कथा. पायघोळाच्या गिरकीची!

By Admin | Updated: March 8, 2015 15:59 IST2015-03-08T15:59:50+5:302015-03-08T15:59:50+5:30

तब्बल पंचाहत्तर मीटर कापडाचा घेरेदार पायघोळ आणि अंगावर सुमारे वीसेक किलोंचा साज - मराठवाड्यातील लोककलावंत निरंजन भाकरे यांनी एक अद्भुत ‘रेकॉर्ड’ केले आहे.

Story Trend! | कथा. पायघोळाच्या गिरकीची!

कथा. पायघोळाच्या गिरकीची!

>शर्मिष्ठा भोसले
 
तब्बल पंचाहत्तर मीटर कापडाचा घेरेदार पायघोळ आणि अंगावर सुमारे वीसेक किलोंचा साज - मराठवाड्यातील लोककलावंत निरंजन भाकरे यांनी एक अद्भुत ‘रेकॉर्ड’ केले आहे. पण त्यांचे काम त्या पायघोळापेक्षाही कितीतरी मोठे आणि महत्त्वाचे आहे. एका ‘समकालीन’ लोककलावंताशी गप्पा..
--------------
‘कलियुगाची दादा ऐकावी थोरी, 
पुत्र होईल पित्याचा वैरी,
भ्रतारा सोडून घरोघरी फिरतील नारी, 
ऐसा माझा शकून ऐकावा निर्धारी’
- मार्मिक शब्दांत दूरदृष्टीची प्रचिती देत तिखट आणि रोखठोक शैलीत ऐकणार्‍याला शहाणपणाचे खडे बोल सुनावणारा गीतप्रकार म्हणजे भारूड! 
या प्रकारावर जबरदस्त पकड असणारे ख्यातनाम लोककलावंत निरंजन भाकरे. 
भारुडासारखी संवादी व समाजभान जपणारी लोककला त्यांनी कधीच सातासमुद्रापार पोचवली आहे, तेही आपल्या मातीचा आणि मातीतल्या प्रश्नांचा गंध जपत आणि संत एकनाथांच्या मोलाच्या परंपरेला समकालीनतेची जोड देत! 
मराठवाड्यातील सिल्लोडजवळच्या रिहमाबाद या लहानशा गावात राहून लोककलेची अखंड साधना करणारे भाकरे या अनोख्या अनुभवाविषयी विचारल्यावर सर्वप्रथम गुरू अशोक परांजपे यांच्यासाठी उत्स्फूर्त कृतज्ञताभाव व्यक्त करतात. 
ते सांगतात, ‘‘मुळात भारूड ही लोकांची, लोकांसाठीची कला आहे. त्यामुळे परांजपे सरांनी मला कलेचा मंत्र तर दिलाच; शिवाय माझ्यात सतत सामाजिक जाणही रुजवली. त्यामुळे आजही विविध समकालीन प्रश्नांवर मी वेळोवेळी स्पष्ट, परखड भूमिका घेत राहू शकलो. खरा लोककलावंत बनू शकलो.’’
 आज जागतिकीकरण आणि आधुनिकीकरणाच्या टेक्नोसॅव्ही युगातही आपल्या कलेला उत्तम प्रतिसाद मिळण्याचे कारण कालसुसंगत आविष्कार असल्याचे भाकरे यांना वाटते. तरुणांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना ते त्यांच्या भारुडातून थेट भिडतात. तरु णांच्या एरवी गावीही नसलेल्या प्रश्नांशी त्यांनाही नेऊन भिडवतात. प्रसंगी पुराणकथांची चिकित्सा करत समोरच्याला अंतर्मुख व्हायला लावतात. शिवजयंती आणि आंबेडकर जयंती एकत्र साजरी करायला लावतात आणि तिथे आपल्या रोखठोक शैलीत समाजवास्तवावर भाष्य करत या दोन्ही लोकोत्तर पुरु षांना अभिवादन करतात. मात्र लोकप्रियतेला सवंगपणाचा बोल लागणार नाही हेसुद्धा आजवर त्यांनी पुरेपूर जपले आहे. ते म्हणतात,
 ‘‘एखादा कार्यक्र म घेणारा मंच कुठला, त्याचा दृश्यादृश्य हेतू काय याचा पुरा विचार करूनच मी कार्यक्र म स्वीकारत असतो. कारण आपण कलावंत असण्यासह बांधिलकीही जपली आहे ती परिवर्तनवादाशी! त्यामुळे भिन्न मंचांवर गेलो तरी माझ्या भूमिकेतील एकवाक्यता मात्र अखंड तशीच असते. काहींना आपल्याच सोयीचे वा जिव्हाळ्याचे महापुरुष हवे असतात. मी मात्र याला वेळीच विरोध करत सर्वसमावेशक, विधायक भूमिकाच पुढे नेतो. कारण कलावंताने कुण्या मूठभर लोकांचा प्रचारक होऊ नये, सुधारक व्हावं!’’
लोककला सवंग रूपात सादर केली जाते आणि उथळ प्रसिद्धीचा खळखळाट फार वाहतो, याबद्दल भाकरे यांना तीव खंत आहे. ते म्हणतात,
‘‘लावणीचा ऑर्केस्ट्रा झाला, वाघ्या-मुरळी द्वैअर्थी संवादातून लोकांची घटकाभर करमणूक करू लागले. अनेक कीर्तनकार विनोदसम्राट म्हणवले जाऊ लागले. जागते, गोंधळी, आराधी देशोधडीला लागले. पोतराज अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकला. वाहिन्यांवरही या कलांचे भ्रष्ट रूपच अधिक समोर येते आहे. हे सारे फारच अस्वस्थ करणारे आहे.’’
 कलावंत समाजाचा आरसा असतो, त्याने लोकानुनय न करता समाजाला त्याचे बरे-वाईट रूप तेवढे दाखवत जावे यावर विश्‍वास असणार्‍या भाकरे यांनी निर्मल ग्राम योजनेपासून स्त्नीभ्रूण हत्त्या, अंधश्रद्धा निर्मूलन असे अनेकविध विषय सादरीकरणातून पोचवले आहेत. आईच्या निधनानंतर संत तुकडोजी महाराजांच्या अकरा हजार ग्रामगीता त्यांनी लोकांना वाटल्या. स्वत:ही अनेक गाणी, पोवाडे रचले. गावागावातील व्यसनाधीनतेची तीव्रता जाणवल्याने त्यांनी व्यसनमुक्तीसाठी इतके प्रभावी आविष्कार केले की त्यांच्या सादरीकरणानंतर आजवर अनेकांनी व्यसने सोडली. ग्रामजीवनातील सहज-सोप्या प्रतिमा, प्रतीके वापरून त्यांनी ऐकवलेल्या गाण्यांनी आजवर अनेकांच्या मनासह मेंदूचाही ठाव घेतला आहे. 
या प्रबोधनप्रवासात त्यांना सहचारिणी शांता भाकरे यांचीही पूर्ण साथ मिळाली आहे. माता-बाल संगोपन, बालकांचे प्रश्न यावर त्या अतिशय सखोल निरीक्षणे त्यांना सांगतात. त्यांच्या सहकारी कलाकारांपैकी शिवसिंह राजपूत यांना तर ते गुरुस्थानी मानतात. सोबतच औरंगाबादचे तबलावादक चतुरसिंह राजपूत, गावातला ढोलकीपटू गणेश ठुसे, विष्णू गोडबोले, शेखर भाकरे यांनाही या यशाचे श्रेय असल्याचे भाकरे सांगतात. नटसम्राट लोटू पाटील यांच्या सोयगावने तर भाकरे यांचे नाव देऊन एक अकादमीच सुरू केली आहे. 
अनेकदा संधी येऊनही या मनस्वी कलावंताने आपले गाव, रिहमाबाद कधी सोडले नाही. त्याचे कारण विचारल्यावर कातर स्वरात भाकरे सांगतात,
 ‘‘मी सहा वर्षांचा असताना ७१ साली वडील वारले. पुढे ७२ चा दुष्काळ पडला. वडिलांच्या जाण्याने आईचे मानसिक संतुलन बिघडले. दुष्काळात सुकडीची गाडी येत असे. दुष्काळावर गाणी रचून आम्ही बहीण-भाऊ ती गायचो. तिथंच मला माझ्यातला कलावंत गवसला. गावकर्‍यांना तेव्हापासून माझे अपार कौतुक आहे. मला माझ्या गावाने जगवले, वाढवले. मी गावाचे नाव सातासमुद्रापार नेऊ शकलो याचाच आनंद आहे. या मातीचे ऋण फेडायला मी अखेरपर्यंत इथेच राहणार आहे..’’ 
 
  ‘‘पूर्वी गावागावांत ग्रामजागले यायचे. पिंगळा, वासुदेव, पांगुळ, नंदीवाला, बहुरूपी यांना आता बदलत्या अर्थव्यवस्थेत आणि उद्ध्वस्त ग्रामव्यवस्थेत स्थान उरले नाही. मी माझ्या भारुडातून या हळूहळू विझत चाललेल्या प्रबोधनाच्या निखार्‍यांना यथाशक्ती फुलवतो. सामाजिक न्यायाचे तत्त्व प्रमाण मानून जागल्याची भूमिका निष्ठेने करतो. लोककला जगो, वाढो एवढंच दान मागतो!’’
 
घोळाची झोकदार गिरकी
कपड्यांचा कितीही शौक असला समजा, तरी एकावेळी एक माणूस जास्तीत जास्त किती मीटर कापड अंगावर बाळगू शकेल? आणि किती किलो वजनाचे दागदागिने अंगावर चढवू शकेल?
निरंजन भाकरे या लोककलावंताने   तब्बल ७५ मीटरचा पायघोळ आणि २0 किलोचा साज सांभाळत  आपल्या झोकदार-तालेवार गिरकीची मोहिनी जनसामान्यांसह वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डसवरही घातली. 
 
वीसेक हजारांचे तर नुसते कापडच!
भाकरे गेली पस्तीस वर्षे भारूड सादर करतात. या प्रवासात लोककलेचे अभ्यासक अशोकजी परांजपे यांनी एकदा त्यांना परभणीच्या राजारामबापू गोंधळी या अवलिया लोककलावंताविषयी सांगितले. साठ मीटरचा पायघोळ घालून त्यांनी भारूड सादर केले होते. त्या काळात तीस वर्षापूर्वी आयफेल टॉवरसमोर हा माणूस लोककलेची जादू पसरून आला होता! त्यातून भाकरेंना प्रेरणा मिळाली. 
तब्बल पंच्याहत्तर मीटरचा हा पायघोळ  उपद्व्याप करायला १८-२0 हजार खर्च आला. भाकरे या प्रयोगासाठी गेल्या २-३ वर्षांपासून पैसे जमवत होते.
 
समाधानाने भिजले डोळे
पायघोळ शिवून झाल्यावर आता हा प्रयोग कुठे करावा असा प्रश्न पडला तेव्हा इंडियन नेशनल थिएटर या मातब्बर नाट्यसंस्थेचे रामचंद्र वरक भाकरेंना म्हणाले, तू आमच्या मंचावर कर सादरीकरण! त्याचे तुला मानधनही देऊ आम्ही!  भाकरेंना तर आभाळच ठेंगणे झाले! १४ फेब्रुवारीला गिरगावला आयएनटीमध्ये हा प्रयोग झाला. रसिकांसह वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डसच्या प्रतिनिधींनीही भरभरून कौतुक पदरात टाकले. तो वजनदार पायघोळ  आणि साजसंभार सांभाळत एकूण आठ भारुडे भाकरे यांनी सादर केली. झब्ब्याचाच रूमाल, जाकिट आणि लुगडे बनवत  उस्फूर्त अविष्कार करत असताना मिळणारा प्रतिसाद आजही त्यांच्या डोळ्यात समाधानाचे पाणी उभे करतो.
 
( लेखिका ‘लोकमत’च्या औरंगाबाद 
आवृत्तीत वार्ताहर-उपसंपादक आहेत)

Web Title: Story Trend!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.