When the phone call to stop suicide in Dhule comes from Ireland... | धुळ्यातील आत्महत्या थांबवणारा फोन आयर्लंडमधून येतो, तेव्हा...

धुळ्यातील आत्महत्या थांबवणारा फोन आयर्लंडमधून येतो, तेव्हा...

ठळक मुद्देसायबर सेलची सुसज्ज लॅब आहे. तेथे टेक्निकल अ‍ॅनालिसिस केलं जातं. सोशल मिडियावर अ‍ॅप चालवणाऱ्या कंपन्यांच्याही पोलीस संपर्कात असतात. त्यांनी पुरवलेल्या माहितीवर लॅबमध्ये काम केलं जातं आणि गुन्हे हुडकून काढले जातात.

- रश्मी करंदीकर

 धुळ्यातील  तरूणाने फेसबुक लाईव्हवर नुकताच केलेला आत्महत्येचा प्रयत्न रोखण्यात तुम्हाला यश आलं. त्याबद्दल सांगाल?

- रविवारी रात्री ८ वाजून १0 मिनिटांनी मला आयर्लंडमधील फेसबुक मुख्यालयातून मुंबई परिसरात एक तरूण फेसबुकवर आत्महत्येचा प्रयत्न करीत आहे, इतकीच माहिती आणि काही व्हिडिओ क्लिपिंग मिळाल्या. त्या व्हिडियोत त्या तरूणाचा गळा आणि मनगटं रक्ताने माखलेली दिसत होती. याव्यतिरिक्त त्याची कोणतीही माहिती नव्हती. फेसबुकच्या दृष्टीने मुंबई केंद्र म्हणजे आपल्या दृष्टीने पूर्ण राज्यच. गवताच्या गंजीतून सुई शोधण्यासारखंच हे आव्हानात्मक होतं. पण त्याचे प्राण वाचवण्यासाठी हालचाल करणं भाग होतं. तो सुटीचा दिवस असल्याने घरूनच मला पुढील आॅपरेशन पार पाडावं लागलं. कारण आॅफिस गाठण्यासच अर्धा तास लागला असता. एकएक क्षण महत्वाचा होता. फेसबुकने दिलेला त्याचा मोबाईल फोन क्रमांक दिल्लीतील त्याच्या पत्नीकडे होता. त्यामुळे कार्यालयातील कर्मचाºयांना व्हिडिओ कॉलवरून सूचना देत टेक्निकल अ‍ॅनालिसिसद्वारे त्या तरूणाची धुळ््यातील बिल्डिंग शोधून काढली आणि पहिला कॉल आल्यापासून अवघ्या पन्नासाव्या मिनिटाला पोलीस त्याच्या घरी पोहचून त्याला वाचवू शकले. अशा प्रकरणात गोल्डन अवर अतिशय महत्वाचा असतो. गेल्या पाच महिन्यात आम्ही झटपट लोकेशन शोधून टाळलेली ही पाचवी आत्महत्या आहे.

आत्महत्येच्या प्रयत्नांच्या घटनांमागील कारणं काय होती?

-  धुळ्याचा हा तरूण आणि एका शेफ तरूणाने नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण अन्य प्रकरणात तरूणींचा सोशल मीडियावरून झालेला छळ हे मुख्य कारण होतं. एका तरूणीचे मॉर्फ केलेले फोटो पॉर्न वेबसाईटवर टाकण्यात आले म्हणून तर दुसरीने तिचा मोबाईल क्रमांक कॉलगर्ल म्हणून वेबसाईटवर टाकल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यात आरोपीला २४ तासात अटक झाली. या प्रकरणांमध्ये सायबर स्पेसचा समाजकंटकांकडून झालेला गैरवापर हे प्रमुख कारण होतं.

   अशाप्रकारे आत्महत्या रोखल्यावर पोलिसांची भूमिका तेथे संपते का?

 -  नाही. तांत्रिकदृष्ट्या पोलिसांचं काम संपलं तरी आम्ही तेथेच थांबत नाही. आत्महत्या करणाºयाची मनस्थिती आम्ही समजून घेतो. केवळ आत्महत्या रोखण्यात नव्हे तर त्याच्या मनातून ते नकारात्मक विचार पूर्ण काढून टाकण्यात आम्हाला रस असतो. अन्यथा ती व्यक्ती पुन्हा आत्महत्येकडे वळू शकते. त्यासाठी तिथपर्यंतचा टेक्निकल प्रवास थांबवून आम्ही त्या घटनेमागील कारण जाणून घेतो. त्यानंतर त्या व्यक्तीचं समुपदेशन केलं जातं. त्याला पूर्णपणे परावृत्त केल्यानंतरच आमच्यादृष्टीने केस सेटल होते आणि पूर्णविराम मिळतो.

अलिकडे सायबर क्राईम वाढलं आहेया नव्या गुन्हेगारीबद्दल काय सांगाल?

- वेगवेगळ््या कारणांनी आज प्रत्येकजण सोशल मिडियाशी जोडला गेलेला आहे. कुणी वस्तूंची विक्री करण्यासाठी कुठल्यातरी साईटवर आपली माहिती टाकतो तर कुणी खरेदीसाठी. विवाह जुळवण्यासाठी अनेकजण आपली वैयक्तिक माहिती मेट्रोमॉनियल साईटवर टाकतात. त्यात ईमेल आयडी, फोन नंबरसह इतर तपशील असतात. माहिती युगात आपली माहिती आजकाल सहजपणे सर्वांना उपलब्ध आहे. संगणक, मोबाईल फोन, डिजिटल कॅमेरे आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. विविध पैलूंमधील तंत्रज्ञान आणि इंटरनेटचा वाढता वापर, यामुळे नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर सायबर अ‍ॅटॅक होत आहेत. 

याचं नेमकं स्वरूप कसं असतं?

  - सायबर स्पेसचं साधन वापरुन केलेलं कोणतंही बेकायदेशीर कृत्य म्हणजे हॅकिंग, लैंगिक चित्रण, खासगी किंवा गोपनीय माहिती चोरणं, फोडणं, सोशल नेटवर्कींगद्वारे धमक्या देणं, आर्थिक गुन्हेगारी, इ-मेलद्वारे फसवणूक आदीे सायबर गुन्हेगारीच्या कक्षेत येतात.

  ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार कसे घडतात?

  - अनेक फ्रॉडस्टर गुगलवरील बँकांच्या हेल्पलाईनचे क्रमांक बनवतात. काही फेक पेज तयार करतात. उदाहरण द्यायचं तर ३१ डिसेंबरला फेसबुकवर दक्षिण मुंबईतील एका हॉटेलची जाहिरात आली, ‘एका थाळीवर एक थाळी फ्री’ एका ग्राहकाने संपर्क केला तेव्हा त्याला दहा रूपये भरण्यास सांगून एक लिंक पाठवण्यात आली. त्यावर क्लिक करताच त्या ग्राहकाच्या खात्यातील रक्कम साफ झाली. अशाप्रकारे मुंबईतील पाच तर पुण्यातील दोन हॉटेलचे फेक पेज बनवल्याचं आम्हाला आढळलं.

  एका ६५ वर्षांच्या आजोबांना पिझ्झा खाण्याची इच्छा झाली. त्यांनी गूगलवर शोधलेला नंबर डायल केला. तो कट झाला आणि नंतर एकाने त्यांच्याशी संपर्क साधून ओटीपी जाणून घेत त्यांच्या खात्यातील ४५ हजार रूपये उडवले.  

  या गुन्ह्यांचा तपास अतिशय क्लिष्ट कसा असतो?

- हे अपराध्यांसाठी एका जागी बसून करणं सोपं आहे. माहितीच्या देवघेवीचं हे तंत्रज्ञान वापरणाऱ्या व्यक्ती बरेचदा पूर्णपणे अनोळखी असतात. यात काही सीमारेषा नसतात. म्हणजेच नायजेरियात बसून कोणी तुमच्याशी संवाद साधेल पण भासवेल की हा संवाद दिल्लीतून होतोय. मुख्य मुद्दा हाच की बरेच गुन्हे हे अनोळखीपणाचा फायदा घेऊन केले जातात.

सायबर सेल याचा छडा कसा लावते?

- सायबर सेलची सुसज्ज लॅब आहे. तेथे टेक्निकल अ‍ॅनालिसिस केलं जातं. आम्ही सोशल मिडियावर अ‍ॅप चालवणाºया कंपन्यांच्याही संपर्कात असतो. त्यांनी पुरवलेल्या माहितीवर लॅबमध्ये काम केलं जातं. वेगवेगळ््या टूलच्या माध्यमातून लोकशनसह अन्य तपशील मिळवला जातो. टूलशिवाय इतरही अनेक तांत्रिक स्वरूपाची मदत घेतली जाते. हा विभाग अधिकाधिक सुसज्ज करण्याचे काम सुरू आहे.

  नागरिकांसाठी आपल्या काय टिप्स आहेत?

 - सावधगिरी बाळगत काही पथ्यं पाळली तर फ्रॉडस्टरच्या कारवाया बऱ्याच प्रमाणात रोखता येतील. सोशल मीडियावर आपले फोटो, वैयक्तिक माहिती शेअर करताना पुरेशी दक्षता घेतली पाहिजे. कोणतीही लिंक क्लिक करताना खातरजमा करावी तसाच ओटीपी कुणालाही शेअर करू नये. केवायसीच्या नावाखाली मागितलेली बँक खाते, आधार क्रमांक अशी माहिती अजिबात देऊ नये. बँका फोनवर केवायसी अपडेट करीत नाहीत. त्यासाठी बँकेत जाऊनच केवायसी अपडेट करावं. अनोळखी व्यक्तींकडून देऊ केली जाणारी बक्षिसं, भेटीदाखलच्या रकमा याकडे दुर्लक्ष करून आपली फसवणूक टाळावी.

(उपायुक्त, सायबर सेल, मुंबई पोलीस)

मुलाखत व शब्दांकन- रवींद्र राऊळ

Web Title: When the phone call to stop suicide in Dhule comes from Ireland...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.