पहारेकरी आणि पहारकरी

By Admin | Updated: October 4, 2014 19:34 IST2014-10-04T19:34:05+5:302014-10-04T19:34:05+5:30

परिस्थितीची साथ नसते, मित्रमंडळी त्रास देत असतात, कष्टांचा काही उपयोग होत नाही, हात लावीन तिथे अपयशच पाठलाग करते, असे सगळे प्रतिकूल असतानाही काही माणसे आपला प्रामाणिकपणा सोडत नाहीत, तत्त्वांना चिकटून राहतात. अशाच एका वारकर्‍याच्या मुलाची गोष्ट..

Watcher and Watcher | पहारेकरी आणि पहारकरी

पहारेकरी आणि पहारकरी

प्रा. डॉ. द. ता. भोसले 

 
सन १९७२मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात ग्रामीण भागातील चांगली शेती-भाती असलेल्या शेतकर्‍यांचीही पार वाताहत झाली. खडी फोडण्यासारख्या दुष्काळी कामावर काम करून त्यांनी कसे तरी दिवस ढकलले. चांगल्या शेतकर्‍याची अशी अवस्था झाली म्हटल्यावर एक-दीड एकर कोरडवाहू शेत असणार्‍या आणि जन्मल्यापासून कर्ज आणि दारिद्रय़ाचेच वरदान मिळालेल्या गरीब शेतकर्‍यावर केवढे अरिष्ट कोसळले असेल? अशा या अरिष्टाला तोंड देण्यासाठी काहींनी गाव सोडून शहराचा आसरा घेतला. जगण्यासाठी मिळेल ते काम करू लागले. जत तालुक्यातील कुठल्याशा छोट्या गावातला एक विठोबाचा माळकरी मी नोकरी करीत असलेल्या जिल्ह्याच्या ठिकाणी विसावला. आधी मजूर म्हणून त्यानं काम केलं. त्याची सचोटी, कामावरील निष्ठा आणि विनम्र स्वभाव यांमुळे आमच्या शहरातल्या एका दुसर्‍या महाविद्यालयात त्याला वॉचमन म्हणून नोकरी मिळाली. दिवसभर पडेल ते काम तो करायचाच; पण रात्री वॉचमन म्हणून डोळ्यांत तेल घालून पहारा करायचा.
महाविद्यालयाच्या परीक्षेची धामधूम सुरू असतानाच तो आजारी पडला. थंडी-तापाने तो आडवा पडला. परीक्षेसारख्या महत्त्वाच्या वेळेला आपण आजारी पडल्याचे त्याला खूप वाईट वाटले. त्यानं एका शिपायाजवळ निरोप पाठवून विनंती केली, की आपणाला बरे वाटेपर्यंत माझा मुलगा वॉचमन म्हणून काम करेल. तोही व्यवस्थित पहारा  करेल. त्याप्रमाणे त्याचा सदानंद नावाचा थोरला मुलगा कामावर हजर झाला. हा सदानंदही कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाला शिकत होता. त्याच्या परीक्षेला अजून थोडा अवधी होता. दिवसभर तो आपल्या परीक्षेची तयारी करायचा आणि  रात्रभर प्रामाणिकपणे पहारा करायचा. झोप अनावर झाली, तरी न झोपता कसले तरी गाणे म्हणत परिसरात फिरायचा.
परीक्षा सुरू होऊन दोन-तीन दिवस झाले असतानाच त्याला एका विलक्षण प्रसंगाला सामोरे जावे लागले. रात्रीचे दहा वाजले असावेत. अचानक एक जीपगाडी कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभी राहिली. सदानंद दाराजवळच्या पायरीवरच बसला होता. तो सतर्क होऊन खाली आला. गाडीतून दोन-तीन प्राध्यापक आणि दोन व्यापारी उतरले. त्याच्या जवळ गेले. हे प्राध्यापक त्याच कॉलेजचे असल्याने त्याने ओळखले. एक जण म्हणाला, ‘‘सदानंद, आपल्या विद्यापीठाने परीक्षेचे व्यवस्थापक म्हणून आम्हाला नेमलेले आहे. उद्या आहे इंग्रजीचा पेपर. या पेपरला नेहमीचे आणि नापास झालेले खूप विद्यार्थी बसणार. त्याची सारी पूर्वतयारी करायला उद्या वेळ कमी पडेल म्हणून आम्ही आता ती करण्यासाठी आलो आहोत. तू आम्हाला दार उघडून दे. परीक्षेचे पेपर्स आणि प्रश्नपत्रिका ठेवलेली खोली उघडून दे. प्रश्नपत्रिका ज्या कपाटात ठेवल्या आहेत, त्याची किल्ली आणलेली आहे.’’ असे म्हणून त्या प्राध्यापकाने कुठली तरी किल्ली त्याला दाखवली. सदानंदचा यावर विश्‍वास बसेना. तो काही बोलेना. काही हालचाल करीना. नुसता विचार करीत थांबला असताना दुसर्‍या दोन्ही प्राध्यापकांनीही तीच कामाची गरज सांगितली. त्यावर सदानंद म्हणाला, ‘‘सर, मला तर हे काही योग्य वाटत नाही. उद्या सकाळी वेळेत काम होण्यासाठी तुम्ही आणखी चार प्राध्यापकांना मदतीला घेऊ शकता. फार तर पाच-दहा मिनिटं उशिरा परीक्षा सुरू करू शकता. मला ड्युटी म्हणून दिलेल्या या कामात हे बसत नाही. मला कुलपं काढायला सांगू नका.’’ त्याचं हे उत्तर ऐकताच सर्व चकित झाले. हा सरळ आपणाला उपदेश करतो, याचा राग येऊन एक प्राध्यापक म्हणाले, ‘‘हे बघ, हे कॉलेजचं काम आहे. तू कॉलेजचा नोकर आहेस. उद्या परीक्षेत बोंबाबोंब झाली, तर तुला जबाबदार धरले जाईल. नोकरीवरून काढून टाकले जाईल. आम्हाला विरोध केला म्हणून उद्या प्राचार्यांकडेच तुझ्याविरुद्ध लेखी तक्रार करू. ते तुला महागात पडेल, ध्यानात ठेव.’’ तरीही सदानंद नम्रपणे म्हणाला, ‘‘सर, या कॉलेजची व परीक्षेची सारी जबाबदारी प्राचार्यांची. त्यांचं लेखीपत्र आणल्याशिवाय मी दरवाजाला हात लावू देणार नाही. कॉलेजने मला उद्या शिक्षा म्हणून काढून टाकले तरी चालेल.’’
या मंडळींनी बराच वेळ हुज्जत घातली. नंतर वादावादी झाली. एकाने आणखी दम दिला. चार शिव्याही घातल्या. दुसर्‍याने त्याच्या खिशातल्या किल्ल्या घेण्याचा प्रयत्न केला. त्याने किल्ल्या मुठीत गच्च धरून ठेवल्या. नंतर थोडी फार ढकला-ढकली झाली. अशाने अधिकच गुंतागुंत होईल आणि उद्या चर्चाही होईल, असे वाटून एका व्यापार्‍याने प्राध्यापकांना शांत केले. सदानंदच्या पाठीवर थोपटत खिशातून नोटांचे एक बंडल काढलं. त्याच्या समोर धरलं. ‘‘घे. तुला स्वखुशीनं बक्षीस म्हणून देतोय. हवे तर आणखी एखादं बंडल देतो. तीनदा नापास झालेली आमची पोरं तुझ्याशिवाय पास होणार नाहीत. तुझी ही मदत आम्ही कधीच विसरणार नाही, हेही तुला सांगतो.’’ अतिशय आर्जवी शब्दांत त्यांनी आपली अगतिकता सांगितली. सदानंदला जो संशय वाटत होता, तो आता खरा ठरला होता. तो हात जोडून म्हणाला, ‘‘साहेब, माझा बाप विठोबाचा माळकरी आहे. माझ्याही गळ्यात माळ आहे. आम्ही गरीब असलो, तरी या माळेला कधी दगा देणार नाही. दगा दिलेला नाही. मला तुमचा एक रुपयादेखील घ्यायचा हक्क नाही. आम्ही करीत असलेल्या या नोकरीचा आम्हाला पगार मिळतोच ना? आणि पगाराचा पैसा कमीच पडला, तर कुठंही मजुरीनं चार कामं करू. सायेब, तुमच्या या बक्षिसीबद्दल मी आभार मानतो.’’ असे म्हणून तो त्यांच्यापासून झपाझपा दूर जायला निघाला. जमून आलेला आपला बेत फिसकटतोय, हे लक्षात येताच या तिघा प्राध्यापकांनी त्याला घेरला आणि निर्दयपणे बेदम मारायला सुरुवात केली. त्याचं तोंड फुटलं. ओठातून रक्त गळू लागलं. खांद्यावरचा शर्ट फाटला. गाल सुजून लाल झाला; पण त्यानं किल्ल्यांची मूठ सोडली नाही. त्याला खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी एखाद्या निर्दय गुन्हेगाराला मारावे तसे मारले. शेवटी तो बेशुद्ध पडला. तरीही त्याला फरफटत ओढून बाहेर रस्त्यावर फेकला आणि खिशातल्या किल्ल्या घेऊन ते दरवाजाकडे धावले. त्यांना आता उशीर करून चालणार नव्हता. इंग्रजीची प्रश्नपत्रिका घेऊन त्यांना ताबडतोब पळून जायचे होते.
काही वेळानं सदानंद शुद्धीवर आला. वेदनेने अंग ठणकत होतं. शरीरात त्राण उरले नव्हते. पायांनाही किरकोळ लागले होते. ओठातलं रक्त खाली गळ्यावर पसरले होते. कसाबसा तो उठला. शेजारच्या नळावर जाऊन ढसाढसा पाणी ढोसले आणि चेचलेल्या सार्‍या देहाचं ओझं घेऊनच त्याने पोलीस स्टेशन गाठले. तिथल्या अधिकार्‍याला सारा प्रकार सांगितला आणि विनंती करून त्यांच्याच व्हॅनमधून तो प्राचार्यांच्या घरी गेला. प्राचार्यांना उठविले. सारा प्रकार त्यांना सांगितला आणि त्याच वाहनात बसून प्राचार्यांसह सारेच कॉलेजवर आले. पोलिसांनी आपले काम यशस्वीपणे पार पाडले. प्राचार्यांनी सदानंदला धन्यवाद दिले. पोलिसांनी कौतुक केले. हा सदानंद आता त्याच कॉलेजमध्ये नोकरी करतो आहे. 
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व 
नवृत्त प्राचार्य आहेत.)

Web Title: Watcher and Watcher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.