रंगीला रतन- एकेकाळी मुंबईवर राज्य करणार्‍या मटका-किंग रतन खत्रीच्या आयुष्याची दास्तान..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 06:05 AM2020-05-17T06:05:00+5:302020-05-17T06:05:20+5:30

माणूस कमालीचा शौकिन. त्याच्या नुस्त्या बोटांच्या हालचालीने कोट्यवधींची उलाढाल एका झटक्यात होत असे. धंदा मटक्याचा, पण त्या बेकायदेशीरपणातही व्यावसायिकता इतकी उच्च कोटीची की, ज्याचा आकडा लागे, त्याला रोकडा मिळेच! निवृत्तीनंतर तो महालक्ष्मी रेसकोर्सवर  आवडत्या घोड्यांवर बेट लावीत असे.  शर्यती संपल्या की,  रेसकोर्सबाहेरच्या कँटीनमध्ये चहा पित बसे.

The story of the life of Matka-King Ratan Khatri who once ruled over Mumbai | रंगीला रतन- एकेकाळी मुंबईवर राज्य करणार्‍या मटका-किंग रतन खत्रीच्या आयुष्याची दास्तान..

रंगीला रतन- एकेकाळी मुंबईवर राज्य करणार्‍या मटका-किंग रतन खत्रीच्या आयुष्याची दास्तान..

googlenewsNext
ठळक मुद्देगेलं अर्धशतक लाखो जुगारी मंडळींचं आकर्षण असलेल्या मटका किंग रतन खत्रीने नुकताच जगाचा निरोप घेतला.

- रवींद्र राऊळ
भरदार देहयष्टीचा, पांढरेशुभ्र वेश परिधान करणारा आणि डोक्याला कायम रूमाल गुंडाळलेला रतन खत्री प्रत्यक्षात दिसतो कसा, हे पहायला कधीकाळी तो राहत असलेल्या मुंबई सेंट्रलच्या नवजीवन सोसायटी परिसरात अनेकजण घुटमळत असत. जणूकाही खत्री म्हणजे कुणी सेलिब्रेटीच. हातात पत्त्यांचा कॅट घेत मटक्याचा जुगार बेफामपणे चालवणार्‍या रतन खत्रीबाबतचं गूढ आणि कुतूहल त्याला कायम चिकटून राहिलं. गेलं अर्धशतक लाखो जुगारी मंडळींचं आकर्षण असलेल्या मटका किंग रतन खत्रीने नुकताच जगाचा निरोप घेतला.
मटका बाजारावर अधिराज्य गाजवणारा रतन खत्री मूळचा पाकिस्तानातील कराचीतल्या सिंधी कुटुंबातला. फाळणीनंतर तो भारतात आला तेव्हा तो जेमतेम पंधरा वर्षांचा होता. मुंबई गाठल्यावर त्याने अनेक धंदे करण्याचे प्रयत्न केले. पण त्यात त्याचा फारसा जम बसला नाही. धनजी स्ट्रीटवर दुकान थाटलेल्या खत्रीच्या डोक्यात पुढे काय करायचं, या विचाराचं चक्र सुरू होतं.  वयाची तिशी ओलांडेपर्यंत त्याची ओळख झाली ती कल्याण भगतशी. वरळी येथे किराणा मालाचं दुकान चालवता चालवता कल्याण भगतने कल्याण बाजार या मटका बाजारचा बर्‍यापैकी जम बसवला होता. 
त्याआधी न्यू यॉर्क आणि बॉम्बे कॉटन मार्केटमध्ये कापसाचे भाव ठरत त्यावर जुगारी जुगार खेळत. भगत त्या जुगाराचा अभ्यास करीत होता. अनेकदा त्याचा अंदाज खरा ठरे. 1962 साली न्यू यॉर्क स्टॉकने ती प्रक्रिया बंद केली आणि त्यावर आधारित इथला जुगार बंद पडला. नेमकी तीच संधी साधत कल्याण भगतने कल्याण बाजार नावाने मटका सुरू केला. 0 ते 9 या आकड्यातला हा खेळ. कल्याण भगत पत्त्यातून एक आकडा काढत असे. ज्याने तो आकडा लावलेला असेल त्याला नऊपट पैसे मिळत. पूर्वी मातीच्या मडक्यात चिठ्ठय़ा टाकून हा जुगार खेळला जात असे म्हणून या जुगाराला मटका असं नाव पडलं. या कल्याण बाजारात त्याने रतन खत्रीला सोबत घेतलं. पण दोन वर्षांतच म्हणजे 1964 साली रतन खत्रीने भगतशी फारकत घेत मेन बाजार या नावाने स्वत:चा मटका बाजार सुरू केला. पुढची तीन-चार दशकं रतन खत्रीने किंग बनून मुंबईच्या मटका बाजारावर राज्य केलं. बेकायदा बेटिंग सिंडिकेटचा रतन खत्री शहेनशहा होता. 
मटका बाजारात खत्री आणि कल्याण भगतप्रमाणे आणखी काहीजण बाजार चालवत. पण पंटरांचा सर्वाधिक विश्वास होता तो खत्रीच्या मेन बाजारावरच. इतर बाजारचालक सर्वाधिक बोली कुठल्या आकड्यांवर लागलीय याचा अंदाज घेत भलतेच आकडे जाहीर करीत. पण रतन खत्रीकडे अशी कोणतीच लांडीलबाडी नसे. तो सर्वांसमक्ष पत्ते पिसून आकडे जाहीर करी. उपस्थितांपैकी कुणालाही दोन  पत्ते वेचून काढायला सांगे आणि लागलीच तिसरा पत्ता स्वत: काढून तेच आकडे जाहीर करी. जुगाराबाबत असलेल्या तकलादू कायद्याचा फायदा घेत हे सारं सुरू होतं. बाकी पोलीस खातं त्याने खिशातच टाकलं होतं.
आकडे काढून ते जाहीर करणं हे त्याचं मुख्य काम असलं तरी मेन बाजारची खरी ताकद होती ती म्हणजे खत्रीने उभं केललं भरभक्कम नेटवर्क. त्याकाळी बाहेरगावी फोन लावायचे तर ट्रंककॉल लावावे लागत. पण मेन बाजारचे आकडे जाहीर करण्यासाठी कायम फोनच्या लायनी बुक असत. काही वेळातच आकडे हजारो बुकींकडे पोहचत आणि पुढील व्यवहार सुरू होत. त्या ठरावीक वेळेत इतरांचे फोन अजिबात लागत नसत. वेळच्यावेळी जिंकलेल्या पंटरना त्यांची ठरलेली रक्कम मिळण्यापर्यंत सगळ्यावर त्याची करडी नजर असे. मुंबईत चालणार्‍या मेन बाजाराकडे केवळ राज्यातल्याच नव्हे तर अन्य राज्यांतील पंटरांचंही लक्ष असे. खत्रीच्या मेन बाजारात दिवसाला कोट्यवधीची उलाढाल होई. त्याच्या कमाईचे अनेक किस्से पंटरांकडून सांगितले जात. त्याच्या बाजाराचे आकडे कुठल्या तरी कारणाने जाहीर झाले नाहीत, असं कधीच घडलं नाही. अपवाद म्हणजे एकदा विरोधी पक्षांनी मुंबई बंद पुकारल्याने मेन बाजारचे आकडे जाहीर झाले नाहीत. दुसर्‍या दिवशी वृत्तपत्रांमध्ये बंदच्या वृत्तांतामध्ये रतन खत्रीच्या मेन बाजारची एक कोटीची उलाढाल कशी झाली नाही, याचीही दखल घेण्यात आली होती. ही घटना देशात आणीबाणी लागू होण्याआधीची. 
सुसाट चाललेल्या खत्रीच्या या मटकाराजला पहिला धक्का बसला तो आणीबाणीच्या काळात. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशावरून कुख्यात स्मगलर हाजी मस्तान, युसूफ पटेल, करीमलाला आणि रतन खत्री या काळे कारनामे करणार्‍या उपद्व्यापी मंडळींना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत तुरुंगात डांबण्यात आलं. तेव्हाही खत्री जोशातच होता. तो म्हणायचा ‘मला बंद करून काय साधणार तुम्ही. अहो, माझ्या हाताच्या बोटांच्या खुणांवरूनही आकडे खेळले जातील. बाहेर पडलो की बघाच.’ आपलं म्हणणं त्याने खरं करून दाखवलंच. 19 महिन्यांच्या तुरुंगवासानंतर बाहेर आलेल्या खत्रीने आपला मेनबाजार पुन्हा वसवला आणि तो पूर्वीच्याच वेगाने घोडदौडही करू लागला. 
रतन खत्री कमालीचा शौकिन माणूस. चित्रपटसृष्टीचं आकर्षण त्यालाही होतंच. मटका किंग म्हणून त्याचा दबदबा इतका होता की उलट चित्रपटसृष्टीतल्या अनेक लोकांनाही त्याचं आकर्षण होतं. बॉलिवूडमधल्या अनेक कलावंतांशी त्याचे मित्रत्वाचे संबंध होते. अभिनेत्री परवीन बाबी अधूनमधून पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याच्यासोबत दिसत असे. मेहमूदशी त्याची पक्की दोस्ती. ती दोस्ती निभावत रतन खत्रीने त्याच्या अनेक चित्रपटांना फायनान्स केला. त्याला जागून मेहमूदने ‘दो फूल’ चित्रपटात ‘रतन मटका’ असे गात आणि अशोककुमारच्या तोंडी मटक्यासंबंधी डायलॉग टाकत खत्रीच्या मटक्याची जाहिरात केली. 
एकदा म्हैसूरचा प्रिन्स वडियार मुंबईत आला होता. त्याने बोलावलेल्या ताजमधील पार्टीला अनेक सितार्‍यांनी हजेरी लावली होती. आकडा काढायची वेळ झाली की रतन खत्री जिथे असेल तिथे पत्ते पिसून आकडा काढायचा. त्या पार्टीत असतानाच त्याची आकडा काढायची वेळ झाली आणि त्याने तेथेच एका टेबलावर पत्ते पिसून आग्रहाने विनोद मेहरा आणि मौसमी चॅटर्जी यांना पत्ते काढायला लावले. त्यांनीही आढेवेढे न घेता पत्ते काढले. कदाचित त्याच्याकडील गडगंज पैसा पाहूनही कलावंत त्याच्याशी मैत्री ठेवू इच्छित होते. 
‘रंगीला रतन’ हा त्याने फायनान्स केलेला एक चित्रपट. त्यात त्याने स्वत:ही एक लहानशी भूमिका केली. चित्रपटात दोघांची भांडणं सोडवत खत्री त्यांना उपदेशाचे डोस पाजतो, असंच काहीसं दृश्य आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर जेव्हा रतन खत्री पडद्यावर येई तेव्हा थिएटर प्रेक्षकांच्या टाळ्या-शिट्टय़ांनी दणाणून जाई. कित्येक प्रेक्षकांनी तर केवळ रतन खत्रीचं दर्शन घेण्यासाठी तो चित्रपट पाहिला. 
फिरोज खानने रतन खत्रीची व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून धर्मात्मा चित्रपट तयार केला. त्यात खत्रीची प्रधान भूमिका प्रेमनाथ याने केली होती तर त्याच्या सरळमार्गी मुलाची फिरोज खानने. हा तद्दन मसालापट तुफान चालला. चित्रपटाची कथा काहीशी खत्रीच्या जीवनावर असल्याने ती लिहिताना खत्रीशी चर्चा करण्यात आली होती, असं सांगितलं जातं. अनेक राजकारणी मंडळींशीही त्याचा दोस्ताना होता. 
काळ बदलत गेला आणि रतन खत्रीचे दिवसही. महाराष्ट्रातील मटकाबंदीने मेन बाजारसहीत सगळेच मटका बाजार भरडून निघाले. पण पूर्णपणे बंद नाही झाले. महाराष्ट्रात बंदी असली तरी गोवा, कर्नाटकसहीत अनेक राज्यातून मेन बाजार चालत होताच. पण पप्पू हिरजी सावला यासारख्या नव्या दमाच्या लोकांनी मेन बाजार उध्वस्त करून आपला स्वत:चा बाजार तेजीत आणण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू केले होते. खत्रीच्या मेन बाजारचा कणा मोडल्याशिवाय ते शक्य होणार नव्हतं. त्यांनी पोलिसांसोबत हातमिळवणी करीत मेन बाजारच्यामागे ससेमिरा लावला. केवळ मेन बाजारविरुद्धच गुन्हे दाखल होऊ लागले. खुद्द खत्रीलाही उतारवयात अटक झाली. 
एका अटकेच्यावेळी चौकशीत त्याने पोलिसांना एक यादीच दाखवली. दाऊद, गवळी, अमर नाईक, सुरेश मंचेकर या सगळ्या टोळ्यांना देत असलेल्या लाखो रुपयांच्या खंडणीची ती यादी होती. खत्री लाखो रुपये कमवत असल्याचं पाहून या टोळ्या त्याच्याकडून नियमित खंडणी वसूल करीत होत्या. एकेकाळी हाजी मस्तान, करीमलाला, वरदराजन मुदलियार यांच्या रांगेतला खत्री वृद्धावस्थेत मात्र या गॅँगसमोर नमून खंडणी देत आपल्या कारवाया सुरळीतपणे चालवत होता. अखेर सततच्या ससेमिर्‍याला कंटाळून साधारण अठरा-वीस वर्षांपूर्वी त्याने मटक्यातून आपलं अंग काढून घेतलं आणि पप्पू हिरजी सावलाने एकदाचा पूर्ण बाजार काबिज केलाच. नंतरच्या काळात मटका बाजार बळकावण्यासाठी रक्ताचे सडे पडले. मटका किंग सुरेश भगत याची हत्या झाली. पण तोवर खत्री मटका बाजारापासून दूर गेला होता. 
रतन खत्रीला घोड्यांच्या शर्यतींचाही नाद होता. निवृत्तीनंतर तो महालक्ष्मी रेसकोर्सवर हजर राहून आवडत्या घोड्यांवर बेट लावीत असे. शर्यती संपल्या की रेसकोर्सबाहेरच्या कँटीनमध्ये चहा पित बसे. इतर माफियांप्रमाणे त्याला बॉडीगार्ड बाळगणं वगैरे प्रकार ठाऊक नव्हता. अखेरच्या काळात केवळ आजारपणाच त्याला जुगारापासून लांब ठेवू शकला.

मटक्याच्या अड्डय़ावर रुपयाला नऊ रुपये

    कुठलीही आडोशाची जागा बघून कच्च्या बांधकामाचा मटक्याचा अड्डा सुरू होई. बहुतेकदा पत्र्यांनी बांधलेला. वर कौलं. दरवाजाला पडदे लावलेले. आत पंटरांची तोबा गर्दी. हवेत विडी-सिगारेटच्या धुराचे गुदमरवून टाकणारे लोळ. खुर्ची आणि बारकसं टेबल टाकून मटक्याचे आकडे घेणार्‍यांसमोर पंटरांची झुंबड. टेबलावर चिठ्ठय़ांची बुकं मांडलेली. टेबलापलीकडचा इसम पंटरांकडून पैसे घेऊन त्यांनी सांगितलेले आकडे रंगीत चिठ्ठय़ांच्या बुकात लिही. सगळीकडे गोंगाटच गोंगाट. त्या कलकलाटात एक्की, र्दुी, तर्िी अशा भाषेत बहुतेकांच्या तोंडी केवळ आकड्यांचेच उल्लेख. एकआकडी, दोन आणि आणि तीन आकडी म्हणजेच सिंगल, डबल आणि ट्रिपल, पाना या प्रकारचे मटके खेळले जात. त्याशिवाय संगम, ब्रॅकेट हेही प्रकार होते. जिंकणार्‍याला एक रुपयाच्या बदल्यात नऊ रुपये मिळत. फोरकास्ट प्रकार म्हणजे जॅकपॉटच. त्यात एक रुपयाला 96 हजार रुपये मिळत. पण तसे आकडे जुळणं खूपच कठीण असे. समजण्यास कठीण वाटणारा मटका शहरी बाबूपासून खेडेगावातल्या अशिक्षित वर्गातही खेळला जात असे. 
आकडे लावून अड्डय़ात ताटकळणार्‍यांना आता कोणते आकडे खुलतात, याची प्रतीक्षा असे. काही वेळाने एकजण येऊन तिथल्याच लहानशा बोर्डावर आकडे लिही. मेन बाजारचे आकडे फुटून प्रतीक्षा संपलेली असे. काहीजणांच्या चेहर्‍यावर मटका लागल्याचा आनंद असे. ते लगेच अड्डय़ातल्या ‘वळण’ देणार्‍याकडे जात. वळण म्हणजे पंटरने जिंकलेली रक्कम. ती विजेत्या पंटरला देणार्‍या मटकाचालकाच्या हस्तकाला वळणवाला बोलत. दुसरीकडे हरणार्‍यांचे चेहरे मलूल झालेले असत. गोपीनाथ मुंडे गृहमंत्री झाल्यावर त्यांनी राज्यात मटकाबंदी करेपर्यंत असं दृश्य मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पहावयास मिळे. 

..सगळ्यांनाच चटक !

कधीकाळी मटका गरिबांपासून र्शीमंतांपर्यंत सर्व वर्गात पसरला होता. आर्थिक मंदीच्या काळात गिरणी कामगारांपासून सारेच अतिरिक्त कमाईच्या आशेने मटका खेळत. म्हणूनच मध्य मुंबईत अनेक मटके अड्डे होते. अगदी चाळीतल्या मध्यमवर्गीय महिलाही मुलांना अड्डय़ावर पिटाळून त्यांच्यामार्फत आकडे लावत. अड्डय़ाबाहेर पांढरे कपडे आणि पांढर्‍याच चपला घातलेला इसम दिसला की समजायचं तो त्या अड्डय़ाचा चालक. तो चालक दिवसभरातील बेटिंग घेऊन ती आपल्या वरच्या एजंटला कळवित असे. तो एजंट तो तपशील आपल्यावरती पाठवत असे. अशा चार-पाच लेव्हल असत. 
पोलिसांना हप्ते बांधून राजरोसपणे हे अड्डे चालत. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटक्याचे अड्डे जास्त त्या पोलीस ठाण्याचं महत्त्व अधिकार्‍याच्या दृष्टीने अधिक. पोलिसांच्या अनेक पिढय़ा मटकाचालकांनी पोसल्या, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. बंदीनंतरही कुठे ना कुठे मटका किरकोळ स्वरूपात का होईना, चोरीछुपे किंवा अगदी राजरोसपणे ऑनलाइन चालतोच. 

ravindra.rawool@lokmat.com
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपवृत्तसंपादक आहेत.)

Web Title: The story of the life of Matka-King Ratan Khatri who once ruled over Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.