A story of an American drummer and percussionist Greg Ellis, who comes to India every year in search and affinity of Indian Classical Music.. | ट्रम्पेट ते ताशा
ट्रम्पेट ते ताशा

ठळक मुद्देग्रेग एलिस भारतातल्या तालवाद्यांच्या प्रेमात पडतात, त्याची कहाणी..

- नम्रता फडणीस

गणेशोत्सवात ‘श्रीं’च्या स्वागत सोहळ्यात एका मंडळातील ढोलपथकामध्ये सहभागी झालेल्या पाश्चिमात्य ड्रमरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल काय झाला आणि सगळ्यांचाच ‘तो’ हीरो झाला ! हा  ‘ड्रमर’ आहे तरी कोण, याचीच चर्चा सर्वत्र सुरू झाली.
हा एक जगप्रसिद्ध ड्रमर आहे. त्याचं नाव आहे, ग्रेग एलिस. पाश्चात्त्य तालवाद्यांमध्ये रस घेणार्‍या भारतीय युवापिढीसाठी हा चेहरा कदाचित नवखा नसेलही; पण त्याच्या वादनाने समस्त भारतीयांचे लक्ष वेधून घेतले हे नक्की. 
अमेरिकेतील ‘लॉस एंजिलिस’ हे ग्रेग एलिस यांचं मूळ गाव. तब्बल 46 वर्षांपासून ड्रम्स आणि तालवाद्यांवर असलेली हुकूमत त्यांचं जागतिक संगीतविश्वातील महत्त्वपूर्ण स्थान अधोरेखित करते. विविध देशांमधील संस्कृतीनुसार वाजवली जाणारी ‘तालवाद्यं’ जाणून घेणं, ही त्यांची खर्‍या अर्थाने ‘पॅशन’. याच ध्यासातून देशविदेशातील दौर्‍यातून सुमारे दोनशेहून अधिक वाद्यं त्यांच्या संग्रही आहेत.
भारतीय संस्कृतीशी ग्रेग यांचा जवळचा संबंध आला तो पत्नीमुळं. त्या भारतीय असल्याने भारतीय संस्कृती आणि तालवाद्यांविषयी ग्रेग यांच्या मनात आस्था निर्माण झाली आणि त्यांचे भारत दौरे वाढले. हॉलिवूडमधील दीडशेहून अधिक चित्रपटांसाठी ड्रम्सवादन तसेच चित्रपटाचं संगीत संयोजन व संगीत दिग्दर्शन यासाठी ग्रेग एलिस हे नाव जगभरात अत्यंत आदरानं घेतलं जातं. जगातील सांगीतिक विश्वात स्वत:चा वेगळा ठसा उमटवूनही  कोणताही ‘अहं’भाव न ठेवता नम्रपणे वागण्याचा त्यांचा स्वभाव खूप काही सांगून जातो.
दरवर्षी भारतात येऊन वेगवेगळ्या भागात ढोल, ताशा आणि इतर तालवाद्यांत रममाण होणं हा ग्रेग यांचा छंद. नुकतीच पुण्यात त्यांची भेट घेतली, तेव्हा ग्रेग सांगत होते,  
‘‘वयाच्या नवव्या वर्षी मी हातात ट्रम्पेट घेतलं आणि बाराव्या वर्षी ड्रम्सकडे वळलो. कसं वाजवायचं हे शिकवणारा कुणीच गुरु नव्हता. रेकॉर्ड लावायचो,  हेडफोन लावून ते ऐकायचो. असा स्वानुभवातूनच शिकण्याचा प्रवास सुरू झाला. वयाच्या सोळाव्या वर्षीच वादनात इतकी क्षमता निर्माण झाली की, ‘प्रोफेशनल’ म्हणून वादन क्षेत्रात पाऊल ठेवलं. लॉस एंजिलिसमध्ये आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होऊ लागलो. वयाच्या 28 व्या वर्षापर्यंत ‘पर्कशन’ या वाद्याला हातही लावलेला  नव्हता. यादरम्यान ‘हिस्ट्री ऑफ ड्रम्स अँण्ड जर्नी’ हे पुस्तक वाचलं, विविध देशांमधील संस्कृतीच्या सीडी पाहायला लागलो. त्यांचं संगीत जाणून घ्यायला सुरुवात केली. खरं भारतीय संगीत काय आहे याची प्रचिती घेतली.’
ग्रेग यांना भारताची प्रचंड ओढ. ते सांगत होते, ‘पंचवीस वर्षांपूर्वी भारतात आलो, तेव्हा मृदुंगम वगैरे कर्नाटकी शैलीतील संगीत ऐकलं होतं. पण माझी ड्रमसेटची एक भाषा तयार झाली होती. त्यामुळं या वयात नवीन वाद्यं शिकायला घेतली तर त्या संगीताच्या उच्चतम पातळीपर्यंत पोहोचू शकणार नाही असं वाटलं. त्यामुळं त्या संगीताचं सार घेऊन ते माझ्या पद्धतीनुसार विकसित केलं आणि ‘पर्कशन’मध्ये त्याचा वापर केला. इथून ‘पर्कशनचा’ माझा खर्‍या अर्थानं प्रवास सुरू झाला. तालाचं आकलन होण्यासाठी नेमकं कुठलं तंत्र नसतं, ते शिकवता वगैरे येत नाही.. त्या तालातच सगळं सार दडलेलं असतं.!’ 
पाश्चिमात्य संगीतात अधिकांश ‘ड्रम्स’, तर भारतीय अभिजात संगीतात तबला, पखवाज, मृदुंग अशी तालवाद्यांची एक र्शृंखला पाहायला मिळते. या दोन्ही संगीतातील तालवाद्यांमध्ये काही साम्य जाणवतं का, असं विचारल्यावर ग्रेग म्हणाले, ‘अमेरिकेमध्ये रॉक अँण्ड रोल वगैरेमध्ये ‘ड्रम्स’च  वाजवले जातात.  हेच तालवाद्य अमेरिकेचं तालवाद्य म्हणून प्रसिद्ध आहे. ‘ड्रम्स’ हे सोलो नव्हे तर एक समूहवाद्य आहे. भारतीय संगीतात पहिल्यांदा असं तालवाद्य ऐकलं; ज्यात तालाचं स्वत:चं एक शास्र आणि स्वभावानुसार संगीत असल्याचं आढळलं. ’
ग्रेग यांची तबल्याच्या ओढीचीही एक वेगळीच कहाणी आहे. त्या अनुभवाबद्दल ते सांगतात, ‘मी जगभरातील विविध वाद्यं एकत्रित करून घरीच ‘पर्कशन्स’ची एक वेगळी दुनिया बनवली आहे. ‘तबला’ हे वाद्य शिकायची माझी खूप इच्छा होती. मी शिकायलाही गेलो; पण ती खूपच गुंतागुंतीची गोष्ट होती. तबल्यावर हातही फार लवकर बसणार नाही याची जाणीवदेखील होतीच. म्हणून तबला शिकायचाच नाही असं मी ठरवलं. पण तबल्याचे बोल विविध वाद्यांवर कसे वाजतील हे पाहिलं. दंडूका, जेंबे या वाद्यांवर ड्रम्समध्ये जे शिकलो, त्याचा वापर केला. भारतात लोक प्रत्येक वाद्यावर तबला वाजवतात जे चुकीचं आहे. प्रसिद्ध पर्कशनिस्ट तौफिक कुरेशी हे जेंबेवर ‘फ्यूजन’चा खुबीनं वापर करतात. मी जेंबे वाद्याचे धडे घेतले नाहीत. पण ते कसं वाजवतात हे शिकलो आणि माझ्या पद्धतीनं ते वाजवायला लागलो. राजस्थानातला ‘नगारा’देखील लोकसंस्कृतीचे दर्शन घडवतो. तो कसा वाजवायचा याचं तंत्र मला अवगत आहे. पण तो त्याच पद्धतीनं वाजवायला पाहिजे असं नाही, त्यात स्वत:ची स्टाइल विकसित करायला हवी, हे मी माझ्या क्लासमध्ये नेहमी सांगतो. भारतीय शास्रीय संगीतात तबला हे वाद्य विलंबित, मध्य आणि द्रूत तालात वाजवलं जातं. तालाचं सौंदर्य खुलवायचं असेल तर तीन तालात वादन उत्तमप्रकारे होऊ शकतं असं निरीक्षणही ग्रेग एलिस नोंदवतात.
भारतीय अभिजात संगीतातील ‘गुरु-शिष्य’ परंपरेविषयी एलिस आपली परखड मतं मांडतात. याबाबत त्यांचं म्हणणं आहे,
  ‘अमेरिकेमध्ये ‘गुरु-शिष्य’ परंपरा नाही. अनेक वर्षे साधना केल्यानंतरच तुम्हाला परिपूर्णता लाभते असं गुरु सांगतात. गुरु जेव्हा ‘शिष्य आता तयार झाला आहे’ अशी पावती देतात तेव्हाच तो कार्यक्रम करण्यासाठी सक्षम आहे असं मानलं जातं. मात्र ही पद्धत अमेरिकेमध्ये नाही. पण याचा अर्थ असा नाही की अमेरिकन कलाकार तासन्तास कलेसाठी साधना करीत नाहीत. आता तू ‘तयार आहेस’ असं आम्हाला कुणी सांगत नाही. त्यामुळं ‘मी’च माझा गुरु आहे असं मी मानतो. तासन्तास सराव केल्यानंतरच मीही वादनाच्या एका पातळीवर पोहोचतो. माझे ‘ड्रम्स’ हेच माझे गुरु आहेत. तेच मला सांगतात की, मी कुठे चुकतो आहे. आवाज चुकीचा ऐकायला आला तर मी योग्य वाजवत नाही हे मला कळतं. त्यामुळं मी जेव्हा स्टेजवर वाजवायला जातो तेव्हा आता काय वाजवणार आहे हे मी ठरवलेलं नसतं. ते वाजवल्यानंतर जेव्हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतं तेव्हा तेच माझ्यासाठी मोठं गिफ्ट असतं. मी त्या वादनातून नेहमी वेगळं काहीतरी शोधत असतो. मला कुणी गुरु नाही याचं मुळीच वाईट वाटत नाही. माझ्यावर इतर कुठल्याही संगीताचा फारसा प्रभाव नाही. पण मला कुणी विचारलं की आयुष्याच्या अखेरपर्यंत कोणतं संगीत ऐकायला आवडेल तर ‘भारतीय अभिजात संगीत’ हेच माझं उत्तर असेल. पाश्चिमात्य देशात संगीत लिखित स्वरूपात असतं. प्रत्येक रचना कागदावर लिहिलेली असते. मात्र त्या रचनांमध्ये फारशी भावनिकता नसते. भारतीय संगीतात वादक स्वत:च्या कौशल्याचा खुबीने वापर करू शकतात. एकाच स्केलमध्ये ते अनेकदा वादन करू शकतात. याउलट पाश्चात्त्य संगीतात अनेक कॉडस आणि कीज असतात. भारतीय अभिजात संगीतात वेगळे राग, भावांचं  मिर्शण आढळतं आणि एक वेगळ्या संगीताची अनुभूती मिळते!’
संगीत आणि मन:शांती यांचा अतिशय जवळचा संबंध आहे असं सांगताना ग्रेग म्हणतात, ‘संगीत का निर्माण झालं असा प्रश्न मला पडतो. संगीत ही एक जागतिक भाषा आहे; पण संगीतापूर्वीच ताल निर्माण झाला आहे. त्यामुळं ‘ताल’ हीच जागतिक भाषा म्हटली गेली पाहिजे. ज्यावेळी मी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कुठलं वाद्य वाजवतो तेव्हा काय वाजवणार याविषयी बाकीच्या वादकांबरोबर माझी मुळीच चर्चा होत नाही; पण आम्ही एका ‘ताला’ने जोडले जातो. ‘ताल’ हा ड्रम्सचा श्वास आहे. विविध आवाजातून मानसिक शांतीचा अनुभव लोकांना मिळतो. ही शक्ती संगीतात शक्ती आहे आणि मी हे करू शकतो याचं आंतरिक समाधानही !’ 

  ‘हे मला का जमत नाही?’
‘ड्रमिंग’ या संकल्पनेचा जन्म आफ्रिकेत झाला असला तरी भारतात तालशास्राच्या दृष्टिकोनातून तालवाद्य खर्‍या अर्थानं विकसित झालं. तालवाद्यांत भारतीय तालवादकांनी जे उच्च पातळीवरचं तंत्र निर्माण केलं ते समजण्यासाठी तालज्ञान असावं लागतं. भारतीय वादकांनी त्या तालवाद्याचा स्वभाव जाणून घेत त्याला पुनर्विकसित केलं हे खरंच वाखाणण्याजोगं आहे. हे आपल्याला का जमलं नाही असा एक न्यूनगंडदेखील मनात येतो. माझ्यासारख्या अमेरिकन वादकाला याचं कौतुक वाटतं. 
इतर भारतीय कलाकारांबरोबर वाजवतो तेव्हा कधी कधी थोडीशी लाज वाटते. त्यामुळे स्वत:मधील वादनक्षमता अधिक वाढवण्यासाठी अधिकाधिक भारतीय वादकांबरोबर कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतो. उदा. उस्ताद झाकीर हुसेन. मी त्यांच्यासारखं वाजवत नाही; पण एकत्रितरीत्या वाजवताना एखादा गुंतागुंतीचा ताल निवडतो आणि नवीन स्टाइलप्रमाणे त्याचं सादरीकरण करतो. 
- ग्रेग एलिस

namrata.phadnis@gmail.com
(लेखिका लोकमतच्या पुणे आवृत्तीत उपसंपादक आहेत.)

Web Title: A story of an American drummer and percussionist Greg Ellis, who comes to India every year in search and affinity of Indian Classical Music..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.