शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

आपल्यातला कर्ता सजग होण्यासाठी काय कराल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 07:00 IST

कर्ता गाडीच्या चालकासारखा असतो. गाडी चालवण्यापासून ते दिशा, रस्ता. सारे काही त्याला ठरवावे लागते. स्वत: निर्णय घ्यावा लागतो. हा निर्णय प्रवाशावर सोडता येत नाही. तरच गाडी निश्चित ठिकाणी पोहोचू शकते. आयुष्याची गाडीही अशीच चालवावी लागते.

-डॉ. यश वेलणकर

माइंडफुलनेस हे मेंदूला दिलेले अटेन्शन ट्रेनिंग आहे. अशा प्रशिक्षणामुळे प्रत्येक प्रसंगात आपण आपली भूमिका ठरवू शकतो, रोल निवडू शकतो. ही भूमिका तीन प्रकारची असते- कर्ता, भोक्ता आणि  साक्षी. यातील कर्ता आणि भोक्ता हे दोन रोल सर्वांच्या माहितीचे आहेत. सजगतेच्या, माइंडफुलनेसच्या सरावाने साक्षी हा तिसरा रोल आपण विकसित करत असतो; पण माइंडफुल राहायचे म्हणजे सतत साक्षी राहायचे असे नाही. काहीवेळ आपण कर्ता आणि भोक्ता होणेदेखील आवश्यक असते. ही भूमिका आपण प्रसंगानुसार निवडू शकतो. स्वत:चा असा रोल बदलवता येणे वैचारिक लवचिकता आणि सजगता असेल तरच शक्य होते. आयुष्यात हे तीनही रोल महत्त्वाचे आहेत. सजगतेने, अटेन्शन ट्रेनिंगने आपण हे तीनही रोल अधिक चांगले वटवू शकतो. आपण कृती करीत असतो त्यावेळी कर्ता असतो, गाडी चालवणारा ड्रायव्हर कर्ता असतो, गाणारा गायक कर्ता असतो. कोणत्याही गोष्टीचे सुख किंवा दु:ख भोगत असतो त्यावेळी आपण भोक्ता असतो. गाडीत मागे बसलेले असताना गाडी खड्डय़ात गेल्याने धक्का बसतो त्यावेळी आपण भोक्ता असतो. गाण्याचा आनंद घेत असतो त्यावेळी भोक्ता असतो. चांगला रसिक हा सजग भोक्ता असतो; पण साक्षी म्हणजे काय? घराच्या गच्चीतून मी रस्त्यावरचा ट्रॅफिक तटस्थपणे पाहत असतो त्यावेळी साक्षी असतो. सजगता ध्यान म्हणजे असेच स्वत:चे सुख-दु:ख साक्षीभावाने जाणत राहायचे प्रशिक्षण आहे. त्यासाठी दिवसभरातील थोडा वेळ द्यायला हवा. इतर वेळी आवश्यकतेनुसार कर्ता आणि भोक्ता व्हायला हवे.    

कर्ता होणे म्हणजे गाडीचा चालक होणे होय. चालक होणे म्हणजे दिशा निवडणे, कोणता रस्ता स्वीकारायचा आहे ते ठरवणे. शिक्षण घेताना दहावी, बारावीत हा रस्ता निवडायचा असतो. त्यानंतर आयुष्यात अनेक वेळा निर्णय घेण्याची वेळ येते. नोकरी करायची की व्यवसाय, लग्न कधी करायचे, कुणाशी करायचे, घर कुठे घ्यायचे, मोबाइल कोणता विकत घ्यायचा, फिरायला कोठे जायचे, कसे जायचे असे असंख्य निर्णय रोजच्या आयुष्यात घ्यावे लागतात. ही निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे म्हणजे कर्ता होणे असते. निर्णय घेतो त्यावेळी त्या निर्णयाच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारावी लागते. निर्णय घेताना मानसिक तणाव येतो. तो टाळण्यासाठी काहीजणांना अशी सवय असते की निर्णय घेताना ते फारसा विचार करीत नाहीत, जो पहिला रस्ता दिसेल तोच निवडतात; पण याचा अर्थ त्यांनी कोठे जायचे आहे ते ठरवलेलेच नसते. असे केल्याने पश्चातापाची वेळ येते. मला जायचे होते एका ठिकाणी आणि पोचलो दुसरीकडेच असे वाटते. हे टाळायचे असेल तर समोर दिसणारे रस्ते कोठे जातात याची चौकशी करायला हवी. आवश्यक ती माहिती मिळवायला हवी. माइंडफुलनेसच्या अभ्यासाने निर्णयक्षमता विकसित होते. त्यामुळे कर्तेपणाची भूमिका अधिक चांगली करता येते.

 

आज मानसिक तणाव वाढले आहेत कारण सतत निर्णय घ्यावे लागतात. अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यातून एकाची निवड करायची असते त्यावेळी मनावर तणाव येतो. दहावी, बारावी नंतर शिक्षणाच्या असंख्य शाखा आहेत, त्यातील कोणती शाखा निवडायची हा प्रश्न येतो त्यावेळी गोंधळ उडतो, तणाव येतो; पण विविध पर्याय उपलब्ध असणे हे चांगलेच आहे, नाही का? अनेक पर्यायातील एकाची निवड करताना तणाव येतो कारण आपला निर्णय चुकला तर काय अशी भीती असते. आणि आपण सतत अचूकच असले पाहिजे हा आग्रह तणाव वाढवतो. कारण निर्णय चुकला तर दु:ख भोगावे लागेल अशी चिंता वाटत असते; पण चूक होईल म्हणून कोणताच निर्णय घेता न येणे ही सर्वात मोठी चूक आहे. ती टाळण्यासाठी निर्णय घेण्याचा सराव करायला हवा. पालकांनी मुलांना तशी संधी द्यायला हवी. हॉटेलमधील मेनूकार्डवरील असंख्य पदार्थांतून आपण एका डिशची निवड करत असतो, त्यावेळी निर्णयच घेत असतो. त्यावेळी आपण कर्ता असतो. एका पदार्थाची निवड करून तो समोर आला आणि आपण तो खाऊ लागतो त्यावेळी आपण भोक्ता होतो. त्यावेळी माइंडफुल राहायचे म्हणजे निर्णय घेताना येणारा तणाव, त्यामुळे शरीरावर निर्माण होणार्‍या   संवेदना, तो पदार्थ खाताना त्याची जाणवणारी आणि बदलत जाणारी चव साक्षीभावाने जाणत राहायची. त्या चवीची, त्या क्षणाची दुसर्‍या अनुभवाशी तुलना करीत न राहता मन वर्तमानात ठेवायचे. मन विचारात भरकटले आहे हे लक्षात आले की पुन्हापुन्हा ते कृतीवर किंवा त्या क्षणी येणार्‍या  अनुभवावर, चवीवर, गंधावर, स्वादावर आणायचे. त्या क्षणाचा आनंद घ्यायचा.

 माइंडफुलनेसच्या सरावाने आपण अधिकाधिक बीइंग इन दी झोन राहू लागतो. असे राहू लागल्याने कर्त्याचे कौशल्य वाढते. कोणत्याही कामासाठी लागणारा वेळ कमी होतो. बीइंग इन दी झोन राहणे म्हणजे मन विचलित होण्याचे प्रमाण कमी होणे. वाचताना फक्त वाचायचे, ऐकताना ऐकायचे, बोलताना बोलायचे. आपण वाचत असताना काहीतरी ऐकत असतो, दुस-याचे बोलणे ऐकत असताना बोलायचे काय याचा विचार करीत असतो आणि  बोलताना मोबाइलवर पाहत असतो. आपले अटेन्शन, आपले ध्यान सतत विखुरलेले असते. असे ध्यान विखुरलेले असते त्यावेळी मेंदूला अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे लवकर थकवा येतो, काम पूर्ण व्हायला वेळ लागतो. अधिक चांगला कर्ता व्हायचे म्हणजे बसच्या ड्रायव्हरसारखे व्हायचे. तो बसमध्ये बसतो, त्यावेळी कोठे जायचे तो बोर्ड लावतो, त्याचा मार्ग निश्चित असतो. आता त्या बसमध्ये प्रवासी आला आणि तो दुस-या ठिकाणी गाडीने असे सांगू लागला तर ड्रायव्हर त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. ड्रायव्हर सर्व प्रवाशांचे ऐकून त्यानुसार बस नेऊ लागला तर त्याच्या ठरवलेल्या ठिकाणी पोचायला त्याला खूप वेळ लागेल. कोणतेही काम करताना ब-याचदा आपले असेच होत असते. आपण मनात येणा-या प्रत्येक विचाराला महत्त्व देतो त्यामुळे हातात घेतलेल्या कामाला वेळ लागतो.

 माइंडफुल कर्ता व्हायचे म्हणजे मनातील अनेक विचारांतून एका विचाराला निवडायचे आणि त्याला ड्रायव्हर बनवायचे. त्यानुसार कृती करायची. त्यावेळी दुसरे विचार येतील त्यांना महत्त्व द्यायचे नाही. दुस-याचे बोलणे ऐकत असताना मोबाइलकडे पाहूया असा विचार मनात आला तरी त्यानुसार पाहायचे नाही, त्या विचाराकडे दुर्लक्ष करायचे आणि आपले लक्ष ऐकण्यावरच ठेवायचे. जेवताना फक्त जेवायचे, अंघोळ करताना आनंदाने अंघोळ करायची आणि विचार करताना सर्व ऊर्जा विचार करण्यावरच केंद्रित करायची. माइंडफुलनेसच्या सरावाने ही क्षमता वाढत जाते, सजगतेच्या सरावाने आपल्यातील कर्ता अधिक सक्षम होऊ लागतो.   

कर्ता, भोक्ता आणि साक्षीप्रत्येकाला आयुष्यात तीन प्रकारची भूमिका निभवावी लागते. कर्ता, भोक्ता आणि साक्षी.ज्यावेळी कोणतीही कृती आपल्याकडून होत असते, त्यावेळी आपण कर्ता असतो. ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा उपभोग घेतला जातो, त्यावेळी आपण भोक्ता असतो आणि ज्यावेळी एखादी गोष्ट आपण त्रयस्थपणे, तटस्थपणे पाहत असतो, त्याचा अनुभव घेत असतो, त्यावेळी आपण साक्षी असतो. आवश्यकतेनुसार आपल्याला तिन्ही भूमिका कराव्या लागत असल्या तरी ठरवून काही काळ आपण साक्षीभावात जायला हवे. स्वत:कडे साक्षीभावानं पाहून स्वत:ला जाणून घ्यायला हवं. 

(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत.)

yashwel@gmail.com