शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

ता थै...दोन शब्दांमधून निर्माण झालेल्या विश्वाची जादू उलगडताना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 2:35 PM

नृत्य आणि जगण्यातले ताणेबाणे अचूक गुंफणाऱ्या पंडित बिरजू महाराज यांच्याबरोबर गप्पांच्या एका सकाळी...

वन्दना अत्रे

‘माझे वय वाढत गेले हे खरे आहे. ते वाढायचेच !..पण बाकी मला विचाराल, तर तेव्हा आणि आजही मी जेव्हा रंगमंचावर जातोतेव्हा ‘तोच’ तर असतो ! बंदिश सुरू होते तेव्हा मी नृत्य करीत नसतो, त्या स्वरांच्या माध्यमातून पूजा करीत असतो... माझ्या समोर उत्कंठेने बसलेल्या रसिकांना म्हणतो, आलात? हे आसन घ्या आणि व्हा स्थानापन्न !मग सावकाश त्यांचे पाय धुतो. पायाला थंड, सुगंधी चंदन लावतो, गळ्यात सुगंधी माळा घालतो, निरंजन-धूप लावून त्या प्रकाशात त्यांना निरखून बघतो...जेव्हा द्रुत लय वेग पकडू लागतेतेव्हा सुरू होते निरोपाची तयारीआणि पुन्हा भेटण्याचा वादा...ही पूजा म्हणजे माझे नृत्य.या प्रकाशातच मलामाझे आयुष्य दिसत असते...रंगमंचावर जातो तेव्हा माझी भूक, तहान,माझे वय, त्या वयाची दुखणी आणि वेदनाहे सगळे कधीच मागे राहिलेले असते.एक तेजस्वी प्रकाश असतो माझ्या आसपासआणि त्यात झिरपणारे बासरीचे स्वर...त्यात सगळे विरून जाते..’ 

अगर उंगलिया बांसूरी नाही छेडेगी तो बांसूरी नाही बजेगी, जबतक तानपुरा नाही छेडते तबतक सूर सूर नाही आयेगा और भवरा फूलको नाही छेडेगा तो फूल नाही खिलेगा... छेडना है, तो जीवन है...’- मिस्कीलपणे पंडित बिरजू महाराज बोलत होते. नाशिकमधील दातारांच्या शेतातील बंगल्यात सकाळी- सकाळी गप्पा सुरू होत्या. भोवती रसिकांचा गराडा नव्हता, नव्हती कोणत्या कार्यक्रमाची धांदल. उलट महाराजजींना आवडणारा प्रसन्न निसर्ग त्यांना निवांत करीत होता. गावापासून दूर असलेलं सुंदर, निवांत ठिकाण. तिथेच दुसऱ्या दिवशी अगदी मोजक्या रसिकांशी ते गप्पा मारणार होते. अंगात एक साधा पांढरा, धुवट शर्ट. गळ्यात तुळशीची माळ. आणि एरवी चेहºयावर ऐंशीचे वय दाखवणारा काहीसा थकवा. पण बोलायला लागले की थेट रंगमंचावरील महाराजजींची आठवण यावी, अशी तडफ आणि आपला मुद्दा सांगण्यासाठी सहज होणाºया हस्तमुद्रा. जातिवंत नजाकत व्यक्त करणाºया...!...जीवनातले हे छेडछाडीचे तत्त्वज्ञान ते सांगत असताना त्यांच्यासमोरच त्यांचा भगवान, दैवत... हातात बासरी धरलेल्या ठाकूरजीची, कृष्णाची एक सुंदर मूर्ती होती. आणि त्या ठाकूरचा वेडा असलेला हा भक्त आपले नृत्याशी, ते आपल्याकडून करून घेणाºया कृष्णाशी, आणि नृत्यातून व्यक्त होणाºया त्याच्या जगाविषयी बोलत होता.हे जग जसे यमुनेचे आणि त्यात न्हाणाºया गोपींचे, राधेच्या डोळ्यातून दिसणाºया कृष्णाच्या प्रतिबिंबाचे तसे हे जग आधुनिक काळातील संगणकाचे आणि फायलींचेसुद्धा...! या जगात असलेले त्यांचे सखे-सोबती? घुंगरू, हार्मोनियम, तबला, सतार, सरोद अशी घरात असलेली सगळी वाद्ये आणि कुंचला, कागद, कागदावर कविता लिहिणारे कलमसुद्धा...!अखंड किनाºयावर ये-जा करणाºया समुद्राच्या लाटांसारखी कितीतरी विचारांची, कल्पनांची वर्दळ मनात अखंड सुरू असते मग उत्तररात्री कधी ती कल्पना समोरच्या कॅनव्हासवर उतरते कधी एखाद्या छोट्या कवितेच्या रूपाने.. पण मनात सुरू असलेली गिनती कधी थांबत नाही आणि त्यातून दिसणाºया नृत्याच्या लवचिक, वेगवान आकृती पाठ सोडत नाहीत. मला एकदम आठवण आली ती खूप वर्षांपूर्वी नाशिकमध्ये झालेल्या एका नृत्य शिबिराची. विद्या आणि सुनील या कलावंत जोडप्याने आयोजित केलेल्या एका नृत्य शिबिरात महाराजजींची भेट झाली तेव्हा त्या हॉलमध्ये अनेक तरुण मुलींचे नृत्य शिक्षण सुरू होतेच, भोवतालच्या भिंतीवर नृत्याची कितीतरी रेखाचित्रे लावलेली होती. प्रत्येक चित्र म्हणजे काळ्या शाईने काढलेल्या मोजक्या रेघा होत्या, पण त्या चित्राच्या नृत्यातील गिरकीचा जोम, त्या गिरकीत आलेला हाताच्या फेकीचा वेग, हवेत उडत असलेल्या अंगरख्याचा घेर असे कितीतरी बारीक-सारीक तपशील त्यातून व्यक्त होत होते... ‘रातको जाब निंद नही आती तब ये करता हुं...’ केसातून हात फिरवत महाराजजींनी मिस्कीलपणे त्या चित्रांकडे बोट दाखवत म्हटले...निंद क्यो नही आती? - तर बाहेर वाजणाºया झाडांच्या झावळ्या, रातकिड्यांचे गाणे, कधी एकाद्या गावातल्या समुद्राच्या लाटांचा आवाज या आणि अशा कितीतरी गोष्टींमधून त्यांना गिनती सुचत असते... मग अशा वेळी करणार काय?नृत्याला चित्रातून मांडण्याचा हा प्रयत्न बघत असताना त्या ठिकाणी चर्चा होती ती महाराजजींनी रचलेल्या बंदिशींची, या बंदिशींना लावलेल्या चालींची, त्या चाली ऐकवताना समोरच्या हार्मोनियमवर त्यांची बोटे सफाईने फिरत होती आणि ती फिरता-फिरता ते कधी गाऊ लागले ते त्यांनासुद्धा समजले नाही... नृत्य, संगीत, गायन, चित्रकला असे बरेच काही, आपले जगणे सुंदर करणारे आणि एकमेकांपासून वेगळे काढता न येणारे... कलेकडे आणि जगण्यातील त्याच्या स्थानाकडे असे समग्रतेने बघण्याची ही दृष्टी कुठे मिळाली असेल त्यांना?- या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे कधीतरी मागायचे हे मनात असताना आज ते पुन्हा भेटत होते. आणि बोलत होते आपले सर्वांचे जीवन व्यापून असलेल्या संगीताबद्दल, आणि लयीबद्दल...महाराजजी सांगत होते, 

‘या पृथ्वीवरील जगण्यात संगीत नसते तर ते जगणेच नसते, कदाचित पशूच्या जगण्यापेक्षा नीरस, अर्थहीन. पंचमहाभूतांनी या शरीराला आणि पृथ्वीला जसे तोलून धरलेय तसे तिला चैतन्य दिले आहे ते संगीताने आणि लयीने. नृत्याचा पहिला शब्द त्ता. ईश्वराला उद्देशून म्हटलेला. आणि त्याला जोड मिळाली थै या इकाराची. इकार म्हणजे लास्य. एखाद्या बाणाप्रमाणे सुटणारा हा इकार ही सृजनाची शक्ती. या त्ता आणि थैमधूनच निर्माण झाले हे विश्व, ही सृष्टी.. त्यामुळे नृत्य म्हणजे केवळ तबल्याचे काही बोल आणि हस्तमुद्रा नाहीत... त्यात स्वर आहेत, रंग आहेत, अभिनय हे सगळे आहेच; पण जगण्यात जे जे काही आहे, आनंदापासून ते जीवघेण्या ताणापर्यंत ते सगळे काही आहे.. दिवसाचे चोवीस तास फक्त संगणकावर बटणे बडवत असलेल्या आणि त्यातच जगू बघणाऱ्या आमच्या माणसांना ‘माणूस’ म्हणून जगायला शिकवा अशी विनंती एका कंपनीनेच माझ्याकडे जेव्हा केली तेव्हा मला पुन्हा नव्याने पटले माझे नृत्य जगणे सुंदर करणारे आहे... लयीला, शब्दांना, सुरांना छेडणारे हे नृत्य नसते तर रस नसता आणि रस नाही तर जीवन कसले?...’ महाराजजींच्या एकूण जीवनप्रवासात रंगमंचावर त्यांना साथ देणाºया साथीदारांच्या गोष्टीही इतक्या अल्लाद गुंफलेल्या, की तबल्याच्या बोलातून नृत्याचे पदन्यास कधी वाहते होतात आणि नृत्याच्या लयीतून सारंगीचे आर्त स्वर कधी पाझरू लागतात, हे कळूसुद्धा नये !गप्पांच्या ओघात आठवण निघाली ती झाकीरभार्इंची! महाराजजी सांगत होते,‘काही वर्षांपूर्वीची गोष्ट. झाकीरभाई आणि मी एका रंगमंचावर होतो. यमुनेच्या काठावर कृष्णासोबत रंगलेली होली मी माझ्या अभिनयातून व्यक्त करत होतो. नि:शब्द असा तो अभिनय आणि त्यातून उधळले जाणारे असंख्य रंग झाकीरभाई बघत होते आणि ते बघता बघता त्यांच्या तबल्याच्या बोलातून ती होली रंग उधळू लागली. एकीकडे माझा अभिनय आणि दुसरीकडे एरवी निरर्थक वाटणारे; पण आता रंग उधळत असलेले तबल्याचे बोल.. फार अद्भुत अनुभव होता तो... तेव्हा मनात आले, शब्द कागदावर तसा निरर्थक दिसतो; पण त्यात रंग भरतो तो कलाकार. त्या शब्दांची विशिष्ट मांडणी कवितेला आणि दोह्याला जन्म देते, त्यातून निर्माण होणारी कंपने नृत्याला जन्म देतात. ही कंपने नसती तर नृत्य निर्माणच झाले नसते. संथ गतीने निर्माण होणारी आणि हळूहळू पावलांबरोबर वेग पकडणारी ही कंपने जेव्हा वेगाच्या परमोच्च बिंदूला पोचतात तेव्हा मला समोर दिसत असतो आपल्या आयुष्यातील सगळ्या भावनांचा एक घट्ट, एकरंगी दिसणारा; पण प्रत्यक्षात अनेक रंगांचे पदर असलेला गोफ... या प्रवासात समोर बसलेल्या श्रोत्यांच्या प्रत्येक भावनेला मी माझ्या नृत्यातून स्पर्श केलेला असतो. राग आणि रुसवा, विफलता आणि नैराश्य, उद्वेग आणि हतबलता, करुणा आणि वात्सल्य आणि त्याच्या बरोबरीने कधीतरी नक्की येणारी असीम शांतता.. सगळ्या भावना मागे टाकणारी, स्वस्थ करणारी शांतता..! नृत्य संपता - संपता मला अनुभवास येणारी शांतता समोरच्या हजारो श्रोत्यांमध्ये झिरपत जाताना मी बघत असतो तेव्हा कृतार्थ वाटते.. ठाकुरांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी आज परत एकदा पार पाडलीय अशी कृतार्थता... मग सांग मला, ही लय नसती आपल्या आयुष्यात तर जगणे कसे झाले असते..?’एका साधकाचे समृद्ध, तृप्त आयुष्य जगलेले महाराजजी हल्लीहल्ली थोडे मागे वळून बघू लागले असावेत. आत्ताही माझ्याशी बोलताना त्यांना मधूनच अम्मा आठवत होती. तिच्या सावलीतले लहानपण, तिच्या हातचा मार.. सगळेच आठवत होते.महाराजजी सांगत होते,‘माझ्या हातात देवाने मला दिलेला ठेका, लय आहे. ते सारे कोणत्या ढंगाने सजवायचे आणि मांडायचे ते माझे सृजन... माझ्या लहानपणी मी कोळश्याने भिंतीवर चित्र काढायचो, त्याबद्दल अम्माच्या हातचा खूप मारपण खाल्ला आहे; पण तेव्हा तो माझा अभिव्यक्तीचा ढंग होता. आता मनात फक्त तबल्याचे बोल आणि त्याच्या बरोबरीने लागणारे ध्यान एवढेच आहे. ते जेव्हा कॅनव्हासवर उतरते आणि ते कॅनव्हास विकत घ्यायला पन्नास - पन्नास हजाराची बोली लागते तेव्हा मला हसू येते...व्यक्ती तीच, अभिव्यक्ती तीच; पण प्रतिसाद किती वेगळा.. तेव्हा मनात येते कदाचित ही माझ्या साधनेची किंमत ! जगणे आणि कला यांना एकत्र जोडून ते समजावून सांगणाऱ्या कलाकाराच्या चिंतनाचे हे मूल्य असेल...’ पण महाराजजींचे सारे जगणे या मूल्याच्या कितीतरी पलीकडे पोचलेले ! वयाची आठ दशके पुरी झाली, तरी रंगमंचावर उभे राहते, तेव्हा त्यांचे शरीर तसेच असते... चिरतरुण !! त्याच जुन्या लयीचे आणि रंगांचेही !ते सांगतात, ‘माझे वय वाढत गेले हे खरे आहे. ते वाढायचेच ! .. पण बाकी मला विचाराल, तर तेव्हा आणि आजही मी जेव्हा रंगमंचावर जातो तेव्हा ‘तोच’ तर असतो ! बंदिश सुरू होते तेव्हा मी नृत्य करीत नसतो, त्या स्वरांच्या माध्यमातून पूजा करीत असतो... माझ्या समोर उत्कंठेने बसलेल्या रसिकांना म्हणतो, आलात? हे आसन घ्या आणि व्हा स्थानापन्न, मग सावकाश त्यांचे पाय धुतो. पायाला थंड, सुगंधी चंदन लावतो, गळ्यात सुगंधी माळा घालतो, निरंजन-धूप लावून त्या प्रकाशात त्यांना निरखून बघतो... जेव्हा द्रुत लय वेग पकडू लागते तेव्हा सुरू होते निरोपाची तयारी आणि पुन्हा भेटण्याचा वादा... ही पूजा म्हणजे माझे नृत्य. या प्रकाशातच मला माझे आयुष्य दिसत असते... रंगमंचावर जातो तेव्हा माझी भूक, तहान, माझे वय, त्या वयाची दुखणी आणि वेदना हे सगळे कधीच मागे राहिलेले असते. एक तेजस्वी प्रकाश असतो माझ्या आसपास आणि त्यात झिरपणारे बासरीचे स्वर... त्यात सगळे विरून जाते..’महाराजजींसमोर बसून हे सगळे ऐकत आणि बघत असताना माझ्या मनात पंचवीस वर्षांपूर्वीची, मनात आजही एखाद्या चित्राप्रमाणे स्पष्ट असलेली आठवण जागी झाली. नाशिकच्या रुंगठा हायस्कूलच्या प्रांगणात संगीत महोत्सव सुरू होता. कडाक्याच्या थंडीने आपल्या मऊ पांढºया दुलईत त्या खुल्या मैदानातील रसिकांना कवेत घेतले असताना महाराजजी रंगमंचावर आले. फिक्कट रंगाचा तलम अंगरखा, कमरेला बांधलेली ओढणी, डोळ्यात काळेभोर काजळ, कपाळावर उभा केशरी टिळा आणि पायात शेकडो घुंगरे... वातावरणात उत्तर रात्रीची शांतता. हातात माइक घेत त्यांनी विचारले,‘यहां काही बारीश हो रही है, उसकी आवाज सून रहे है ना आप?...’- ऐन गारठ्यात हे अवेळी बारीशचे संकट आले कुठून म्हणून शाली सावरत रसिक आभाळाकडे बघू लागले. आभाळ छान चांदण्यांनी लुकलुकत असताना समोरून त्या अवेळी आलेल्या बारीशीचे थेंब पडू लागले... टप... टप... हळूहळू थेंबांचा वेग वाढू लागला, पाऊस जोर धरू लागला आणि काही क्षणातच तो अनावर वेगाने कोसळू लागला. हा पाऊस पाडणारे महाराजजींच्या पायातील प्रत्येक घुंगरू त्यांच्या आज्ञेनुसारच हलत होते, वाजत होते... रंगमंचावर चहू अंगांनी ही घुंगरे वादळी पाऊस घेऊन येऊ लागली; पण तरी, हालत होती ती फक्त त्यांची घुंगरे बांधलेली पावले आणि ठेका मोजणारी हाताची बोटे... नृत्य म्हणजे केवळ हस्तमुद्रा किंवा पदन्यास किंवा अभिनय इतकेच नाही, तर पापणीची लवलवसुद्धा उगाचच होत असेल तर ती न करण्याची शरीरावरची हुकमत हे सांगणारा तो सगळा अनुभव होता... त्या रात्री रसिकांनी बघितला, अनुभवला तो निव्वळ कलाकार नव्हता, एक साधक होता. शरीराच्या पलीकडे असलेल्या नृत्याच्या एका विशाल प्रदेशात रसिकांना घेऊन जाणारा एक नृत्य साधक... पंडित बिरजू महाराज. आणि त्यांची साधना केवळ नृत्य शिकू-मांडू इच्छिणाºया कलाकाराची नव्हती, भोवतालच्या निसर्गाला, आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटकाला नृत्याशी जोडण्याचा एक वेगळाच सर्वसमावेशक असा प्रयत्न होता तो... तेव्हा त्यांच्या भोवती न दिसलेला आणि त्यांना सतत दिसत असलेला प्रकाश आज दिसत होता. कधीच न मावळणारा...

(लेखिका मुक्त पत्रकार आणिकला-संगीताच्या अभ्यासक आहेत.) vratre@gmail.com