अभी करना क्या है बाबाजी?
By Admin | Updated: January 10, 2015 13:14 IST2015-01-10T13:14:41+5:302015-01-10T13:14:41+5:30
त्र्यंबकेश्वर : पापमुक्तीची संकटमोचक यात्रा

अभी करना क्या है बाबाजी?
>- धनंजय वाखारे
परग्रहावरून अवतरलेला आणखी एक ‘पीके’ समजा भारतभूमीवर भटकत असेल आणि (भारतात प्रकट होण्याहून) वाईट म्हणजे लग्न करून संसारतापात अडकला असेल, त्याला स्वत:लाच किंवा त्याच्या मुलाला मूल होत नसेल, तो धंद्यात पडून सारखा माती खात असेल, भांडणे आणि न संपणार्या कलागतींमध्ये अडकला असेल, तर सर्व प्रयत्न करून थकलेल्या, त्रासलेल्या या पीकेला कुणीतरी ज्योतिषी नारायण-नागबलीचा विधी एकदा करून घेण्याचा सल्ला देईलच देईल.
केवळ काही तासांच्या एका विधीने कुचंबून पडलेल्या आयुष्याला कलाटणी मिळणार असेल तर त्यासाठी पीके काहीही करायला तयार होईल. त्याकरता मग तो पै-पैशाची, विवेक-सूज्ञतेची मांडामांड करत बसणार नाही. डोक्यात प्रश्न आलेच समजा, तरी बाजूला ठेवील आणि ज्योतिषाला नेमका कळीचा प्रश्न विचारील, ‘‘अभी क्या करना है, बाबाजी?’’
पीके भारतभरात कुठेही असो, हा विधी भूतलावर महाराष्ट्र देशी नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या त्र्यंबकेश्वरीच होतो, अशी टीप मग त्याला मिळेल आणि त्याचा प्रवास सुरू होईल. उत्सुकतेपोटी पीकेने गुगलवर जायचा अवकाश, एका क्लिकसरशी अनेक गुरुजी-पुरोहितांची संकेतस्थळे त्याच्या पुढय़ात ओपन होतील आणि माहितीबरोबरच ऑप्शनही देऊ लागतील. तीन दिवसांच्या विधीसाठी कुणी नातेवाइकांसह निवास-भोजनाचे पॅकेज ऑफर करेल, तर कुणी आम्ही किती शास्त्रशुद्ध पद्धतीने विधी पार पाडतो, याविषयी काही मान्यवरांच्या पत्रांचे पुरावेच देईल.
एका होमपेजवर जाऊन पीके पुरोहितांशी संपर्क करील. मुहूर्ताची तिथी निश्चित करून घेईल. त्याच फोन किंवा ईमेलवर त्याला येताना सोबत काय काय आणायचे याची यादी मिळेल- सफेद कपडे, गमछा, पत्नीसाठी साडी, ब्लाऊज (त्यातही काळा आणि हिरवा रंग नको). राहण्या-भोजनाची सोय पुरोहितांच्याच घरी होणार, हे एक बरेच.
नाशिकजवळच्या त्र्यंबकेश्वरी जायचे म्हटल्यावर त्याआधी किंवा नंतर जवळपासचे देवदर्शनही करायचे ठरेल. त्याप्रमाणे तिकिटे, राहण्या-प्रवासाची व्यवस्था. काही पॅकेजे म्हणतील, काळजी करू नका. नाशिक, शिर्डी, शनि-शिंगणापूर हे सारेच आम्ही जमवून देऊ. खिसापाकीट असेल तशी सोय. धर्मशाळांपासून पंचतारांकित सोयींपर्यंत आणि साध्या रिक्षापासून विमानाच्या कन्फर्म तिकिटांपर्यंत!
- सगळे नीट ठरेल आणि सल्ला देणार्या ज्योतिषाची चिठ्ठी सोबतीला घेऊन पीकेची सहकुटुंब यात्रा सुरू होईल.
रेल्वेच्या प्रवासाने आंबून गेलेला ‘पीके’ नाशिकरोड स्थानकावर उतरेल, त्या क्षणापासून तो एका मोठय़ा उद्योगाचा ग्राहक असेल.
शांतता, समाधान आणि संकटमुक्तीसाठी आसुसलेल्या, पितरांच्या आत्म्यांना शांती देऊ पाहणार्या, सारे प्रयत्न थकल्यावर कर्मकांडाच्या पर्यायाकडे वळलेल्या, हातून घडत असलेल्या नको त्या व्यवहारांमुळे मनात वस्तीला येणार्या अपराधभावनेतून सरसकट मुक्ती मिळवण्याचा शॉर्टकट शोधणार्या. अशा हरतर्हेच्या माणसांना काही हजार रुपयांत मन:शांती विकण्याच्या एका संघटित उद्योगाचा ग्राहक !
- या ‘पीके’च्या खिशात मजबूत पैसे असतील, तर त्याला देवाच्या दारी जाताना पाय झिजवण्याची गरज पडणार नाही.
त्याने विकत घेतलेल्या पॅकेजची सगळी व्यवस्था पाहणारा कुणी एजंट एखादी वातानुकूलित गाडी घेऊन त्याला नाशिकरोड रेल्वेस्थानकावर, (पीके फारच पैसेवाला असेल तर) मुंबईच्या विमानतळावरदेखील हजर असेल.
तो ‘पीके’ला सहकुटुंब रिसिव्ह करील आणि हे सारे मिळून निघतील त्र्यंबकेश्वरच्या दिशेने.
पापमुक्तीसाठी! संकटमोचनासाठी!!