विनोद 'बहाद्दूर'

By Admin | Updated: December 6, 2014 17:55 IST2014-12-06T17:55:22+5:302014-12-06T17:55:22+5:30

चित्रपट सृष्टीतल्या बदललेल्या वातावरणाशी आपलं जमणार नाही, हे जेव्हा लक्षात आलं, तेव्हा योग्य वेळी त्यांनी चित्रपट सृष्टीतील आपली इनिंग सन्मानानं खेळून त्यांनी स्वेच्छानवृत्ती घेतली. पुन्हा १९९३मध्ये ते पुण्याला सामान्य जीवन व्यतीत करण्यास परतले. आपल्या स्वीकारलेल्या तत्त्वांशी तडजोड न करणार्‍या ह्या विनोदवीरास सलाम.

Vinod 'Bahadur' | विनोद 'बहाद्दूर'

विनोद 'बहाद्दूर'

- कृपाशंकर शर्मा

 
उच्च प्रतीचा नर्म विनोद’, ‘कुटुंबवत्सल विनोद’ या श्रेणीत आपलं आगळंवेगळं स्थान निर्माण करणारे ‘देवेन वर्मा’ हे खरोखरच एक वेगळं रसायन होतं. हिंदी चित्रपटातील विनोदाची बैठकच देवेननं स्वत:हून स्वीकारलेल्या तत्त्वनिष्ठ भूमिकेद्वारा बदलली. म्हणूनच चित्रपटसृष्टीत ते स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करू शकले. हे आपल्यापर्यंत नीट पोहोचलेलं नाही.
बी. आर. चोप्रा यांच्या १९६१च्या ‘धर्मपुत्र’मध्ये त्यांनी शशी कपूरच्या भावाची छोटीशी भूमिका प्रथम केली. त्यानंतर बी. आर. चोप्रा यांच्याच १९६३मधील ‘गुमराह’ चित्रपटात भोजपुरी व्यक्तीच्या भूमिकेद्वारा त्यांचे चित्रपटसृष्टीत खर्‍या अर्थानं पदार्पण झाले.  ‘गुमराह’च्या दखलपात्र यशानंतर त्यांना सर्व थरांतून भूमिकांची मागणी येऊ लागली. मद्रासच्या ए. व्ही. एम. संस्थेने त्यांना तीन वर्षांसाठी करारबद्ध केलं; परंतु मद्रासमध्ये त्यांचं मन रमलं नाही व ते मुंबईला परतले.
खरं तर चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच देवेननं अगोदरच मनात पक्कं केलं होतं, की विनोदासाठी कधीही अचकट विचकट चाळे करायचे नाहीत. लुळा, पांगळा, आंधळा, बहिरा अशा व्यंगांवर कधीही विनोद करायचे नाहीत. व्यंगांची चेष्टा करायची नाही. अशा अभागी व्यक्तींच्या व्यंगांची क्रूर चेष्टा करून आपण पैसे कमवायचे नाहीत. याशिवाय साडी नेसून तृतीयपंथी विनोद तर बापजन्मात करावयाचा नाही, अशी तर त्यांनी भीष्मप्रतिज्ञाच केली होती.
ओंगळ विनोदाने भरलेले चित्रपट त्यांनी सरळ सरळ नाकारले. मनाविरुद्धचा कोणताही चित्रपट त्यांनी स्वीकारला नाही. चित्रपटात निखळ विनोद असावा, असा देवेनचा प्रयत्न असे. विनोदाची खरी गंमत अथवा लज्जत ही त्याच्या खुशखुशीत संवादात असते. गमतीदार घटना तितक्याच हलक्या फुलक्या विनोदी संवादात सांगितली गेली, तरच प्रेक्षकांना तो विनोद भावतो आणि त्याच बरोबरीने तो विनोदी कलाकारही भावतो. याच त्यांच्या आंतरिक तात्त्विक भूमिकेतून ते काम करीत राहिले. त्यामुळे त्यांच्या कॉमेडीला ‘ड्रॉइंग रूम कॉमेडी’ म्हटलं गेलं. त्यांचा विनोद हा कुटुंबवत्सल विनोद म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत मान्यता पावला.
देवेन वर्मा हे मूळचे कच्छी, कच्छी राजपूत. देवेनचा जन्म २३ ऑक्टोबर १९३७ रोजी मुंबईत झाला. वडील ‘बलदेवसिंग’ यांना संगीताची आवड होती. मुंबईत स्थायिक होण्यासाठी त्यांनी संगीत विद्यालय सुरू केलं आणि शेअर्समध्येही पैसे गुंतवले. शेअर्समध्ये गुंतवलेले सारे पैसे बुडाले; परंतु संगीत विद्यालयाने हात दिला. १९४५मध्ये मुंबईत जातीय दंगली वारंवार होऊ लागल्यामुळे कंटाळून बलदेवसिंगांनी मुंबईला रामराम ठोकला आणि ते सहकुटुंब कायमच्या वास्तव्यासाठी पेशव्यांच्या पुण्यात स्थलांतरित झाले.
देवेनचं शालेय शिक्षण पुण्यात झालं. या शिक्षणकाळात त्यांना नकला करण्याची आवड होती. पुढे पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये शिकत असताना प्राध्यापक भालबा केळकरांच्या अभिनयाचा आणि दिग्दर्शनाचा देवेनवर खूप प्रभाव पडला, तसेच ‘दामुअण्णा मालवणकर’ आणि ‘राजा गोसावी’ या विनोदी कलाकारांचाही त्यांच्यावर खूप प्रभाव पडला, असं त्यांनी खास नोंदवून ठेवलंय.
‘मालिका’ नावाच्या एका दक्षिणात्य चित्रपटाचे दिग्दर्शक होते ए. भीमसिंग.  देवेनला त्यात भूमिका देण्यात आली होती. दाक्षिणात्यांच्या चित्रपटातील विनोदाबद्दलच्या कल्पना ओंगळ आणि बालीश होत्या. त्या पद्धतीनं देवेननं काम करावं, अशी त्यांची अपेक्षा होती; परंतु देवेननं स्पष्ट नकार दिला आणि म्हणाले, ‘असल्या विनोदासाठी मोहन चोटी, जगदीप, जॉनी व्हिस्की यांना घ्या. मी हा चित्रपट सोडतो आहे.’ तेव्हा निर्माता वासू मेमन यांनी देवेन यांना त्यांच्याच पद्धतीने भूमिका करू द्यावी, असा निर्णय घेतला. १९७५मध्ये दिग्दर्शक ब्रीज यांच्या ‘चोरी मेरा काम’ या चित्रपटात देवेन वर्मा यांनी साकार केलेल्या ‘प्रवीणभाई’ या व्यक्तिरेखेने त्यांना उत्कृष्ट विनोदी अभिनेत्यासाठीचा फिल्मफेअरचा पुरस्कार मिळवून दिला. त्या भूमिकेमागची कथाही अशीच रंजक आहे. ब्रीज यांनी देवेनला प्रथम यात भितट्र पंजाबी व्यक्तीची भूमिका करण्यासाठी पाचारण केलं होतं. तेव्हा देवेननं ब्रीज यांना सांगितलं, ‘पंजाबी माणूस कधीही कुणाला घाबरणार नाही. उलट, त्याच्याकडे पैसे मागायला आलेल्या माणसाला तो चांगलाच ठोकून काढेल. पंजाबी माणसाला कुणीही ब्लॅकमेल करू शकणार नाही, तेव्हा या ठिकाणी आपण गुजराथी माणूस दाखवू या. गुजराथी माणूस जन्मत: थोडा घाबरट असतो. त्याला दमदाटी देऊन पैसे काढता येतात.’ ब्रीज यांना देवेन यांनी सुचवलेली कल्पना पटली.
देवेनने ‘चोरी मेरा काम’मध्ये प्रवीणभाई व्यक्तिरेखा साकार केली. गुजराथी माणूस जातिवंत बनिया असतो. त्यामुळे चित्रपटात नायकाने शंभर रुपये मागितले, की घाबरून ‘प्रवीणभाई, मै सौ रुपया नहीं दुंगा’, असं म्हणून त्यातून एक रुपया वाचवतो. अशा प्रकारची त्यातील चिकट वृत्ती आणि बनियागिरी पाहून प्रेक्षकांमध्ये हास्याचा धबधबा निर्माण होत असे.
‘चोरी मेरा काम’मधील पुरस्कारप्राप्त भूमिकेनंतर देवेन यांना वेगवेगळ्या समाजातील व्यक्तिरेखा साकार करण्याची संधी मिळाली. अशाच प्रकारची एका पारशी तरुणाची व्यक्तिरेखा रंगविण्याची संधी त्यांना ‘खट्टामिठा’ चित्रपटात मिळाली. यातील पारशी रंगवताना नाकातून उच्चार काढीत ‘मम्मीऽऽऽ’ असं म्हणत त्यांनी वेगळा पारशी उभा केला. ही भूमिकाही प्रेक्षकांना खूप आवडली. यानंतर देवेन वर्मा यांना अजरामर करणारी दुहेरी भूमिका गुलजार यांच्या ‘अंगूर’ चित्रपटात मिळाली. या भूमिकेचं त्यांनी खरोखर सोनं केलंय. या चित्रपटात देवेनच्या दोन्ही भूमिकांचं नाव होतं ‘बहाद्दूर’. एका बहाद्दूरचं लग्न झालेलं होतं, तर दुसरा अविवाहित होता. या दोन्ही भूमिका सारख्याच करायच्या. त्यामध्ये फारसा फरक करायचा नाही, असं गुलजार यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं. देवेननं दोन्ही भूमिका नीट समजावून घेतल्या, त्यांचा अभ्यास केला. तेव्हा त्यातील एक ‘बहाद्दूर’ उभा करताना त्याला ‘लेट टायमिंग’ची छटा दिली. या चित्रपटात अनेक प्रसंगनिष्ठ विनोदाची कारंजी उडतात. उच्च प्रतीच्या नर्म विनोदाने हा चित्रपट पूर्णपणे नटलेला आहे. प्रेक्षकांनी ‘अंगूर’चं जोरदार स्वागत केलं.
यश चोप्रांच्या बरोबर देवेनची खूप जवळीक होती. म्हणून देवेननं ‘दिल तो पागल है’मध्ये भूमिका स्वीकारली होती. प्रथम ती भूमिका ‘अनुपम खेर’ यांना ऑफर झाली होती; परंतु त्यात दम नाही, असं म्हणून त्यांनी ती नाकारली होती. देवेनने त्या भूमिकेत आपल्या पद्धतीने गहिरे रंग भरले. त्या भूमिकेवर खूश होऊन आदित्य चोप्रानं देवेनच्या पायाला स्पर्श केला. जवळच उभे असलेल्या यश चोप्रा यांनी देवेनच्या पाठीवर थाप मारली आणि आदित्यला म्हणाले, ‘जेव्हा भूमिकेत काहीच नसतं, तेव्हाच देवेन त्यात जान आणतो, हे तू लक्षात ठेव. देवेनला तू साधा कॉमेडियन समजू नकोस. तो एक बुद्धिमान कॉमेडियन आहे.’
‘देवर’, ‘अनुपमा’, ‘बुढ्ढा मिल गया’, ‘गोलमाल’, ‘मेरे अपने’ हे देवेन वर्मा यांचे ‘चोरी मेरा काम’, ‘खट्टामिठा’, ‘अंगूर’, ‘गुमराह’ यांव्यतिरिक्त अन्य उल्लेखनीय चित्रपट होत. त्यांनी आजवर १११ हिंदी चित्रपटांतून काम केलंय. ‘फरारी’, ‘हा खेळ सावल्यांचा’ आणि ‘दोस्त असावा तर असा’ या तीन मराठी चित्रपटांत काम केलंय. याशिवाय एक गुजराती आणि एक भोजपुरी चित्रपटही केला होता.
अभिनय करण्याव्यतिरिक्त चित्रपट निर्मितीचाही अनुभव त्यांनी चाखला होता. आपल्या नवरत्न फिल्म्सतर्फे त्यांनी ‘यकीन’, ‘नादान’, ‘बडा कबुतर’, ‘बेशरम’, ‘यास्मीन’, ‘दाना-पानी’ आणि ‘हाऊस नंबर १३’ असे आठ चित्रपट निर्माण केले. पैकी ‘यकीन’ आणि ‘बेशरम’ हे दोन चित्रपट पंधरा- पंधरा आठवडे चालले. अमिताभ बच्चन सुरुवातीच्या काळात फ्लॉप असताना देवेन यांनी त्यांना ‘बेशरम’मध्ये प्रमुख भूमिका दिली होती. ही गोष्ट अमिताभ विसरले नाहीत. देवेन यांनी ‘अमिताभ लंबी रेस का घोडा है,’ असं भाकीतही केलं होतं. चित्रपट निर्मिती पोरखेळ नाही, याचा त्यांना पुरेपूर अनुभव आला आणि फार आर्थिक नुकसान होण्याआधीच स्वत:ला सावरलं. पुढे हृषीकेश मुखर्जी, गुलजार, बासू चटर्जी यांसारख्या दिग्गजांबरोबर काम केलेल्या या विनोदी अभिनेत्याला चित्रपट सृष्टीतल्या बदललेल्या वातावरणाशी आपलं जमणार नाही, हे जेव्हा लक्षात आलं, तेव्हा योग्य वेळी त्यांनी चित्रपट सृष्टीतील आपली इनिंग सन्मानानं खेळून स्वेच्छानवृत्ती घेतली. पुन्हा १९९३मध्ये ते पुण्याला सामान्य जीवन व्यतीत करण्यास परतले. आपल्या स्वीकारलेल्या तत्त्वांशी तडजोड न करणार्‍या या विनोदवीरास सलाम. हॅट्स ऑफ टू हिम.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)

Web Title: Vinod 'Bahadur'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.