‘जिहाद’च्या वाटेवर.

By Admin | Updated: August 29, 2015 15:15 IST2015-08-29T15:15:07+5:302015-08-29T15:15:07+5:30

‘इसिस’च्या नावाचा वापर करून महिनाभरात 12 लाख ट्विट झाले. दिवसाला सुमारे 40 हजार ट्विट लाखभर ट्विटर अकाउंट्स इसिसशी संबंधित आहेत. जगभरातली तरुण मुलं या संघटनेत सामील होताहेत. भारतही त्यात मागे नाही. काय आहे ‘इसिस’ची मोडस ऑपरेंडी? तरुणांना तिचं एवढं आकर्षण का?

On the way to 'Jihad'. | ‘जिहाद’च्या वाटेवर.

‘जिहाद’च्या वाटेवर.

- पवन देशपांडे
 
कसं सांगू?.
माझी मलाच लाज वाटतेय. त्यांनी माङयावर इतके अत्याचार केलेत. मनाच्या, भावनांच्या आणि शरीराच्या तर अनंत चिंधडय़ा झाल्यात. जिवंत आहे एवढंच.. 
ती खोली म्हणजे नरकच.. तिथं त्यांच्या ताब्यातल्या असंख्य तरुणींवर, महिलांवर आळीपाळीनं दररोज असह्य अत्याचार होतात. रोज वेगवेगळं मरण. विरोध केला की मरेस्तोवर मार. या सगळ्या आठवणी घेऊन मी जिवंत राहावं का असा प्रश्न हरघडी पडतो.’’
इराकमधील 17 वर्षीय या याझिदी तरुणीची थरकाप उडवणारी ही आपबिती.
तिला इंग्लिश बोलता येतं याचा फायदा घेत इसिसच्या दहशतवाद्यांनी तिला माध्यमांशी बोलायची (जगभरात आपली दहशत पसरवण्यासाठी) परवानगी दिली होती. सप्टेंबर महिन्यात या तरुणीची कहाणी जगासमोर आली आणि इसिसच्या सैतानांचे मनसुबे स्पष्ट झाले. 
जग जिंकायचं आणि सारी पृथ्वी तथाकथित ‘इस्मालिक स्टेट’ बनवायची अशा मनसुब्यांनी निष्पाप जिवांच्या रक्ताचा सडा टाकत सुटलेली इसिस ही दहशतवादी संघटना दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. कुर्दीश संघटनेच्या मते इसिसकडे सुमारे दोन लाखांहून अधिक ‘जिहादी’ तरुणांची फौज आहे. त्यात दिवसेंदिवस भरही पडतेय. 
आपसूकच आपल्याला प्रश्न पडतात.. 
का भरती होत असेल तरुण रक्त या सैतानी फौजेत? का भुलत असेल या सैतानी प्रवृत्तीच्या थापांना? अशा कोणत्या जबरदस्त ओढीनं तरुण इसिसकडे खेचले जातात? एवढं काय ‘ब्रेनस्टॉर्मिग’ केलं जात असेल? इसिस या दहशतवादी संघटनेसोबत जोडला असलेला ‘धर्म’ मुळात कायम विश्वशांतीचा संदेश असताना का ही असुरी वृत्ती वाढतेय? 
आता तर भारतातील तरुणांनाही भुलवून, त्यांची माथी भडकवून इसिसमध्ये सामील करून घेण्याची मोहीम जोरात सुरू आहे. एखाद्या तरुणाला या दहशतवादी संघटनेची भुरळ पडली आणि तो लगेच त्यात सामील झाला असंही होत नाही. कारण त्याची प्रक्रियाही मोठी आहे. 
यासंदर्भात काही धर्मगुरू आणि मदरशांमध्ये शिकवणा:यांशी चर्चा केली. त्यांच्या प्रतिक्रिया डोळ्यांत अंजन घालणा:या आहेत.
तरुणांना धर्माच्या नावाखाली भुलवलं जातंय. त्यांना ‘जिहाद’ या शब्दाचा चुकीचा अर्थ सांगितला जातोय. ‘जिहाद’चा मूळ शब्द आहे ‘जहद’. ‘जहद’ म्हणजे संघर्ष. ‘जिहाद’ म्हणजे संघर्ष करणो. स्वत:च्या विचारांशी संघर्ष करणो. यात कुठेही निष्पापांचा बळी घेणो, कोणत्याही व्यक्तीचा खून करावा असं म्हटलेलं नाही. ‘जिहाद’ म्हणजे स्वत:च्या आत असलेल्या अवगुणांशी सुरू असलेला संघर्ष. ज्या जिहादच्या नावाखाली तरुणांना भुलवलं जातंय त्या ‘जिहाद’चा अर्थ दहशतवाद्यांनी त्यांच्या पद्धतीनं घेतलाय आणि त्याच चुकीच्या अर्थानं ते तरुणांना दहशतवादी बनवत सुटलेत, असं सांगताना अजमेर शहा दग्र्याचे सय्यद आझम चिश्ती यांच्या चेह:यावर चिंता आणि राग यांचं मिश्रण स्पष्ट जाणवत होतं.
मजहब नहीं सिखाता.. असं एका देशभक्तीपर गाण्यात म्हटलंय ते त्यामुळेच. कोणताही धर्म इतरांची हत्त्या करा असं शिकवत नाही. संपूर्ण जगच इस्लामिक स्टेट बनवायचा इसिसचा मनसुबा आहे. त्यासाठी त्यांनी केवळ इतर धर्मीयांच्या नव्हे, तर मुस्लिमांच्याही कत्तली करणं चालवलंय. हा कोणता ‘इस्लाम’? ज्यांना इस्लामचा खरा अर्थच कळला नाही, ते संपूर्ण जगच ‘इस्लामिक’ बनविण्याचं स्वप्न पाहत आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 
सर्वसामान्य तरुणांच्या मनात विष कालवण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं जातंय. तरुणांचं रक्त सळसळत असतं. विचारांची बैठक पक्की होण्याआधीच त्यांची माथी भडकवायची. त्यांच्यात एक प्रकारची भीती निर्माण करायची. आयुष्याचा चुकीचा मार्ग दाखवायचा आणि दहशतवादी कारवायांमध्ये सामील करून घ्यायचं. हीच इसिसची रणनीती. यासाठी ट्विटरचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो आहे. इसिस या नावाचा वापर करून गेल्या महिनाभरात झालेल्या ट्विटची संख्या आहे 11 लाख 85 हजार. म्हणजे दिवसाला जवळपास 40 हजार ट्विट. यावरूनच इसिसचा टि¦टरवरून सुरू असलेला प्रसार लक्षात येऊ शकतो. अमेरिकेतील ब्रोकिंग्ज इन्स्टिटय़ूटच्या अहवालानुसार तब्बल 90 हजार टि¦टर अकाउंट्स इसिसशी संबंधित आहेत किंवा त्यांना फॉलो करणारे आहेत. म्हणजे इसिसची ऑनलाइन फळीही मोठी आहे. यात 70 टक्के अकाउंट इंग्रजीतून हँडल केले जातात. म्हणजे शिकलेले तरुण/तरुणी या संघटनेच्या आमिषांना आणि भूलथापांना बळी पडले आहेत. हीच फळी आणखी तरुणांना इसिसमध्ये सामील करून घेण्यासाठी सोशल मीडियावर सातत्याने तरुणांच्या संपर्कात असतात, त्यांचे विचार बदलण्याचा प्रयत्न करत असतात. 
आता अशा टि¦टर अकाउंट्सवर सा:या जगातील सुरक्षा यंत्रणांची नजर आहे आणि त्यातून मिळणारे मेसेजेस आणि कोणाला बळी पाडलं जातंय, यासंबंधी वेळोवेळी माहिती गोळा केली जात आहे. गेल्यावर्षीच बंगळुरूमधून मेहदी मसरूर बिस्वास नावाच्या टि¦टर हँडलरला ताब्यात घेण्यात आलं होतं. तो शमीविटनेस नावानं टि¦टरवर अकाउंट हँडल करायचा आणि तरुणांना इसिसमध्ये सामील होण्यासाठी मदत करायचा. त्यांची माथी भडकवायचा. टि¦टरवर दोन वर्षात त्याचे 18 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते आणि तो इसिसचा भारतातला प्रमुख रिक्रुटर होता.  
तुमचं, तुमच्या कुटुंबाचं आयुष्य ऐशोआरामात जावं, त्यासाठी तुम्हाला पैसा लागेल आणि तो पैसा आम्ही पुरवू, अशा थापा या दहशतवादी संघटना मारतात. बेरोजगार राहून उपाशीपोटी दारोदार भटकण्यापेक्षा अशा संघटनेत सामील झालं तर निदान आयुष्याची तर ददात मिटेल, अशा विचारांनीही तरुण मुलं दहशतवादाकडे वळतात. 
इसिसमध्ये सामील झाल्यावर काडीचा खर्च करावा लागत नाही. त्यांना इराक आणि सीरियामध्ये पोहोचवण्याचा आणि तिथे राहायचाही खर्च हीच संघटना करते. मग आधीच सिमी, इंडियन मुजाहिद्दीन यांच्यासारख्या संघटनांशी संपर्कात आलेले काही तरुण इसिसकडे वळतात. इसिसच्या मार्गावर असलेल्या चार भारतीय तरुणांनी सांगितलेली कहाणीही अशीच आहे. त्यांना ब्रिटनमधून कुणीतरी हजारो रुपये पाठवले. नंतर पुन्हा लाखभर रुपये पाठवले गेले. त्यांच्यासाठी इसिसर्पयत पोहोचण्याचा मार्गही तयार झाला होता. पण त्यांचे मनसुबे पोलिसांनी उधळून लावले. गेल्या वर्षभरात तेलंगणामधून 17 जणांचं मनपरिवर्तन करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
सध्याच्या परिस्थितीत 25 हून अधिक भारतीय तरुण इसिसच्या मार्गावर आहेत, अशी गुप्तचरांची माहिती आहे. काश्मीरमध्ये इसिसचे ङोंडे फडकण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. हे तरुण खुलेआम इसिसचा स्वीकार करताना दिसत आहेत. अशा बंडखोर वृत्तीच्या तरुणांना शोधून, त्यांचं मतपरिवर्तन करून त्यांना इसिसमध्ये जाण्यापासून रोखण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. पण सरकार म्हणून, समाज म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे. प्रत्येकाला सलोख्याची वागणूक देणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. देशात बेरोजगारी वाढली नाही, तरुणांना ‘इनसिक्युअर’ वाटलं नाही तर दहशतवादाकडे वळू पाहणारी किमान निम्म्यापेक्षा जास्त पावलं आहे तिथेच थांबतील.
 
टि¦टरचं हत्यार
 
फेसबुक आणि यूटय़ुबपेक्षाही इसिसचा कल टि¦टरवर अधिक आहे. कारण टि¦टरवरील त्यांच्या अकाउंटमध्ये फारसं कोणी फेरफार करू शकत नाही. तसेच फेसबुकसारखं त्यावर कोणी कमेंट अथवा लाइक करू शकत नाही. 
 
‘नो टू इसिस’
 
इसिसविरोधात टि¦टर आणि इन्स्टाग्रामवरही मोठी मोहीम उघडण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही मोहीम सुरू करण्यात मुस्लीम बांधव आघाडीवर आहेत. त्यांनी ‘नो टू इसिस’ आणि ‘ब्रिंगबॅक अवर’ अशा टॅगने विरोध दर्शविणोही सुरू केले आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
 
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत 
मुख्य उपसंपादक आहेत.)
pavan.deshpande@lokmat.com
 

 

Web Title: On the way to 'Jihad'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.