शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पबद्दल एवढे विवाद चालू आहेत पण तिथलं वातावरण तरीही थंडच कसं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 03:00 IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेतला भ्रष्टाचार सिद्ध होऊनही अमेरिकन जनता मात्र थंड आहे. ट्रम्प यांच्यावर खटला दाखल करता येईल का, महाभियोग चालवता येईल का, याविषयीही माध्यमांमध्ये खल चालू आहे; पण ट्रम्प आणि मुख्य म्हणजे जनता; दोघांनाही त्याचं काही सोयरसुतक दिसत नाही.

-निळू दामले

ट्रम्प यांचे प्रचार मोहीमप्रमुख मॅनाफोर्ट आणि त्यांचे कायदेशीर सल्लागार कोहेन या दोघांनी अमेरिकन कोर्टात गुन्हे कबूल केले. आर्थिक गुन्हे, भ्रष्टाचार, बेकायदेशीर आर्थिक व्यवहार, बेकायदेशीर व्यवहार लपवून ठेवणे हे आरोप होते, दोघांनी ते मान्य केले, कोर्टानं त्यांना दोषी ठरवलं. पैकी कोहेन यांची कबुली  चक्रावून टाकणारी आहे. ट्रम्प यांच्या वतीनं, त्यांच्या सांगण्यावरून, ट्रम्प यांच्या सेक्सविषयक भानगडींची वाच्यता होऊ नये यासाठी आपण लाच दिली अशी कबुली कोहेननी दिली आहे. हे पैसे मोहीम फंडातून दिले गेले. 

अमेरिका दुभंगलेली आहे. ट्रम्प सर्मथक आणि ट्रम्प विरोधक. माध्यमांचीही तशी विभागणी झालीय. वाहिन्यात सीएनएन ट्रम्प विरोधात आणि फॉक्स न्यूज ट्रम्पच्या बाजूनं. छापील माध्यमांत बहुतेक मोठे पेपर ट्रम्पच्या विरोधात आणि अनेक लहान आणि मध्यम पेपर ट्रम्प यांच्या बाजूला. डेमॉक्रॅटिक पक्ष ट्रम्प यांच्या विरोधात, रिपब्लिकन पक्ष ट्रम्प यांच्या बाजूनं. कुठल्याही पक्षात नसलेले लोकही सुमारे 15 टक्के आहेत. त्यांचं म्हणणं की एकूणच व्यवस्था भ्रष्ट आहे, दोन्ही पक्षाचे लोक भ्रष्ट आहेत, याला झाकावा आणि त्याला उघडा करावा येवढंच.

ट्रम्प विरोधकांचं म्हणणं की, आता ट्रम्प बेकायदेशीर वागतात हे सिद्ध झाल्यानं त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांना अध्यक्षपदावरून हटवावं. रिपब्लिकन पक्षाच्या लोकांचं म्हणणं की मॅनाफोर्ट आणि कोहेन भ्रष्ट असतील तर त्यांना शिक्षा व्हावी; पण त्याचा अर्थ ट्रम्प दोषी आहेत असा होत नाही. ट्रम्प ग्रेट काम करत आहेत, त्यांनी नोक-या निर्माण केल्या आहेत, ते पहाता बाकीचे आरोप महत्त्वाचे नाहीत. विरोधी पक्ष, सुरक्षा यंत्रणा, तपास यंत्रणा यांना ट्रम्प यांचा उत्कर्ष पहावत नसल्यानं ते ट्रम्प यांना बदनाम करण्याची खटपट करत आहेत. वरील खटले त्या प्रयत्नांचाच भाग आहेत, असं त्यांचं म्हणणं. 

अमेरिकेतील विश्वशाळांत कायदा विषय शिकवणारे आणि नामांकित वकील अशा दोन्ही वर्गांत ट्रम्प दोषी ठरलेत यावर एकमत आहे. त्यांच्या मते बेकायदेशीर देणग्या आणि निवडणूक मोहीम कायद्याचा भंग असे दोन्ही गुन्हे आता सिद्ध झाले आहेत. आरोप ट्रम्प यांच्यावर नसले तरी त्यात ट्रम्प गुंतलेले आहेत हे पुरेसं सिद्ध झालं आहे. त्यामुळं आता स्वतंत्रपणे ट्रम्प यांच्यावर खटला होऊ शकतो. परंतु अमेरिकन कायद्यानुसार प्रेसिडेंटवर फौजदारी खटला भरता येत नाही. त्यामुळं त्या बाबतीत मॅनफोर्ट, कोहेन यांना दहा ते पन्नास वर्षं इतकी शिक्षा झाली तरी ट्रम्प यांना शिक्षा होऊ शकत नाही.

अध्यक्षाकडून गुन्हा घडला तर त्यांच्यावर महाअभियोग चालवून त्यांना पदावरून हाकलता येतं. वरील गुन्हे महाअभियोग चालवण्यासाठी पुरेसे आहेत असं वकिलांचं म्हणणं आहे. ट्रम्प सर्मथक वकिलांचं म्हणणं मात्र हे आरोप सिद्धच होत नाहीत, ते महाअभियोगाला पुरेसे नाहीत असं आहे.

कोर्ट किंवा संसद ट्रम्पवर कारवाई करू शकतील की नाही या बद्दल राजकीय जाणकार गोंधळात आहेत. काँग्रेस आणि सिनेट या दोन्ही सभागृहांनी प्रेसिडेंटला घालवण्याचा ठराव मान्य करावा लागतो. आजघडीला सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचं बहुमत आहे. आज घडीला पक्षातले लोक ट्रम्प यांच्या विरोधात मतदान करण्याच्या मूडमध्ये नाहीत. काहीही करून त्यांना वाचवायचं असा त्यांचा मूड आहे. ट्रम्प भले बेकार माणूस असेल; पण त्यांना घालवलं तर पुढल्या निवडणुकीतही आपला उमेदवार पडेल या भीतीनं ट्रम्प यांना वाचवायच्या विचारात सर्व जण आहेत. निक्सन वॉटरगेट प्रकरणात दोषी ठरले तेव्हाही संसदेत त्यांच्या पक्षाचं बहुमत होतं. परंतु त्यांच्याच पक्षातल्या काही शहाण्या लोकांनी निक्सनना राजीनामा देण्याचा सल्ला दिला. मांडवळ अशी होती की, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी प्रेसिडेंट होणारे फोर्ड त्यांना क्षमा करतील, म्हणजे त्यांची चौकशी होणार नाही, दोषाचा ठप्पा त्यांच्या चारित्र्यावर लागणार नाही. या तडजोडीला निक्सननी मान्यता दिल्यानं निक्सननी राजीनामा दिला, प्रकरण मिटलं. आज रिपब्लिकन पक्षात असे कोणी शहाणे उरलेले दिसत नाहीत. आणि समजा एखादा तसा निघाला तरी एखाद्या माणसाचं म्हणणं ट्रम्प ऐकतील याची शक्यता नाही. बहुसंख्य रिपब्लिकन खासदार या ना त्या कारणानं ट्रम्प यांना टरकून आहेत.

ज्या दिवशी दोन्ही निकाल आले तेव्हा ट्रम्प सिनेटच्या निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी न्यू जर्सीमध्ये होते. या निकालाचा त्यांच्यावर काहीही परिणाम दिसला नाही. त्यांची प्रतिक्रि या अशी - मॅनाफोर्ट हा चांगला माणूस आहे, त्यानं आजवर रेगनसह अनेक प्रेसिडेंटांना मदत केली आहे, जे घडलं ते वाईट घडलंय. कोहेन हा तर वाईटच वकील होता. कोणालाही खड्डय़ात जायचं असेल तर त्यानं कोहेनना वकिली करायला सांगावं. दोन्ही निकालांचा रशियन हातमिळवणीशी संबंध आहे, असं मला वाटत नाही. ट्रम्प यांची मोहीम टीम आणि रशिया यांच्यात संगनमत होतं काय, रशियानं अमेरिकेतल्या निवडणुकीत ढवळाढवळ केली काय याची चौकशी सध्या विशेष वकील मुल्लर करत आहेत. ते आरोप सिद्ध झाले तर ट्रम्प यांचे वांधे होतील. ट्रम्प सतत म्हणत आहेत की, रशियानं ढवळाढवळ केलेली नाही, रशिया निर्दोष  आहे. वरील दोन निकालांचा रशियन ढवळाढवळीशी थेट संबंध नाही हे खरं आहे. परंतु कोहेन यांच्या वकिलानं पत्रकारांना सांगितलं आहे की, रशिया प्रकरणातही कोहेन यांच्याकडं खूप महत्त्वाची माहिती आहे, ती माहिती कोहेन मुल्लर यांना देतील आणि त्यामुळं ट्रम्प अडचणीत येऊ शकतील.

इंदिरा गांधींनी निवडणूक कायद्याचा भंग केला असं कोर्टानं मान्य केल्यानंतर भारतभर आंदोलनाची लाट पसरली, आणीबाणी लागली. इथं अमेरिकेत तसं काही घडताना दिसत नाहीये. एकुणात लोकांमध्ये एक सिनिसिझम पसरलाय, एकूण राजकारणाचं खरं नाही, अमेरिकन लोकशाही व्यवस्थाच बिघडलीय, सगळेच खासदार आणि प्रेसिडेंट भ्रष्ट असतात, त्यामुळं ट्रम्प यांच्यावर आरोप सिद्ध झालेत यात फार काही घडलंय असं लोकांना वाटत नाहीये.आयडाहोमध्ये रस्ते शांत आहेत. बारमध्ये आणि पबमध्ये माणसं शांतपणे दारूचे घुटके घेत बसलेत. मॉलमध्ये खरेदी छान चाललीय. कॉलेजं ठीक चाललीत. कोणी तावातावानं चर्चा करताना दिसत नाहीये. लोकं म्हणताहेत आमचं चांगलं चाललंय. कशाला त्या ट्रम्प चर्चा?.

(ज्येष्ठ पत्रकार असलेले लेखक सध्या अमेरिकेत आहेत. ट्रम्प सर्मथक आयडाहो राज्यात फिरून त्यांनी घेतलेला हा कानोसा.) 

damlenilkanth@gmail.com