रुग्णसेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या डॉ. व्ही. शांता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 06:01 AM2021-01-24T06:01:00+5:302021-01-24T06:05:01+5:30

डॉ. शांता आयुष्यभर रुग्णसेवेसाठी झटल्या. विविध आजारांवर विशेषत: कॅन्सरसारख्या रोगावर अधिक संशोधन झाले पाहिजे, हा त्यांचा ध्यास होता. गरीब रुग्णांना मोफत किंवा अत्यल्प खर्चात उपचार मिळावेत, यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत त्या झटल्या.

V. Shanta- Dr. who served her life for patients service.. | रुग्णसेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या डॉ. व्ही. शांता

रुग्णसेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या डॉ. व्ही. शांता

googlenewsNext
ठळक मुद्देचेन्नई येथील अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष डॉ. व्ही. शांता यांचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्त..

- वसंत भोसले

‘भारतातील वैद्यकीय क्षेत्र खूप व्यावसायिक झालेले असतानाही डॉ. विधनाथन शांता ‘आपल्या सर्वांसाठी सेवा’ या तत्त्वासाठी अहोरात्र धडपड करताहेत. वर्षभरात एक लाख रुग्णांपैकी साठ टक्के रुग्णांना सवलतीच्या फीमध्ये किंवा मोफत उपचार करतात. वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षातही डॉ. शांता रुग्ण तपासतात, शस्त्रक्रिया करतात आणि त्या चोवीस तास उपलब्ध असतात,’ असे आशिया खंडातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे अवॉर्ड डॉ. व्ही. शांता यांना २००५ मध्ये जाहीर करताना म्हटले गेले होते.

चेन्नई येथील अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष डॉ. व्ही. शांता यांचे मंगळवार, १९ जानेवारी रोजी वयाच्या ९३व्या वर्षी निधन झाले. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्रीने सन्मानित झालेल्या डॉ. शांता अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या भव्य परिसरातील एका छोट्या खोलीत राहत होत्या. प्रसूतिशास्त्रात एम. डी. केल्यानंतर तत्कालीन मद्रास लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन राज्य शासनाची नोकरी त्यांनी पत्करली होती. महिला, बालकल्याण आणि कुटुंब आरोग्य विभागात काम करीत होत्या. डॉ. मथुलक्ष्मी रेड्डी या निष्णात डॉक्टरांची भेट झाली. त्यांनी कॅन्सरवर संशोधन आणि उपचार करणारे रुग्णालय सुरू करण्याचा विचार केला होता. एका छोट्या जागेत केवळ बारा बेड्‌सचे रुग्णालय सुरू करण्यात आले.

मद्रास राज्य शासनाची नोकरी सोडून डॉ. शांता यांनी त्यांना १९५५ मध्ये साथ देण्याचा निर्णय घेतला. ‘आजचे संशोधन हा उद्याचा उपचार’ असू शकतो, असे मानणाऱ्या डॉ. शांता यांना रुग्णांना भेडसावणाऱ्या विविध आजारांवर संशोधनही करायचे होते. विशेषत: कॅन्सरसारख्या भीतीदायक रोगावर अधिक संशोधन झाले पाहिजे. कॅन्सर झाल्याचे लक्षात येण्यासाठी तसेच त्यावर मात करण्यासाठीचे उपचार शोधले पाहिजेत. गरीब रुग्णांनाही कमीतकमी खर्चात उपचार मिळाले पाहिजेत, हा ध्यास घेऊन १९५५ ते अखेरचा श्वास घेईपर्यंत त्या अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटसाठी कार्यरत राहिल्या. दिवसातील चोवीस तास आणि सलग पासष्ट वर्षे त्यांनी या इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन, उपचार, शस्त्रक्रिया आणि रुग्णांची सेवा करण्यात व्यतीत केली. सर्वसामान्य माणसाला स्वस्तात उपचार मिळाले पाहिजेत, यावर त्या ठाम होत्या. तसे डॉक्टरांनी रुग्णांच्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध असले पाहिजे, असे त्या मानत होत्या आणि संपूर्ण जीवनात त्यांनी हे पाळले. यासाठी त्या अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटमधील दोन खोल्यांत राहत होत्या.

डॉ. व्ही. शांता यांची जीवनमूल्ये, जीवनप्रवास थक्क करणारा आहे. त्या ज्या घराण्यातून आलेल्या होत्या त्या घराण्यात विद्वत्ता नांदत होती. पदार्थ विज्ञानातील संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रमण त्यांचे आजोबा आणि नोबेल पारितोषिक विजेते डॉ. एस. चंद्रशेखर हे त्यांचे चुलते! अशा कुटुंबातून आलेल्या डॉ. शांता यांनी प्रसूतिशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर रुग्णालय सुरू करावे, अशी त्यांच्या माता-पित्यांची इच्छा होती. पण, त्यांना वेगळा मार्ग निवडायचा होता. शासकीय नोकरीत जाऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, त्याचवेळी त्यांच्यामध्ये संशोधनाची वृत्ती होती. त्यांनी अखेरपर्यंत रुग्णसेवा आणि संशोधन चालू ठेवले. तामिळनाडू सरकार, केंद्र सरकार, शिवाय जागतिक आरोग्य संघटनांबरोबरही त्यांनी विविध पातळ्यांवर काम केले. जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्य सल्लागार समितीच्या त्या अनेक वर्षे सदस्य होत्या. जागतिक आरोग्यविषयीच्या धोरणावर अभ्यास करून त्याचा उपयोग गरीब वर्गाला झाला पाहिजे, यासाठी त्या प्रयत्नशील राहिल्या.

कॅन्सरचे रुग्ण वाढू लागले तसे त्यांनी संशोधनावर भर दिला. कॅन्सरची लक्षणे लवकर लक्षात आली तर त्यावर मात करता येऊ शकते, असा त्यांच्या संशोधनाचा निष्कर्ष होता. त्यासाठी कॅन्सर रुग्णाच्या अंगातील लक्षणे लवकर ओळखण्यासाठी अधिक संशोधन व्हायला हवे, असे त्यांना वाटत होते. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थांवर त्यांनी काम केले. जगभरातील ज्ञान अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये आणून बहुसंख्यांना मोफत सेवा देण्याची त्यांची अखेरपर्यंत धडपड राहिली. १९५२ मध्ये एम.बी.बी.एस. आणि १९५५ मध्ये एम.डी. झाल्यावर दीड वर्षे सरकारी नोकरी केल्यावर ‘अड्यार’मध्ये त्यांनी केवळ २०० रुपयांवर नोकरी पत्करली. स्वत:चे रुग्णालय स्थापन करणे अशक्य नव्हते. सुशिक्षित आणि संपन्न घराण्यातून त्या पुढे आलेल्या होत्या. त्यासाठी बळ मिळणे कठीण नव्हते. मात्र, त्यांचा जीवनमार्गच वेगळा होता. जीवनमूल्येच वेगळी होती. तीन वर्षे ऑनररी काम केल्यानंतर अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटचा विस्तार आणि विकास करायचा हा एकमेव ध्यास त्यांनी घेतला. त्यांच्या या प्रवासात डॉ. एस. कृष्णमूर्ती यांनी मोलाची साथ दिली. डॉ. मथुलक्ष्मी रेड्डी तर त्यांचे गुरूवर्यच होते. भारत सरकारने पद्मश्री (१९८६), पद्मभूषण (२००६) आणि पद्मविभूषण (२०१६) देऊन तीन वेळा गौरव केला. २००५ मध्ये त्यांना रॅमन मॅगसेेसे पुरस्कार देण्यात आला. हे सर्व पुरस्कार त्यांनी अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटला समर्पित केले. त्याच्या रकमेचा विनियोगही या संस्थेसाठी केला. प्रारंभी केवळ बारा बेडचे असलेले हे रुग्णालय आज चेन्नई आणि देशातील एक प्रमुख संशोधन आणि उपचार करणारे केंद्र झाले आहे. सलग ६५ वर्षे त्या रुग्णालयाच्या परिसरात राहून अहोरात्र उपचार, संशोधन, चिंतन आणि मनन करीत राहिल्या. गेल्या २० डिसेंबर २०२० रोजी तामिळनाडू सरकारच्या एका आरोग्य कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. कोरोना विषाणूच्या प्रसारानंतर त्या खूप अस्वस्थ झाल्या होत्या. अशा प्रकारच्या विषाणूंमुळे मानवी जीवनाच्या समोर आव्हाने उभी केली आहेतच. पण, गरीब माणसाला सर्वार्थाने जीवनातून उठविणारा हा विषाणू आहे. या विचाराने त्या खूप व्यथित होत्या. आदल्या दिवशी रुग्णांना तपासून आलेल्या डॉ. व्ही. शांता यांना हृदयविकाराचा धक्का १८ जानेवारी रोजी रात्री बसला आणि पहाटे त्यांचे निधन झाले. हृदयविकारावर उपचार करण्यासाठी त्यांना हलविण्यात येत असताना त्या नकार देत होत्या. येथेच माझ्यावर उपचार करावेत. माझ्या निधनानंतर कोणतेही अंतिम संस्कार न करता दहन द्यावे आणि माझी रक्षा रुग्णालयातील वृक्षाखाली अंथरून सोडावी, अशी समर्पिततेची भावना व्यक्त करून त्या मानवतेची सेवा करून निघून गेल्या!

(लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक आहेत.)

Web Title: V. Shanta- Dr. who served her life for patients service..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.