मेंदूचा स्वामी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 03:00 IST2018-08-26T03:00:00+5:302018-08-26T03:00:00+5:30

मेंदूतील रसायने बदलल्याने मनातील भावना बदलतात हे जसे खरे, तसेच भावना बदलल्या तर मेंदूतील रसायनेही बदलतात. जाणीवपूर्वक भावना बदलूनही आपल्याला उत्साह, आनंद निर्माण करता येऊ शकतो, हे विज्ञानाने आता सिद्ध केले आहे.

Who is the brain controller? | मेंदूचा स्वामी कोण?

मेंदूचा स्वामी कोण?

डॉ. यश वेलणकर

माइण्डफुलनेसचा सराव करायचा म्हणजे आपले मन पुन: पुन्हा वर्तमानात आणायचे. या क्षणी मनात जे काही विचार आहेत, भावना आहेत त्या प्रतिक्रिया न करता जाणायच्या, त्यांचा स्वीकार करायचा. ही भावना पापी आहे, घाणेरडी आहे. ही प्रतिक्रिया झाली. हा विचार निगेटिव्ह आहे हीदेखील प्रतिक्रिया झाली. अशी कोणतीही प्रतिक्रि या न करता या क्षणी मनात ही भावना, हा विचार आहे हे मान्य करायचे. 

हे शब्दात लिहिणे सोपे असले तरी प्रत्यक्षात येण्यासाठी मेंदूला प्रशिक्षण द्यावे लागते. असे प्रशिक्षण म्हणजेच माइण्डफुलनेस मेडिटेशन, सजगता ध्यान होय. रोज किमान दहा मिनिटे वेळ काढून शांत बसायचे आणि शरीरातील संवेदना जाणत राहायचे. असे करताना मनात विचार येणार, त्या विचारांचा, भावनांचा आणि शरीरातील संवेदनांचा परस्परसंबंध अनुभवायचा. मनात रागाचा विचार आला की शरीरात कोणती संवेदना निर्माण होते, भीती वाटली की काय होते, वासना निर्माण झाली की कोणती संवेदना येते हे साक्षीभावाने म्हणजे त्यामध्ये कोणताही बदल न करता जाणत राहायचे. आपण या संवेदना जाणतो आणि त्यांचा स्वीकार करतो त्यावेळी मेंदूला प्रशिक्षण देत असतो त्यामुळे आपल्या अंतर्मनात साठलेली घाण स्वच्छ होते. चिंता, औदासीन्य, अकारण भीती यांचा त्रास कमी होतो.

माइण्डफुलनेस थेरपीचा मुख्य भाग निगेटिव्ह, पॉझिटिव्ह अशी प्रतिक्रि या न करता मनातील भावना, विचार आणि शरीरातील संवेदना जाणत राहणे हा असला तरी थोडा वेळ मनात सकारात्मक भावना निर्माण करणेही आवश्यक असते. कचरा साफ करताना त्याचा त्रास कमी व्हावा म्हणून आपण सुगंधी अत्तर लावतो, सेंट वापरतो तसेच हे आहे. अंतर्मनात साठलेला कचरा साफ करताना एक आंतरिक आधार, सपोर्ट सिस्टीम आवश्यक असते. त्यासाठी रोज थोडा वेळ कृतज्ञता, करुणा, प्रेम, आनंद अशा भावना प्रयत्नपूर्वक निर्माण करून मनात त्या धारण करून राहायचे.
संशोधनाने हे सिद्ध झाले आहे की मी माझ्या मेंदूच्या हातातील बाहुले नाही, तर माझ्या मेंदूचा शिल्पकार आहे.

मेंदूतील रसायने बदलल्याने माझ्या मनातील भावना बदलतात हे जसे खरे आहे, तसेच मी माझ्या भावना बदलल्या तर मेंदूतील रसायने बदलतात. मात्र  संशोधनात असेही दिसून आले आहे की अगोदर एकाग्रता आणि सजगता ध्यानाचा नियमित सराव केल्यानंतर करु णा ध्यान केले तर त्याचे परिणाम अधिक प्रमाणात दिसतात. याचे कारण पहिल्या दोन ध्यानाचा सराव न करता एकदम करुणा ध्यान करायला गेलो तर मन एकाग्र होणे आणि प्रयत्नपूर्वक मनातील भावना बदलवणे शक्य होत नाही. एखाद्या ठिकाणी येणारी दुर्गंधी घालवायची असेल तर दुर्गंधी कोठून येते आहे ते शोधून साफ करणे आणि सुगंधी अगरबत्ती, रूम फ्रेशनर, अत्तर लावणे अशा दोन कृती कराव्या लागतात. तसाच मनात रोज तयार होणारा कचरा साफ करण्यासाठीदेखील रोज सजगता ध्यान आणि करुणा, कृतज्ञता ध्यान अशा दोन्हीसाठी वेळ द्यायला हवा. रोज झोपताना किमान दोन- तीन मिनिटे कृतज्ञता व्यक्त करायला हवी.

माइण्डफुलनेसच्या नियमित सरावाने मी माझ्या मनाचा गुलाम न राहता स्वामी बनू शकतो हे आधुनिक मेंदूविज्ञान मान्य करते. सध्या नैराश्य आणि चिंता या विकारांची साथ वेगाने पसरत असताना मेंदूच्या या संशोधनाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवणे ही काळाची गरज आहे. 

सिद्धांतालाच आव्हान !

* विज्ञानात असे मानले जायचे की माणसाचे मन हे त्याच्या मेंदूतील रसायनांचा परिणाम आहे. ही रसायने कमी जास्त होतात त्यानुसार मनातील भावना बदलतात. सेरेटोनिन नावाचे रसायन कमी झाले की नैराश्य येते. हे नैराश्य अधिक काळ टिकले, त्यामुळे माणसाच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला की त्याला क्लिनिकल डिप्रेशन हा आजार आहे, असे म्हटले जाते. त्यावर औषधे दिली जातात ती मेंदूतील सेरेटोनिन वाढवणारी असतात. त्या औषधाने सेरेटोनिन वाढले की नैराश्य कमी होते. सेरेटोनिन कमी होणे हे कारण आहे आणि नैराश्य हा परिणाम आहे, या सिद्धांतावरच नैराश्यावर औषधे तयार करणार्‍या औषध कंपन्या विकसित झालेल्या आहेत.

* मात्र  ध्यानावरील संशोधनाने या सिद्धांतालाच आव्हान दिले आहे. आपण मनात कृतज्ञता, प्रेम अशा भावना निर्माण करतो त्यावेळी मेंदूतील रसायने बदलतात, सेरेटोनिनची पातळी वाढते असे प्राथमिक संशोधनात आढळले आहे. म्हणजेच या संशोधनानुसार मनातील भावना हा मेंदूतील रसायनांचा केवळ परिणामच आहे असे नसून भावना हे कारण आणि रसायने हा परिणाम असा बरोबर विरु द्ध सिद्धांतदेखील खरा आहे. म्हणजे मला उदास वाटत असेल त्यावेळी माझ्या मेंदूत सेरेटोनिन कमी झालेले असणार. पण मी जाणीवपूर्वक मनातील भावना बदलल्या, मनात उत्साह, आनंद निर्माण केला, आनंदाने दोन उड्या मारल्या, एक शीळ घातली आणि त्या क्षणाचा समरसून आनंद अनुभवू लागलो तर त्याचा परिणाम म्हणून कोणतेही औषध न घेताही माझ्या मेंदूतील रसायने बदलतात, मेंदूतील सेरेटोनिनची पातळी वाढते.

(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत.)

yashwel@gmail.com

 

Web Title: Who is the brain controller?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.