तेल अवीवच्या मुक्कामात उलगडलेली महत्त्वाची गोष्ट ही, की सतत दहशतीच्या छायेत असूनही
हे शहर स्मार्ट झालं हे खरं नव्हे, तर सतत दहशतीच्या छायेत असल्यामुळेच या शहराच्या
‘स्मार्ट’ होण्याला वेग आला; हे अधिक खरं.
संभाव्य हवाई हल्ल्याचं प्रभावक्षेत्र असलेल्या निवासी वस्तीतल्या नागरिकांना जमिनीखालच्या बंकरमध्ये सुरक्षित पोचवणारी, त्यासाठी अशा हल्ल्याबाबतचे संदेश तत्काळ संबंधितांर्पयत प्रसारित करणारी व्यवस्था या शहरात वीस वर्षापूर्वी उभी राहिली. - तेल अवीवच्या ‘स्मार्ट’पणाचा प्रारंभ झाला, तो कुठल्या राजकीय चढाओढीतून अगर मॉडर्न असण्याच्या हव्यासातून नव्हे, तर हा असा,
जिवंत राहण्याच्या गरजेपोटी.
- अपर्णा वेलणकर
इस्त्रायलचं सगळ्यात देखणं, रोमॅण्टिक, ग्लॅमरस आणि उत्साहानं उसळतं स्मार्ट शहर तेल अवीव. वांशिक विद्वेष आणि धार्मिक एकारलेपणाच्या उग्र शापामुळे अखंड युद्धखोरीच्या आत्मघातकी खुमखुमीशी झगडणा:या मध्यपूर्वेच्या अशांत वाळवंटातलं नखरेल, अत्याधुनिक न्यू यॉर्कच जणू!
परस्परांच्या अखंड कुरापती काढणारे पॅलेस्टाइन आणि इस्नयल हे दोन शेजारी देश भारतीयांना भेटतात ते त्यांच्यातल्या वैराच्या बातम्यांमध्येच. जेरुसलेम, जाफा, गाझापट्टी इथल्या हिंसाचाराच्या बातम्या, अरब आणि ज्यूंचं विध्वंसक शत्रुत्व, खाडी युद्धाच्या भडक्यात झालेले आत्मघातकी बॉम्बहल्ले याखेरीजच्या वेगळ्या संदर्भात इस्नयलची चर्चा सुरू झाली ती या देशाने थेंबभर पाण्यात फुलवलेल्या शेतीमुळे! त्यानंतर नव-उद्योजकतेला प्रेरक वातावरण पुरवणारं शहर म्हणून तेल अवीव प्रकाशात आलं. ‘स्टार्ट-अप नेशन’ या नाममुद्रेवर जणू तेल अवीवचाच हक्क! 2क्14 साली आणखी एक गोष्ट झाली. लंडन, बार्सिलोना, अॅमस्टरडॅम, न्यू यॉर्क अशा युरोप-अमेरिकेतल्या बडय़ा शहरांच्या स्पर्धेत मुसंडी मारून पुढे आलेल्या तेल अवीवने ‘स्मार्टेस्ट सिटी ऑफ द वर्ल्ड’ असा किताब पटकावला. आणि जेमतेम साडेचार लाख लोकसंख्येचं हे चिमुकलं शहर चर्चेत आलं.
साध्या सुरक्षित अस्तित्वासाठीचा अखंड झगडा नशिबी आलेल्या देशाने अत्याधुनिक स्मार्ट नगररचनेची प्रयोगशाळा उभारावी, याचं नवल मनात घेऊनच मी तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळावर उतरले होते.
निळ्यागर्द मेडिटेरिनियन समुद्राच्या कुशीतलं देखणं शहर! पॅलेस्टाइनबरोबर इस्नयलच्या कडव्या संघर्षातली शस्त्रं तेल अवीवच्या दिशेने कायमच रोखलेली असतात. 199क् च्या खाडी युद्धात इराकच्या स्कड क्षेपणास्त्रंनी तेल अवीवच्या हृदयावरच घाला घातला होता. शहरात जाळपोळ, बॉम्बस्फोट, आत्मघातकी हल्ले, प्रवाशांनी भरलेल्या बसच्या खाली बॉम्ब लावून ती भर बाजारातल्या गर्दीत धडकावणं असा गदारोळ उडाला.
गेली वीस र्वष सत्तेवर असलेले सध्याचे महापौर रॉन हुल्देई 1995 साली सत्तेवर आले, तेव्हा हे शहर जखमांनी घायाळ होतं. मिसाईल आणि बॉम्बहल्ल्यांच्या शक्यतेची तलवार कायम डोक्यावर लटकलेली. कधी काय होईल या अखंड धास्तीत नागरिक आणि प्रशासनाची बोबडी कायम वळलेली. या परिस्थितीत हुल्देई कामाला लागले. संभाव्य हवाई हल्ल्यांची पूर्वसूचना देण्यासाठी उपग्रहाधारित यंत्रणा उभी करण्यासाठी त्यांनी कंबर कसली. वीस वर्षापूर्वीच्या इस्नयलमध्ये हे सोपं नव्हतं आणि परवडणारंही नव्हतं. तरीही या शहराने पदरमोड करून तंत्रज्ञान विकत आणलं, प्रसंगी स्वत: विकसित केलं. अशा तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेबद्दल प्रारंभी शंका असल्याने त्यावर खर्च होणा:या पैशापोटी टीका सोसली.
हवाई हल्ल्यांची पूर्वसूचना मिळू शकते, ही शक्यता आणि अशा प्रसंगी आपण जिथे असू तिथून सगळ्यात जवळचा भूमिगत निवारा (बंकर) कुठे आहे, तिथवर कसं जायचं हे तत्काळ कळू शकतं हा दिलासा ! - या दोन गोष्टींनी तेल अवीवचा नागरी स्वभावच पालटून टाकला.
त्या शहराच्या ‘स्मार्ट होण्या’चा हा स्वाभाविक प्रारंभ होता. तंत्रज्ञानाधारित शहररचनेच्या बाबतीत गेल्या वीस वर्षात तेल अवीवने गाठलेली मजल किती आहे, हे सोबतच्या चौकटींवरून लक्षात येईल.
‘डिजि-टेल’तेल अवीवमधल्या शहरनियोजनाची केंद्रीय प्रणाली
तेल अवीवच्या चौकाचौकांत लावलेले कॅमेरे, सेन्सर्स, प्रत्येक नागरिकाहाती असलेल्या स्मार्टफोन्सच्या सिग्नल्समुळे होणारं टॅगिंग, त्यातून आणि क्राउडसोर्सिंगच्या माध्यमातून सातत्याने जमा होणारा रिअल टाइम डाटा, त्याच्या विश्लेषणातून अखंड कार्यरत असलेली ‘स्मार्ट’ तंत्रज्ञानाधारित विविध साधनं आणि या सर्वाच्या माध्यमातून महानगरपालिका-नागरिक-सेवासुविधा पुरविणारे इतर विभाग-संस्था-गट यांच्यात चाललेली माहिती-सूचना-निर्णयांच्या देवाणघेवाणीची अखंड प्रक्रिया अशा गुंतागुंतीच्या जाळ्याभोवती उभारलेलं ‘डिजि-टेल’ ही तेल अवीवमधल्या स्मार्ट शहरनियोजनाची केंद्रीय प्रणाली आहे. - हे सगळं वाचायला किचकट वाटत असलं, तरी प्रत्यक्ष वापराला मात्र अत्यंत सोपं, सुलभ आहे. या प्रकल्पाची दृश्य-रूपं तीन महानगरपालिकेची वेबसाइट स्मार्टफोनसाठीचं डिजि-टेल अॅप डिजि-टेल रेसिडेण्ट्स कार्ड
वेबसाइट
हे महानगरपालिका आणि नागरिकांमधल्या परस्पर संपर्काचं मुख्य साधन. वीज-पाण्याची बिलं आणि कर भरणं, पार्किंगसह विविध परवान्यांसाठी अर्ज करणं, तक्रार निवारण विभागासाठी रस्त्यावरचे खड्डे, तुटलेली बाकं इत्यादिंचे फोटो अपलोड करणं अशा अगणित गोष्टी नागरिक घरबसल्या करू शकतात. महानगरपालिकेच्या निर्णय-प्रक्रियांसंबंधीची माहितीही इथे सतत अपडेट होत असते.
महापौरांसह विविध खातेप्रमुखांशी नागरिकांना थेट संपर्क साधता येतो, तक्रारी-सूचना नोंदवता येतात आणि त्या तक्रारींचं पुढे काय झालं, याचा मागही ठेवता येतो.
डिजि-टेल अॅप
‘तुम्ही कुठेही असलात, तरी महानगरपालिका तुमच्या मुठीत’ या मुख्य सूत्रभोवती तयार केलेलं हे डिजि-टेल अॅप! वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या गोष्टी या डिजि-टेल अॅपवरूनही करता येतात.
शिवाय तुम्ही कुठे आहात, त्या विशिष्ट ‘लोकेशन’वर आधारलेल्या अधिकच्या सेवा हे अॅप पुरवतं. म्हणजे जवळचा बस स्टॉप, पार्किंग-लॉट कुठे आहे, तिथे आत्ता गाडी पार्क करायला जागा आहे का, सायकलींचं डॉकिंग स्टेशन कुठे आहे, सायकल-लेन्स कुठे मिळतील, जवळपासची रेस्टॉरण्ट्स, शॉपिंग मॉल इ.
डिजि-टेल रेसिडेण्ट्स कार्ड
तेरा वर्षावरील प्रत्येक नागरिकाला डिजि-टेल रेसिडेण्ट्स कार्डसाठी नोंदणी करता येते. त्यावेळी आपलं नाव-पत्ता-वय-व्यवसाय यांखेरीज इतर जास्तीची माहिती- म्हणजे सवयी, छंद, रिलेशनशिप स्टेटस, आवडतं संगीत, पदार्थ, कपडे, रेस्टॉरण्ट इ. नोंदवता येतं. त्या माहितीच्या आधारावर प्रत्येक व्यक्तीसाठी तिच्या उपयोगाच्या सेवा, सवलती, शहरातल्या कार्यक्रमांची-मैफलींची माहिती आणि तिकिटं ऑफर होतात. प्रत्येक कार्डधारकासाठी या वेबसाइटवर ‘पर्सनलाईज्ड वेबपेज’ची सुविधा दिली जाते. या वेबपेजवर त्या व्यक्तीने महानगरपालिकेशी केलेला प्रत्येक आर्थिक व्यवहार, वाहन-पार्किंग आदि परवान्यांचा तपशील, भरलेल्या-बाकी असलेल्या करांची माहिती, घरांचे नकाशे आदि तपशील साठवलेला असतो. शिवाय ती व्यक्ती राहते त्या भागाशी आणि तिच्या कुटुंबाशी संबंधित सर्व त:हेच्या सूचना, अॅलर्ट्स (म्हणजे आज पाणी येणार नाही, तुमचा रोजचा रस्ता आज दुपारी अमुक वेळात दुरुस्तीसाठी बंद असेल, तुमच्या मुलीला अमुक लस देण्याचा दिवस जवळ येतो आहे, तुमच्या आवडत्या गायकाची मैफल येत्या रविवारी अमुक ठिकाणी आहे इ.) या पानावर मिळतात.
आपण राहत असलेल्या नागरी भागासाठी महानगरपालिकेच्या विविध विभागांतर्फे होत असलेला/होणारा खर्च, नियोजित प्रकल्प, त्यासाठी उपलब्ध निधी इ. माहितीही इथे अपडेट होते. ही माहिती एसएमएसमधून पाठवली जावी, ईमेलवर मिळावी की छापील पत्रतून घरपोच मिळावी, रोज मिळावी की आठवडय़ातून अमुक वेळा असे पर्याय निवडता येतात.
(लेखिका ‘लोकमत’च्या फीचर एडिटर आहेत.)
aparna.velankar@lokmat.com