सितार सितारा नादयोगी
By Admin | Updated: September 27, 2014 15:03 IST2014-09-27T15:03:53+5:302014-09-27T15:03:53+5:30
सतारवादनाचं बक्षीस मिळवणारा १0 वर्षांचा एक मुलगा ते सतारवादनाचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कार्यक्रम करणारे जगप्रसिद्ध सतारवादक, बेळगाव ते मलेशियातील फाईन आर्ट्स विद्यापीठाचे डीन, हा उत्तुंग प्रवास आहे उस्ताद उस्मान खान यांचा. अमृतमहोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त एका कलावंतानेच उलगडलेला हा कलाप्रवास..

सितार सितारा नादयोगी
रवी परांजपे
इसवी सन १९५२ च्या सुमारचं बेळगाव. त्या गावातली त्या वेळची सांगीतिक श्रीमंती दृष्ट लागावी अशी होती. ज्यांना संगीतात ‘गुणिजन’ म्हणतात असे अनेक गायक-वादक व रसिक त्या काळी बेळगावात वास्तव्यास होते. संगीत शिकू पाहणार्या तरुण-तरुणींची बेळगावातील संख्याही लक्षणीय असायची. बेळगावची आर्ट सर्कल ही अशीच एक महत्त्वाची संस्था. या संस्थेमार्फत प्रतिवर्षी भरवल्या जाणार्या संगीत-गायन-वादन स्पर्धा माझ्यासाठी एक पर्वणीच ठरायची. अर्थात, एक तरुण रसिक या नात्यानं! त्या सुमारास एका वर्षी धारवाडहून स्पर्धेस आलेला सुमारे दहा वर्षांचा एक मुलगा, सतारवादनातील पहिलं बक्षीस पटकावून गेला. त्या वर्षी त्याचं नाव लक्षात राहिलं नाही. पण त्याचा प्रसन्न हसरा चेहरा, त्यानं अंतर्मुख बनून केलेलं सतारवादन अगदी पक्कं लक्षात राहिलं.. आश्चर्यचकित करून गेलं! नंतरची दोनही वर्षे सतारवादनाचं पहिलं बक्षीस पुन्हा त्याच मुलानं पटकावलं. मी चौकशी केली. मुलाचं नाव उस्मान असल्याच समजलं. त्यानंतरच्या वर्षी उस्मान पुन्हा दिसला नाही. कारण, सलग तीन वषर्ं बक्षीस मिळवणार्या स्पर्धकांना, नियमाप्रमाणे, स्पर्धा बंद झाली होती. मी पण १९५३ पासून सुरू झालेल्या उच्चकला परीक्षांच्या अभ्यासात गढून गेलो. उस्मानच्या प्रसन्न चेहर्याशिवाय, अंतर्मुख होऊन केलेल्या अप्रतिम सतारवादनाशिवाय, इतर फार काही लक्षात राहिलं नाही. त्यानंतर चाळीस एक वर्षे उलटली.
मी मुंबईतील बत्तीस वर्षांचं अभिजात-उपयोजित चित्रकलेतलं योगदान संपवून पुण्यात १९९0 च्या जूनमध्ये आलो.. हळूहळू रुळायला लागलो.. संगीत क्षेत्रात जास्त! आणि एक दिवस १९९२च्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवात घोषणा कानावर पडली : रंगमंचावर येत आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध सतारवादक उस्मानखान. तबल्यावर त्यांची साथ.. पुढील शब्द मी ऐकलेच नाहीत. कारण बालपणीच्या उस्मानचा बदललेला चेहरा न्याहाळत मी केव्हाच पुन्हा बेळगावला पोचलो होतो.. त्या मनातल्या काल्पनिक बेळगाव भेटीतून मला पुन्हा पुण्यात आणलं, ते उस्मान खान साहेबांनी छेडलेल्या मालकंसच्या स्वरांनी. एका बाजूने मालकंसचे आलाप आता मला कवेत घेत चालले होते. आणि दुसर्या बाजूनं उस्मानचं उस्मानखानमधे झालेलं संवेदनशील कलावंताच्या पातळीवरील परिवर्तनही लक्षात येत होतं. या परिवर्तनात काय काय घडलं असेल, याचा तर्कही मी बांधू शकत होतो. कारण उस्मानखान साहेबांच्या आधी पाच वर्षे मी स्वत:च त्या परिवर्तनातून गेलो होतो.
लाभलेलं कलाशिक्षण; आणि अंतरी विकसित होत चाललेल्या कलात्मक धारणा, यांचा मेळ कसा घालायचा?.. कलावंताच्या परिवर्तनात हा प्रश्न त्याला खूप अस्वस्थ करत असतो. या प्रश्नाची सोडवणूक कोण कशा रीतीने करतो, यावरच त्या कलावंताच्या कलाजीवनाचा नूर ठरत असतो.. त्याची स्वत:ची शैलीही या नुरावरच अवलंबून असते. तो नूर जर चिंतनशील असेल, तर कलावंताची शैलीही तशीच असणार. तो नूर जर दिखाऊ असेल, तर शैलीही दिखाऊ ठरणार. उस्मानखानसाहेबांचा मालकंस त्या दिवशी मला चिंतनशील दिखाऊपणाचा समतोल राखणारा वाटला. माझ्या स्वत:च्या कलात्मक चित्तवृत्तीशी जवळचं नातं जोडून गेला! त्या नंतर आमची प्रत्यक्ष भेट केव्हा-कुठे झाली?. आज नीटसं आठवत नाही! परंतु त्या भेटीनंतर उस्मानखान साहेब आणि माझ्यातले सूर.. तारा.. एकदम जुळल्या, एवढं मात्र खरं. आम्ही कौटुंबिक मित्रही बनलो; आणि म्हणता म्हणता, उस्मान खानसाहेबांच्या नादपरिवाराचाही भाग बनलो. माझ्या सत्तरी-प्रवेशानिमित्तानं नादमधे झालेला माझा सत्कार खानसाहेब व माझ्याही सांगीतिक मित्रांनी मिळून केला होता. त्या दिवशी प्रथम पं. श्रीकांत देशपांडे तासभर गायले. आणि नंतर खानसाहेबांनी तासभर सतारीवर षण्मुखप्रिया हा एक अपरिचित पण विलक्षण लोभस असा राग वाजवला. धारवाडमधील बालपण, स्वगृही लाभलेले घरंदाज शिक्षण-संस्कार ते पुण्यातील नादपर्व हा उस्मानखान साहेबांचा सांगीतिक प्रवास महत्त्वाचा आहे. धारवाड ते पुणे या अंतरातील प्रत्यक्षातील मैलांचे दगड किती, हा प्रश्न बाजूला ठेवू या. कारण खानसाहेबांसारख्या कलावंतानं पार केलेल्या प्रवासातील मैलांच्या दगडांची मोजदादच होऊ शकत नाही. किंबहुना ते मैलांचे दगड नसतातच! ते असतात कलावंताची सत्त्वपरीक्षा घेणारे क्षण.. असंख्य आणि अनमोल!
अशा असंख्य क्षणी स्वत:च घेतलेल्या स्वत:च्या सत्त्वपरीक्षेत उत्तीर्ण होत पंचाहत्तरी गाठण्याचा क्षण आयुष्यात येणं, म्हणजे अनमोलच नाही का? आज उस्ताद उस्मानखान साहेब या क्षणावर.. अनमोल अशा क्षणी उभे आहेत. या क्षणी त्यांना आपल्या सांगीतिक वाटचालीतील काय काय आठवत असेल? -मला प्रश्न पडतो, पण क्षणभरच! कारण त्यांना लाभलेल्या सांगीतिक वारशाचा त्यांना रास्त असा अभिमान आहे हे मला माहीत असतं. त्यामुळेच म्हैसूर दरबारच्या नवरत्नांपैकी एक अशा उस्ताद रहिमत खानसाहेबांचे स्मरण त्यांना नेहमीच होत असतं. ते उस्मान खानसाहेबांचे आजोबा. कर्नाटक विद्यापीठातील संगीत विभागाचं प्रमुखपद ज्यांनी भूषवलं असे उस्ताद अब्दुल करीम खानसाहेब उस्मान खानसाहेबांचे पिताजी आणि प्रत्यक्ष गुरू. या समृद्ध कौटुंबिक वारशातून उस्मानखान साहेबांनी जे जे वेचलं, त्याला त्यांनी आपल्या कठोर रियाझानं आणि चिंतनानं एका मॉड्यूलचं स्वरूप दिलं. सतारवादनाच्या गायकी-अंग आणि तंत-अंगाच्या समतोल ऐक्याचं ते मॉड्यूल म्हणजे सर्जनशीलतेच्या अनेक शक्यतांचं उदाहरणच ठरलं. तो एक ब्रेक थ्रू ठरला. त्याच्या घराण्याला पुढं घेऊन जाणारा ब्रेक थ्रू! यामुळेच उस्मानखानसाहेबांची दखल पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, पंडित गंगुबाई हनगल आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी या थोर कलावंतांनी घेतली. या थोरांचे आशीर्वाद लाभले. त्या पैकी गंगुबाई आणि भीमसेनजी उस्मान खानसाहेबांना किती जवळचे मानीत, याचा मी स्वत:च साक्षीदार आहे.
उस्मान खानसाहेबांना आज भारतातील सर्वच प्रमुख शहरांत झालेले, तसेच विदेशांतील कार्यक्रम स्मरत असणारच. परंतु मार्सेलिस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय गिटार फेस्टिव्हलमध्ये पूर्वेकडील देशांपैकी फक्त उस्मानखान साहेबांची झालेली निवड, माझ्यासह त्यांच्या सर्व चाहत्यांच्याही अभिमानाचा विषय ठरली, यात शंका नाही. मलेशिया येथील स्वामी शांतानंद सरस्वती यांच्या द टेंपल ऑफ फाईन आर्ट्स या संस्थेचे उस्मानखान साहेब आंतरराष्ट्रीय डीन आहेत. स्वामी शांतानंद सरस्वती यांनी खानसाहेबांना सितार सितारा नादयोगी म्हणूनही गौरवलं आहे. फाय फाउंडेशनचा पुरस्कार, लक्ष्मी कला संस्कृती पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कला गौरव पुरस्कार लाभलेल्या उस्मानखान नामक या गुणी मित्रास पंचाहत्तरी प्रवेशानिमित्तानं मनापासून शुभेच्छा!
(लेखक ज्येष्ठ चित्रकार आहेत.)