राणीची गोष्ट

By Admin | Updated: March 23, 2015 19:11 IST2015-03-23T19:11:12+5:302015-03-23T19:11:12+5:30

धर्मबंधनांपलीकडल्या वाटा शोधणा:या आणि त्यात विचारपूर्वक यशस्वी होणा:या एका तरुण, आधुनिक हिंदू- मुस्लीम जोडप्याचा सहप्रवास हे या कादंबरीचे मुख्य सूत्र आहे.

The story of the queen | राणीची गोष्ट

राणीची गोष्ट

सय्यद सलीम 
 
सय्यद सलीम हे तेलुगु भाषेतील आघाडीचे लेखक. त्यांचे लेखन परंपरेपासून निराळे आणि वेगळ्या प्रकारचे आहे. ‘कालुथुन्ना पुलाथोता’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमीच्या पुरस्कारासह आंध्र प्रदेश सरकारचे अनेक मानाचे पुरस्कार सलीम यांना मिळाले आहेत. त्यांच्या कथांचे कन्नड, हिंदी, इंग्रजी, मराठी व ओरिया भाषांतून अनुवाद झाले आहेत. ‘सोनेरी मेघ’ ही कादंबरी तसेच ‘तीन बाजू’ आणि ‘तलाक’ हे कथासंग्रह मराठीत प्रकाशित झाले आहेत. सय्यद सलीम सध्या नागपूर येथे आयकर विभागात संयुक्त आयकर आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. ‘राणीची गोष्ट’ ही त्यांची नवी कलाकृती. धर्मबंधनांपलीकडल्या वाटा शोधणा:या आणि त्यात विचारपूर्वक यशस्वी होणा:या एका तरुण, आधुनिक हिंदू- मुस्लीम जोडप्याचा सहप्रवास हे या कादंबरीचे मुख्य सूत्र आहे. या दीर्घ कथासूत्रतले चार संपादित आणि अनुवादित अंश या अंकापासून सलग  ‘मंथन’मध्ये प्रसिद्ध होतील.
--------------------
शर्मा डिग्री कॉलेज. कॉलेजचा पहिलाच दिवस. तिसरी घंटा वाजण्यापूर्वी वर्गात जाण्याच्या गडबडीत माङया जवळून जाणा:या मुलीच्या खांद्याला माझा धक्का लागला. मी लगेच थांबलो.
 ‘‘डोळे फुटले आहेत? पुन्हा  अशी चेष्टा केलीस तर तुङो डोळे काढून तुङया हातात देईन, समजलास!’’
तिचं वाक्ताडन संपताच मी म्हणालो, ‘‘सॉरी’’. 
त्या शाब्दिक हल्ल्याने मी प्रचंड घाबरलो होतो. माङो डोळे तिच्या लांबसडक वेणीवर खिळले होते, 
मी सहज बोलून गेलो, ‘‘केवढी लांब वेणी आहे.’’
 दोन पावलं पुढे गेलेली ती मुलगी झटकन् मागे वळली आणि माङयाकडे बघत म्हणाली, ‘‘ही वेणी नाही, नागीण आहे नागीण. काळी नागीण. वाह्यातपणा करशील तर ती तुला डसल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेव.’’
तिच्या त्या पावित्र्यानं मी घाबरून गेलो. वाटलं, मुलगी कसली ही तर अॅटम बॉम्ब दिसते आहे. आमच्या वर्गात एकूण आठ मुली होत्या. सगळ्याजणी पहिल्या बाकावर बसायच्या, मी त्यांच्या मागे. त्या मुलीच्या लांबलचक वेणीकडे पाहण्याची मला सवय लागली होती. 
एक दिवस क्लास संपल्यावर मला थांबवून ती  म्हणाली, ‘‘क्यों मिस्टर ! रोज माङयामागे बसून माङयाकडे बघत असतोस? ’’
‘‘हो, पण तुमच्याकडे नाही, तुमच्या वेणीकडे.’’
‘‘तुला  नाव ठाऊकेय ना माझं?’’
‘‘राणी’’ - मी म्हणालो.
‘‘नुसतं राणी नाही, नागराणी! म्हणजे नागांची राणी. मी डसले तर जीव जाईल.  सांभाळून रहा.’’
‘‘पण मला लांब वेणी आवडते त्यात वाईट काय आहे?’’ - मला तिचा रागच आला होता.
‘‘हे बघा, तुमच्या आवडीनिवडी तुमच्यापाशीच असू द्या. पण माङया वेणीकडे बघणं सोडून द्या.’’
‘‘तुमची वेणी लांब आहे. म्हणून मी बघतो. तुमचे केस कापून लहान करा, मी त्यांच्याकडे बघणार नाही.’’ 
‘‘ते मी बघीन. असला सल्ला देणारे तुम्ही कोण?’’ - तिने मला फटकारलं.
त्यावर मी म्हणालो, ‘‘ माङया डोळ्यांनी मला हवे ते मी पाहू शकतो. मला रोखणा:या तुम्ही कोण?’’
  ‘‘बायकांच्या वेण्या ही त्यांची खासगी बाब असते. त्याबद्दल असं बोलू नये.’’
‘‘लांब केस तुमचे असले, तरी त्याचं खरं सुख आम्हा बघणा:यांनाच तर मिळत असतं,’’ 
‘‘तुम्ही विनोदी गोष्टी वाचता का?’’ - ती.
‘‘तुम्ही कसं ओळखलं?’’ - मी.
‘‘नानाची टांग’’ - ती म्हणाली.
‘‘काय?’’- मला कळेना.
‘‘ पण हे वेणीविषयीचं आकर्षण कसलं बाई?’’  
‘‘माङया आईची मी वेणी घालून द्यायचो तेव्हापासून हे आकर्षण आहे. पण तिचे केस वीतभरदेखील लांब नव्हते. ’’ - मी म्हणालो.
 ती  खळखळणा:या नदीसारखी हसली.
‘‘आता मला एकदम खूप छान वाटतंय,’’ - तिच्या हसण्यामुळे धीर वाटून मी म्हणालो.
‘‘काय छान वाटतंय? माझं हसणं?’’ - ती.
‘‘तसं नाही, पण तुमच्या हसण्यानं मला तुमच्याविषयी वाटणारी भीती एकदम कमी झाली’’ - मी.
 ‘‘मुलगा असून मुलीला घाबरतोस?’’- ती अहो जाहो वरून ‘ए, जा’ वर आली त्यामुळे माझी भीड बरीच चेपली. राणी हसणं थांबवून म्हणाली, ‘‘कुठे राहातोस?’’
‘‘इस्लामपेट ’’
‘‘म्हणजे तू मुसलमान आहेस?’’
‘‘हो. माझं नाव सैफ. पूर्ण नाव सैफुल्लाह.’’ - मी म्हणालो आणि प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे पाहत तिला विचारलं, ‘‘असं का विचारलंस? मी मुसलमान आहे हे तुला अगोदरच ठाऊक असतं तर माङयाशी बोलली नसतीस का? मी दोस्ती करण्यालायक नाही का?’’
नागराणीचा चेहरा शांत होता.  क्षणापूर्वी माङयावर आग ओकणारी मुलगी  आता एकदम शांत, हसतमुख होती.  तिच्या पातळ ओठांवर हास्य उमललं होतं.
‘‘तू असं का म्हणालास, ठाऊक आहे? अल्पसंख्यक असल्यामुळे मुसलमानांमध्ये जी असुरक्षिततेची भावना आहे, तीच तुङया तोंडून बोलत होती. इतिहासाची पानं उलटून  बघशील तर तुङया लक्षात येईल की हिंदू मूलत: स्नेहपूर्ण आणि सहनशील असतात. हिंदूंच्या चांगुलपणामुळेच मुसलमान बादशहा या देशावर अनेक वर्षे राज्य करू शकले.’’ - ती श्वास न घेता भराभर बोलत होती. मी पाहातच राहीलो. वाटलं, ही मुलगी ठरवेल, तर उत्तम वकील होईल.
‘‘तू खूप छान विचार मांडलेस. तुङया विचारांशी मी सहमत आहे.’’ - मी तिची प्रशंसा केल्यामुळे ती क्षणभर लाजली. 
‘‘मी फालतू बडबड करतेय असं समजू नकोस हं,’’ ती पुन्हा बोलू लागली. ‘‘तू म्हणालास ना, की तू मुस्लीम आहेस, हे जर मला समजलं असतं तर मी कदाचित तुङयाशी बोलले नसते. आमच्याकडे असं काही नसतं. जातीपातीला, धर्माला आम्ही फारसं महत्त्व देत नाही. तू माङया घरी येऊन बघ म्हणजे तुङया लक्षात येईल.’’
‘‘कुठे राहातेस तू?’’
‘‘अग्रहार भागात.’’
‘‘अच्छा! म्हणजे तू ब्राrाण आहेस तर!’’
‘‘हो, वैदिक ब्राrाण. आगदेखील धुवून पुसून स्वच्छ करून घेणारा वंश आहे आमचा.’’
‘‘मी मुसलमान आहे हे तुङया घरच्यांना समजलं तर ते मला तुमच्या घरात पाऊल तरी ठेवू देतील का?’’
‘‘तू स्वत: घरी येऊन तर बघ. पुढच्या रविवारी येशील?  मुसलमान हे मैत्री करण्यालायक नसतात का, असा तू प्रश्न केला होतास. पण मैत्री करण्यासाठी मनं स्वच्छ असावी लागतात. स्वत:चं मन स्वच्छ आहे असं तुला वाटत असेल, तर नक्की ये.’’
क्क्क्क्क्क्
रविवारी सकाळी मला जाग आली तेव्हा काय करावं कळेना. तिच्याकडे जावं की जाऊ नये? गेलो नाही तर तिला वाटेल, याच्याच मनात किंतू आहे. पण समजा गेलो, आणि ती अडचणीत आली तर?  ते ब्राrाण आहेत. मी मुसलमान. शिवाय माझा स्वभाव संकोची.  काय करावं या विचारात मी संध्याकाळर्पयत गुंतून पडलो होतो. राणीचं बोलणं मला वारंवार आठवत होतं. 
अखेर मी तिच्याकडे जायचा निर्णय घेतला. मनात भीती होती, तरीही मी निघालो. अग्रहार भागात त्यांचं घर शोधायला फार वेळ लागला नाही. समोर अंगण, अंगणात बगिचा, कोप:यात विहीर, त्यावर रहाट बसवलेला. घर मोठं होतं. काही भागात भाडेकरू राहात असावेत.  खालच्या भागातल्या एका खोलीत राणी पुस्तक वाचत होती.  मला पाहताच ती म्हणाली, ‘‘आत ये. बराच उशीर केलास यायला? मला वाटलं, तू काही आता येत नाहीस.’’ तिच्या आवाजात कमालीचं मार्दव  होतं. 
 तिच्या समोरच्या खुर्चीत मी बसलो. राणी काही मिनिटाकरता वरच्या खोलीत जाऊन आली.
‘‘माङो वडील तुला भेटायला येताहेत खाली.’’
‘‘तू त्यांना माझं नाव सांगितलंस?’’
‘‘तुङया नावात काय असं वेगळं आहे?’’ - राणी मोठय़ाने हसली. 
‘‘पण माझं नाव त्यांना का नाही सांगितलं?’’
‘‘माङया आईबाबांना मी चांगली ओळखते. तुझं नाव त्यांना सांगण्याची गरज नाही. माङया वर्गात शिकणारा एक मुलगा आलाय, असं मी त्यांना सांगितलं, तेवढं पुरे’’ 
तेवढ्यात तिचे वडील आलेच.  पन्नासएक वर्षाचं वय.  उंच बांधा, सरळ नाक, भव्य कपाळ आणि चेह:यावर विलक्षण तेज.
राणी म्हणाली ‘‘हे माङो बाबा.’’
‘‘माझं नाव भास्करराव. मी हिंदी शिकवतो.’’ -त्यांनी स्वत:ची ओळख करून दिली.
मी उठून उभा होत म्हणालो, ‘‘नमस्कार’’.
 ते खुर्चीवर बसत मला म्हणाले, ‘‘तू खाली बस ना, उभा का आहेस? नाव काय तुझं?’’
आपलं नाव सांगावं की सांगू नये ह्या द्विधा मन:स्थितीत  धीर धरून राणीच्या वडिलांची नजर चुकवीत म्हणालो, ‘‘सैफुल्लाह.’’
‘‘तुङो वडील काय करतात?’’ त्यांचा सहज प्रश्न ऐकताच माङया जिवात जीव आला. माझं नाव ऐकल्यावर ‘तू मुसलमान आहेस?’ असा प्रश्नही त्यांनी विचारला नव्हता.
‘‘ते शिंपी आहेत.’’
‘‘काय नाव त्यांचं?’’
‘‘मस्तानवली.’’
‘‘अच्छा मस्तानवली? अद्दंकी बसस्टॉपजवळ त्यांचं दुकान आहे ना?’’
‘‘हो.’’
‘‘तुङया वडिलांचा चांगला नावलौकिक आहे. मी माङो कपडे त्यांच्याकडूनच शिवून घेत असतो. कोण कोणता व्यवसाय करतो हे फारसं महत्त्वाचं नसतं, तर त्या व्यवसायात तो किती कौशल्य संपादन करतो हे जास्त महत्त्वाचं असतं.  तुला भेटून खूप आनंद झाला.’’
त्यांच्या बोलण्यामुळे मला वाटत असलेलं भय क्षणात दूर झालं. माङो वडील लहानसे शिंपी होते. पण त्यांच्या त्या लहानशा कामाचं राणीचे वडील जे कौतुक करीत होते, त्यावरून मला त्यांच्यावर झालेल्या संस्कारांची ओळख पटली. राणीचे वडील निघून गेल्यावर तिची आईदेखील आली.  सुवर्णासारखी कांती. लहानसर बांधा आणि धारदार नाक. ‘‘ही माझा आई, सुंदरअम्मा’’ -राणीनं ओळख करून दिली. 
‘‘कॉफी घेशील ना?’’ - राणीच्या आईने विचारलं.
‘‘नको मी चहा-कॉफी काहीच घेत नाही’’ - मी.
‘‘मग मी तुला दुधात हॉर्लिक्स घालून देते,’’ असं म्हणून मी काही म्हणण्यापूर्वी ती तेथून निघून गेली.
‘‘मला दोन भाऊ आहेत, राजा आणि परमहंस. दोघंही सिनेमा पाह्यला गेले आहेत. पुन्हा कधीतरी त्यांची ओळख करून देईन. अगोदर हे पाणी तर घे’’ - असं म्हणून राणीने पाण्याने भरलेला ग्लास समोर केला.
पाणी कसं प्यावं? मला प्रश्न पडला. ग्लासला तोंड लावणं योग्य होणार नाही असं वाटून मी वरून पाणी पिऊ लागलो. तसं पाणी पिण्याची मला सवय नसल्यानं चांगलाच ठसका लागला. त्यावर मोठय़ाने हसत राणी म्हणाली, ‘‘सवय नव्हती तर ग्लासला तोंड लावून पाणी प्यायचं होतंस.’’
राणीच्या आईने गरम दुधात हॉर्लिक्स घालून ते राणीच्या हातून मला दिलं. चांदीचा ग्लास  गरम झाला होता. तो रुमालात पकडून मी फुंकर मारीत ते दूध पिऊ लागलो तशी राणी म्हणाली, 
‘‘आलेल्या पाहुण्याचं स्वागत चांदीच्या भांडय़ातून कॉफी किंवा चहा देऊन करणं हे अतिथीच्या स्वागताचं महत्त्वाचं अंग असते. तू ग्लास तोंडाला लावून सावकाश दूध पी.’’ मी फुंकर मारीत दूध पिऊ लागलो. तेव्हा माङयाकडे पाहत हसत राणी म्हणाली, ‘‘नानाची टांग.’’
‘‘म्हणजे काय? कॉलेजातही तू हेच म्हणाली होतीस.’’ ‘‘नानाची टांग म्हणजे बेरीची माती, मातीचा गणपती. गणपतीची घंटा, घण..घण..घण’’ आणि ती जोरजोराने हसू लागली. तसा मी लाजून तिला म्हणालो, ‘‘तुझ्या नानाची टांग.’’
 
मूळ तेलुगु लेखक : सलीम
मराठी अनुवाद : मलाकर धारप
 

 

Web Title: The story of the queen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.