- धनंजय जोशी
काल माझा वाढदिवस होता. आता फेसबुकवर सर्वाना माहीत असतं, तेव्हा खूप मेसेजेस आले. मलादेखील खूप बरं वाटलं.
पण एक मेसेज फार सुंदर होता. माझ्या झेन शिक्षकानं पाठविलेला! तिनं विचारलं, ‘आर यू ओल्डर दॅन द बुद्ध?’ तू बुद्धापेक्षा वयस्क आहेस का?
मला तेव्हा आणखी एक कथा आठवली. गांटो आणि सेपे हे दोन ङोन साधक होते. ते आपल्या ङोन गुरूला मास्टर रिनझाईंना भेटायला निघाले. ते रिनझाईंकडे पोचेर्पयत रिनझाईनने देह ठेवला होता. असो. त्या प्रवासामधे अनेक दिवस आणि तासन्तास, रोज चालत चालावं लागेल. एके दिवशी मात्र ती दोघं झोपून गेले. मध्यरात्री एकाएकी गांटोला जाग आली. बाहेर बघतो तर चंद्राच्या उजेडात त्याला सेपेचा आकार दिसला ध्यानांत बसलेला. गाटोनं त्याला विचारले, ‘काय करतोयस तू? मध्यरात्र झाली आहे तुला कळलं की नाही?’
सेपोला कदाचित वाटलं असणार काय हा मूर्खासारखा प्रश्न?
विचारण्याला काही अर्थ आहे की नाही? सेपो म्हणाला, ‘मी ध्यान करतो आहे!’
गाटो म्हणाला, ‘पण कशासाठी?’
सेपो म्हणाला, ‘मला बुद्ध व्हायचंय म्हणून!’
आता विचार करायचा म्हणजे गांटी आणि सेपो दोघेही ङोन साधक! त्यांना माहीत असायलं हवं की ‘बुद्ध’ होणं म्हणजे काय? आपण सर्वही एका परीनं ङोन साधकच आहोत आणि आपल्याला वाटतं की आपली साधना आपल्याला कुठेतरी (बुद्ध जीवनाकडे) घेऊन जाईल म्हणून! सगळ्यात मोठी चूक ती ही!
गांटोला समजली होती सेपोची चूक! तो म्हणाला, ‘अरे, तुला कळत कसं नाही? तुङया हृदयामधून जे काही क्षणोक्षणी बाहेर येतंय ती बुद्धाची शिकवणच आहे! पण तू फक्त बाहेर येऊ द्यायला पाहिजे! तुझं ज्ञान आणि अपेक्षा त्याच्या आड नाही आली पाहिजे!’
आपली साधना पण तशीच आहे. आपण तिला आपल्या हृदयामधून बाहेर येऊ देत नाही. का? कारण आपल्याला काही तरी वेगळंच हवं असतं, वेगळ्याच अनुभवाची अपेक्षा असते! आपल्या हृदयामध्ये एक साधनेचा वृक्ष असतो पण आपण त्याला प्रकाश देत नाही! तो कसा द्यायचा? त्याला साधनेचं पाणी द्यायचं आणि निरपेक्षतेचं दार उघडायचं.
वयाचा प्रश्न असो वा नसो!
(अमेरिकेतील शिकागो या शहरात वास्तव्याला असणारे
लेखक झेन साधक/अभ्यासक आहेत.)
joshi5647@gmail.com