खरंच कुठं चाललाय पाकिस्तान ?

By Admin | Updated: December 27, 2014 19:38 IST2014-12-27T19:38:36+5:302014-12-27T19:38:36+5:30

धार्मिक मूलतत्त्ववादाने बळावलेला भारतविरोधी नकारात्मक दृष्टिकोन आणि पाकिस्तानचे तुकडे करणे हे भारताचे एकमेव उद्दिष्ट असल्याचा पूर्वग्रह यात पाकिस्तान गुरफटलाय. तो त्यातून बाहेर पडणार कसा?

Where exactly is Pakistan running? | खरंच कुठं चाललाय पाकिस्तान ?

खरंच कुठं चाललाय पाकिस्तान ?

शशिकांत पित्रे

 
धार्मिक मूलतत्त्ववादाने बळावलेला भारतविरोधी नकारात्मक दृष्टिकोन आणि पाकिस्तानचे तुकडे करणे हे भारताचे एकमेव उद्दिष्ट असल्याचा पूर्वग्रह यात पाकिस्तान गुरफटलाय. तो त्यातून बाहेर पडणार कसा? आणि त्याशिवाय दहशतवादाच्या महाराक्षसाचा संहार होणार तरी कसा? पाकिस्तानमधील दहशतवादाचे मूळ भारताबद्दल वाटणार्‍या नाहक भीतीमध्ये आहे. सर्वनाशाच्याच उंबरठय़ावर असलेल्या पाकिस्तानला हे वास्तव कधी उमगणार?..
-----------------
सप्टेंबर २0१३ मध्ये दोन आत्मघाती दहशतवाद्यांनी पेशावरमधील ‘ऑल सेंट्स चर्च’वर रविवारच्या सकाळी प्रार्थनासमुदायावर हल्ला केला. त्यात शंभरएक ख्रिश्‍चन भाविक ठार झाले होते. आपल्या मागे ५४ अनाथ मुले, १६ विधवा आणि सात विधूर सोडून गेले. त्याबद्दल फारसा गदारोळ माजला नाही.  पाकिस्तानात गेल्या दशकात शिया, अहमदी, खिश्‍चन आणि अल्पसंख्याकांवर झालेल्या अनेक प्रहारांप्रमाणे तो विरून गेला. परंतु, १६ डिसेंबरला तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) त्याच पेशावरमध्ये केलेल्या निर्घृण हल्ल्याने पाकिस्तान खडबडून जागा झाला. त्याचे प्रमुख कारण म्हणजे १४२ मृतांपैकी १३२ ही दहा ते वीस वर्षांची निष्पाप मुले होती आणि ती पेशावरच्या ‘आर्मी पब्लिक स्कूल’मध्ये शिकत होती. त्यांची कत्तल शिया, अहमदी, ख्रिश्‍चन वा अल्पसंख्याक म्हणून नव्हे, तर एका सूडाच्या अमानुष भावनेने केली गेली. 
पाकिस्तान सैन्याने गेल्या जून महिन्यापासून उत्तर वझिरिस्तानात टीटीपीविरुद्ध सुरू केलेल्या ‘झर्ब-ए-अझिझ’ या मोहिमेचा तो बदला होता. टीटीपीचा कमांडर जिहाद यार वझीर याने जाहीर केले, की ‘आम्ही पश्तून आहोत. पश्तूनी संस्कृती आमच्यात भिनली आहे. कोणीही आमच्यावर हल्ला केला, तर आम्ही त्याचा सूड घेऊ, मग त्यासाठी शंभर वर्षेसुद्धा लागोत.’ जमाल मुजाहिद या दुसर्‍या तालिबान्याने पुस्ती जोडली आहे, की ‘सप्टेंबर २0१२ मध्ये उत्तर वझिरिस्तानात झालेल्या ड्रोन हल्ल्यात तीन लहान मुले मारली गेली. त्यात माझ्या कुटुंबातील दोन होती. त्या शाळेत सैनिकी अधिकार्‍यांची पाचशे मुले शिकत होती, मग का करू नये आम्ही त्यांना लक्ष्य, खरोखरंच कुठे चाललाय पाकिस्तान?
१६ डिसेंबरच्या हल्ल्यामुळे पाकिस्तान इतका हादरला, की पंतप्रधान नवाझ शरीफ त्याच रात्री पेशावरला पोचले. रात्रभर चर्चेच्या फैरी झडल्या आणि दुसर्‍या दिवशी शरीफसाहेबांनी पत्रकार परिषदेत दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. पहिली, चांगला तालीबान आणि वाईट तालीबान यांच्यात आम्ही यापुढे भेद करणार नाही आणि दुसरी, २00८ मध्ये मृत्युदंडावर घातलेला निर्बंध हटवला जाईल. धोरणातील हा लक्षणीय बदल होता. त्यानुसार मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या जवळजवळ ५00 दहशतवाद्यांना फासावर लटकवण्याचा मार्ग मोकळा झाला. राष्ट्राध्यक्ष मनमून हुसेन यांनी तातडीने मुशर्रफांवर प्राणघाती हल्ला करणार्‍या पाच दहशतवाद्यांना फाशी देण्याच्या आदेशावर सही केली आणि ५५ तालिबान्यांना सुळावर चढवण्याची तयारी सुरू आहे. दैवदुर्विलास हा की मनमून हुसेन वा नवाझ शरीफ या कळसूत्री बाहुल्या आहेत. बोलविता धनी वेगळाच आहे. शरीफ सात्विकतेचा कितीही आव आणोत, ते केवळ देखाव्याचा मुखवटा आहेत. सर्व अधिकार सेनेकडे आहेत आणि ते सेनाप्रमुख राहील शरीफ यांच्या हातात एकवटले आहेत. जोपर्यंत सेनाप्रमुख म्हणतील तोपर्यंत भल्याबुर्‍या तालिबान्यात फरक होतच राहील. किंबहुना भला आणि बुरा हे शब्द पाकिस्तानी सेनेच्या  
शब्दकोशातच नाहीत, त्यांची शब्दावली आहे. ‘उपयोगी तालिबान’ आणि ‘सेनाविरोधी तालिबान’!  अमानुष दहशतवाद ही पाकिस्तानी सैन्याची युद्ध संकल्पना आहे. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने ती केवळ त्यांच्याकडून उसनी घेतली आहे. १९४७ व ६५ च्या युद्धात भारताकडून काश्मीर हिसकावून घेण्याचा प्रयत्न फसल्यावर पाकिस्तानने १९७१ मध्ये स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारून देशाची दोन शकले केली.
पारंपरिक युद्धात भारताचा पराभव करू शकणार नाही, ही शाश्‍वती झाल्यावर पाकिस्तान सैन्याने परभारी युद्धाची (प्रॉक्सी वॉर) संकल्पना विकसित केली. योगायोगाने रशियाला अफगाणिस्तानातून हाकलून लावण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची मदत घ्यावी लागली आणि त्यासाठी पाकिस्तानला प्रचंड अर्थसाह्य आणि शस्त्रसाह्य मिळाले. त्या वेळचे हुकूमशहा झिया उल हक यांनी या पैशाचा उपयोग  जम्मू-काश्मीरबरोबरील ताबारेषेवर आणि अफगाणिस्तानातील ड्युरंड रेषेपार परभारी युद्धासाठी केला. अद्यापपर्यंत हा ‘आरोप’ केवळ भारतीय आणि पाश्‍चात्य संरक्षण विश्लेषक करत होते, पण आता पाकिस्तानचे अमेरिकेतील भूतपूर्व राजदूत हुसेन हक्कानी, सुप्रसिद्ध लेखिका आयेशा सादिका आणि पत्रकार खालेद अहमद आणि बीजा सरवर यांच्यासारखे पाकिस्तानी विश्लेषक उघडपणे त्याचा स्वीकार करत आहेत. 
१९८0चे दशक पाकिस्तानसाठी एक ‘काळा कालावधी’ म्हटला पाहिजे. सेनाप्रमुख झिया उल हक यांनी आपले उपकारकर्ते झुल्फिकार भुट्टो यांना पदच्युत करून केवळ सत्ताच बळकावली नाही, त्यांना सुळावर चढवून लोकशाही नामशेष करण्याचा घाट घातला. पाकिस्तानी लष्कराचे धर्मीकरण आणि सेनादलात मूलतत्त्व वादाची पेरणी हे झियांचे पाकिस्तानला दोन शाप. आयएसआयसारख्या एका सामान्य सैन्य इंटेलिजन्स संघटनेचे एका बलवत्तर, धनदांडग्या आणि पाताळयंत्री संस्थेत परिवर्तन करण्याचे पूर्ण श्रेय त्यांना जाते. सैन्याला पाकिस्तानच्या राज्यकारभारात चिरंतन ‘व्हेटो’चा हक्क त्यांनी प्राप्त करून दिला. सैन्याला ‘डीप स्टेट’ची अलिखित मुखत्यारी त्यांनी बहाल केली.  सीमापार दहशतवाद्याला राष्ट्रीय धोरणाचा दर्जा त्यांनीच प्राप्त करून दिला. दहशतवादी हे राष्ट्राची ‘सामरिक संपत्ती’ (स्ट्रॅटेजिक अँसेट्स) मानण्याची शक्कल त्यांचीच. झियांनी भविष्यातील आपल्या सेनाप्रमुख वारसदारांना पाकिस्तानातील सर्वोच्च सत्ताकेंद्राचा दर्जा मिळेल, याची तजवीज केली.   
आयएसआयने त्यांच्या पश्‍चिमेच्या लष्कर सीमेवर हक्कानी नेटवर्क, अफगाणिस्तानात मुल्ला ओमरचे अफगाण तालिबान; तर पूर्वसीमेवर सईद हफीजने लष्कर तय्यबा आणि अझहर मसूदचे जैश-ए-मोहम्मद या संघटनांना खतपाणी घालून जोपासले आहे. हे आहेत त्यांचे ‘उपयोगी’ (चांगले) दहशतवादी गट. त्यांच्या ‘स्ट्रॅटेजिक अँसेट्स’; तर सिपाह-ए-साहेबा, लष्कर-ए-झांगवी आणि तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान हे त्यांचे ‘वाईट तालिबान’ किंबहुना पाकिस्तानी सैन्याच्या या पंक्तीभेदामुळेच टीटीपी फोफावला. १ मे २0१0 रोजी फैजल शहजाद या टीटीपी दहशतवाद्याने न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरमध्ये प्रचंड कार बॉम्ब उडवण्याचा घाट घातला होता. तो फळास गेला असता, तर शेकडो लोकांचा बळी गेला असता. आता तर टीटीपीने इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँण्ड सिरिया (आयसिस) शी सलगी करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. पेशावर हल्ल्याच्या दुसर्‍या दिवशी जनरल राहील शरीफ यांनी अफगाणिस्तानला स्वत: भेट देऊन तिथे दडून बसलेल्या फलुल्ला या टीटीपीच्या म्होरक्याला पकडून पाकिस्तानच्या हवाली करण्याची मागणी केली. परंतु ‘हा हल्ला भारताच्या चिथावणीने झाला आहे,’ असा खोडसाळ आरोप पाकिस्तान सैन्याच्या मदतीनेच भरवलेल्या प्रचंड मेळाव्यात करणार्‍यांवर काही निर्बंध घातले नाहीत. दहा लाख डॉलर्सचे बक्षीस वागवणारा हा ‘चांगला दहशतवादी’ मात्र मोकाट फिरत आहे. 
पंतप्रधान नवाझ शरीफांनी कितीही छाती ठोकून  सांगितलं, तरी जोपर्यंत सेनाप्रमुख  हमी देत नाहीत, तोपर्यंत या वल्गना फोल आहेत. दुर्दैवाने दहशतवादी तत्त्वांचा भारतविरोधी सैनिकी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वापर करण्याची परभारी युद्धपद्धती पाकिस्तानी सैन्यात इतकी खोलवर रुजली आहे, की राहील शरीफांनी फार जोर दिला, तर सैन्यातच दुफळी माजण्याची शक्यता आहे.  १९४७ पासून चालत आलेला आणि झियांच्या धार्मिक मूलतत्त्ववादाने बळावलेला भारतविरोधी नकारात्मक दृष्टिकोन बदलल्याशिवाय आणि पाकिस्तानचे तुकडे करणे हे भारताचे एकमेव उद्दिष्ट असल्याच्या ‘भन्नाट’ पूर्वग्रहाचा भ्रमनिरास झाल्याशिवाय पाकिस्तान दहशतवादाच्या महाराक्षसाचा संहार करू शकत नाही.   
पाकिस्तानमधील दहशतवादाचे मूळ त्याच्या भारताबद्दल वाटणार्‍या नाहक भीतीमध्ये आहे. गेली सहा दशके काश्मीरच्या मृगजळामागे धावता धावता पाकिस्तानने स्वत:चा सर्वनाश करून घेतला आहे. पाकिस्तानचे दहशतवादाविरोधी धोरण एकसंघ असणे आवश्यक आहे. त्याला नाण्यासारख्या दोन बाजू असता कामा नयेत, याची जेव्हा जाणीव होईल तेव्हाच पाकिस्तान त्याला पोखरत असलेल्या आणि सार्‍या जगाला शाप ठरलेल्या दहशतवादाविरुद्ध लढा देऊ शकेल. हिलरी क्लिंटन यांनी २00८मध्ये भाष्य केल्याप्रमाणे, तुम्ही आपल्या बागेत साप पाळून त्यांनी केवळ शेजार्‍यांनाच दंश करावा, असे त्यांच्यावर बंधन घालू शकत नाहीत, हे कळण्यासाठी पाकिस्तानात आणखी किती पेशावर घडणार आहेत?
(लेखक भारतीय लष्करातील मेजर जनरल पद भूषविलेले नामवंत अधिकारी व 
युद्धशास्त्राचे अभ्यासक आहेत.)
 
 
 

Web Title: Where exactly is Pakistan running?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.