देशाच्या विकासात तरुणांचे जास्तीत जास्त योगदान निश्चित करण्याची काळाची गरज असून त्यासाठी तरुणांना सक्षम करणे आवश्यक आहे. त्यांना तसे सक्षम बनवण्याची जबाबदारी शिक्षण व्यवस्थेची आहे. पण दर्जेदार उच्च शिक्षणाची आपल्या देशात वानवा आहे. जी काही थोडीफार चांगली विद्यापीठे वा संस्था आहे, तिथे शहरी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थ्यांचा टक्का जास्त आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी संख्या अजून वंचित आहे. ग्रामीण भागात उच्च शिक्षण घेण्याची परंपरा म्हणावी तेवढी रूजली नाही.
विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालविलेली शैक्षणिक चळवळ... एकलव्य अकॅडमी
प्रा. राजू केंद्रे
विदर्भमराठवाड्यातील पोरं बारावी झाल्याबरोबर पोलीस भरती, रेल्वे भरती, कर्मचारी चयन आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि इतर सरकारी खात्याच्या भरती परीक्षेच्या तयारीसाठी तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी, नागपूर आणि पुणेसारख्या ठिकाणी धाव घेतात. दरवर्षी अशा लाखो स्पर्धा परीक्षार्थ्यांची भर पडत आहे. त्यांचे पुढचे शिक्षण स्पर्धा परीक्षांच्या शिकवणीवर्गातून घडते. विद्यापीठांची जागा अशा खासगी शिकवणी सस्थांनी घेतल्याचे चित्र आज महाराष्ट्रभर दिसत आहे.शासकीय नोकरीतील संधी कमी असल्यामुळे तीन वर्षे, पाच वर्षे आणि दहा वर्षे परीक्षांच्या तयारीसाठी घालवूनही हाती यश लागण्याची शक्यता अत्यंत कमीच. असे असूनही सरकारी नोकरीचे प्रचंड आकर्षण, कुटुंबाचा आणि समाजाचा दबाव, पालकांच्या अपेक्षा, पर्यांयांबाबतची अनभिज्ञता यामुळे ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी स्पर्धेच्या दुष्टचक्रात फसलेले आहेत. आयुष्यातील महत्वाची वर्षे घालवूनही यश न आल्याने असे तरुण आत्मविश्वास हरवून शेवटी हताश होऊन बसतात. अशा तरुणांना उच्च शिक्षणाची वाट दाखवून समाज विकास क्षेत्रात करियरच्या पर्यायी संधी मिळवण्यासाठी एकलव्य हे तरुणांचे व्यासपीठ बनले आहे. ग्रामीण तरुणांची गरज लक्षात घेऊन ‘एकलव्य’ने विविध उपक्रम सुरू केलेले आहेत.विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या या चळवळीमार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी कार्यशाळा व संसाधने उपलब्ध केली जातात. यामध्ये विदर्भ (यवतमाळ), मराठवाड्यातल्या (बीड) अविकसित जिल्ह्यांमध्ये एकलव्यमार्फत घेण्यात आलेल्या कार्यशाळांमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, अजीम प्रेमजी युनिव्हर्सिटी, जे.एन.यू. आदीसारख्या अनेक नावाजलेल्या भारतीय, आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या संधीबाबत सोबतच प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती पुरविण्यात आली. इथेच न थांबता एकलव्यमार्फत २५ नोव्हेंबर २०१९ ते ०५ जानेवारी २०२० दरम्यान ४० दिवसाचा निवासी वर्ग यवतमाळ येथे चालविण्यात आला. त्यात वरील शिक्षण संस्थांच्या पूर्वपरीक्षेची तयारी करून घेण्यात आली.या वर्गामध्ये यवतमाळ, बीड, औरंगाबाद, बुलडाणा व अमरावतीसारख्या भागातून ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कौतुकाची बाब अशी की, नि:शुल्क असलेल्या या वर्गातून ४३ विद्यार्थी नुकत्याच झालेल्या २०२० च्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीच्या तयारीकरिता यवतमाळ येथे ३ दिवसीय निवासी शिबिर २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले.३० हजार पुस्तकांची देवाण-घेवाणग्रामीण महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, वाचन संस्कृती जोपासली जावी व गावागावातील ग्रंथालये ही केवळ वाचनकेंद्र न राहता गावाची शाश्वत विकासकेंद्र असावीत या उद्देशाने टीम एकलव्यने ‘गाव तिथे ग्रंथालय’ हा उपक्रम हाती घेतला. पुणेसारख्या शहरांतून आजवर या तरुणांमार्फत घेण्यात आलेल्या पुस्तक संकलन मोहिमांमधून ३० हजारांहून जास्त पुस्तके विदर्भ, मराठवाडा, कोकण विभागातील ३० हून अधिक ग्रंथालयांत पोचवली गेली आहेत. मागील दोन वर्षांपासून लोकांनी या उपक्रमास भरभरून मदत केली.