दगड फेकणारे आले धावून
By Admin | Updated: September 27, 2014 15:10 IST2014-09-27T15:10:33+5:302014-09-27T15:10:33+5:30
काश्मीरमधील महाप्रलयाच्या आपत्तीने सारे चित्रच बदलले. तिथले तरुण जिवाची पर्वा न करता, पाण्यात उभे राहून लोकांना मदत करत होते, एकमेकांना सावरत होते. लागेल तिथे धावून जात होते. असंख्य तरुणांनी काश्मीरमध्ये परस्परविश्वासाचे जे बंध निर्माण केले, ते थक्क करणारे होते. माणुसकीचे अनोखे दर्शन घडविणारा हा अनुभव.

दगड फेकणारे आले धावून
- संजय नहार
श्रीनगरला जाण्यासाठी १५ सप्टेंबरला निघालो तेव्हा खूप थकलो होतो. आठवडाभर जम्मू-काश्मीरच्या पुरामध्ये अडकलेले अधिकारी, पर्यटक, ‘सरहद’चे कार्यकर्ते आणि पुण्यात शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात होतो. जम्मू-काश्मीरमध्ये नेमकी परिस्थिती काय असेल, याचा अंदाज आला होता.
नझीर खान यांनी ‘विमानतळावर घ्यायला येतो,’ असा निरोप दिला होता; मात्र विमानतळाकडे जाणारे काही रस्ते पाण्याखाली बुडालेले असल्याने त्यांच्या येण्याची खात्री नव्हती. पण, विमानतळावर उतरताच समोर त्यांना पाहून सुखद धक्का बसला. दूरध्वनी आणि इतर संपर्क यंत्रणा अजूनही विस्कळीत होती. इंडिगो आणि गोएअर या विमान कंपन्या वैद्यकीय साहित्य, पाणी, अन्नपदार्थ; इतकेच काय, जुने कपडेही विनाशुल्क श्रीनगरला पोहोचवीत होत्या. अनेक चिंताग्रस्त काश्मिरी आमच्याबरोबर बाहेर पडत होते. त्यांच्या कोठल्याही नातेवाइकाचा, मुलांचा, आईचा अथवा मित्राचा संपर्क होत नसल्याने ते जिवंत आहेत की नाही, त्यांचे नेमके काय झाले? या काळजीने त्यांना ग्रासले होते.
विमानतळावरून बाहेर पडलो व नझीर खान, गाझी रोहुल्ला, अर्शद हुसेन यांच्याबरोबर गाडीतून आम्ही पुढे निघालो. याच तरुणांनी गेल्या आठवड्यात जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचविले होते. लाल चौकात, शहरातील अत्यंत धोकादायक भागात घराघरांतून अनेक नागरिकांना त्यांनी बाहेर काढून बोटीद्वारे सुरक्षित ठिकाणी पोहोचविले होते. ही कथा प्रत्येक काश्मिरी तरुणाची होती. राज्य सरकार अथवा पोलिस दल सामान्यपणे अशा आपत्तीच्या वेळी मार्गदर्शक आणि महत्त्वाची भूमिका बजावत असतात. परंतु तेही पाण्यात बुडलेले होते. स्थानिक जिल्हाधिकार्यांपासून आयुक्तांपर्यंत सर्वांना आम्ही सातत्याने संपर्काचा प्रयत्न करीत होतो. मात्र, या यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्या होत्या आणि पूर्ण शहराचा ताबा लष्कराचे जवान, एनडीआरएफ यांच्या अधिकार्यांनी आणि श्रीनगरमधील तरुणांनी घेतला होता. त्यातही लष्कराचे जवान, राज्य सरकारचे अधिकारी आणि पर्यटक यांची सुटका करण्यासाठी सर्व महत्त्वाच्या यंत्रणा कामाला लागल्या, त्यामागचा हेतू राज्य सरकारचे कामकाज सूरू करावे, असा होता. मात्र, त्यातून केंद्रीय यंत्रणा त्यांच्याच लोकांना वाचविण्यासाठी पुढाकार घेत आहेत, असा आरोप हुर्रियतचे नेते यासीन मलिक आणि शब्बीर शहा यांनी केला. प्रत्यक्षात यासीन मलिक ज्या भागात राहतात, त्या मायसुमामधूनही त्यांना काश्मिरी तरुणांनीच बाहेर काढले आणि ‘या संकटकाळी राजकारण करू नका. आपण आधी आपल्या बांधवांचे प्राण वाचवू या,’ असे आवाहन केले.
हिलाल नावाचा एक रिक्षा ड्रायव्हर काही वेळ माझ्याबरोबर होता. त्याने मला त्याचा नंबर दिला आणि म्हणाला, ‘‘कोणीही पर्यटक कुठे अडकला असेल, तर मला कल्पना द्या. मी त्याची सुटका करतो.’’ हा अनुभव जवळपास सर्व ठिकाणी येत होता. यात मुलींचाही समावेश होता. याचाच अर्थ, इथे कट्टरपंथीय अथवा हुर्रियत यांच्या आवाहनापेक्षा एकमेकांना मदत करण्याची भावना अतिशय तीव्र होती. आया आपल्या तरुण मुलांना स्वत:हून बाहेर पाठवत होत्या. पडलेल्या घरांचे दरवाजे, पाण्याच्या टाक्या, गाड्यांचे टायर यांचा वापर करून बोटींची कमतरता भरून काढली जात होती. थोडीशी झोप घेऊन हे तरुण पुन्हा कामाला लागत होते. नझीर, गाझी आणि अर्शदही थकले होते. मग आम्ही परिस्थितीचा आढावा घेत रायझिंग काश्मीर या वृत्तपत्राचे सुज्जात बुखारी यांच्या घरी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घेतली आणि लगेचच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला. तोपर्यंत पुण्यातून अभय छाजेड यांनी पाठविलेल्या ६ बोटीही पोहोचल्या होत्या. लाल चौक, जवाहरनगर, महजूरनगर, कमरवारी भागात पाणी ५ फुटांपेक्षा जास्त होते. लगोलग डॉ. शफाकत खान या आरोग्य विभागाच्या अधिकार्याच्या घरी गेलो. त्याने घरूनच कामाला सुरुवात केली होती. पुलवामा, अनंतनागमधील अनेक गावांमधील लोक स्थलांतरित होऊन रस्त्यांवर तंबूमध्ये राहायला आले होते. त्यांच्यासाठी शौचालयाची व्यवस्था नव्हती. सरपणही भिजलेले होते. दहशतवादाने रक्ताळलेली ही ऋषिमुनी आणि सुफ ींची भूमी नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी सज्ज झाली होती.
रस्त्यात आम्ही बेघर झालेल्या अनेकांना भेटलो. ‘सरहद’च्या जम्मू-काश्मीर मदतकार्याचे समन्वयक संजीव शहा यांनी त्यांना जवळचे कपडे आणि जुजबी औषधे दिली. लहान मुलांना छोटे-छोटे आजार सुरू झाले होते. श्रीनगरमधील न्यू सिटी हॉस्पिटलचे डॉ. झाकीर गिलानी रस्त्यावरच ट्रकमध्ये औषधे ठेवून कोठलीही फी न घेता रुग्णाला तपासून औषधे देत होते. त्यांच्याकडील सर्व वैद्यकीय उपकरणे पाण्यात बुडाली होती; मात्र त्यांची जिद्द त्यावर मात करत होती. सरकारी अथवा मोठय़ा हॉस्पिटलचे कामकाज जवळपास बंद झाले होते. शिकलेल्या तरुण मुलांनी त्यावरही मार्ग काढला. त्यांनी ज्या भागात फ ोन चालू झाले, तेथून टेलिमेडिसीन आणि तपासणीवर भर दिला. पुढे जाताना हळूहळू झेलमच्या किनार्यावरील पडलेली घरे, फसलेल्या, बुडालेल्या गाड्या पाहून पुराच्या फटक्याचा अंदाज येत होता. जगप्रसिद्ध काश्मिरी लेखक कवी फ ारूक नाझकी आम्हाला भेटले. त्यांचे पूर्ण कुटुंब लष्कराने वाचविले होते. ते म्हणाले, ‘‘काश्मिरी माणसाचा लष्करावर राग आहे; मात्र लष्कराचा हा एक चेहरा तो राग कमी करेल, याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही.’’
काही ठिकाणी राजकीय कार्यकर्ते अजूनही स्वत:च्या कुटुंबीयांसाठीच यंत्रणांचा आणि जीव रक्षा पथकाचा वापर करताना दिसत होते. यामुळेच काश्मिरी युवकांमध्ये सर्व राजकीय पक्षांवर मोठा राग दिसत होता. ‘जो खुद को नहीं बचा सकते, वो हमे क्या बचाएँगे? अब तो हमेंही कुछ करना पडेगा और आप भी देश में एक संदेश दीजिए। हमे भी भिकारी मत समझिए। हमारे सारे सपने टूट गए मगर हम फ ीर भी गुलाम नहीं बनेंगे, भारत से हमें बहुत उम्मीदें हैं।’ अशी भावना पुण्यात एमबीए झालेल्या असा मेहराज आणि अनेक इंजिनिअर, उच्चशिक्षित तरुणांची होती.
हैदरपुर्याकडून सोहरा इन्स्टिट्यूटजवळील नालाबल भागात बैठकीसाठी निघालो आणि छानपुरा भागात मारुती गाडी पाण्यात फ सली. मी अर्शदला म्हटले, ‘‘तू इथेच थांब, नंतर गाडी बाहेर काढ. मला मात्र पुढे निघावे लागेल.’’ समोर पुराच्या पाण्यात काही बिहारी युवक बसगाड्या धूत होते. त्यांना परत बिहारला जायचे होते. मात्र, जाण्यापूर्वी बस मालकाला द्यायची होती. ती पूर्ण बस मी तात्पुरती भाड्याने घेतली. मालक काश्मिरी होता. म्हणाला, ‘‘८00 रुपये घेईन.’’ याआधी दुसर्याने याच प्रवासाचे १0,000 रुपये सांगितले व २,000 पर्यंत तडजोडीस तयार झाला. तो म्हणत होता, की पेट्रोल, डिझेल काहीच पोहोचत नाही. रस्ते बंद आहेत; डिझेल ब्लॅकने घ्यावे लागते. या परिस्थितीतही लोक संधीचा फ ायदा घेतात, तसे इथेही होते. मात्र ८00 रुपये सांगणार्या काश्मिरी चाचाने सांगितले, ‘‘बस आप फ स गए हो.. मेहमान भगवान होता है।’’ त्याने ज्या आपुलकीने अडचणीतही मदतीचा हात दिला ते पाहून मी हेलावलो. मग आमचा पुढील सोहरा इन्स्टिट्यूटपर्यंतचा साडेतीन तासांचा प्रवास थरारकच होता. तरुण मुले खांद्याइतक्या पाण्यात हातात काठय़ा घेऊन गाडीने कुठे जावे- जाऊ नये, सांगत होती. पुढे गाडीत बसलेला एक तरुण म्हणाला, ‘‘बीस से ज्यादा लोगों की हमने जान बचाई हैं। पत्थर फे कने वाले सही हाथ जो सामान हमे मिल रहा हैं उससे एक दुसरे की मदत कर रहे हैं। आर्मी भी अच्छा काम कर रही है, मगर उनकी भी लिमिटेशन्स है। उन्हे पहले आर्मीवाले को बचाना था। बदामी बाग पूरा डूब गया था। फि र काश्मीर सरकार के लोग और फ ीर टुरिस्ट, मगर लोगोंने अपने घरों में, मज्जिदों में, मंदिरो में, गुरुद्वाराओं में जगह दी। घरमें जितना अनाज था बाँटा गया, मगर आपके टीव्हीवाले इसकी न्यूज नहीं बनाएँगे। चलो...’’ अशी चर्चा सुरू असतानाच एका वृद्ध महिलेच्या औषधाच्या गोळ्या संपल्या होत्या, मी तेथे उतरलो. डॉ. अथर नावाच्या डॉक्टरांशी या संदर्भात बोललो. त्यांनी काही क्षणांत औषधे उपलब्ध केली. ज्या भागात लष्कराच्या विरोधी बॅनर होता, त्याच्याच खाली लोक आणि लष्कर एकत्र दिसत होते. विरोधी विचार फक्त बॅनरवरच होता. लोकांना आता आधार हवा होता. सरकार पाण्यात बुडाले होते. तेथील आयुक्त फारूक शहा मला म्हणाले, ‘‘परिस्थितीचा अंदाज येण्याच्या आतच शहर पाण्यात बुडाले होते. लष्कराच्या ६ फ ोनद्वारे आम्ही एकमेकांशी संपर्क करीत होतो. मुख्यमंत्री, मुख्य सचिव, लष्करी अधिकारी अशा ६ लोकांनी काम सुरू केले, तेव्हा काहीच अस्तित्वात नव्हते. काही ठिकाणी तरुण मुलांनी बोटी ताब्यात घेऊन पोलीस व लष्करी जवांनानाही बाहेर काढले; मात्र दुर्दैवाने याची दखल घेतली गेली नाही.
रस्त्यात शेकडो कुत्री, पक्षी, गुरे मरून पडली होती. जवाहरनगरमध्ये १५ प्रेतं सापडली. ती काढण्याचे काम सुरू होते. सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. पत्रकार व काही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांच्या लाइव्ह बातम्या सुरू झाल्या. अनेक डॉक्टर औषधे देत होते, पुण्याचे डॉ. अभिजित वैद्य यांचीही इथे भेट झाली. ज्या झेलमच्या अक्राळविक्राळ पुराने त्यांचे जीवन उद्ध्वस्त केले, त्याच झेलमचे पाणी उकळून प्यावे लागत होते. पुण्यात क्रिकेट खेळणारा मुनीर मुस्तफा शेकडो कार्यकर्त्यांसह पुलवामा जिल्ह्यात मदतकार्य करीत होता. त्याला ब्लिचिंग पावडर, क्लोरिनच्या गोळ्या आणि प्रशिक्षित डॉक्टरांची गरज होती; मात्र जी उपलब्ध आहेत, त्या सर्व साधनांचा वापर करून मुनीर मुस्तफा पूरग्रस्त भागात जीव धोक्यात घालून काम करीत होता. लष्कर, एनडीआरएफ आणि केंद्रीय यंत्रणांना सॅल्यूट करतानाच मुनीर मुस्तफा, नझीर खान, गाझी रोहुल्ला, अर्शद हुसेन असो की बहिणीच्या लग्नासाठी घरी आलेला फि रोज; प्रत्येक जण आपापल्या परीने भूमिका बजावत होता. त्यांनाही देशाने सलामच करायला हवा.
एका प्रसंगी तर नझीर खानने आम्हाला चार फू ट पाण्यातून पुढे नेले. ती पाच मिनिटे आम्हाला बहुधा जलसमाधी घ्यावी लागते की काय, असे वाटले होते; पण या काळातही ही तरुण मुले आपला जीव धोक्यात घालून आमची काळजी घेत होती. अनेकांची घरे पडली, संसार उद्ध्वस्त झाले; मात्र आपल्या घासातला घास एकमेकांना देत होते. माणुसकी जागोजागी ओथंबून वाहताना दिसत होती. या प्रवासात श्रीनगरच्या जवळपास प्रत्येक भागात जाता आले. संकटे आता सुरू होणार आहेत. ऑक्टोबरमध्ये थंडी पडेल. रोगराई वाढण्याची शक्यता आहे. अशा काळात पुन्हा नव्याने हे राज्य उभे करावे लागेल. म्हणूनच पुणे महापालिकेने पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरण यंत्रणांच्या पुन:स्थापनेसाठी आपली एक टीम त्वरित पाठवली. ‘सरहद’ संस्थेनेही आगामी तीन महिन्यात व पाच वर्षांत कराव्या लागणार्या कामांचे नियोजन केले आहे.
हे राज्य भारताचा स्वर्ग समजला जातो. तो उभारण्यासाठी हजारो तरुणांचे हात तयार आहेत. हीच संधी आहे नवीन काश्मीर निर्माण करण्याची. अनेक घटना मनात घेऊन निघालो; मात्र पाय निघत नव्हते. शेवटी हृदय तिथेच ठेवून पाय माघारी आले, त्या तरुणांच्या स्वप्नांना साथ देण्याचा संकल्प करूनच.
(लेखक सरहद संस्थेचे अध्यक्ष आहेत.)