प्रितीचं सोनरंगी चांदणं…

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 06:01 AM2021-02-14T06:01:00+5:302021-02-14T06:05:01+5:30

काळजाच्या कुपीत जपून ठेवण्यासाठी सुंदर आठवणी.. एक स्निग्ध नजर.. एक जिव्हाळ्याचा शब्द.. प्रेमाने एकमेकाला संबोधलेला खास शब्द, हाताच्या तळव्यावर रेंगाळत राहिलेला स्पर्श.. या गोष्टी जगण्याला उभारी देऊन जातात. आणखी काय हवं?...

Valentine's day special.. What more do you need to live!... | प्रितीचं सोनरंगी चांदणं…

प्रितीचं सोनरंगी चांदणं…

Next
ठळक मुद्दे(आज व्हॅलेंटाईन्स डे. त्यानिमित्त..)

- लीना पांढरे

आज व्हॅलेंटाईन्स डे. कोरोनाने बंद असणारी तमाम कॉलेजेस १५ फेब्रुवारीपासून खुली केली जात आहेत. अर्थात रविवारचा फायदा घेऊन अनेक प्रेमीजनांनी एकमेकांना भेटण्याचं प्लॅनिंग आता नक्की केलेलं असणारच. फेसबुक, इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियावर लाल-गुलाबी हार्टस्, फुगे यांचा पूर येवू लागला आहे. प्रेम व्यक्त करणं ही फक्त तरुण मंडळीची मक्तेदारी आहे का, असा सवाल करत 'पिकल्या पानांचे हिरवे देठ'ही आपले सस्मित, हातात हात गुंफलेले फोटो फेसबुकवर शेअर करत आहेत.

आज एकविसाव्या शतकामध्ये आपण आलेलो असतानाही ठरलेल्या पारंपरिक गुळगुळीत गुलाबी चौकटीत प्रेमाचा गुलकंद करण्यामध्ये आणि हार्ट, गुलाबाची फुले, भेटवस्तू यामध्येच अडकून पडणार आहोत?

स्त्री पुरुषांना अनादी अनंत काळापासून एकमेकांचे आकर्षण वाटत आलेले आहे हे एक सुंदर नैसर्गिक सत्य आहे. प्रेम म्हणजे नेमकं काय असतं? तुमचं आमचं सेम असतं, म्हणजे नेमकं काय असतं? फरिदा खानमच्या 'आज जाने की जीद ना करो' चे सूर काय किंवा ‘केली तुम्हावर मर्जी बहाल, नका जाऊ सोडून रंग महाल’ काय, या दोन्हीतील भावना पाहायला गेलं तर अगदी सेम टू सेम असते . त्याला आपण वेगवेगळे वर्ख चढवतो इतकचं !

 प्रेम या विषयावर आतापर्यंत किती शतकांपासून लेखक ,कवी ,चित्रकार, चित्रपट निर्माते, गीतकार यांनी आपली ऊर्जा खर्ची घातलेली आहे. प्रेम म्हणजे ेकाळोख्या खोलीमध्ये दडून बसलेलं काळ्या रंगाचे मांजर; जे त्या खोलीत नाहीच, पण आपण त्याला शोधायचा प्रयत्न करतो आहोत. विवाहाच्या चार फुटांच्या कुंपणांमध्ये बांधता येते का प्रेमाला? नातिचरामी शपथ घेतल्यावर 'मन पाखरू पाखरू' होण्याचं थांबतं का? 

साधारणतः १९५० ते १९८० पर्यंतच्या दशकांमध्ये तो आणि ती एकमेकांना भेटायचे. मग ते प्रेमात पडायचे आणि ते भाग्यवान असतील तर नंतर त्याची परिणती लग्नामध्ये व्हायची. पती-पत्नींमध्ये असणारा प्रेम, जिव्हाळा हा एकच आयाम प्रेमाला आहे का, किंवा अगदी रोमिओ-ज्युलिएट , शिरीन फरहाद , लैलामजनु वगैरे मंडळींचे असफल प्रेम म्हणजे फक्त प्रेम असतं का? या ठरलेल्या साचेबंद नात्याच्या पलीकडे जाऊनही आपल्या सर्वांच्या मनात प्रेम ही गोष्ट सतत उमलत असते. आपल्या मनावर असणाऱ्या तथाकथित नैतिकतेच्या परंपरेच्या , सांस्कृतिक वर्चस्वाच्या ,समाजाच्या भयाने आपण आपल्या मनाशी कधी निखळ स्वच्छपणे या गोष्टीची कबुली देत नाही. 

एकमेकांबद्दल मानसिक आणि शारीरिक आकर्षण वाटणे आणि स्त्री-पुरुषांनी एकमेकांच्या सहवासात फुलून येणं ही स्वाभाविक घटना आहे हे सांगण्यासाठी सिग्मंड फ्रॉईडचं प्रमाणपत्र लागतं असं नाही. परस्परांबद्दल असणाऱ्या आकर्षणाचा आणि प्रेमाचा अविष्कार वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतो. एकमेकांबद्दल वाटणारा आदरभाव, जिव्हाळा, एकमेकांना समृद्ध करत जाणं, अडीअडचणीला एकमेकांसाठी धावून जाणं ,एकमेकांच्या सहवासात एकत्र येऊन एखादं सर्जनात्मक काम पूर्ण करणं हे सर्व प्रेमाचेच आविष्कार आहेत. गोपाळ कृष्ण गोखले आणि सरला राय , विठ्ठल रामजी शिंदे आणि कृष्णाबाई केळवकर, जी ए कुलकर्णी व सुनीताबाई, स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता, महात्मा गांधी व सरलादेवी चौधुराणी ,रवींद्रनाथ टागोर आणि व्हीक्टोरीया यांच्यातील स्नेहाच्या नात्याने अनेक मोठी संजीवक समाजकार्य पार पडलीत. कुठलं साचेबंद लेबल लावणार या नात्याला?

'हमने देखी है इन आँखों की महकती खुशबू

हाथ से छुके इसे रिश्तो का इल्जाम न दो .

सिर्फ एहसास है ये रूह से महसूस करो '

असे हे दवबिंदुंसारखे नाजूक संबंध!

परस्परआकर्षणाचा कोंब कायम हिरवागार राहत असेल तर रोजचं जगणं जगायलाही खूप उभारी येते. कितीतरी निरस कंटाळवाणी कामं झरझर आटपली जातात. प्रेमात असलं तर आभाळ अजूनच निळंभोर होतं. गवत अजून हिरवं होतं. कितीही अडचणी आणि संकटे आली तरी त्याची तमा आपल्याला वाटेनाशी होते. खूप खूप ऊर्जा मिळते आणि उत्साहाने आपण पुढे पुढे जात राहतो.

'अजून येतो वास फुलांना ..अजून माती लाल चमकते' असा अदम्य आशावाद टिकून राहतो.

मात्र कधीतरी नात्याची एक्सपायरी डेट येते तेव्हां शांतपणे कडवटपणा येऊ न देता त्यातून बाहेरही पडता यायला हवं. अत्यंत आनंदाने एकत्र राहून आणि वेळ आल्यानंतर शांतपणाने त्यातून बाहेरही पडता यायला हवं. ज्याला आजची युवा पिढी ब्रेकअप असं संबोधते. ही तरुण मंडळी शांतपणे ब्रेकअप मधून बाहेर येतात आणि पुन्हा नवीन नाते गुंफायला सुरवात करतात. 

प्रत्येक वेळी आकर्षण आणि प्रेमबंधांचा आविष्कार शरीर बंधामध्ये होतोच असं नाही आणि त्याचा अट्टाहासही का करावा? कधी हे बंध निर्माण होतात तर कधी तशी संधीच मिळत नाही. पण तरीही प्रिय व्यक्तीचे नुसते शब्द ,चेहरा ,निसटते स्पर्शही मनावर फुंकर घालून जातात. असं प्रेम हे प्रदर्शन करण्याची बाब नव्हे. प्रेम आतल्याआत रुजवत नेण्याइतका आयुष्याबरोबर करावयाचा दुसरा रोमान्स नाही. काही संबंध, नाती काही दिवसांपूर्वीच टिकतात कधी काही नाती काही तासांपुरती. वीज लखकन चमकून जावी अशी! अनावर आकर्षणाची एक लालबुंद ज्योत मनात उजळते.. मनाचा गाभारा लख्ख प्रकाशाने काठोकाठ भरून टाकते आणि शांतपणे विझूनही जाते. त्या सोनेरी प्रकाशाची चिमूट भाळावर टेकवून पुढील चढण चढायला किती उमेद वाटते आपल्याला!

नात्यांची लेबलं घाईघाईने संबंधांवर चढवण्याची आपल्याला फार गरज भासते. आपल्या तथाकथित नैतिकतेच्या, संस्कृतीच्या, समाज भयाच्या बडग्याला घाबरून त्या नात्याला ताबडतोब ‘भाऊ’ किंवा ‘बहीण’ असं नाव दिलं जातं. म्हणजे पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, भाऊ बहीण यापलीकडे नाती नसतातच का? आणि जर असं आवडीचं कुणी भेटलं तर निसंकोचपणे ते नाते स्वीकारून त्याची एक्सपायरी डेट येईपर्यंत ते नातं फुलवायला काय हरकत आहे? त्यापासून कोणालाही त्रास होऊ नये. मानसिक-भावनिक हिंसा होऊ नये याची काळजी घेऊन!

मुसळधार पाऊस पडत असावा आणि पहाटे पहाटे जाग यावी. शांतपणे जोडीदार निघून गेलेला असावा. पुनश्च त्या सुखद गारव्यात आपण पापण्या मिटून घ्याव्यात. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडल्यावर तो किंवा ती आपल्याला भेटलीच पाहिजे असा अट्टाहास का? कुसुमाग्रजांनी एका कावितेत म्हटलंय

'काढ सखे गळ्यातील

तुझे चांदण्यांचे हात

क्षितीजाच्या पलिकडे

उभे दिवसाचे दूत.'

कारण कविला जाणीव आहे की उजेडात जर आपण एकमेकांना भेटलो तर दुनियाच्या नजरेत आपण अपराधी ठरू. तेव्हा ही मदमंथर गतीने जाणारी सुंदर रात्र ढळायच्या आतच आपण एकमेकांचा निरोप घेऊ या. अंधारातील नाती कधीकधी खुप उजळवून टाकणारी असतात ज्याला जॉन डन या कवीने डॅझलींग डार्कनेस असे संबोधलेले आहे. ‘झगमगता अंधार !’

या दुनियेतील प्रेम काढून घेतलं तर हे जग एक रेताड वाळवंट होऊन जाईल. काळजाच्या कुपीत जपून ठेवण्यासाठी सुंदर आठवणी .. एक स्निग्ध नजर.. एक जिव्हाळ्याचा शब्द.. प्रेमाने एकमेकाला संबोधलेला खास शब्द, हाताच्या तळव्यावर रेंगाळत राहिलेला स्पर्श, बस्स, या गोष्टी जगण्याला उभारी देऊन जातात. प्रितीचा कांचनमृग आयुष्यात भेटायलाच हवा . त्याची मृगया करायची इच्छा मात्र बाळगू नये . या अप्राप्य कांचनमृगाच्या पाठलागाच्या धुंदीत प्रितीचं सोनरंगी चांदणं आयुष्यात पसरतं जातं.. और क्या चाहिए जीने के लीए !    

(लेखिका साहित्याच्या अभ्यासक आहेत.)

pandhareleena@gmail.com

Web Title: Valentine's day special.. What more do you need to live!...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.