खांडेकर आजही का हवेत?

By Admin | Updated: July 5, 2015 13:48 IST2015-07-05T13:48:16+5:302015-07-05T13:48:16+5:30

खांडेकरांच्या निधनालाही आता तीस र्वष उलटली.ते सांगत तो ध्येयवाद कालबाह्य झाला की काय अशी शंका घेता येईल, अशा या काळात आजही जुन्या, मधल्या आणि नव्या वाचकांनाही खांडेकर भुरळ घालतात. ती का? काळाच्या पुष्कळच पुढल्या टप्प्यावर खांडेकरांचा आधार वाचकांना नेमका कशासाठी वाटत असावा? - खांडेकरांच्या अप्रकाशित साहित्याचा संपादकाने घेतलेला हा एक शोध!

Why is Khandekar still in the air? | खांडेकर आजही का हवेत?

खांडेकर आजही का हवेत?

>- डॉ. सुनीलकुमार लवटे
 
 
मराठी भाषा आणि साहित्यास भारतीय बनवण्याचं ऐतिहासिक कार्य वि. स. खांडेकरांनी केलं. भारतीय ज्ञानपीठाचा मराठीला लाभलेला पहिला पुरस्कार त्यांना मिळाला. त्यांच्या ‘ययाति’ कादंबरीने भोगलोलूप होत चाललेल्या समाजास त्यागाची शिकवण दिली. वि. स. खांडेकर मराठी साहित्य क्षितिजावर अवतरले सन 1919 मध्ये. सन 1976 ला त्यांचा मृत्यू होईर्पयत ते अखंड लिहित राहिले. सुमारे सहा दशकांच्या लेखन काळात वि. स. खांडेकरांनी प्रचुर नि बहुआयामी लेखन केले. त्यांच्या जीवनात त्यांनी विपुल लेखन केलं. पण ह्यातील म्हणाल तर 16 कादंब:या, 39 कथासंग्रह, 11 निबंधसंग्रह, 3 रूपक कथासंग्रह, 1 प्रस्तावना संग्रह, 8 लेखसंग्रह, 4 व्यक्ती व वा्मय ग्रंथ, 1 व्यक्तिलेख संग्रह, 1 चरित्र ग्रंथ, 1 आत्मचरित्र, 3 भाषांतरे, 3 भाषण संग्रह, 1 नाटक, 35 संपादित ग्रंथ अशी सुमारे सव्वाशे पुस्तकं प्रकाशित झाली. सर्वसाधारणपणो लेखकाबरोबरच त्याच्या लेखन प्रकाशनाचा ओघ थांबतो असं आपण पाहतो. पण वि. स. खांडेकर हे मराठीत अपवाद लेखक म्हणायला हवेत. त्यांच्या निधनाला सुमारे 3क् वर्षे होत आली. त्यांच्या पूर्वप्रकाशित साहित्याच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या प्रकाशित होत आहेत. एकटय़ा ‘ययाति’ कादंबरीची पस्तिसावी आवृत्ती सध्या विकली जात आहे. इतकंच नव्हे तर त्यांचं अप्रकाशित, असंकलित साहित्य शोधून काढून संशोधक, संपादक वर्तमान पिढीनं न वाचलेलं साहित्य संपादित करून प्रकाशित करीत आहेत. खांडेकरांच्या मृत्यूनंतर असं नवसाहित्य किती प्रकाशित झालं? 1 कादंबरी, 4 कथासंग्रह, 1 रूपक कथासंग्रह, 4 लघुनिबंध संग्रह, 3 वैचारिक लेखसंग्रह, 3 व्यक्तिलेख संग्रह, 2 आत्मचरित्रत्मक पुस्तके, 1 मुलाखत संग्रह, 1 पटकथा संग्रह, 2 कवितासंग्रह, 1 सचित्र चरित्रपट, 1 चरित्रग्रंथ असे 25 ग्रंथ प्रकाशित झालेत अन् त्यांच्याही आवृत्त्यांवर आवृत्त्या प्रकाशित होत आहेत. अजून 1 विनोदी लेखसंग्रह, 1 भाषण संग्रह, 2 समीक्षा ग्रंथ, 2 वृत्तपत्रीय लेखनसंग्रह, 2 अपूर्ण कादंब:या, 1 निवडक प्रस्तावना संग्रह, 1 परीक्षण संग्रह, 1 स्मारक ग्रंथ असे डझनभर ग्रंथ संपादित झाले असून, ते प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहेत.
वि. स. खांडेकरांच्या साहित्यात अशी कोणती गोष्ट आहे की जिने कालच्या वाचकांना रिझवलं, आजच्या वाचकांना ते वाचणं आवश्यक वाटतं आणि कदाचित उद्याच्या वाचकांचंही ते आकर्षण असेल? वि. स. खांडेकरांचं साहित्य परंपरेच्या पाश्र्वभूमीवर वेगळं ठरतं. खांडेकरांच्या लेखनाचं आपलं असं वेगळेपण आहे. वाचक ते वाचतो, तेव्हा आपला एक वडीलमाणूस जवळ बसून चार हिताच्या गोष्टी ऐकवतो असा विश्वास ते निर्माण करतं. आशय आणि अभिव्यक्ती अशा दोन्ही अंगांनी ते सुसंस्कृत, सभ्य वाटत राहतं. उदाहरणच सांगायचं झालं तर खांडेकरांच्या कादंब:यांत प्रेम असतं, पण त्यात कामुकता नसते.  विजेची चमक दाखवणा:या कल्पना कराव्या, उपमा द्याव्यात, सुभाषित वजा वाक्यांची फेक असावी ती खांडेकरांची! काही लोक त्याला कृत्रिम म्हणतात. पण कला नि कृत्रिमता या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवं. ‘भग्न स्वप्नांच्या तुकडय़ांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आला नाही, तर त्याला भविष्याच्या गरुडपंखाचे वरदानही लाभले आहे’ अशी वाक्यं वाचकांना एकाच वेळी त्यातील सौंदर्याने दिग्भ्रमित करतात नि दुसरीकडे जगण्यावरील श्रद्धा वाढवत सामान्य, हताश वाचकांना जगण्याची उमेदही देतात. 
खांडेकरांच्या साहित्याचं खरं बलस्थान त्यांचं मूल्यशिक्षण होय. सदाचार, नैतिकता, अहिंसा, विज्ञाननिष्ठा, धर्मनिरपेक्षता, पुरोगामीपण या अशा गोष्टी आहेत, की त्यांचं महत्त्व केवळ कालातीत म्हणावं लागेल. ‘लास्टिंग ह्युमन व्हॅल्यू’ कोण नाकारेल? शिवाय खांडेकरांचं लेखन, जीवन म्हणजे विचार आणि कृतीचं अद्वैत. जे महर्षी धोंडो केशव कर्वेवर गौरव लेख, चित्रपट कथा (‘माझं बाळ’) लिहून थांबत नाहीत. हिंगणो स्त्री शिक्षण संस्था, पंढरपूरच्या अनाथाश्रमास नियमित भाऊबीज पाठवत. शिवाजीराव पटवर्धनांच्या अमरावतीच्या कुष्ठधामास (दत्तपूर) नियमित मदत करीत. बाबा आमटेंना स्वत: भेटायला जाऊन नम्रतेने नमस्कार करणारे नि नंतर त्यांच्या ‘ज्वाला आणि फुले’ काव्यसंग्रहास स्वत: प्रस्तावना लिहिणारे खांडेकर ‘अंधार फार झाला, पणती जपून ठेवा’ म्हणत जो आचारधर्म पाळतात तो वाचकांच्या चोखंदळ, चिकित्सक नजरेत चिरंतर बसलेला असतो.
वि. स. खांडेकरांचं साहित्य म्हणजे केवळ शाब्दिक करामत नव्हे! वाचक जेव्हा ते वाचतो, तेव्हा आजही जागतिकीकरणात गोंधळलेल्या, हरलेल्या पिढीस जगण्यावर स्वार होण्याचं बळ तेच देतं. तो नंदादीपाचा अंधुकसा प्रकाश, कवडसा घेऊन वाचक विषम गर्दीतूनही आपली पायवाट चालत राहतो. 
खांडेकरांचं साहित्य सत्त्वशील माणुसकीवर विश्वास ठेवणारं. त्यांची पात्र सामान्य असतात. सर्वसाधारण वाचकांना त्यांच्यात स्वत:चं प्रतिबिंब दिसतं. हा आपलेपणा खांडेकरांचे नायक, नायिका देतात. ‘नवी स्त्री’ सारखी कादंबरी आजच्या नवशिक्षित महिलांनाही ऊर्मी मिळते. ‘ध्वज फडकत ठेवू या’ हा लेखसंग्रह वाचताना दलित वाचकांना लक्षात येतं की अरे, हा लेखक काळाच्या फारच पुढे होता. दलित साहित्यप्रवाह अवतरण्यापूर्वी सन 1971 साली ‘दलित सेवक’ मध्ये सलग नऊ लेख लिहून समाजमनाची बधिरता कमी झाली पाहिजे, समाजमनाची नांगरणी झाली पाहिजे म्हणून त्यांनी आग्रह धरला होता. आपल्या स्नेह्याच्या घरी जेवण्यास गेल्यानंतर सोबतच्या दलित विद्याथ्र्यासमोर शेणाचा गोळा ठेवणा:या यजमानाला ते स्वत: जेवल्यानंतर सारवून खजिल करतात. त्या काळात सार्वजनिक सहभोजन योजणारे खांडेकर उक्ती नि कृतींनी पुरोगामी होते. राजर्षी शाहू, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर लिहिणारे खांडेकर व्यक्तिगत जीवनात देव, धर्म पाळत नसत. अंधश्रद्धा निमरूलक व्यवहार हे त्यांचं खरं वैचारिक अधिष्ठान होतं. ‘चांभाराचा देव’ कथेवर ‘अमृत’ पटकथा लिहून चित्रपट प्रकाशित करणारे खांडेकर त्यांच्या पटकथा, कथा-कादंब:यांतील स्त्रीपात्र, नायिका प्रेयसी नव्हत्या, त्या होत्या मैत्रिणी कंपॅनिअन (‘अमृतवेल’ची नंदा) हे पाहिलं की खांडेकरांच्या साहित्याचं आधुनिकपण उमजतं आणि तेच नवतरुण वाचकांना अचंबित करून आकर्षित करत राहतं.
खांडेकरांचे लघुनिबंध असोत वा रूपककथा, साध्या गोष्टी, प्रसंग, वस्तूतून चिरकालीन सत्य अधोरेखित करण्याचं सामथ्र्य हे खास खांडेकरी म्हणायला हवं. म्हणून त्यांचं साहित्य केवळ मराठीत वाचलं जात नाही, तर समग्र भारतीय भाषांत त्याची भाषांतरे आढळतात. सिंधी, पंजाबी, बंगाली, कन्नड, मल्याळम्, तामिळ, गुजराती, हिंदी, इंग्रजी किती भाषा सांगाव्या! प्रेमचंद, शरतचंद्र, रवींद्रनाथ यांच्याप्रमाणोच खांडेकर साहित्य भारतभर वाचलं जातं. विशेष म्हणजे, त्या भाषेतही भाषांतरांच्या आवृत्त्या आजही प्रकाशित होतात. तामिळ, गुजरातीत तर खांडेकर यांच्या भाषेतील लेखक मानले जातात. तामिळ व मराठी वाचकांचा कौल घेतला तर माझी खात्री आहे की तामिळ भाषिक मतं खांडेकरांना अधिक मिळतील.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराय यांना खांडेकरांच्या कादंब:यांचे उतारेच्या उतारे पाठ होते. त्यांच्या ‘द्रविड कळघम’, ‘द्रविड मुनेत्र कळघम’ पक्षाची चळवळ खांडेकर विचारांवर उभी राहिली आहे. तामिळ साहित्य इतिहासात ‘खांडेकर साहित्य’ युग/अध्याय म्हणून अभ्यासलं जातं. खांडेकरांचे तामिळ अनुवादक कां. श्री. श्रीनिवासाचार्य तर तामिळमध्ये लेखक म्हणून ओळखले जातात, ते केवळ खांडेकरांच्या भाषांतरामुळे. 
श्रीलंका, मलेशिया, रशियामध्ये खांडेकर साहित्यावर संशोधन, समीक्षा आहे. रशियात ‘ययाति’ भाषांतरित झाली आहे. देश, प्रदेशाच्या सीमा ओलांडणारं खांडेकरी साहित्य त्या मातीत रुजतं ते त्याच्या वैश्विक सामथ्र्यामुळेच ना?
वि. स. खांडेकरांनी आपल्या साहित्यातून ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘पुराण’ इत्यादिंमधील पात्रं घेऊन त्यांची नाळ इथल्या वर्तमानाशी जोडली म्हणून प्राचीन व आधुनिकतेचा सेतू निर्माण करणारं हे साहित्य जुन्या, नव्या पिढीस वाचनीय ठरतं. खांडेकर पाश्चात्त्य साहित्याचे व्यासंगी वाचक व अभ्यासक होते. टॉलस्टॉय, स्टीफन कोट्स, बायरन आदि कथाकार, नाटककार, कवी खांडेकरांनी चांगले वाचले होते. खलील जिब्रान, अर्नस्ट टोलरच्या रूपककथा, पत्रे यांची भाषांतरे ‘सुवर्णकण’, ‘सोनेरी सावल्या’, ‘वेचलेली फुले’, ‘तुरुंगातली पत्रे’च्या रूपांनी उपलब्ध आहेत. दुसरीकडे ‘शाकुंतल’, ‘उत्तर रामचरित्र’, ‘शारदा’ यांच्या सौंदर्याची खांडेकरांना जाण असते. ‘मॅकबेथ’, ‘हॅम्लेट’, फ्रॉमिथिअस’, ‘ज्युलियस सिझर’ त्यांना माहीत असतो. 
साहित्यिक श्रेष्ठत्वाच्या पाऊलखुणा चोखाळणारे खांडेकर वैश्विक दर्जाचं लेखन करू शकले ते चतुरस्त्र वाचन व व्यासंगामुळे. या सा:याचं एक वैचारिक अधिष्ठान खांडेकरी साहित्याला लाभलेलं असतं. त्यामुळे वाचक आपण एक प्रगल्भ अभिजात साहित्य वाचतो या भावनेनं खांडेकरांच्या साहित्याकडे गांभीर्याने पाहतो. 
वाचकांचं ‘खांडेकरवाचन’ हा शिळोप्याचा उद्योग न राहता वेळेचा सदुपयोग म्हणून जीवनदृष्टी देणारं ठरतं. 
पूर्व-पश्चिम, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, प्राचीन-आधुनिक असा सेतू खांडेकर सतत बांधत एक वैश्विक अभियांत्रिकी रचत जातात. त्यातून वाचक मराठी न राहता भारतीय, जागतिक आपसूकच होतो. 
‘आपणासारिखे करूनि सोडावे सकलजन’ हा खांडेकरी साहित्याचा वस्तुपाठ.. त्यातच खांडेकर साहित्याची वाचनीयता, अविस्मरणीयता, अमरता सामावलेली आहे. 
म्हणून खांडेकर काल वाचले जात होते, आज वाचले जात आहेत आणि उद्याही वाचले जातील, ही तर काळ्या दगडावरची रेघ! 
- त्याला कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही.

Web Title: Why is Khandekar still in the air?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.