When tears come in the eyes of Mohammad Siraj ... | मोहंमद सिराजच्या डोळ्यात जेव्हा पाणी येतं...

मोहंमद सिराजच्या डोळ्यात जेव्हा पाणी येतं...

ठळक मुद्देआपण ज्या भूभागात राहतो, ज्या जाती-धर्मात जन्माला येतो, ज्या अर्थिक विवंचनेत जगतो त्या साऱ्या अडचणी आणि पूर्वग्रहांवर मात करत हिमा आणि सिराजसारखे खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करतात. म्हणून त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याला वेगळी चकाकी दिसते.

- मेघना ढोके

सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारत- ऑस्ट्रेलियादरम्यान तिसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी भारताचं राष्ट्रगीत सुरू झालं आणि त्याला अश्रू अनावर झाले. डोळे पुसत असल्याचा त्याचा व्हिडिओ बराच व्हायरलही झाला. भारताचा तेज मध्यमगती गोलंदाज मोहंमद सिराजची ही गोष्ट.

स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये सामन्यांची सुरुवात राष्ट्रगीतानं होणं काही नवीन नाही. मात्र, मोहंमद सिराजसाठी ही गोष्ट नवीनच होती. या सामन्याआधीच्याच कसोटीत त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये पर्दापण केलं, डोक्यावर टेस्ट कॅप आली आणि भारतीय संघात, देशासाठी खेळायचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं. या देशात क्रिकेट खेळणारी लाखो मुलं भारतीय संघाची टेस्ट कॅप डोक्यावर येण्याचं स्वप्न पाहतात; पण म्हणून साऱ्यांचीच स्वप्नं थोडीच पूर्ण होतात? काहींची स्वप्नं पैशांअभावी, सुविधा आणि संधींअभावी आणि पुरेशा मार्गदर्शनाअभावीही वेगवेगळ्या टप्प्यांवर खुडली जातात.

त्यातही मोहंमद सिराजसारखे खेळाडू. ते ज्या आर्थिक, सामाजिक वर्तुळातून येतात त्यांचा संघर्ष तर पावलोपावली अधिकच परीक्षा पाहणारा असतो. खेळाडू म्हणून तुम्ही सुरुवात कुठून करता, ज्याला सोशल पोझिशनिंग म्हणतात ते नेमकं कसं आणि काय आहे, हे आजच्या काळात फारच महत्त्वाचं झालं आहे. पूर्वीपेक्षा अधिक टोकदार झालेत ते संदर्भ. राष्ट्रगीत कानावर पडताच मोहंमद सिराजच्या डोळ्यात अश्रू आले, त्याला आपल्या दिवंगत वडिलांची आठवण व्याकूळ करून गेली; या गोष्टी म्हणूनच केवळ त्या सिराजच्या व्हायरल व्हिडिओपुरत्या मर्यादित राहत नाहीत, त्या एका वेगळ्या संंघर्षाची गोष्ट सांगतात.

तर मोहंमद सिराज हैदराबादचा. त्यांचे वडील मोहंमद गाऊस रिक्षाचालक होते. आई गृहिणी. एरव्ही क्रिकेट म्हणजे तेंडुलकर- धोनी होण्याची अर्थात बॅट्समन होण्याची स्वप्नं आपल्या देशात मुलं पाहतात. (त्याचं कारण बॅट्समनला ग्लॅमर जास्त आहे. कपिल देव होणं तेव्हाही सोपं नव्हतं, आजही नाही.) तिथं सिराज बॉलर होऊ घातला होता. त्यातही फास्ट बॉलर. पैशाअभावी तो कुठल्याही कोचिंग अकॅडमीत प्रशिक्षण घेऊ शकला नाही. तरीही त्यानं आपल्या गुणवत्तेच्या जोरावर २०१५- १६ च्या मौसमात थेट रणजी संघापर्यंत मजल मारली. बॉलरसाठी आवश्यक स्पाइक शूज घ्यायचे तर वडिलांना केवढी आर्थिक तयारी करावी लागायची, हे त्यानं अनेकदा सांगितलं आहेच. पुढे त्याच्यासाठी आयपीएल लिलावाची कवाडं २० लाख रुपये बेस प्राइजला उघडली. विशेष म्हणजे सनरायजर्स हैदराबादने त्याच वर्षी त्याला २.६ कोटी रुपये बोली लावून संघात घेतले. त्या वेळीही सिराज म्हणाला होता, ‘आता सांगतो मी वडिलांना की, आता नका चालवू रिक्षा. आराम करा; पण ते ऐकत नाहीत. आता या पैशांतून कुटुंबासाठी एक चांगलं घर विकत घ्यायचं एवढंच ठरवलं आहे.’

त्यानंतर बंगलोर चॅलेंजर आणि भारतीय संघ असा त्याचा प्रवास झाला. यंदा आयपीएल खेळून दुबईतून तो भारतीय चमूसह ऑस्ट्रेलियात गेला. बायो बबलचे कोरोना नियम कडक होतेच. त्यात २० नोव्हेंबर २०२० ला सिराजच्या वडिलांचं निधन झालं. आपल्या मुलानं भारतीय संघात खेळावं हे स्वप्न पाहणाऱ्या वडिलांनी अकाली डोळे मिटले. त्यांच्या अंत्यसंस्कारांनाही सिराज घरी येऊ शकला नाही. त्यावेळी विराट कोहलीने त्याला धीर दिला. विराट त्याला म्हणाला होता, ‘मियां टेन्शन मत ले, ॲण्ड बी स्ट्राँग, वडिलांचं स्वप्न होतं तू भारतीय संघात खेळावं, ते पूर्ण कर!’

वरकरणी हे वाक्य कुणीही कुणाला म्हणेल; पण विराटने हे म्हणण्यात त्याची स्वत:ची वेदना आहे. विराट रणजी सामना खेळत असताना त्याचे वडील हृदयविकाराच्या झटक्याने अचानक गेले, सामना खेळून तो थेट अंत्यसंस्काराला स्मशानात गेला होता. भारताचा पूर्व कप्तान मोहंमद अझरुद्दीनचे आजोबाही अझरला भारतीय संघात खेळताना पाहण्यापूर्वी असेच अचानक गेले. वैयक्तिक दु:ख मनात साठवून त्यावर दगड ठेवून जेव्हा हे खेळाडू मैदानात उतरतात, त्यावेळी मग डोळ्यातलं पाणी असं अनावर होतं.

मात्र, तिथवर पोहोचणंही सोपं नसतंच. आपल्या निम्न सामाजिक, आर्थिक स्तरातून पुढे सरकताना द्याव्या लागणाऱ्या हजारो परीक्षा, क्षमतांवर घेतले जाणारे संशय, काही टक्के जास्त योगदान देऊन वारंवार सिद्ध कराव्या लागलेल्या क्षमता, दिसण्यापासून इंग्रजी बोलण्यापर्यंत आणि मन मारून जगत आपल्या ध्येयाचाच विचार करण्यापर्यंतचं हे सारं सिराजसारख्या अनेकांच्या संघर्षाचा भाग असतं. तो संघर्ष हर पावलावर त्यांची परीक्षा पाहतो. म्हणून मग कानावर पडणारे राष्ट्रगीताचे स्वर असे आपण सर्वेच्च स्तरावर कामगिरी करण्यास ‘पात्र’ ठरलो याचा आनंद बनून डोळ्यातून वाहू लागतात.

हिमा दासचा आसामी गमछा

४ जुलै २०१८ रोजी आसामी धावपटू हिमा दास हिचाही राष्ट्रगीत सुरू असताना डोळ्यातून पाण्याच्या धारा लागलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. धिंग नावाच्या छोट्या गावातली हिमा. ज्या देशात लोकांना आसाम भारताच्या नकाशावर दाखवता येणार नाही, त्या आसाममधल्या लहानशा गावात सुसाट पळणारी हिमा वर्ल्ड ट्रॅक इव्हेंटमध्ये सूवर्णपदक जिंकून आली होती. राष्ट्रगीत सुरू झालं आणि ते गाताना ती तिच्याही नकळत रडू लागली. आताही ती येत्या टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र झाल्याची बातमी आहे. मात्र, अजून त्याची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. आपण ज्या भूभागात राहतो, ज्या जाती-धर्मात जन्माला येतो, ज्या अर्थिक विवंचनेत जगतो त्या साऱ्या अडचणी आणि पूर्वग्रहांवर मात करत हिमा आणि सिराजसारखे खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करतात. म्हणून त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याला वेगळी चकाकी दिसते. हिमाच्या गळ्यातला आसामी गमछा आणि सिराजची हैदराबादी बोली न बोलताही बरंच काही सांगून जाते.

(लेखिका लोकमत वृत्तसमूहात मुख्य उपसंपादक आहेत.)

meghana.dhoke@lokmat.com

Web Title: When tears come in the eyes of Mohammad Siraj ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.