संशोधकांच्या डोळ्यांत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 06:00 AM2020-12-13T06:00:00+5:302020-12-13T06:00:06+5:30

फ्लोरिडाच्या किनाऱ्यापासून १६०० किमी अंतरावर प्युर्टो रिको नावाचं बेट आहे.  या अमेरिकन बेटावर अरेसिबो दुर्बीण १९६३ पासून पृथ्वीची दृष्टी बनून काम करत होती. ती अचानक तुटली.

Tears in the eyes of researchers due to arecibo telescope | संशोधकांच्या डोळ्यांत पाणी

संशोधकांच्या डोळ्यांत पाणी

Next
ठळक मुद्देया दुर्बीणीवर काम करून गुरुत्वीय तरंगांचा पहिला पुरावा शोधणाऱ्या दोन शास्त्रज्ञांना नोबेलने सन्मानित करण्यात आले होते. आतापर्यंत ही दुर्बीण जगासाठी मोठी सहाय्यकारी ठरलेली होती.

- पवन देशपांडे

अनेक वर्षांपासून साथ देत असलेली वस्तू जुनी झाली असली तरी ती जपण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करत असतो. त्या वस्तूचा वापर कमी झाला असला तरी त्या वस्तूमुळे झालेल्या फायद्याची जाण असते. त्यामुळे जेव्हा ती वस्तू नाहीशी होते, फुटते-तुटते तेव्हा वाईट वाटल्याशिवाय राहात नाही. तसंच काही अवकाश संशोधकांचं झालं असणार. त्यांच्या डोळ्यात पाणी नक्कीच आले असणार. गेली अनेक वर्षे जगातील सर्वांत मोठी दुर्बिण म्हणून ज्या दुर्बिणीने सन्मान मिळवला होता ती अचानक तुटली. कोसळली आणि तिचे अक्षरशः तुकडे-तुकडे झाले. अरेसिबो नावाची दुर्बीण गेली ५० हून अधिक वर्षे या पृथ्वीला अवकाशातील धोक्यांच्या सूचना देत होती.

फ्लोरिडाच्या किनाऱ्यापासून १६०० किमी अंतरावर प्युर्टो रिको नावाचं बेट आहे. या अमेरिकन बेटावर ही अरेसिबो दुर्बीण १९६३ पासून पृथ्वीची दृष्टी बनून काम करत होती. आतापर्यंत अनेक भूकंप, अनेक वादळे या दुर्बिणीने झेलली. पण, ती डगमगली कधीच नव्हती. ही दुर्बीण म्हणजे पृथ्वीला सतर्कतेचा इशारा देणारे अस्त्र होते. या अरेसिबोला पृथ्वीचा डोळाही म्हटले जात होते. पृथ्वीवर एखादी उल्का कोसळणार आहे का, ती किती जवळून जाणार आहे, पृथ्वीवर काही संकट येणार आहे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ही दुर्बीण शोधायची.

गेल्या आठवड्यात या दुर्बीणीवर लटकत्या अवस्थेत असलेला ९०० टनांचा भाग खालत्या गोलाकार रिफ्लेक्टर डिशवर कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. संपूर्ण रिफ्लेक्टरचे तुकडे झाले. तसे पाहिले तर या दुर्बीणीचे काम संपले असे जाहीर करून, ती पूर्णपणे काढूण घेण्याचे नियोजन होते. पण, तसे करण्याआधीच दुर्बीणीवर लटकत असलेला भाग तुटला आणि खाली पडला. त्यामुळे जगातील अवकाश संशोधन क्षेत्रातील आश्चर्य नाहिसे झाले आहे.

या दुर्बीणीवर काम करून गुरुत्वीय तरंगांचा पहिला पुरावा शोधणाऱ्या दोन शास्त्रज्ञांना नोबेलने सन्मानित करण्यात आले होते. आतापर्यंत ही दुर्बीण जगासाठी मोठी सहाय्यकारी ठरलेली होती. शिवाय प्युर्टो रिको या बेटाच्या शिरपेचातील मानाचा तुराही होती. खास ही दुर्बीण पाहायला दरवर्षी ९० हजार लोक यायचे. आता तेही नष्ट झाले आहे. या दुर्बीणीच्या माध्यमातून अवकाश संशोधनाचे काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना दुर्बिणीच्या तुटण्याचे आतीव दुःख नक्कीच झाले असणार यात, तीळमात्र शंका नाही. त्याहूनही पृथ्वीचा डोळा निकामी झाला, याची सलही त्यांच्या मनात असणार.

(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत सहायक संपादक आहेत.)

Web Title: Tears in the eyes of researchers due to arecibo telescope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.