What Corona taught us? - Dr. Abahy Bang | थोडे थांबलो, बिघडलं कुठे?

थोडे थांबलो, बिघडलं कुठे?

ठळक मुद्देभांडवलशाहीचं पाप (लोभ व विषमता), पृथ्वीला आलेला ताप (ग्लोबल वार्मिंग)  आणि धार्मिक हिंसेचा शाप - या तिन्हींपासून सुटकेची शक्यता कोरोनाने दाखवली आहे, हे मात्र नि:संशय! माझं कोरोना विद्यापीठ : लेखांक तिसरा

- डॉ. अभय बंग

विद्यापीठं चार भिंतींत पुस्तकी शिक्षण देतात. पण कोरोनाच्या विषाणूचा जगावर हल्ला झाला.. अशा आयुष्यात एकदाच येणार्‍या या वैश्विक संकटाने आपल्याला काय शिकवलं?
माझ्या कोरोना विद्यापीठातून मी जे महत्वाचे धडे शिकलो आहे, त्यातल्या एकूण सात धड्यांचं  विवेचन मी गेल्या दोन रविवारच्या लेखात केलं आहे. हे  धडे होते :
1. प्रश्न सोडविण्यासाठी त्याचं नेमकं मोजमाप अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासाठी निव्वळ अधिकृत आकडेवारीवर विसंबून राहू नका. ती आंशिक असू शकते. स्वतंत्रपणे शास्रीय मोजमाप केल्यानेच सत्य कळू शकते, हा दृष्टीकोन समाजात रुजवण्याचं मोठं काम कोरोनाच्या संसर्गाने केलं आहे.
2.  सत्य सर्व अंगांनी बघावं, तपासावं. आणि तरीही पूर्ण सत्य कधीच कळत नाही; हा कोरोनाने शिकवलेला दुसरा धडा
3. समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी निव्वळ खासगी वैद्यकीय उपचारांवर विसंबून राहता येणार नाही. बाजाराचं तत्त्व आरोग्य रक्षणासाठी अपुरं आहे. आरोग्यसेवांच्या क्षेत्रात खासगी आवडती, सार्वजनिक नावडती व सामुदायिक (कम्युनिटी) तर बहिष्कृत असा भेदभाव व एकांगीपणा भारतासाठी अयोग्य आहे. खासगीला सोबत घेऊन, सार्वजनिक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देऊन व सर्वात महत्त्वाचे, गावागावात लोकांच्या सहभागाने ‘आरोग्य-स्वराज्य’ व ‘सर्वांसाठी आरोग्य’ (युनिव्हर्सल हेल्थ केअर) अशी व्यवस्था करावी लागेल - हा कोरोनाने शिकवलेला सर्वात महत्वाचा धडा
4. स्वच्छता म्हणजे केवल व्यक्तीगत अगर परिसर स्वच्छता नव्हे,  श्वास स्वच्छतेची जाणिव जागृती कोरोनामुळे जगभरात झाली.
5.  न मागता व्यसनमुक्तीची शक्यता निर्माण झाली.
6.   कोरोना  व्हायरसमुळे होणार्‍या वैद्यकीय प्रगतीमुळे इतर रोगांसाठी सोप्या, तत्काळ निदान देणार्‍या, घरोघरी लोक वापरू शकतील अशा रोगनिदानाच्या टेस्ट निर्माण होतील. , बॅक्टेरियाविरुद्ध जसे प्रभावी अँण्टिबायोटिक आहेत व त्यामुळे गेल्या शतकात कोट्यवधींचे प्राण वाचले, तसं या शतकात अँण्टिव्हायरल औषधे निघतील. कोरोना व सोबतच अनेक विषाणू-रोगांवर प्रभावी उपचार व्यापक उपलब्ध होईल.
7. ‘कोरोना जात-पात, धर्मभेद जाणत नाही, सर्व समान आहेत ! या साथीविरुद्ध सर्वांना एक व्हावं लागेल’- या जाणिवेमुळे समाजातल्या धार्मिक कलहांची धार कमी होऊ शकेल

- आणि आज आता शेवटच्या तीन धड्यांबद्दल सांगतो :


धडा आठवा :
आता पश्चिमेकडे नव्हे,
पूर्वेकडे पाहा!

पाश्चिमात्य देशांच्या प्रभुत्वाची मानसिकता आपल्या देशात खोलवर रुजलेली आहे. विज्ञान, औद्योगिक क्रांती, भांडवलशाही व लोकशाही या पश्चिमेतून आलेल्या कल्पनांचं व म्हणून गोर्‍या लोकांचं व त्यांच्या प्रगतीचं कौतुक - सांस्कृतिक गुलामी - जगभर आहे. महात्मा गांधींपासून एडवर्ड सैदपर्यंत अनेकांनी याबाबत आपल्याला सावध केलं आहे. पण गेली दोन शतकं जागतिक सत्ता व नेतृत्व पश्चिमेच्या ताब्यात आहे. तेच जगाचे सत्ताधारी. निर्णयकर्ते. तारणहार. 
कोरोनाच्या साथीत विपरीत घडलं. कोरोनाच्या साथीचं सर्वात वाईट व्यवस्थापन व म्हणून सर्वात भयानक परिणाम कुठे झाले? अमेरिका, इंग्लंड, स्पेन, इटली, फ्रान्स. पाश्चिमात्त्य देशातील सर्वशक्तिमान नेत्यांनी, ट्रम्प व जॉन्सन सारख्यांनी, अतिशय वाईट पद्धतीने या संकटाचा सामना केला. (अपवाद-र्जमनी). अधिक प्रभावी नियंत्रण कुठे झालं? कोरिया, तैवान, चीन, हाँगकाँग व काही प्रमाणात भारत. देशाच्या पातळीवर नरेंद्र मोदी प्रभावी व निर्णायक नेतृत्व देत आहेत. सिक्कीममध्ये एकही रोगी झाला नाही. केरळने यशस्वीरीत्या साथ आटोक्यात आणली. हिमाचल प्रदेश, तेलंगणा हेही यशस्वी होताना दिसत आहेत. म्हणजे भारतातील राज्यं देखील प्रभावी नेतृत्व प्रकट करीत आहेत. 
प्राध्यापक किशोर महबूबांनी या सिंगापूर मधल्या जागतिक व्यवहाराच्या तज्ज्ञाने भविष्यवाणी केली आहे - कोविड-19च्या पॅनडेमिकनंतर प्रभावी नेतृत्वासाठी जग पश्चिमेकडे नव्हे, पूर्वेकडे बघेल. हे जागतिक सत्तांतर होईल.
कोविड-19 मुळे जागतिक नेतृत्व पूर्वेकडे परत येत आहे. असं खरंच होईल का? आणि पूर्वेकडच्या अनेक देशांचे नेते हुकूमशाही प्रवृत्तीचे आहेत हे विसरता कामा नये. लोकशाही व स्वातंत्र्याचं रक्षण करत  हे घडल्यास आपण म्हणू - थँक यू कोरोना !

धडा नववा :
शेती उजाड, गावं ओसाड होणं;
म्हणजे ‘विकास’ का?

एकविसाव्या शतकाच्या पहिल्या वीस वर्षातच भांडवलशाहीला दोन भूकंपांचा सामना करावा लागला. 2008मध्ये बँकिंग व रिअल-इस्टेट स्कॅममुळे आलेली जागतिक मंदी व आता पुन्हा दहा वर्षांनी कोविडनंतर नक्कीच येऊ घातलेली, अधिक गंभीर, जागतिक मंदी. अमेरिका, चीन, युरोप, जपान, भारत बहुतेक देशांचा आर्थिक विकासदर शून्याच्या जवळपास जाणार आहे. कोट्यवधी माणसं बेरोजगार होतील. लाखो छोट्या-मोठय़ा कंपन्या बुडतील. भांडवलशाहीवरील जगाच्या विश्वासाला तडे जात आहेत. हे आर्थिक प्रारूप टिकाऊ नव्हे टाकाऊ आहे असं अनेकांना वाटू लागलं आहे.
चाल्र्स हॅण्डी हे जागतिक मॅनेजमेंट गुरु म्हणाले - ‘मार्क्‍सवाद अपयशी ठरला, कारण त्याच्याकडे समाजाबाबत एक सुंदर स्वप्न होतं; पण तिथे पोहोचायचा रस्ता, साधनं त्यांना अवगत नव्हती. भांडवलशाहीकडे प्रभावी साधनं आहेत. पण दुर्दैवाने स्वप्नच नाही, हेतू नाही, आत्माच नाही’.
आर्थिक विकास म्हणजे काय? अंबानी-अदानींची किंवा अँमेझॉन, गुगलची संपत्ती शेकडो पटीने वाढणं व इतिहासात कधी नव्हती एवढी आर्थिक विषमता निर्माण होणं म्हणजे विकास काय? शहर धुराने व धुळीने झाकून जाणे, जंगलांचं वाळवंट होणं, शेती उजाड, गावं ओसाड होणं याला विकास म्हणायचं का? माणसं जगायला शहराकडे स्थलांतरित व्हायला मजबूर होणं आणि कोरोनाची साथ आल्यावर शहरांनी त्यांना हाकलून लावणं, त्यांनी परत गावांकडे पायी जायला निघणं व रस्त्यातच एकाकी मरून पडणं याला विकास म्हणतात काय? भांडवलशाहीमधला विकास असा असल्यास तो कशासाठी? विकासाच्या या रस्त्याने आपण ग्लोबल वार्मिंगला पोहोचतो आहोत. कोरोनाची साथ तर एक छोटी वावटळ आहे. ग्लोबल वार्मिंगचा प्रलय तर अजून भयानक व लांब काळचा राहील.
हे लक्षात आणून देण्यासाठी -  थँक यू कोरोना !

धडा दहावा :
सगळं ठप्प झालं; तरी जग बुडालं नाही;
मग कशासाठी होती ती घाई-गर्दी?

कोविडच्या साथीमुळे कारखान्यांची महाकाय चाकं थांबली. त्यांचं राक्षसी महोत्पादन थांबलं. ते विकणारे मॉल्स, दुकाने, जाहिराती सर्व थांबलं. मोटरींची घरघर थांबली. धूर थांबला. धूळ कमी झाली. दिल्लीची व बहुतेक शहरांची हवा गेल्या दहा वर्षात सर्वात शुद्ध झाली. यमुना पुन्हा स्वच्छ, निळीशार दिसायला लागली. अनेक नद्या पुनर्जीवित झाल्या. वन्यप्राणी निर्भय झाले. मोर रस्त्यावर यायला लागले. जुनागढच्या जंगलात सिंह मोकळेपणे वावरायला लागले.
शहरांतली गर्दी कमी झाली. विनाकारणची खरेदी थांबली. रोजची कुठेतरी पोहोचण्याची घाई, धावपळ शांत झाली. माणसं घरी निवांत वेळ घालवायला लागली. प्रेम करायला, छंद जोपासायला, स्वत:च्या आतमध्ये डोकावूून बघायला उसंत मिळायला लागली. कारखान्यांचा, वाहनांचा व सार्वजनिक कार्यक्रमांचा कर्कश आवाज बंद झाला. धार्मिक गर्दी थांबली. देव शांत व स्वतंत्र झाला.
संसद थांबली. त्यात रोज दिले जाणारे शिव्याशाप थांबले. सरकारी कार्यालयं बंद झाली. तिथली दिरंगाई व भ्रष्टाचार थांबला. कोर्ट व दवाखाने ओस पडले. रेल्वेची गतिमान चाकं थांबली. आणि तरी जग बुडालं नाही. म्हणजे हे सर्व विनाकारणच सुरू होतं तर ! 
हे काय घडतं आहे? 1909मध्ये, म्हणजे आजपासून एकशेअकरा वर्षांपूर्वी, ‘हिंद-स्वराज्य’ या छोटेखानी पुस्तकात मोहनदास करमचंद गांधी या दक्षिण आफ्रिकेत राहणार्‍या वकिलाने आधुनिक संस्कृतीच्या नेमक्या याच गोष्टींवर टीका केली होती. त्यावेळी आधुनिकतेच्या व पश्चिमेतील प्रगतीच्या झगझगाटाने डोळे दिपलेल्या सर्वांना गांधी आधुनिकता विरोधी वाटला होता. पण शंभर वर्षांंनी आपण तिथेच परततो आहोत का?
कोविडच्या संकटातून काय शिकलो याबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले - आम्ही स्वावलंबनाचं महत्त्व शिकलो. हा धडा अगदी योग्य आहे. कोरोनाने आम्हाला दाखवून दिलं की रोगनिदान किट्स व मास्कसाठी चीनवर अवलंबन योग्य नाही. शस्रांसाठी अमेरिकेवर अवलंबन योग्य नाही. अन्यथा ट्रम्प अहमदाबादला येतो तेव्हा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ट्रम्पच्या स्वागतासाठी लाखोंची गर्दी गोळा करावी लागते. तिथे गळाभेट केल्यावर परत जाऊन तोच ट्रम्प ‘भारताने हायड्रॉक्सी-क्लोरोक्वीन औषध अमेरिकेला पाठवलं नाही तर बघून घेऊ’ अशी उद्दाम धमकी देतो व भारत सरकारला औषध पाठवावं लागतं. हे नको असल्यास स्वावलंबन आवश्यक आहे.
या तुलनेत भारतातली खेडी फार प्रभावित झाली नाहीत. जागतिक प्रवासी कोरोनाचा विषाणू घेऊन मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, जयपूर या शहरात पोहोचले. खेड्यांमध्ये व आदिवासी पाड्यांमध्ये अजून हा संसर्ग पोहोचला नाही. ग्लोबलायझेशनपासून दूर असण्याचं संरक्षण त्यांना मिळालं. ग्रामीण भागातली शेती फार प्रभावित झाली नाही. गहू पिकायचा थांबला नाही. गाईंनी दूध देणं बंद केलं नाही. जंगलात मोहफुलं पडायची थांबली नाहीत; आदिवासी मोहफुलं वेचायचा थांबला नाही.
आजच्या वैश्विकरणाच्या जगात खेडी पूर्णपणे अप्रभावित राहतील हे अशक्य आहे. कोरोनाचा, बंदीचा व नंतर येणार्‍या मंदीचा भयानक परिणाम त्यांनाही भोगावाच लागेल. पण लॉकडाउनच्या एकूण चित्राकडे पाहिल्यावर क्षणभर वाटून जातं - हे असंच सुरू राहिलं तर काय वाईट आहे?
आपल्याला कोरोनाचा धोका नको. बंदीची गरज पडायला नको. विस्थापित मजुरांचे हाल व बेरोजगारी नको. परस्परांविषयीचा ‘याला संसर्ग तर नसेल?’ हा कायम संशय व दुरावा नको. नक्कीच नको. पण या निमित्ताने जर जगाचा ग्लोबल वार्मिंगकडे जाणारा प्रवास, विकासाच्या नावाखाली होणारा निसर्गाचा विनाश काही काळ थांबला असेल धूर, धूळ, गरमी, गरिबी, रोजची धावपळ व ताण थांबला असेल तर कोरोनाच्या निमित्ताने आपल्याला वेगळ्या जगाची व वेगळ्या जगण्याची एक झलक मिळते आहे. जणू हरवलेला स्वर्ग परत सापडतो आहे. अपुरा, फक्त काही दिवसांपुरता. पण तरी ग्लोबलायझेशन ऐवजी गांधींचं ग्रामस्वराज्य व ग्राम-स्वावलंबन अधिक व्यावहारिक आहे, वांछनीय आहे असं जाणवतं आहे. ते म्हणाले होते, ‘देअर इज इनफ ऑन धिस अर्थ फॉर एव्हरीवन्स नीड, बट नॉट फॉर ग्रीड’ हे किती खरं आहे हे लक्षात येतं आहे. ग्रेटा थुनबर्ग काय म्हणते त्याकडे गंभीरपणे लक्ष द्यायला हवं असं वाटतं आहे.
कुणास ठाऊक, आधुनिक जगातले तीन सर्वात मोठे वैश्विक प्रश्न - भांडवलशाहीचं पाप (लोभ व विषमता), पृथ्वीला आलेला ताप (ग्लोबल वार्मिंंग) व धार्मिक हिंसेचा शाप - या तिन्हींपासून सुटकेची क्षणभर झलक दिसून आपण आपला मार्ग बदलू.
 खरंच तसं झालं, तर आपण नक्कीच म्हणू - थँक यू कोरोना !
 
search.gad@gmail.com
(लेखक आरोग्य विषयाचे तज्ञ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

Web Title: What Corona taught us? - Dr. Abahy Bang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.