Stone age 'Khal-batta'- twelve thousand years ago man made design is same even today! | खलबत्ता- तब्बल बारा हजार वर्षांपूर्वी माणसाने घडवला, आजही ते जुनंच ‘डिझाइन’ कायम आहे!

खलबत्ता- तब्बल बारा हजार वर्षांपूर्वी माणसाने घडवला, आजही ते जुनंच ‘डिझाइन’ कायम आहे!

ठळक मुद्दे‘डिझाइन’ची गोष्ट- घडणार्‍या, मोडणार्‍या, नव्याने घडणार्‍या,  सतत बदलणार्‍या ‘आकारां’च्या दुनियेतला  विचार आणि शास्र

- स्नेहल जोशी

हे खरं, की विज्ञान-तंत्रज्ञानात माणसाने केलेल्या चित्तवेधक प्रगतीतून त्याचं आजचं भौतिक जीवन आकाराला आलं आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला नुसती नजर फिरवलीत, तरी माणसाने आपल्या सोयीसाठी, उपयोगीतेसाठी, सुखासाठी आणि चैन-चंगळीसाठीही किती तर्‍हेचे आकार घडवले आहेत; हे तुमच्या लक्षात येईल.
पण गंमत म्हणजे आजही आपण अशा काही गोष्टी, वस्तू वापरतो, ज्या थेट आदिमानवाने घडवल्या होत्या.
त्यातला एक म्हणजे खलबत्ता!


मनुष्य जाती ही संपूर्ण जीवसृष्टीतली सर्वात उत्क्रांत आणि विकसित प्रजाती आहे असं आपण मानतो. मनुष्यात आणि इतर प्राण्यांत एवढा फरक कसा झाला असेल? मनुष्य हा खूपच जटिल प्राणी आहे. इतर प्राण्यांप्रमाणे माणसाकडे जगण्याची अंत:प्रेरणा तर आहेच, पण त्यावर त्याला नियंत्रण मिळवता आलं आहे. याला कारणीभूत आहे माणसाचा अतिशय प्रगत मेंदू. विचाराला स्मरणशक्तीची जोड मिळाली आणि त्यातही त्याच्या जवळ असलेलं विलक्षण कुतूहल; यातून मनुष्याला तर्क करता येऊ लागला आणि तो भविष्याबद्दल कल्पनादेखील करू लागला.

मागच्या रविवारी आपण मनुष्याने दगडापासून निर्माण केलेली पहिली शस्त्र पाहिली. मानव उत्क्रांत होण्याआधी वानरांनीही दगडाचा वापर शस्त्र म्हणून केल्याचे शोध लागले आहेत; पण त्यात एक मोठा फरक आहे. माणसाला ‘आजप्रमाणे उद्यासुद्धा भूक लागेल’ हे लक्षात आलं होतं; तेव्हा पुन्हा नवीन दगडाला आकार न देता, आहे त्याच दगडाला त्याने उत्कृष्ट धार काढली. त्यातूनच पुढे छोट्या दगडी कुर्‍हाडी, अणकुचीदार भाले यासारखी शस्त्रं निर्माण केली. 
शिकार करण्यात माणूस एव्हाना तरबेज झाला होता. जंगलातून भटकत आपला उदरनिर्वाह करत होता; पण अचानक काहीतरी घडलं आणि सगळ्या सृष्टीचा जणू कायापालट झाला. आजपासून सुमारे 12000 वर्षांपूर्वी निसर्गात, हवामानात अचानक हिंस्त्र बदल घडू लागले. पृथ्वीवरचं तापमान वाढून समुद्राची पातळी उंचावू लागली. हिमनग वितळून पाणी झाले आणि बर्फाच्या जागी गवत दिसू लागलं.
पाचवं हिमयुग संपलं. मनुष्य प्रजाती पृथ्वीच्या सर्व भूखंडांवर विखुरलेली होती. प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या तशाच झाडांच्याही बर्‍याच प्रजाती नष्ट झाल्या होत्या. मनुष्याच्या उपजीविकेसाठी अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा होत्या. निवार्‍याला नैसर्गिक गुहा सापडत, तर हवामानापासून बचाव करण्यासाठी प्राण्याची कातडी किंवा झाडा-पानांचा आधार घेता येत होता. अन्नाची गरज मात्र रोज नव्यानं भिडत होती. 
आपल्याला शिकार करणं फार सोपं राहिलेलं नाही हे माणसांनी एव्हाना हेरलं होतं. एखादं जनावर मिळालं तरी इतर मांसाहारी प्राणी त्यावर तुटून पडत. झाडावरची फळं खायला माकडं किंवा पक्षीच आधी पोहोचत. इथेच माणसाच्या प्रगतीला मोठी कलाटणी मिळाली. 
माणसाला प्राण्यांपासून, पक्ष्यांपासून असलेली स्पर्धा मोडून काढण्याशिवाय दुसरा पर्याय तरी काय होता? जे धान्य, कंदमुळं, बिया इतर प्राणी किंवा पक्षी खाऊ शकत नाहीत, त्याचा उपयोग माणसाने आपली भूक शमवण्यासाठी करायला सुरुवात केली. माणूस आता शेतीचे प्रयोग करू लागला; पण हे धान्य, बिया तशाच कशा पचवणार? 
इथे लक्षात घ्यायला हवं की 12000 वर्षांपूर्वी माणसाला फक्त दगडच वापरता येत होता. त्याने दगडाची खळगी हेरली आणि त्यात बिया भरून दुसर्‍या दगडाने कुटायला सुरुवात केली. इथे जन्म झाला तो खल आणि बत्ता यांचा.
आता हा खल-बत्ता बनवण्यासाठी कोणता दगड वापरायचा? दगडाची योग्यता कशी तपासायची? त्याचा आकार कसा असावा? माप काय असावं? हा सगळा विचार काही एकाच व्यक्तीने केला नसणार, हे उघड आहे. किंबहुना हे सगळं एकाच वेळेला घडलं असंही नाही. या प्रक्रियेत माणसाच्या बर्‍याच पिढय़ा गेल्या.
माणसाच्या वाढत्या गरजा आणि अनुभव यातून तो या खल-बत्त्याच्या   ‘डिझाइन’मध्ये बदल करत गेला. जे धान्य कुटायचं त्यापेक्षा दगड टणक हवाच, तो ठिसूळ असेल तर अन्नात त्याचाच भुगा मिसळेल हे लक्षात आलं. त्यात अन्न शोषलं जाऊ नये, दगडाचा परिणाम त्यातल्या अन्नावर होऊ नये हेही माणसांनी कालांतरानी हेरलं. अन्नकण चिकटू नये म्हणून खल आणि बत्त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत करायला हवा. 
या सगळ्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकाची सुरुवात झाली आणि अन्नाची भ्रांत मिटली. साहजिकच, हळूहळू लोकसंख्या वाढू लागली. शिकार्‍याचा शेतकरी झाला, आणि जंगलातला भटका माणूस नदीकाठी स्थिरावू लागला. एव्हाना तो आपल्या गरजेसाठी प्राणी पाळूही लागला होता.
अन्नाची भ्रांत मिटल्याशिवाय कलांचा उगम होत नाही. शेती, खल-बत्ता, अग्नी, स्वयंपाक अशी तंत्रं विकसित करताना माणूस जसा स्थिरावला, तसा तो समाजही बांधू लागला. शेतीसाठी आवश्यक वाटली म्हणून निसर्गाची पूजा करू लागला, सण साजरे करू लागला. आता त्यासाठी विशेष उपकरणंही लागणारच. 
इथेच पाहा ना, ‘पॅप्युआ गिनी’मधला हा बत्ता किती सुंदर घडवला आहे. हा बत्ता जवळपास एक फूट उंचीचा आहे. त्याची कुटण्याची बाजू क्रिकेटच्या चेंडूएवढी असावी. त्यावर असलेला सुबक दांडा, उघडत जाणारे पक्ष्याचे पंख आणि नाजूकपणे निमुळती होत जाणारी त्याची मान.. या सगळ्यात काय विलक्षण मिलाफ साधला गेला आहे. 

आता या सगळ्या नक्षीचा खरं तर अन्न शिजवण्याशी अर्थाअर्थी काहीच संबंध नाही. पण, कुठलीही क्रिया करताना त्यामागची भावना ही कार्यसिद्धीसाठी प्रेरणा ठरते. त्यात क्षुधा आणि भावना यांचं तर फारच जवळचं नातं आहे. एकत्र जेवल्याने माणसं जवळ येतात किंवा माणसाच्या हृदयाची वाट ही त्याच्या पोटातून जाते, असं आपण आजही मानतो. 
आत्ताही आठवून पाहा, आजीचा पोळपाट, कल्हई करून चमकवलेल्या कढया, आपलं नाव कोरून घेतलेली भांडी, या सगळ्यांत आपल्या कितीतरी आठवणी दडलेल्या आहेत. अशा आठवणींची साठवण करण्याची सुरुवात 10000 वर्षांपूर्वी, खल-बत्ता निर्माण केला तेव्हाच केली होती. 
अश्मयुगातला हा खल-बत्ता आपण आजही जसाच्या तसा वापरतो.

----- 
snehal@designnonstop.in
(लेखिका वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत)

छायाचित्र सौजन्य : ब्रिटिश म्युझियम

Web Title: Stone age 'Khal-batta'- twelve thousand years ago man made design is same even today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.