दिल्ली कुठली दूर ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 06:31 PM2017-12-16T18:31:25+5:302017-12-17T06:40:56+5:30

‘धडधाकट, सावळ्या रंगाचे, सहनशील, अभिमानी, भांडखोर आणि ‘दिले’-‘घेतले’ अशी भाषा बोलणारे मराठे तेथे राहतात. - दिल्लीतल्या मराठी माणसांच्या बाह्यरूपाचे, सवयींचे आणि स्वभावाचे हे वर्णन उद्योतनसूरीने तेराशे वर्षांपूर्वी केलेले आहे.

Where is Delhi away? | दिल्ली कुठली दूर ?

दिल्ली कुठली दूर ?

Next

- डॉ. निशिकांत मिरजकर
‘धडधाकट, सावळ्या रंगाचे, सहनशील, अभिमानी, भांडखोर आणि ‘दिले’-‘घेतले’ अशी भाषा बोलणारे मराठे तेथे राहतात.
- दिल्लीतल्या मराठी माणसांच्या बाह्यरूपाचे,
सवयींचे आणि स्वभावाचे हे वर्णन
उद्योतनसूरीने तेराशे वर्षांपूर्वी केलेले आहे.
..आजही, इतक्या वर्षांनंतर, दिल्लीतील अमराठी लोकांच्या मनातील मराठी माणसाची प्रतिमा अशीच आहे !

दिल्लीमध्ये ‘बाडा हिंदुराव’ म्हणून एक भाग आहे. हे ‘हिंदुराव’ एक मराठा सरदार होते. नानासाहेब पेशव्यांचे धाकटे बंधू सदाशिवराव भाऊ यांनी दिल्लीवर आक्रमण केले, तेव्हा सरदार हिंदुरावांचे सैन्य या भागात छावणी टाकून राहिले होते, असे म्हणतात. आता त्या सरदारांविषयी कोणालाच काही माहिती नाही; पण ‘बाडा हिंदुराव’ हे नाव मात्र त्या भागाला कायमचे चिकटले आहे. त्या भागात ‘हिंदुराव हॉस्पिटल’ हे एक मोठे हॉस्पिटल झालेले आहे. मराठी माणसाच्या प्रतिष्ठेची ही दिल्लीमधली अडीचशे वर्षांपूर्वीची खूण.
आता दिल्लीमध्ये वास्तव्य करून राहिलेल्या मराठी माणसांची संख्या भरपूरच आहे. उत्तरोत्तर ती वाढतच आहे. पश्चिम विहार, राजा गार्डन, पटपडगंज, मयूर विहार यांसारख्या भागांमध्ये मराठी लोकांच्या हाऊसिंग सोसायट्या आहेत. करोल बाग आणि पहाडगंज येथे मराठी माणसांनी चालवलेल्या शाळा आहेत. दिल्लीच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळी स्वतंत्र मंडळे, शिवाय सर्वांची मिळून एक केंद्रवर्ती मराठी सांस्कृतिक संस्था आहे. व्यापार, उद्योग, न्यायालये, शिक्षण, कला इत्यादी क्षेत्रांमध्ये मराठी माणसाने आपले स्थान निर्माण केले आहे. विविध मंत्रालये आणि कॉर्पोरेट जगतातील कंपन्या यांमध्येही काम करणाºया मराठी माणसांची संख्या लक्षणीय आहे. दिल्लीमध्ये महाराष्ट्र परिचय केंद्र महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधित्व करते. दिल्ली विद्यापीठाच्या ‘आधुनिक भारतीय भाषा व साहित्याभ्यास विभागा’त आम्ही दोघा पतीपत्नींनी तीस वर्षे मराठीचे अध्यापन केले. वास्तविक पाहता सर्वसाधारणपणे मराठी माणूस महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन स्थायिक व्हायला नाखूश असतो. तामिळी, बंगाली, बिहारी, उत्तर भारतीय लोक जसे भारतात कुठेही जाऊन स्थिरावतात आणि स्वत:ची भरभराट करून घेतात, तशी मराठी माणसांची मानसिकता नसते. महाराष्ट्राबाहेरच काय, आपल्या पंचक्रोशीबाहेरही जाऊन स्थायिक व्हायला ती नाराज असतात. महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात जरी थोड्या दूरच्या ठिकाणी बदली झाली, तर ती रद्द करून घेण्यासाठी खटपटी-लटपटी करायच्या मागे लागतात. याला भेट, त्याला भेट, पैसे चार, वशिला लाव वगैरे उपाय करून एकदाची बदली रद्द झाली की सुटकेचा श्वास सोडतात.
पण तरीदेखील बराच मोठा मराठी समाज दिल्लीमध्ये वास्तव्य करून राहिलेला आहे. नोकरीधंद्याच्या निमित्ताने अल्पकाळासाठी दिल्लीत वास्तव्य करून महाराष्ट्रात परत येणाºयांची- ‘मोबाइल पॉप्युलेशन’- संख्या लक्षणीय आहे.
दिल्ली विद्यापीठात अध्यापन करताना खूप नवीन, अगदी वेगळ्याच पातळीवरचे अनुभव आम्हाला मिळाले. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही येथे मराठीचे प्राध्यापक म्हणून अध्यापन केले खरे; पण ते सगळे इंग्लिशमधून. विद्यार्थी सगळे अमराठी. मग अध्यापनाचे स्वरूप काय होते? तर ते असे :
आम्ही दिल्ली विद्यापीठात रुजू झालो तेव्हा विभागाचे नाव होते ‘आधुनिक भारतीय भाषा विभाग’! या विभागामध्ये बारा भाषांचा समावेश होता. असमीया, बांगला, गुजराती, कन्नड, मल्याळम्, मणिपुरी, मराठी, पंजाबी, ओडिया, सिंधी, तमिळ आणि तेलुगू. आठ-दहा वर्षांनंतर पंजाबीचा स्वतंत्र विभाग अस्तित्वात आला.
या विभागातील मराठीचे अध्यापन तसे थातुरमातूरच होते. मराठी भाषेचे प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासवर्ग होते. त्यांत केवळ भाषा शिकवणे अपेक्षित होते. या अभ्यासक्रमासाठी मराठी शिकण्याकरिता येणाºया विद्यार्थ्यांची पात्रता केवळ ‘बारावी उत्तीर्ण’ एवढीच होती. मी जेव्हा विभागप्रमुख झालो तेव्हा ही पात्रता वाढवून मी ती ‘पदवी परीक्षा उत्तीर्ण’ अशी करून घेतली. त्यामुळे पहिल्या वर्षी ज्यांची निराशा झाली अशा चिडलेल्या विद्यार्थ्यांनी माझ्या आॅफिसवर हल्ला केला. कपाटाच्या काचा फोडल्या. फायली फाडल्या. या उद्रेकामागे मराठी शिकण्याची विद्यार्थ्यांची तळमळ हे कारण नव्हते. खरे कारण वेगळेच होते. त्या काळी विद्यार्थ्यांना दिल्लीमध्ये बसचा ‘आॅल रूट पास’ फक्त बारा रुपयांत मिळायचा. म्हणजे महिन्याला फक्त बारा रुपये भरून कोणत्याही रूटच्या बसने कितीही प्रवास करता यायचा. प्रवेश मिळवण्याची विद्यार्थ्यांची धडपड या पासकरिता असायची. एकदा पास पदरात पडला की मग ते वर्गाकडे ढुंकूनही फिरकायचे नाहीत. अक्षरश: चार चार हजार अर्ज प्रवेशासाठी येत असत. पात्रता वाढवल्यावर ही संख्या कमी झाली.
आम्ही विभागातर्फे ‘पेट्रियॉटिक एलिमेंट्स इन इंडियन लिटरेचर विथ स्पेशल रेफरन्स टू सावरकर’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र घेतले, तेव्हा विश्व हिंदू परिषदेने सावरकरांचे एक भव्य चित्र विद्यापीठाला भेट म्हणून दिले होते. हे चित्र आर्ट्स फॅकल्टीतल्या चर्चासत्र सभागृहात लावावे, अशी योजना होती. त्या सभागृहात अनेक साहित्यिकांची चित्रे लावलेली होती. त्या वेळचे कलाशाखेचे अधिष्ठाता हिंदीचे विभागप्रमुख होते. दिल्लीमध्ये असलेल्या सावरकरांविषयीच्या पूर्वग्रहदूषित वृत्तीमुळे हे चित्र सभागृहात लावण्याविषयी ते चालढकल करत राहिले. मी कलाशाखेचा अधिष्ठाता झाल्याबरोबर पहिल्याच आठवड्यात ते चित्र व्यासपीठाच्या शेजारी दर्शनी भिंतीवर लावून टाकले.
दिल्लीमध्ये मराठी मंडळींनी काढलेल्या एका शाळेशी मुलांचा पालक म्हणून आणि नंतर संचालक मंडळाचा सदस्य म्हणून बरीच वर्षे माझा संबंध आला. तिथे आठवीपर्यंत मराठी हा एक अनिवार्य विषय म्हणून ठेवलेला आहे. पण त्यात उत्तीर्ण होणे अनिवार्य नाही. नववी ते बारावी या वर्गात मराठी विषय घेणाºयांची संख्या मोठ्या मुश्किलीने तीन ते पाचपर्यंत असायची. दुसºया एका शाळेच्या नावातच ‘मराठी’ हा शब्द आहे. पण तेथे मराठी विषयाचे अध्यापन (कोणी तो विषय घेईना म्हणून) बंद करावे लागले. दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बी.ए.साठी ‘मराठी’ हा एक गौण (Subsidiary) विषय म्हणून घेण्याची सोय होती. त्याचा व्यवस्थित अभ्यासक्रम बनविलेला होता. पण तो कागदावरच राहिलेला होता.आता तर दिल्ली विद्यापीठाने मराठी, ओडिया आणि मल्याळम् हे तीन विषय बी.ए.च्या अभ्यासक्रमातून काढूनच टाकले आहेत, असे समजले. हे जर खरे असेल तर ती फार गंभीर बाब आहे. दिल्ली ही भारताची राजधानी आहे. तिथे प्रत्येक भारतीय भाषेतील वाङ्मयाच्या अभ्यासाची सोय असायलाच हवी.


दिल्लीमधील मराठी माणसांची मराठी भाषेविषयीची वृत्ती पाहिली की असे वाटते, मराठी अस्मितेचे प्रतीक असणाºया मराठी भाषेची इथल्या मराठी माणसावरची पकड सैल होत चाललेली आहे. परभाषिक माणसाशी गाठ पडल्यावर त्याच्या भाषेत बोलून त्याच्याशी आंतरिक जवळीक प्रस्थापित करणे याला सौजन्य आणि सुसंस्कृतपणा म्हणता येईल; पण दिल्लीमधील मराठी माणसांना बसमध्ये, रस्त्यावर, बागेत, दुकानात मी परस्परांशी हिंदीत किंवा इंग्लिशमध्येच बोलताना पाहिले आहे. तमिळ आणि बांगला भाषिकांमध्ये परस्परांशी आपल्या मातृभाषेतच बोलण्याची जी ऊर्मी आणि सहजता आढळते, ती दुर्दैवाने मराठी माणसांमध्ये दिसत नाही. याचा भयावह परिणाम म्हणजे दिल्लीमधील मराठी लोकांच्या मुलाबाळांचा मराठीशी संबंध तुटत चालला आहे. आई-वडीलच जर कौतुकाने त्यांच्याशी हिंदी-इंग्लिशमध्ये बोलत असतील तर त्यांचा मराठीशी संबंध राहणार कुठून?
दिल्लीमध्ये आमची मराठी मित्रमंडळी आमच्या घरी आल्यावर आमची मुले सहज शुद्ध मराठीत वार्तालाप करताना पाहून त्यांना साश्चर्य, कौतुक वाटायचे आणि ते ती बोलून दाखवायची; पण असा प्रयोग आपल्या मुलांच्या बाबतीत करावा असे त्यांना कधी वाटायचे नाही. महाराष्ट्रातील समीक्षक जेव्हा दिल्लीमध्ये विविध राष्ट्रीय चर्चासत्रांत सहभागी होतात, तेव्हा मराठी साहित्याचे प्रतिनिधित्व करण्याच्या आपल्या जबाबदारीचे यथायोग्य पालन करीत नाहीत, असा माझा अनुभव आहे. मराठी साहित्यकृतींतली उदाहरणे ते अजिबात चर्चेला घेत नाहीत. उलट मराठी साहित्याविषयी न्यूनत्वाचेच चित्र उभे करतात.
मराठी माणसाविषयी दिल्लीतील अमराठी लोकांच्या मनात जी प्रतिमा आहे तिचा मागोवा घेत चांगले हजार-बाराशे वर्षे मागे जाता येते. आठव्या शतकात उद्योतनसूरीने लिहिलेल्या ‘कुवलयमाला’ ग्रंथामध्ये मराठी माणसांचे वर्णन पुढीलप्रमाणे केलेले आहे :
‘‘दढमढह सामलंगे सहिरे
अहिमाण कलहसीले य।
दिण्णले गहिल्ले उच्चविरे तत्थ मरहट्टे।।’’
(अर्थ : ‘धडधाकट, सावळ्या रंगाचे, सहनशील, अभिमानी, भांडखोर आणि ‘दिले’-‘घेतले’ अशी भाषा बोलणारे मराठे तेथे राहतात.)
मराठी माणसांच्या बाह्यरूपाचे, सवयींचे आणि स्वभावाचे हे वर्णन उद्योतनसूरीने तेराशे वर्षांपूर्वी केलेले आहे. आजही, इतक्या वर्षांनंतर, दिल्लीतील अमराठी लोकांच्या मनातील मराठी माणसाची प्रतिमा अशीच आहे. यामध्ये मराठी माणसाच्या सहनशीलतेबद्दल कौतुकाची छटा असली (तशी ती नेहमीच असते असे नाही. कधी कौतुकाची जागा हेटाळणी घेताना दिसते) तरी अभिमानीपणाबद्दल, भांडखोरपणाबद्दल नाराजी, उपरोध, तुच्छता, टिंगल-टवाळी याचेच सूर आढळतात. सातशे वर्षांपूर्वी उत्तर भारतात दीर्घकाळ भ्रमण करणारे संत नामदेव, कर्तृत्वशाली छत्रपती शिवाजी महाराज, रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई, स्वराज्याचा मंत्र उच्चारणारे लोकमान्य टिळक, दलितांना आत्मभान देणारे बाबासाहेब आंबेडकर, क्रिकेटच्या क्षेत्रात कर्तृत्वाचे मनोरे उभारणारे सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर, संगीताच्या क्षेत्रातील अद्वितीय चमत्कार लता मंगेशकर ही मराठी व्यक्तिमत्त्वे दिल्लीवासीयांच्या कौतुकाचा, आदराचा आणि प्रेमाचा विषय बनलेली आढळतात. पण दुर्दैवाने ही प्रतिमा व्यक्तिकेंद्रित असते. ते प्रेम, तो आदर किंवा ती भक्ती त्या व्यक्तिमत्त्वांच्या महाराष्ट्रीयत्वाशी जोडली जात नाही. त्या त्या व्यक्तीमुळे एकूणच मराठी माणसाविषयी, मराठी संस्कृतीविषयी प्रेम अथवा आदर निर्माण झाला, असे घडत नाही.
मराठी माणसाचे नाटकाचे वेळ दिल्लीतही शाबूत राहिलेले आहे. दिल्लीमध्ये ‘महाराष्ट्र रंगायन’तर्फे दरवर्षी ‘बृहन्महाराष्ट्र हौशी नाट्य स्पर्धा’ होतात. पंधरा-वीस दिवस हा कार्यक्रम चालतो. महाराष्ट्राबाहेरच्या हौशी नाट्यमंडळांकडून रोज एक नाटक याप्रमाणे नाटके उत्साहाने सादर केली जातात. दिल्लीतले नाट्यरसिक या हौशी नाट्यमंडळींच्या नाट्यप्रयोगांना हौसेने गर्दी करतात. शेवटी पारितोषिके जाहीर करण्याच्या दिवशी औत्सुक्याचे आणि जल्लोषाचे वातावरण असते. नाट्य स्पर्धांमधील नाट्यकर्मींची आणि नाट्यरसिकांची दोघांचीही भावनिक गुंतवणूक विलोभनीय असते. वर्षातून एकदा नाट्यमहोत्सव साजरा केला जातो तेव्हा, आणि गणेशोत्सवात व्यावसायिक नाटकांचे प्रयोग आमंत्रित केले जातात तेव्हाही, नाटकवेड्या मराठी प्रेक्षकांनी नाट्यगृह तुडुंब भरलेले असते. दिल्लीतील गणेशोत्सवामध्ये अजूनही उच्च अभिरुचीचा दर्जा सांभाळला जाताना दिसतो. गणपतीची प्रतिष्ठापना बंदिस्त जागेत, एखाद्या सभागृहात वा पटांगणात केली जाते. रस्त्यावर मांडव घालून वाहतुकीला अडथळा निर्माण केला जात नाही. एक दिवस महाप्रसादाचे भोजन असते. इतर कार्यक्रमांत नाटक (याला प्राधान्य), चित्रपट (शक्यतो मराठी), नृत्य, गायन, वाद्यवृंद यांचा समावेश असतो. एखादी काव्यसंध्या असते. त्यामध्ये स्थानिक कवी हौसेने आपल्या कविता सादर करतात आणि श्रोते त्यांना प्रोत्साहन देतात. एखादा चर्चेचा वा परिसंवादाचा कार्यक्रमही असतो. एकदा श्रीराम लागू आणि नरेंद्र दाभोलकर यांचा ‘अंधश्रद्धा आणि परमेश्वराचे अस्तित्व’ यावरील प्रश्नचर्चेचा कार्यक्रम गणेशोत्सवात ठेवलेला होता! मुंबई-पुण्याच्या गणेशोत्सवांना जे बाजारू आणि धांगडधिंग्याचे स्वरूप आलेले आहे, त्या तुलनेत दिल्लीच्या मराठी माणसांचा गणेशोत्सव खरेच प्रशंसनीय असतो.
असा हा दिल्ली आणि दिल्लीतला मराठी माणूस यांच्यातला संबंध आहे. मराठी माणसाने दिल्लीत आपली भाषा, आपली संस्कृती आणि आपला स्वभावधर्म अजून तरी टिकवून ठेवला आहे. हळूहळू त्यात घट होत जाणार हे निश्चित आहे. मात्र ही घट मराठी माणसाला उपकारक ठरते की हानिकारक हे मात्र आत्ताच सांगता येणार नाही. ते काळच निश्चित करेल.

Web Title: Where is Delhi away?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.