What does India do at Antarctica? | भारत ‘तिथे’ काय करतो?

भारत ‘तिथे’ काय करतो?

ठळक मुद्देअसा दावा केला जातो की, अंटार्क्टिकाचाच भाग वेगळा होऊन भारत तयार झाला आहे. कितीतरी वर्षांपूर्वी हे झाले आणि त्याचीच पाळेमुळे आता तिथे शोधली जात आहेत.

- पवन देशपांडे

हवामान बदलाचे पहिले पडसाद पडतात ते अंटार्क्टिकावर, उणे २० ते उणे २५ एवढे तापमान तिथे कायम असते. काहीवेळा ते उणे ७० अंशापर्यंतही जाते. मान्सून, हवामान बदल आणि त्याचा मानव, समुद्री जीव आणि प्राण्यांवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास तिथे केला जातो. सहा महिने रात्र आणि सहा महिने दिवस असलेल्या अति थंड प्रदेशात आपले संशोधक तिथे संशोधन करीत आहेत.. ‘बर्फाची वादळे एवढी तीव्र की त्यात सापडलात तर कायमचे बर्फात गाडले जाणार, यात तीळमात्र शंका नाही. पण याच वादळांशी मैत्री केली, तर हाती नवं काही सापडेल. त्यांच्या सान्निध्यात राहता येईल आणि देशाची मान-शान उंचावण्यात खारीचा वाटाही उचलता येईल...’

ही भावना आहे... अंटार्क्टिकासारख्या ९८ टक्के बर्फाळ प्रदेशात देशासाठी संशोधनाचे काम करणाऱ्या प्रत्येक संशोधकाची. गेल्या काही आठवड्यांपूर्वी कोरोनाच्या विषाणूने तिथेही शिरकाव केल्याच्या बातम्या आल्या. अंटार्क्टिका हा असा एकमेव खंड होता, जिथे कोरोनाने शिरकाव केला नव्हता. पण अनेक महिन्यांनी तिथेही कोरोनाचे पाऊल पडलेच... या बातम्यांनंतर भारतातील तेथील संशोधक आणि तेथील भारताचे संशोधन केंद्र यांच्या चर्चा सुरू झाल्या. पण भारत तेथे काय करतोय... का करतोय... किती दिवसांपासून करतोय, हे जाणून घेणे औत्सुक्याचे तर आहेच, शिवाय संशोधक किती कठीण परिस्थितीत राहून देशाची सेवा करू शकतात, याचे उत्तम उदाहरणही आहे.

नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्चचे संचालक डॉ. एम. रवीचंद्रन यांनी ‘लोकमत’ला सविस्तर माहिती दिली. ते सांगतात, जगातील ९० टक्के बर्फ असलेला हा खंड. शिवाय सर्वाधिक शुद्ध पाण्याचा साठा कुठे असेल, तर तो या जागी आहे. एकही स्थानिक व्यक्ती नाही. कारण, कोणचीच तेथे मालकी नाही. कोणी तिथलं स्थानिक असतील, तर तो मनुष्यप्राणी नाही. काही जीव, काही छोटी झुडपं... तळ्यात आढळणारे कीटक... एवढेच काय तिथले मूळ रहिवासी. बाहेरच्या जगातून जो कोणी अंटार्क्टिकावर जातो तो संशोधनासाठी. गेल्या काही दिवसांपासून तिथे पर्यटन सुरू झाले असले, तरी ते करण्याची फारशी हिंमत कोणी दाखवत नाही. कारण तिथे कायम उणे २० ते उणे २५ एवढे कायम तापमान असते. हेच तापमान आणखी खाली जाऊन उणे ७० पर्यंतही पोहोचते. कधी कधी हिमवादळं एवढी मोठी असतात की, आपण काल पाहिलेली जागा खरंच नाहीशी झाली की काय, अशी शंका येते.

असा दावा केला जातो की, अंटार्क्टिकाचाच भाग वेगळा होऊन भारत तयार झाला आहे. कितीतरी वर्षांपूर्वी हे झाले आणि त्याचीच पाळेमुळे आता तिथे शोधली जात आहेत. डॉ. रवीचंद्रन म्हणाले की, जगातील हवामानातील पहिला बदल पाहायला मिळतो किंवा त्या बदलाचे पहिले पडसाद पडतात, ते अंटार्क्टिकावर. त्यामुळे जगातील कार्बन उत्सर्जन नियंत्रणात आणण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या जात आहेत, त्यावरही अनेक देश अंटार्क्टिकावर संशोधन करत आहेत. भारतही त्यात सहभागी आहे. भारतात येणारे मान्सूनचे वारे, भारतात दरवर्षी पडणारा पाऊस आणि त्यातील बदल यांचा आणि अंटार्क्टिकावर होणारे हवामानातील बदल यांचा संबंध काही आहे का? असेल तर तो कसा? अंटार्क्टिकावर कोणते बदल झाले की, भारतात येणारे मान्सून वारे त्या पद्धतीने बदलतात... असे अनेक प्रकारचे संशोधन भारतीय संशोधक तेथे करत आहेत. मान्सूनची... हवामान बदलाची आणि त्यांचा मानवावर शिवाय समुद्री जिवांवर तथा प्राण्यांवर होणारे परिणाम यांचाही अभ्यास सातत्याने केला जात आहे. भविष्यातील हवामान कसे असेल, याचा अंदाज घेऊन त्यावर उपाय करता यावेत, यासाठी हाडे गोठवणाऱ्या थंडीत अहोरात्र संशोधन करतात. भारताचे शंभरावर संशोधक तिथे वर्षभर असतात. एकदा तिथे गेल्यानंतर वर्षभर परत यायची सोय नाही. त्यामुळे वर्षभर लागणारे सर्व साहित्य एकाच खेपेला न्यावे लागते. इथे राहायचे तर अनेक नियम पाळावे लागतात. कारण तसे जागतिक पातळीवरच ठरलेले असते. त्यामुळे कुठलीही हलगर्जी चालत नाही. काही दिवसांपूर्वी भारतातील ४० संशोधकांची टीम अंटार्क्टिका मोहिमेसाठी निघाली आहे. ती दक्षिण अफ्रिकेमार्गे तिथे पोहोचेल. त्यानंतर तेथील काही संशोधक मार्च-एप्रिलमध्ये भारतात येतील.

अंटार्क्टिकावर संशोधन करता यावे, यासाठी भारताने १९८३ मध्ये दक्षिण गंगोत्री नावाचे केंद्र सुरू केले होते. पण त्यावर काही काळ काम झाल्यानंतर ते बर्फाखाली गाडले गेले. त्यानंतर भारताने जिथे फारसा बर्फ नाही, अशा भूभागावर १९८८ मध्ये ‘मैत्री’ आणि २०१२ मध्ये ‘भारती’ हे दोन संशोधन केंद्रे सुरू केली आहेत. या दोन्ही केंद्रांवर अनेक प्रकारच्या लॅब आहेत. तेथे जमा केलेले विविध नमुने वर्षभर टिकविण्यासाठी सुविधा आहेत. येथे सर्वाधिक संशोधन हे भारतातील मान्सूनसंबंधी केले जाते. कारण, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मान्सून हा सर्वात मोठा घटक आहे. त्यावर देशाची सर्वाधिक आर्थिक गणिते अवलंबून आहेत. त्यामुळे या संशोधनाला अधिक गती मिळावी, बर्फाखाली दडलेली अनेक गुपिते... समुद्रात लपलेली स्वप्ने साकार करता यावीत... एवढीच या जाँबाज़ संशोधकांना शुभेच्छा...

सहा महिने रात्र आणि सहा महिने दिवस- संशोधक तिथे राहतात कसे?

अंटार्क्टिकाला जाताना संशोधक वर्षभराची शिदोरी सोबत घेऊन जातात. ते वर्षभर पुरवावे लागते. शिवाय तिथे सहा महिने रात्र आणि सहा महिने दिवस असल्याने तशी मानसिक तयारी करावी लागते. बर्फात राहण्यासाठी प्रशिक्षण घ्यावे लागते. त्यासाठी संशोधकांना हिमालयात काही महिने ट्रेनिंगही दिले जाते. सहा महिने उजेडात काढताना झोपेच्यावेळी झोप यावी यासाठी काळ्या पडद्यांनी प्रत्येकाची रूम झाकली जाते. बर्फात राहण्यासाठी तसे कपडेही दिले जातात. केवळ संशोधन करून मानसिक ताण येऊ नये म्हणून विविध धर्माचे सणही तिथे भारतीय संशोधक साजरे करतात.

(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत सहायक संपादक आहेत.)

pavan.deshpande@lokmat.com

Web Title: What does India do at Antarctica?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.