उद्याचं घर
By Admin | Updated: October 4, 2014 19:18 IST2014-10-04T19:18:41+5:302014-10-04T19:18:41+5:30
नुकतीच भारताची मंगळमोहीम यशस्वी झाली. उद्याचा वेध घेताना पृथ्वीवरचे लोक आता मंगळावर राहायला जायची स्वप्ने रंगवत आहेत. सध्या यात स्वप्नरंजनाचाच भाग अधिक असला तरी अगदीच अशक्य काहीही नाही.... मंगळावर

उद्याचं घर
सचिन दिवाण
प्रसंग पहिला
सुट्यांचा हंगाम असल्याने मंगळाच्या सेंट्रल कॉस्मोड्रोमवर यानांना प्रचंड गर्दी. त्यातून वाट काढत आजी, आजोबा आणि नातवंडांनी त्यांचे यान गाठले. रिझर्वेशनप्रमाणे सीट्स तपासून घेत जागा पकडली. सामान ठेवले. प्रवासी थोडे स्थिरस्थावर होताहेत तोवर यानाचा पायलट आणि तिकीट चेकर आले. चेकरने रुक्ष आवाजात घोषणा केली, ह्लफक्त डायरेक्ट पृथ्वीवाले बसा. यान चंद्रावर जात नाही. नाक्यावर थांबेल.ह्व कोणीच काही बोलत नाही बघून त्याने पायलटला खूण केली. पायलटने सीट बेल्ट्स, ऑक्सिजन मास्क वगैरे बरोबर लावल्याची खात्री करून घ्या म्हणून पॅसेंजरना सूचना दिल्या आणि काही सेकंदांत यान थरथरू लागले. जोराच्या ब्लास्ट-ऑफसरनंतर ते पृथ्वीच्या दिशेने झेपावले. मंगळाचा लालसर लोहगोल मागे टाकत निळ्य़ाशार अवकाशातून वेगाने मार्गक्रमणा सुरू झाली.
नातवंडे खिडकीजवळची सीट पकडून बाहेरच्या गंमतीजंमती पाहण्यात मग्न झाली तशी आजीबाईंनी शेजारच्या काकूंशी कोण-कुठल्या वगैरे जुजबी ओळख होताच अघळपघळ गप्पा मारायला सुरुवात केली. ' अहो आमचा मुलगा असतो मंगळावर. पण यावेळी त्याला आणि सूनबाईंना जास्त सुटी मिळाली नाही. म्हणून पोरांना घेऊन चाललोय दिवाळीच्या सुटीला पृथ्वीवर. हे घ्या थोडं फराळाचं.' वाटेत स्पेस ओडिसी ढाब्यावर यानाने डॉकिंग केले. तिकिट चेकरने परत सांगितले, 'अर्धा तास थांबेल यान. कुणाला चहा, नाष्टा, जेवण करायचे असेल तर लवकर घ्या करून.' अध्र्या तासाने यानाने परत पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू केला. चंद्र जवळ आला तसा काही पॅसेंर्जसनी पुढे जाऊन चेकरला सांगितले की चंद्र फाट्यावर जरा थांबवा. त्यांना उतवून यान पृथ्वीकडे मार्गस्थ झाले.
इकडे या उतरलेल्या पॅसेंजरनी नाक्यावरून चंद्रावर जायला शेअर यान पकडले. पायलटने मागे-पुढे सरकून बसायला सांगत गुरकावले, ‘सुट्टे पैशे काढून ठेवा हा.’ जरा पुढे जातायत तर मागून पोलिसाची शिटी ऐकू आली आणि पाठोपाठ आवाज, ‘हं. घ्या साइडला. बघू लायसन, यानाची कागदपत्रं. परमिट कितीचं आहे आणि माणसं किती भरलीत. ’ शेअर यानवाला काकुळतीला येऊन म्हणाला, ‘साहेब, दिवाळी आहे. जाऊद्या की.’ तसा पोलीस म्हणाला ‘आमी पण तेच म्हणतो.’ यानवाला समजून चुकला. दोघे जरा वेळ बाजूला गेले आणि थोड्याच वेळात यान चंद्राच्या दिशेने गेले.
प्रसंग दुसरा..
एका वर्तमानपत्राचे कार्यालय. सकाळची बैठक सुरू आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर पृथ्वी, चंद्र, मंगळ आणि इतर आवृत्त्यांचे संपादक तसेच जाहिरात, छपाई, वितरण विभागाचे आणि व्यवस्थापनाचे प्रतिनिधी चर्चा करत आहेत. विषय आहे काल मंगळ आवृत्ती का लेट झाली आणि मार्केटमध्ये अंक उचलला गेला नाही त्याची जबाबदारी कोणाची. छपाई विभागाने सांगितले की संपादकीय विभागाकडून पाने उशिरा आली. त्यावर संपादकीय विभागाने सांगितले की जाहिरात विभागाकडून लुनासा स्पेस सिटीची (चंद्रासाठी लुनार आणि लवासा लेक सिटीशी साधम्र्य म्हणून) जाहिरात लेट आली. त्यामुळे पानाला उशीर झाला. तर जाहिरात विभागाचे म्हणणे होते, की एजन्सीकडून आरओ (रिलिज ऑर्डर) वेळेत आली नाही त्यामुळे त्यांचा नाईलाज होता. हा सगळा दैनिक काथ्याकूट झाल्यावर संपादकीय विभागाने आपली स्वतंत्र बैठक सुरू केली.
समूह संपादकांनी एकेका आवृत्तीच्या निवासी संपादकांना विचारणा केली, की बातम्यांचे मुख्य विषय काय आहेत. मंगळ आवृत्तीच्या संपादकांनी सांगितले, की तिथल्या निवडणुका जवळ आल्या आहेत. काही मुद्दे कळीचे ठरणार आहेत. सत्ताधारी पक्षाने ग्रहाच्या उत्तरेकडील मिथेनच्या आइस कॅपमधून पाणी बनवून ते थेट पाइपलाइनद्वारे मध्य भागातील वस्तीत आणण्याच्या सिंचन प्रकल्पात घोटाळा केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी तेथील आयर्न ऑक्साइडच्या (यामुळे मंगळाला लाल रंग आहे) याशिवाय एका स्थानिक पक्षाने मंगळाचे मूळ रहिवासी आणि पृथ्वीवरून जाऊन स्थायिक झालेले परप्रांतीय यांच्यातील वादाला फुंकर घालत वातावरण तापवण्यास सुरुवात केली आहे. चंद्र आवृत्तीच्या संपादकांनी सांगितले, की तेथे इंटरप्लॅनेटरी फुटबॉल चँपियनशिप स्पर्धेचे उद्घाटन होत आहे. तर पृथ्वी आवृत्तीच्या संपादकांना तेथे होऊ घातलेल्या मिस सोलर सिस्टिम (सूर्यमाला) ब्युटी काँटेस्टची बातमी महत्त्वाची वाटत होती.
प्रसंग अर्थातच काल्पनिक आहेत. त्यातील गंमतीचा भाग सोडून देऊ. पण भविष्यात असे होणारच नाही, असे सांगता येत नाही. किंबहुना मानवजातीची पावले त्या दिशेने पडत आहेत. नेमके नाही, पण कदाचित ५0, शंभर किवा दीडशे वर्षांत ही गंमतीशीर वाटणारी कल्पना वास्तव असेल. तपशील, तंत्रज्ञान, साधने वेगळी असतील. पण मानवी भाव-भावना, वृत्ती-प्रवृत्ती, प्रेरणा तशाच असतील. अशाच एका शाश्वत मानवी प्रेरणेत या सर्व विकासाची बिजे आहेत.. अज्ञाताचा वेध घेण्याची प्रेरणा. त्यातूनच माणसाने समुद्रसफरी केल्या. नवीन प्रदेशांचा शोध घेतला. अमेरिगो, वास्को-द-गामा आदी दर्यावर्दींच्या सफरींनी पुढील वसाहतवादाची बिजे रोवली. त्या काळी माणूस जसा समुद्राच्या अथांग पसार्यात चाचपडला, भरकटला असेल, तसाच आज तो अवकाशाच्या पोकळीत धडपडतो आहे. सोव्हिएत युनियनने ४ ऑक्टोबर १९५७ रोजी सोडलेल्या स्पुटनिक या कृत्रिम उपग्रहाने अवकाश युगाची नांदी केली. त्याने सोव्हिएत युनियन आणि अमेरिकेत अवकाश स्पर्धा लागली आणि अमेरिकेने २0 जुलै १९६९ रोजी मानवाला चंद्रावर उतरवले. त्याच्याही पुढे याने सूर्यमालेचा वेध घेऊ लागली.
आता भारतानेही या क्षेत्रात महत्त्वाचे टप्पे पार केले. इस्रोने चांद्रयान, मंगळयान मोहिमा यशस्वी केल्या. काही जण म्हणतात की भारतासारख्या गरीब देशाला हवेतच कशाला असले उद्योग. इथे माणसे उपाशी मरताहेत आणि हे निघाले मंगळावर. पण तीस-चाळीस वर्षांपूर्वी असाच विचार केला असता तर आज देशभरात जे टेलिव्हिजन वाहिन्यांचे जाळे पसरले आहे, मोबाईल फोन क्रांती झाली आहे, आपण जे एटीएमवर पैसे काढतो आहोत, ते जमलेच नसते. याच उपग्रहांनी संदेशवहनात क्रांती घडवली, देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वेध घेऊन प्रभावी नियोजन करणे शक्य केले, हवामानाचे तसेच पिकांचे अंदाज बांधणे सुकर केले आणि अन्नधान्य उत्पादनात हातभारच लावला.
मंगळ मोहिमेने सामान्य माणसाच्या जीवनात ताबडतोब काही फरक पडणार नाही. पण अशा मोहिमांच्या अनुषंगाने जे तंत्रज्ञान विकसित होते (स्पिन-ऑफ टेक्नॉलॉजीज) त्यातून आपले जीवन सुखकर आणि समृद्धच होणार आहे.
पण मानवी मन इतके साधे-सरळ नाही. एकदा वैज्ञानिक कुतुहल शमले की ते अधिकार गाजवण्याकडे वळेल. त्यातूनच आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत युरोपियनांच्या वसाहती उभ्या राहिल्या. तसं बघायला गेलं तर आऊटर स्पेस ट्रिटी नावाचा १९६७ मध्ये केलेला एक करार आहे, त्यानुसार अनेक देशांनी अंतराळाचा वापर शस्त्रास्त्रे तैनात करण्यासाठी किंवा त्यांच्या चाचण्या घेण्यासाठी न करण्याचे मान्य केले आहे. पण जगाच्या इतिहासात अशा कित्येक करारांचे सांगाडे विखुरलेले दिसतात.
तसे नसते तर आज अनेक देशांनी आपल्या सेनादलांच्या एरोस्पेस कमांड्स स्थापन केल्या आहेत, त्या दिसल्या नसत्या. इतिहास साक्षी आहे, अणुभंजन करून प्रचंड ताकद मोकळी करता येते कळल्यावर त्यातून उर्जानिर्मिती होण्याआधी अणुबाँब तयार झाला आणि वापरला गेला होता. स्वनातीत वेगाची (सुपरसॉनिक) प्रवासी विमाने तयार होण्याआधी लढाऊ विमाने तयार झाली होती. आणि अग्निबाणातून कृत्रिम उपग्रह सोडण्यापूर्वी त्यांचा वापर क्षेपणास्त्रे म्हणून (नाझी र्जमनीची व्ही-१ आणि व्ही-२ रॉकेट्स) झाला होता.
उद्या पृथ्वीवरील साधनसंपत्ती अपुरी पडू लागेल तेव्हा त्याच्या शोधात तो अवकाशाकडेच वळणार आहे. आता प्रश्न होणार की नाही याचा नाही. तर कधी होणार याचा आहे. अवकाशात, जवळपासच्या ग्रहांवर मानवी वसाहती होणार. बरे वाटो किंवा वाईट, त्यांच्या वर्चस्वासाठी संघर्षही होणार. आपल्याला ठरवायचंय, त्यासाठी तयारीत राहायचं की नाही.
(लेखक लोकमत टाईम्सच्या मुंबई आवृत्तीमध्ये उपसंपादक आहेत.)