शिव्याशाप कशाला? ‘बोट’ धरा!
By Admin | Updated: July 18, 2015 13:22 IST2015-07-18T13:22:57+5:302015-07-18T13:22:57+5:30
दोन पिढय़ांत अंतर राहणारच. नव्या तंत्रज्ञानानं तर आता सारीच मूल्यं पार उलटीपालटी करून टाकली आहेत. पण हेच तंत्रज्ञान दोन पिढय़ांतली आचार-विचारांची दरीही सांधतंय. तंत्रज्ञानाची कास धरली तर पिढय़ान्पिढय़ांचा हा झगडा नुसता सुटणारच नाही, एक नव मैत्र जुळत जाईल.

शिव्याशाप कशाला? ‘बोट’ धरा!
>- अच्युत गोडबोले
उत्तर अमेरिकेतल्या महाराष्ट्र मंडळाची मातृसंस्था असलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाचे 17वे अधिवेशन 3 ते 5 जुलै दरम्यान लॉस एंजेलिस येथे पार पडले. या अधिवेशनाचे प्रमुख पाहुणो म्हणून केलेल्या बीजभाषणाचा संपादित सारांश.
दर 25 वर्षानी पिढी बदलते असं म्हणतात. पण एवढंच नाही, हा बदल हजारो वर्षापासून सुरूच आहे. पिढी बदलते, तसं दोन पिढय़ांमधील अंतरही बदलतं. ‘जनरेशन गॅप’ हा विषय माणूस जन्माला आला तेव्हापासून म्हणजे माणसाच्या अस्तित्वाइतकाच जुना आहे.
या जनरेशन गॅपनं आज पिढीतलं नुसतं ‘अंतर’च वाढवलेलं नाही, तर तो एक मोठा प्रश्नही झालाय.
एका माणसानं जनरेशन गॅपची चांगली व्याख्या केली आहे.
‘20 रुपये वाचविण्यासाठी वडील 20 मिनिटं चालायचे, तर मुलगा 20 मिनिटं वाचविण्यासाठी 20 रु. खर्च करतो!’
हा किस्सा आपल्याला ‘विनोद’ म्हणून ऐकायला चांगला वाटतो. पण त्यात खोलवर अर्थ दडलाय. पूर्वी वेळेला तौलनिकदृष्टय़ा कमी महत्त्व होतं, पण पैशांची बचत करणं खूपच अत्यावश्यक होतं. या उलट आज नवीन पिढीकडे जास्त पैसा खुळखुळायला लागलाय. त्यामुळे ते तो खर्च करायला मागेपुढे बघत नाहीत, शिवाय आजच्या 24/7 चालणा:या जेट युगात वेळेला प्रचंड महत्त्व आलंय आणि वेळेची किंमतही खूपच वाढलीय. पूर्वी लोक पैसा वाचवायचे, आता वेळ वाचवतात. केवळ जनरेशन गॅपविषयी नाही, आजच्या बदलत्या परिस्थितीलाही ते तितकंच लागू आहे!
1971 साली राजकपूर निर्मित आणि रणधीर कपूर दिग्दर्शित ‘कल, आज और कल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तीन पिढय़ांचं चित्रण त्या वेळी दाखवलं होतं. या चित्रपटात कामही पृथ्वीराज कपूर, राजकपूर आणि रणधीर कपूर या प्रत्यक्षातल्या तीन पिढय़ांनी केलं होतं. तीन पिढय़ांमध्ये अंतर तेव्हाही होतं, आजही आहे आणि पुढेही असणारच आहे. पहिल्या पिढीतले नवरा-बायकोदेखील मिळून एकत्र सिनेमाला जात नसत. प्रेमविवाह तर सोडाच. तसंच सिनेमातही प्रेम व्यक्त करताना दोन गुलाबांची फुलं एकमेकांकडे झुकताना दाखवली की यांचं प्रेम जमलंय असं आपल्याला समजावून घ्यावं लागे! त्यानंतरच्या पिढीत मात्र प्रेम व्यक्त करताना शेरोशायरीमधून प्रेम दाखवलं जायला लागलं. त्यानंतरची पिढी मात्र डायरेक्ट ‘आती क्या खंडाला?’ म्हणून आपल्या भावना थेट आपल्याच भाषेत विचारून मोकळी होते.
नवीन उद्योग, शहरं, आधुनिक तंत्रज्ञाना. यामुळे आपली मूल्यं बदलली. व्यक्तिस्वातंत्र्याची जागा टोकाच्या व्यक्तिवादानं घेतली. अमेरिकेत तर मुलं वयात आल्यावर आई-वडिलांपासून दूर, ‘स्वतंत्र’ राहायला लागली. अर्थात आपल्याकडे आणि अमेरिकेत तेव्हा बराच फरक होता.
अमेरिकेत वेगळं घर घेणं त्यांना एकतर परवडतही होतं आणि तेवढी नवीन घरं उपलब्धही होती. पण भारतात मात्र मोठं झाल्यावर आई-वडिलांपासून वेगळ्या घरात जाणं हे फक्त श्रीमंतांना परवडणारं होतं. त्यामुळे भारतातल्या नवश्रीमंत/श्रीमंत मुलं अमेरिकनांप्रमाणोच मोठय़ा शहरात 2-3-4 बीएचके फ्लॅट्समध्ये राहायला लागली. पण भारतातल्या 7क्-8क्टक्के लोकांना मात्र असलं काही परवडण्यासारखंच नव्हतं.
त्यांना झोपडपट्टीत, चाळीत किंवा लहान फ्लॅटमध्ये आई-वडिलांबरोबर आणि काही वेळा आजी-आजोबांबरोबरही राहावं लागायला लागलं. त्यामुळे त्यांची प्रचंड कुचंबणा होत होती. कोटय़वधींना एकांतच मिळत नव्हता. इतकं की ‘माझं तुङयावर प्रेम आहे’ असं एकानं दुस:याला सांगणंही अशक्य व्हावं! मग आई-वडिलांचा किंवा आजी-आजोबांचा तिरस्कार करणं, त्यांचं ओझं वाटणं, त्यांचा अपमान करणं/होणं हे सगळं सुरू झालं. एकेकाळी मोठय़ांना नमस्कार करणारी, त्यानंतर त्यांच्याशी हस्तांदोलन करणारी मुलं आता त्यांना टाकून बोलायला लागली. त्यांचा तिरस्कार करायला लागली.
अमेरिकेचे ढोबळमानानं तीन कालखंड मानता येतील. दुस:या महायुद्धानंतर 1946 ते 1964, 1964 ते 1976 आणि त्यानंतर आतार्पयतचा काळ. त्यात 1972र्पयतच्या कालखंडाला ‘गोल्डन एज ऑफ कॅपिटलिझम’ म्हटलं जातं. या काळात बेकारी जवळजवळ नव्हती, युद्ध, दहशतवाद, तेजीमंदीची अरिष्टं, अस्थिरता. या गोष्टी जवळजवळ नगण्य होत्या. याच काळात ‘अमेरिकन ड्रीम’ जन्माला आलं.
अमेरिकेत कुणीही आलं तर आपल्या बुद्धीच्या आणि श्रमाच्या जोरावर प्रगती करू शकतो असं अमेरिकेविषयी एक स्वप्नवत चित्र जगात सगळीकडेच तयार झालं होतं. यामुळेच जगातून अनेक लोक अमेरिकेत नशीब काढायला गेले. भारतातूनही कित्येक जण गेले. काही शिकायला, काही नोकरी करायला, तर काही जण संशोधन करायला किंवा उद्योग काढायला.
आपलं ‘अमेरिकन ड्रीम’ पूर्ण करण्यासाठी अमेरिकेलाही जगातल्या हजारो हुशार तरुणांची गरज होती. त्यामुळे त्यांनी 1965 सालीच व्हिसाचे नियम शिथिल केले होते. त्यामुळे ही पहिल्या पिढीतली मंडळी अमेरिकेत दाखल झाली. आपल्या बुद्धीच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी यश प्राप्त केलं. अमेरिकेत त्यांना पैसा आणि प्रतिष्ठा मिळाली.
198क् आणि 199क् च्या दशकात भारतातही आयटीची वाढ झाली. अमेरिकेतही चांगल्या, हुशार आयटी प्रोफेशनल्सची गरज होती. त्यामुळे 198क् ते 2क्क्क् या काळात आणि खरंतर अगदी आतार्पयत एक लाखावर भारतीय अमेरिकेत गेले आणि त्यातले कित्येक जण अमेरिकेत राहायला लागले. ही मंडळी मात्र अजून भारताला विसरली नव्हती. मनात भारतीय संस्कृती बाळगून ती अमेरिकन संस्कृतीशी जुळवून घेत होती. पण त्यांचे आई-वडील मात्र भारतात होते. त्यांना आपली मुलं अमेरिकेत आहेत याचा एका बाजूला अभिमान वाटत होता, पण दुसरीकडे ती मुलं आज आपल्यापासून दूर गेल्यामुळे त्यांना एकाकीही वाटत होतं. हळृहळू अमेरिकेत आलेलीही मंडळी अमेरिकेत रमली. भारतीयांच्या अमेरिकेतल्या तीन पिढय़ा आज अमेरिकेत नांदत आहेत आणि आपापल्या कर्तृत्वानं अमेरिकेतही हुशार आणि यशस्वी म्हणून चांगलं नाव कमावताहेत. आज मात्र जनरेशन गॅपचं अंतर एकांगी नाही. त्यात बदल होतोय. एकीकडे जेवढय़ा प्रमाणात अंतर वाढताना दिसतं, तितक्याच प्रमाणात ते अंतर कमीही होताना दिसतं आहेच. पहिली पिढी आणि तिसरी पिढी यात अंतर निश्चितच आहे, पण दुसरी पिढी आणि तिसरी पिढी यातलं अंतर मात्र नक्कीच कमी झालं आहे.
आज शिक्षण आणि तंत्रज्ञानातील झपाटय़ानं, प्रगतीनं या दोन पिढय़ांना एकत्र आणलं आहे. आज आई आणि मुलगी किंवा बाप आणि लेक एकमेकांचे चांगले मित्र झाले आहेत. आपल्या बहुतांशी गोष्टी ज्या पूर्वी वडीलधा:यांसमोर बोलायच्या नसतात असा धाक होता, तो आज गळून पडला आहे आणि त्या सर्व गोष्टी आता एखाद्या मित्रप्रमाणो शेअर केल्या जातात. दुसरी पिढी तिस:या पिढीची प्रगती समजून घेत अपडेटेड राहण्याचा प्रयत्न करताना बघायला मिळतंय. एखादं कुटुंब एकत्रितपणो एखादा चित्रपट बघायला जातांना तुम्ही कधी पाहिलंय? दोन पिढय़ा एकत्रित ‘नांदतानाचा’ आनंदी अनुभव आपल्याला सहजच घेता येईल.
वडीलधा:यांचा ‘धाक’ही किती बदलतोय. पूर्वी घरातली मोठी मंडळीच आपल्या वतीनं निर्णय घ्यायची. मुलांनी स्वत:च एखादा निर्णय घेणं म्हणजे अक्षरश: तोहमत! आज तरुण मुलं-मुली आपल्या लग्नाचा, आपल्याला आवडणा:या जोडीदाराचा निर्णय घरी वडीलधा:यांसामोर बिनधास्त सांगू शकतात. मोबाइल आणि स्कायपेच्या मदतीनं आई-वडील किंवा आजी-आजोबांशी सहज संपर्क साधतात. ‘जनरेशन गॅप’ कमी होताना आजकाल अनेक प्रौढांनीही फेसबुकपासून ते स्कायपे आणि व्हॉट्सअॅपर्पयत सगळ्याच आयुधांशी दोस्ती करताना परिस्थितीशी जुळवून घेतलं आहे, तंत्रज्ञानाच्या मदतीनं जनरेशन गॅप कमी केली आहे. सोशल नेटवर्क साईट्सच्या माध्यमातून समान इंटरेस्ट असणारे नवे मित्रही त्यांनी मिळवले आहेत.
कित्येक वेळा नव्या पिढीला जुन्या पिढीनं किती कष्ट सोसलेत, त्यांना आपल्यापेक्षा किती कठीण परिस्थितीतून जावं लागलं होतं. याविषयी माहीतच नसतं. त्याविषयीचा एक किस्सा, एकदा कॉलेजमध्ये जाणारा एक मुलगा क्रिकेटची मॅच बघायला गेला. त्याच्या शेजारी एक ज्येष्ष्ठ नागरिक बसला होता. तो तरुण त्या ज्येष्ठाला गर्वानं म्हणाला, ‘‘तुमचं युग खूपच जुनंपुराणं होतं. आजची आम्ही तरुण मुलं टेलिव्हिजन, जेट विमान, चंद्रावर पाऊल, अणुऊर्जा, कम्प्युटर्स, मोबाइल्स, टॅब्ज, जलद रेल्वे आणि मोटारगाडय़ा यामध्ये वाढतो आणि मोठे होतो.’’ ते ऐकल्यावर तो ज्येष्ठ माणूस त्याला म्हणाला, ‘बरोबर आहे तुझं. आमच्याकाळी यातलं काहीही नव्हतं. त्यामुळेच तर आम्ही तुमच्याकरता या सगळ्या गोष्टी शोधल्या. पण मुला, तुम्ही पुढच्या पिढीकरता काय करताय?’’
आई-वडील आणि मुलं यांच्यातले संबंध कसे असतात याविषयी मिल्टन ग्रीनब्लॅट म्हणायचा, ‘‘ आपण प्रथम आपल्या आई- वडिलांची मुलं असतो, त्यानंतर आपण आपल्या मुलांचे आई-वडील असतो, कालांतराने आपण आपल्या आई-वडिलांचे आई-वडील होतो आणि शेवटी आपण आपल्या मुलांची मुलं होतो.’’
तंत्रज्ञानाबरोबर नव्या पिढीची वागणूक, त्यांची मूल्यं, राहणीमान आणि जीवनाची पद्धती बदलतंच जाणार हे अटळ आहे. ते बदलता येणार नाही. त्यामुळे उगाचच नव्या पिढीला शिव्याशाप देण्यापेक्षा वास्तव स्वीकारुन त्यांना प्रोत्साहन दिलं, त्यांच्याबरोबर आपणही तंत्रज्ञानाचं बोट धरलं तर दोन पिढय़ांतला हा तिढा उलगडत आणि सुटतही जाईल.
थांब, मीही तुझ्याबरोबर येतो!
नवीन पिढीकडे अनेक गॅजेट्स आहेत. त्यांना कुठेही, कोणाबरोबरही, केव्हाही, कसंही, फिरण्याचं, राहण्याचं, मैत्री करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याचप्रमाणो नव्या पिढीला मोटारगाडय़ा, लॅपटॉप्स, मोबाइल्स अशा अनेक गोष्टींविषयी पूर्वीच्या पिढीपेक्षा खूपच पर्यायही उपलब्ध आहेत. यामुळे कित्येक वेळा जुन्या पिढीला नवीन पिढीविषयी चक्क असूया वाटते. याविषयी एक विनोद ऐकला होता. एकदा जनरेशन गॅपविषयी एक मुलगा आणि त्याचे वडील यांच्यात मोठमोठय़ाने वाद चालला होता. त्यावेळी तो मुलगा वडिलांना म्हणाला, ‘‘मला पैसा हवाय, गाडय़ा आणि बंगले हवे आहेत. सुंदर मुली हव्या आहेत आणि आयुष्यात काहीतरी अॅडव्हेंचर हवंय’’. एवढं बोलून तो मुलगा दरवाज्याकडे धावला. त्याबरोबर त्याचे वडीलही त्याच्या मागे गेले. ‘‘मला माझ्या मार्गाने जाऊ दे. मला आता अडवू नका’’ असं तो मुलगा त्याच्या वडिलांना म्हणाला. यावर त्याचे वडील म्हणाले, ‘‘अरे! तुला कोण थांबवतंय! एक मिनिट थांबलास तर मीही तुझ्याबरोबर येतो.’’
(लेखक माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रतील तज्ञ आणि सामाजिक-सांस्कृतिक प्रश्नांचे जाणकारआहेत.)