- विकास मिश्र
साधारण 1990चा सुमार.उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्याच्या चौबेपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेलं बिकरू हे एक छोटंसं गाव. तिथलाच विकास दुबे हा एक कोवळा तरुण. हळूहळू गुन्हेगारी जगतात त्याचं नाव घेतलं जाऊ लागलं.सर्वसाधारण गुंडांची सुरुवात जशी होते, तशीच याचीही झाली. सुरुवातीला छोट्या-मोठय़ा चोर्या, लूटमार. त्यानंतर त्यानं स्वत:चीच एक टोळी तयार केली. काही दिवसांनी ही टोळी दरोडेही टाकू लागली.राजकारणी अशा गुंडांच्या शोधात असतातच. साहजिकच थोड्याच दिवसांत स्थानिक राजकारण्यांच्या तो डोळ्यांत भरला.यावेळेपर्यंत उत्तर प्रदेशच्या राजकारणातही एव्हाना गुंड-बदमाशांची ऊठबस सुरू झाली होती. विकास दुबेही त्याला अपवाद नव्हता. अनेक राजकारण्यांना तो हवाहवासा वाटू लागला.गुन्ह्यांच्या आरोपाखाली तो तुरुंगात तर जात होता; पण राजकारण्यांच्या वरदहस्तानं थोड्याच दिवसांत पुन्हा तुरुंगातून सुटूनही येत होता. छोटीमोठी गुंडगिरी करणारा हा तरुण पुढे चक्क डीएसपीसहित आठ पोलिसांचाच खातमा करेल, याची त्यावेळी कोणाला कल्पना होती?याच काळात विकास दुबेच्या महत्त्वाकांक्षाही पल्लवित होत होत्या. 1995-96च्या सुमारास त्याला वाटायला लागलं, आपणही राजकारणात नशीब अजमावून पाहावं. त्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाशी संधान साधणं गरजेचं होतं. त्यानं बसपाचा हात धरला आणि स्थानिक पातळीवर काही निवडणुकाही तो जिंकला.विकास दुबेचं प्रस्थ वाढत होतं, तशीच त्याची गुंडगिरीही. वर्ष 2000.एका महाविद्यालयाचे सहायक व्यवस्थापक सिद्धेश्वर पांडे यांची हत्या झाली. मुख्य आरोपी अर्थातच विकास दुबे होता आणि या प्रकरणी त्याला जेलची हवाही खावी लागली. पण कारागृहातूनही तो आपलं साम्राज्य चालवत होता. तुरुंगात असतानाच रामबाबू यादव या व्यक्तीची हत्या झाली. ही हत्याही त्यानंच घडवून आणल्याचं सर्रास बोललं जातं.
अटक ते एन्काउंटर !.विकास दुबेच्या अटकपासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत अनेक घटनांकडेही आता संशयानं पाहिलं जातंय. विकास दुबेला खरंच उजैनमध्ये अटक करण्यात आली होती, की त्यानं आत्मसर्मपण केलं होतं? पोलिसांच्या हत्येनंतर संतापलेले पोलीस आता आपला एन्काउंटर करतील, याची त्यालाही भीती होतीच. ज्या गुन्हेगाराच्या मागावर सहा राज्यांतले पोलीस होते, त्यांच्या हाती न पडता, उजैनमधल्या महाकाल मंदिरातल्या एका सिक्युरिटी गार्डनं त्याला कसं काय पकडलं? आणि दुबेला पकडल्यानंतर तो खरंच पळून जाण्याचा प्रय} करत होता की तसा बनाव रचून त्याचा पद्धतशीर एन्काउंटर करण्यात आला?.
राजकीय पक्षांचा ‘लाडका’!गुन्हेगारी जगतातील विकास दुबेच्या विकासाचा आलेख सतत चढताच होता. ती काही आता लपून राहिलेली गोष्ट नव्हती. एकेकाळी तो बसपामध्ये होता; पण प्रत्येक राजकीय पक्षांशी त्याचे संबंध होते. आपल्या परिसरात होणार्या सर्व निवडणुकांच्या हार आणि जितची पटकथा तो स्वत:च लिहित होता, इतकी त्याची दहशत होती. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाची तो ‘गरज’ बनला होता. स्थानिक पातळीवर ब्लॉक आणि पंचायत स्तरावर त्याचाच कब्जा होता. जिल्हा पंचायत स्तरावर कायम त्याच्याच परिवारातले सदस्य निवडून येत. निवडून येण्याच्या त्याच्या या ‘कौशल्या’मुळेच प्रत्येक राजकीय पक्षाचा तो ‘लाडका’ बनला होता.
डीएसपीच्या पत्रांकडे दुर्लक्ष का?डीएसपी देवेंद्र मिर्श हे उत्तर प्रदेश पोलिसांतले एक जांबाज, धाडसी अधिकारी मानले जात होते. गुन्हेगारांचे ते कर्दनकाळ होते. त्यांच्या याच धाडसी आणि निडर स्वभावामुळे हवालदारपदापासून सुरू केलेली त्यांची कारकीर्द डीएसपी पदापर्यंत पोहोचली होती. याच वर्षी 14 मार्चला त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना पत्र लिहिलं होतं की, विनय तिवारीसहित आणखी काही पोलीस अधिकारी विकास दुबेचे ‘हस्तक’ आहेत. डीएसपी दर्जाच्या अधिकार्यानं हे पत्र लिहिलं असूनही वरिष्ठ अधिकार्यांनी त्याकडे दुर्लक्ष का केलं, हा सवालही आता विचारला जाऊ लागला आहे. पण मिळेल या प्रश्नाचं उत्तर? - कदाचित कधीच नाही!
कहाणी प्रेमविवाहाची!कानपूरमध्ये राहणार्या ऋचा निगम यांच्याशी विकास दुबेनं प्रेमविवाह केला होता. ऋचा यांच्या कुटुंबीयांनी या प्रेमविवाहाला विरोध केला, तर त्यानं सगळ्यांना जिवानिशी मारण्याची धमकी दिली होती. या विवाहानंतर ऋचाच्या कुटुंबीयांनी आपलं घर सोडून शहडोल येथे ते राहायला गेले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानंतर विकास दुबेनं आपल्या सासुरवाडीच्या या घराचाही कब्जा घेतला !vikas.mishra@lokmat.com(लेखक लोकमत समाचारचे संपादक आहेत.)