कोरोनानुभव..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 10:11 AM2020-03-29T10:11:27+5:302020-03-29T10:12:38+5:30

आज अचानक पक्ष्यांची किलबिल ऐकू आली. कोकिळेचाही आवाज आला. अचानक बदललेलं हे वातावरण कफ्यरूमुळे असल्याचंही लक्षात आलं.  पण जागतिक पातळीवर वर्षातून किमान एक दिवस तरी ‘शांत’ असावा,  ‘सायलेन्स डे’ म्हणून तो पाळला जावा, आणि त्या काळात आपला ‘आतला आवाज’ तेवढा प्रत्येकानं ऐकावा, असंही वाटून गेलं. कोरोनानं अल्पावधीत अनेक गोष्टी आपल्याला शिकवल्या. निसर्गाला गृहित धरणं  आता आपल्याला  परवडण्यासारखं नाही,  ही त्यातली एक प्रमुख शिकवण!.

Unique silence experience in the Corona curfew | कोरोनानुभव..

कोरोनानुभव..

Next
ठळक मुद्देजागतिक पातळीवर शक्य नसेल, दरवर्षी शक्य नसेल, तर आधी प्रयोग म्हणून भारतात निदान पाच वषार्तून एक दिवस तरी ‘सायलेन्स डे’ म्हणून पाळावा.

- आशुतोष शेवाळकर

सकाळी उठल्याबरोबर पाणी पितांना खिडकीबाहेर पहिलं तर ओस रस्ता पाहून थोडा दचकलो. एक आळसावलेलं ओसाडपण या रस्त्यावर दर रविवारीच असतं, पण आजचं अधिक काही होतं. मग एकदम आठवलं, आज ‘जनता कफ्यरू’ आहे! (आणि आता तर हा कफ्यरू 21 दिवसांसाठी वाढवला आहे!)
चहासाठी खाली जातांना पहिले कानांना आणि डोक्याला जाणवली ती एक परिचित, पण अगदीच विस्मृतीत गेलेली शांतता. वणीला लहानपणी गावाबाहेरच्या आमच्या घराच्या अवतीभोवती अशीच शांतता असायची. वाहनांची कायम वर्दळ व गर्दी. आवाजाच्या या वातावरणात एक ‘रेझोनन्स’ उमटलेला राहत असतो. (मंदिराची घंटी वाजल्यावर काही वेळ आजूबाजूच्या वातावरणात असतो तसा.) रस्त्यावरुन जाणारी वाहनं, गर्दी आणि विविध आवाज या एकामागून एक आदळणार्‍या आवाजांमुळे शहराच्या वातावरणात आता आजकाल तो सततच साकाळलेला असतो. ती आवाजांची चेन आज ब्रेक झाल्यामुळे तो ‘रेझोनन्स’ आज नाही हे मग लक्षात आलं. 
चहा घेतांना निरनिराळ्या पक्षांचे आवाज व किलबिल स्पष्ट ऐकू येत होती. रोज ती आपल्या अवतीभोवती अशीच गुंजत असेल, पण ती आपल्याला ऐकु येत नसावी हे मग  लक्षात आलं. त्यानंतर दुपारी अचानक कोकिळेचा आवाजही ऐकू आला. वसंत ऋतु येवूनही अजून ती आलेली नव्हती. तशीही ती आमच्याकडे एप्रिलमध्येच येते व जुलै-ऑगस्ट अशी उशिरापयर्ंत रहाते. पण या अचानक बदललेल्या वातावरणामुळे कदाचित तिनं आज ही लवकर ‘एंट्री’ घेतली असेल.  
अँसिडिटीमुळे मायग्रेन अटॅक येण्याचा मला त्रास आहे. अशा मायग्रेन अटॅकच्या त्या तासा-दोन तासाच्या काळात कुठलाही आवाज मग सहन होत नाही. तसं आज या शांततेत घरच्यांच्या बोलण्याच्या आवाजाविषयीदेखील वाटू लागलं. 
इतक्यात रस्त्यावरून एक अँम्बुलन्स सायरन वाजवत शांतता चिरत गेली. बाजूच्या हॉस्पिटलमधून पेशंटला आणायला निघालेली ती रिकामी अँम्बुलन्स होती. गर्दीच्या वेळी प्राधान्याने रस्ता मिळावा म्हणून परवानगी असलेल्या सायरनचा अशा रस्त्यावर चिटपाखरूही नसतांना का उपयोग करावासा वाटला ते कळलं नाही.
गर्दी कमी झाल्याने इटलीच्या समुद्रकिनार्‍यावर रस्त्यालगतच्या संरक्षक भिंतीपयर्ंत डॉल्फिन मासे आलेत, मध्य शहरातल्या नदीमध्ये राजहंस उतरलेत, शिकागोला भर शहरात पेंग्विन्स आलेत, तसा काही चमत्कार आवाजाचं प्रदुषण थांबवल्याने पण होऊ शकतो असं मग वाटायला लागलं.  गर्दी थांबल्यावर जलचर जसे शहरात आलेत, तसा आवाज थांबल्यावर निसगातलं काही पक्षीविश्व आपल्यात येवून मिसळतं का हे पाहायला पाहिजे.
असा एखादा जनता कफ्यरूचा दिवस वर्षातून एकदा तरी असावा. त्यादिवशी मग सगळ्याच गोष्टींवर बंदी असावी. वातावरणात त्या दिवशी कुठलाच आवाज असू नये. शक्य असेल तर त्यादिवशी आपण सर्वांनी मौन पाळून आपल्या आतले धुळमाखले, ऐकु येइनासे झालेले आवाज ऐकण्याचा प्रय} पण करावा, असा विचार मग मनात आला.  
शक्य असल्यास हा दिवस जागतिक पातळीवर एकाच दिवशी असावा म्हणजे आवाज प्रदुषणाचे संपूर्ण पृथ्वीच्या निसर्गावर काय परिणाम होतात, हे पण अभ्यासता येईल.
वॉशिंग्टनमधल्या एका परिचित व्यक्तिकडे मी एकदा सकाळी ब्रेकफास्टला गेलो होतो. बील गेट्ससाठी मोठ्या अधिकारपदावर तो काम करीत असल्याने बर्‍यापैकी र्शीमंतही होता.े गावालगतच्या एका टेकडीवर त्याचं मोठं घर होतं. आजूबाजूला दाट वनराई होती. डेकवर बसून ब्रेकफास्ट घेतांना खळाळत्या नदीसारखा आवाज खालून येत होता. नेहमीच्या स्वभावाप्रमाणे त्या झाडामधून खाली उतरून जात ती नदी शोधावी, पहावी अशी इच्छा झाली. मी त्या स्नेह्याला तसं विचारलं. तो म्हणाला, ती नदी नाहीये. खालून फ्री-वे जातो, त्याच्या ट्रॅफिकचा हा आवाज आहे. वाहनांची संख्या आणि गती वाढली कि तो आवाज किती प्रचंड असतो हे मला त्या दिवशी वनराईच्या पडद्यामागून तो आवाज ऐकल्यामुळे कळलं. बाहेरच्या जगात वाहनांची संख्या व चांगल्या रस्त्यांमुळे गतीचे आवाज जास्त तर आपल्याकडे लोकसंखेमुळे. घरातल्या फ्रीज एसी, पंखा अशा उपकरणांचे हमिंग साऊंड तर आता दोन्हीकडे आहेतच. 
त्यामुळे सगळ्या जगाच्याच स्तरावर आपण असा एक ‘सायलेन्स डे’ पाळायलाच हवा. ‘व्हॅलेण्टाइन डे’सारखे कितीतरी दिवस आपण जागतिक पातळीवर पाळतोच. मग निसर्गाचा सन्मान करण्यासाठी निसर्गाचे आभार मानण्यासाठी असा एखादा ‘सायलेन्स डे’ पाळायला काय हरकत आहे? 
कोरोना व्हायरस या मायक्रोस्कोपिक छोट्या जीवाने आज संपूर्ण जगाच्या गालावर थप्पड मारली आहे. ही एक मोठी धोक्याची घंटा आहे. यापुढे येऊ घातलेला विषाणू कदाचित यापेक्षा जास्त घातक व जीवघेणा असू शकतो. असा एखादा विषाणू एका फटकार्‍यातच संपूर्ण पृथ्वी निर्मनुष्य करू शकतो हे तरी आपण आता या कोरोनानुभवातून शिकलं पाहिजे. 
निसर्गाला इतकं गृहित धरणं आता आपल्याला  निश्चितच परवडण्यासारखं नाही. ‘धर्म र्शेष्ठ कि विज्ञान?’अशा दोनच विचारधारा आज आपल्याला जगात दिसून येतात. पण निसर्ग हा धर्म व विज्ञानापेक्षाही मोठा आहे, किंबहुना निसर्गाच्या अभ्यासातूनच धर्माचा किंवा विज्ञानाचा जन्म झालेला आहे. धर्म वा विज्ञानातून निसर्गाचा नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. निसर्ग आद्य आहे, निसर्ग हा आपला मूळ आहे, त्याची स्पेस न संकोचवता आपल्याला आपली वाटचाल, प्रगती करायला पाहिजे. निसर्गाच्या या स्पेसचा आपण संकोच करीत गेलो तर एका मयार्देपलीकडे होणार्‍या त्याच्या घुसमटीतूनच असे विषारी फुत्कार बाहेर पडत असतील कदाचित.      
जागतिक पातळीवर शक्य नसेल, दरवर्षी शक्य नसेल, तर आधी प्रयोग म्हणून भारतात निदान पाच वषार्तून एक दिवस तरी असा पाळावा. निवडणुकीचा प्रचार थंडावल्यावर मतदानाच्या आधीचा जो एक दिवस असतो त्या दिवशी असा प्रयोग करून पाहता येईल. प्रचार थंडावलेला, टीव्ही वाहिन्या, माध्यमांतूनही तो मनावर आदळत नसलेला, अशा वेळी शांततेने अंतर्मुख होऊन एक दिवस आतला आवाज ऐकण्यात घालवल्यानंतरचं मतदानही जास्त सखोल आणि परिपक्व होईल. 

(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)

Web Title: Unique silence experience in the Corona curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.