळत असतात. आजपर्यंत ते कोणी शोधण्याचा फारसा प्रयत्न केलेला नाही. तो प्रयत्न मी किंवा काहीजण करत असतील तर लोकांना चांगला इतिहासच पडद्यावर पाहायला मिळतोय असं मी म्हणेन.
- दिग्पाल लांजेकर (लेखक, दिग्दर्शक)

 ..तर ऐतिहासिक सिनेमात मजा
तान्हाजीचा इतिहास आज संपूर्ण देशभरात पोहचतोय याचा सर्वात जास्त आनंद आहे. एका राज्यात घडलेली ऐतिहासिक घटना बॉलिवूडमुळे अख्ख्या भारतभर पोहचते आहे आणि त्याची माहिती प्रेक्षकांना मिळत आहे. ऐतिहासिक सिनेमा बनवण्यात चूक काय? तंत्रज्ञानाचा वापर करून सिनेमा बनवण्यात आपण ऐतिहासिक घटनांना कुठेही धक्का पोहचू दिला नाही तर प्रेक्षक आनंदानं आणि भरभरून प्रतिसाद देऊन सिनेमाचं कौतुक करतात. आपल्याकडच्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांमध्ये असलेल्या करारीपणामुळे सिनेमा करण्यात एक प्रकारची मजा येते. हे एक आव्हान आहे असं मला वाटतं. तंत्रज्ञान प्रगत झाल्यामुळे योग्य निर्माता आणि कलाकार मिळाले तरच ऐतिहासिक सिनेमा करण्यात एक प्रकारची मजा असते. 
- ओम राऊत (दिग्दर्शक)

(मुलाखती आणि शब्दांकन - अजय परचुरे )

Web Title: Why there is a wave of Historical Films?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.