अब्जाधीश घडवणारे विद्यापीठ

By Admin | Updated: October 4, 2014 19:37 IST2014-10-04T19:37:59+5:302014-10-04T19:37:59+5:30

जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत १२ अब्जाधीश हे मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचे नुकतेच एका जागतिक आकडेवारीमध्ये समोर आले आहे. भारतातील सर्वांत जुन्या तीन विद्यापीठांपैकी मुंबई विद्यापीठ एक आहे. खर्‍या अर्थाने चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी विद्यापीठ स्तरावर केल्या जात असलेल्या प्रयत्नांचा या निमित्ताने मागोवा..

University of Billionaire | अब्जाधीश घडवणारे विद्यापीठ

अब्जाधीश घडवणारे विद्यापीठ

- लीलाधर बनसोड

 
नुकतीच जगभरातील अब्जाधीशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सिंगापूरच्या वेल्थ एक्स आणि स्विस बँक युबीएस यांनी ही यादी जाहीर केली. या यादीत जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत १२ अब्जाधीश हे मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचे समोर येताच सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले, ही बाब नक्कीच भूषणावह आहे. जगातल्या टॉप टष्‍द्वेंटी विद्यापीठांच्या तुलनेत मुंबई विद्यापीठ नवव्या स्थानावर असून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि कोलंबिया तसेच एमआयटीलाही मागे टाकत जगाच्या पाठीवर मुंबई विद्यापीठाचे नाव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
गेल्या १५६ वर्षांच्या समृद्ध आणि वैभवशाली परंपरेचे हे विद्यापीठ आहे. या विद्यापीठातून शिकलेल्या अनेकांनी आज जगाच्या पाठीवर आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली आहे. या विद्यापीठात शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीवर नजर टाकल्यास लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मोहम्मद अली जिना, लालकृष्ण आडवाणी, महादेव गोविंद रानडे, जगदीश भगवती, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, द्वारकानाथ कोटणीस, वसुंधरा राजे, प्रफुल्ल पटेल, अजित गुलाबचंद अशा अनेक दिग्गजांसह सिनेतारकांसह अभिनेते याच विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत.
मुंबई विद्यापीठ वगळून भारतातील एकही विद्यापीठ या यादीत नाही. ढोबळमानाने त्याचे असेही एक विवेचन केले जाऊ शकेल, की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या आर्थिक राजधानीच्या केंद्रात मुंबई विद्यापीठ आहे. भारतातील सर्वांत जुन्या तीन विद्यापीठांपैकी मुंबई विद्यापीठ एक आहे. यादीत जाहीर केल्यानुसार, मुकेश अंबानी, अनिल अंबानी, कुमार मंगलम बिर्ला, निरंजन हिरानंदानी, अजय पिरामल, अश्‍विन चिमनलाल चोकशी हे अब्जाधीश मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. निरंजन हिरानंदानी-सिडनहॅम कॉलेज, अनिल अंबानी - के. सी. कॉलेज, मुकेश अंबानी -इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, कुमार मंगलम बिरला - एच. आर. कॉलेज, उदय कोटक-सिडनहॅम कॉलेज, अजय पिरामल-जमनालाल बजाज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, सी. एल. रहेजा - नॅशनल लॉ कॉलेज, मधुकर पारेख - इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, हर्ष मारिवाला-सिडनहॅम कॉलेज, अश्‍विन चिमनलाल चोकशी - सिडनहॅम कॉलेज हे सर्व अब्जाधीश मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांतून शिकले आहेत.
जगाच्या पाठीवर होत असलेले बदल आणि त्या बदलांच्या अनुषंगाने शिक्षणपद्धतीत होणार्‍या बदलांची योग्य सांगड मुंबई विद्यापीठाने घातली आहे. गेल्या तीन-चार वर्षांचा शैक्षणिक आलेख पाहता मुंबई विद्यापीठाने जवळपास ५५ नवीन अभ्यासक्रम सुरूकेले आहेत. विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण मिळावे, याची कास धरणार्‍या मुंबई विद्यापीठाने कम्युनिटी कॉलेजेस सुरू केली आहेत. विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख अभ्यासक्रम शिकता यावेत म्हणून नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरूकेले आहेत. उच्च दर्जाचे शैक्षणिक संशोधन व्हावे, यासाठी जवळपास चार लाखांहून अधिक रिसर्च र्जनल्स ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत. भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैज्ञानिक संशोधनाला चालना मिळावी, यासाठी सूक्ष्म विज्ञान क्षेत्रात आमूलाग्र बदल करत नॅनो सायन्स आणि टेक्नॉलॉजी हा अद्ययावत विभाग सुरू करण्यात आला आहे. आजमितीला मुंबई विद्यापीठाशी ७२९ महाविद्यालये संलग्नित असून ५६ विद्यापीठ विभाग आहेत, ज्यामधून जवळपास सात लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जगाच्या पाठीवर शिक्षणपद्धतीत आज जी श्रेयांक श्रेणीपद्धती (क्रेडिट सिस्टिम) अस्तित्वात आहे, त्याचा स्वीकार मुंबई विद्यापीठाने केला आहे.
मुंबई विद्यापीठ हे आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबईत आहे. जगातील दहा व्यावसायिक केंद्रांमध्ये मुंबईचा समावेश होतो, यावरून मुंबईचे जागतिक पातळीवरील महत्त्व लक्षात येते. देशातील २५ टक्के व्यापार, बंदराच्या माध्यमातून होणारा ४0 टक्के व्यापार आणि ७0 टक्के भांडवली व्यवहार भारताच्या गंगाजळीत भर घालत असतात. मुंबईतच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई शेअर बाजार, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आहे. शिवाय अनेक बड्या कंपन्यांची मुख्यालये याच महानगरात आहेत आणि या सर्व बड्या मुख्यालयात आज मुंबई विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी नावारूपाला येत आहेत. जागतिक स्तरावर त्यांना मोठी मागणी आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा ग्रुप, गोदरेज, रिलायन्स यांच्यासारख्या भारतातील बड्या व्यावसायिक आस्थापनांचे मुंबईत मुख्यालय आहे. फॉच्यरुन ग्लोबल ५00 कंपन्यांमधील चार कंपन्या मुंबईत आहेत. अनेक परकीय बँका आणि वित्तीय संस्थांनी मुंबईत शाखा उघडल्या आहेत. याशिवाय केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या संस्थाही येथे आहेत. ज्यात भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर, ऑईल अँड नॅचरल गॅस लि. (ओएनजीसी), या अशा अनेक नामवंत संस्थांमध्ये मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी कर्तृत्व गाजवताना दिसून येतात.
ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे आणि देशाची ज्ञानविषयक गौरवशाली परंपरा आणि वाढता सामाजिक-आर्थिक प्रभाव पाहता मुंबई विद्यापीठाने ज्ञानदानाच्या या पवित्र कार्यात आपला मोलाचा ठसा उमटवला आहे.
मुंबई विद्यापीठाने समाजाचे बौद्धिक आणि नैतिक शक्तिस्थान म्हणून गेल्या १५६ वर्षांत भरीव कामगिरी केली आहे. सामाजिक मूल्य आणि संधींची सतत वाढणारी जबाबदारी उत्साहाने वागवत देशाला विशेषत: महाराष्ट्र आणि मुंबई शहराला उत्तम गुणवत्ता दिली आहे.
उच्च शिक्षणाची जागतिक दिशा ओळखून मुंबई विद्यापीठाने जवळजवळ १0 नवीन शिक्षणक्रम देण्याचे योजले आहे. त्यातून भविष्यात मुंबई विद्यापीठात येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमांचे शिक्षण उपलब्ध होईल. विद्यापीठ अनुदान आयोगाने संशोधनास वाव देण्यासाठी मुख्य आणि दुय्यम संशोधन प्रकल्पास प्रोत्साहन दिले आहे. इनफ्लीबीनेट अंतर्गत कार्यक्रमात जागतिक स्तरावरील र्जनल्स, ई-पुस्तके प्रत्येक प्राध्यापकास उपलब्ध करून दिली आहेत आणि ही खरी स्वागतार्ह बाब आहे, तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालयाला ‘नॅक’ दर पाच वर्षांनी भेट देते, त्यांच्या कार्यानुसार श्रेणी देते. नॅकमुळे सोयी-सुविधा द्याव्या लागतात. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांना नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांची आकलनक्षमता,  वैचारिक पातळी वाढते. त्यांच्या संशोधनास प्रोत्साहित करण्यासाठी विविध सोयी दिल्या जातात.  याच विकासाची कास धरणारे मुंबई विद्यापीठ येत्या काही काळात जगाच्या पाठीवर आपली मोहोर उमटवेल, असा आशावाद निश्‍चितच व्यक्त केला जाऊ शकतो.
 
 
 
विद्यापीठाचे नावअब्जाधीश माजी विद्यार्थ्यांची नावे
युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्वानिया२५
हार्वड विद्यापीठ२२
येले विद्यापीठ२0
युएससी१६
प्रींस्टन विद्यापीठ१४
कॉर्नेल विद्यापीठ१४
स्टॅनफर्ड विद्यापीठ१४
यु.सी.बर्कले१२
मुंबई विद्यापीठ१२
एलएसइ११
मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी११
टेक्सास विद्यापीठ१0
डार्थमाऊथ कॉलेज१0
मिशीगन विद्यापीठ१0
न्युयॉर्क विद्यापीठ
ड्यूक विद्यापीठ
कोलंबिया विद्यापीठ
ब्राऊन विद्यापीठ
एमआयटी
इटीएस झुरीच
                      (लेखक मुंबई विद्यापीठामध्ये 
                           उप-कुलसचिव आहेत.) 

 

Web Title: University of Billionaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.